ऑनलाईन रिव्यू वाचून फिरायला चाललात, मग सांभाळून

१३ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


फिरायला जायचं असो किंवा डिनरला आपण हमखास ऑनलाईन जाऊन त्या त्या ठिकाणांचे रिव्यू वाचतो. मग तिथली हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंगच्या जागांपासून सगळंच बघतो. आणि त्यानुसार आपली ट्रीप प्लॅन करतो. पण आपण रिव्यू वाचून एखाद्या ठिकाणी गेलात आणि ती तिथे वेगळंच पाहायला मिळालं, असं कधी झालंय?

आपण वर्षातून किमान एकदा तरी फिरायला जातो. प्रसिद्ध ठिकाणं पाहणं, तिथल्या संस्कृतीची माहिती घेणं, आठवणी जमवणं यात आनंद असतो. आता तर आपल्याकडे गुगलसारखी भारी गोष्ट आहे. ज्यावर आपल्याला अख्ख्या जगाची माहिती मिळते. त्याच्या आधाराने आपल्या फिरण्याचा प्लॅन बनवणं ही गोष्ट आता नवीन राहिली नाही.

फिरायला जाताना आपण गुगल मॅपवरून जागेचं अंतर, तिथल्या तापमानापासून सर्व गोष्टी बघतोच. हॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंट, दुकानं किंवा इनडोर हँगआऊट प्लेसेस इत्यादींचा रिव्यू बघतो. त्यानुसार प्लॅन ठरवतो. पण प्रत्येक वेळी रिव्यूतली गोष्ट खरी ठरत नाही. कधीतरी आपण फसतो.

नुकताच ब्रिटीश कन्ज्युमर असोसिएशनने एक अहवाल सादर केला. त्यातल्या माहितीनुसार जगभरातल्या रिव्यू देणाऱ्या वेबसाईटवरचे १०० पैकी १५ रिव्यू हे फेक असल्याची माहिती समोर आलीय.

रिव्यू सांगणाऱ्या वेबसाईट वाढल्यात

आपण तर साधं आपल्याच शहरात डिनरला कुठे जाणार असलो तरी गुगलवर रेस्टॉरंट शोधतो, त्याचे रिव्यू बघतो, मेन्यू बघतो आणि ठरवतो. रिव्यू देणाऱ्या अनेक रिव्यूअर्सना किंवा इन्फ्लुएन्सरना आपण फॉलोसुद्धा करत असतो. आपल्याला रिव्यू बघायला, वाचायला आवडतातही. म्हणूनच डिजिटल रिव्यू कंपन्या किंवा एजन्सी मोठ्या प्रमाणात येतायत. तर अनेक ट्रॅवल कंपन्या स्वत:चे रिव्यू ब्लॉग बनवतायत.

आपल्याकडे २००३ नंतर इंटरनेटचा वापर वाढू लागला. मग आपल्याला इंटरनेटची सवय झाली. आपल्याला मदत करणाऱ्या वेगवेगळ्या वेबसाईटही वाढू लागल्या. त्यापैकी एक म्हणजे आपल्या आजूबाजूच्या आणि जगभरातल्या गोष्टींची माहिती आणि रिव्यू देणाऱ्या वेबसाईट. २०१०नंतर या वेबसाईटचं प्रस्थ वाढलं.

हेही वाचा: सोन्याचांदीच्या किंमती वरखाली का होत आहेत?

ट्रॅवल कंपन्यांपेक्षा रिव्यू कंपन्या फायद्यात

ग्लोबल बिझनेस ट्रॅवलचे व्यवस्थापक मायकल मॅकक्रॉमिक यांनी द गार्डियन या इंग्लंडमधल्या इंग्रजी वर्तमानपत्राला माहिती दिलीय, ट्रॅवल रिव्यू एजन्सीचा व्यवसाय पर्यटन व्यवसायापेक्षा जास्त वाढतोय. कारण प्रत्यक्ष त्या ठिकाणाला किती लोकांनी भेट दिली यावरुन त्यांची मिळकत ठरत नाही. तर वाचकांनी वरच्युअल भेट दिल्यावर, प्रतिक्रिया, लाईक, जाहिराती आणि प्रमोशन इत्यादी सर्व गोष्टींवर त्यांचं उत्पन्न अवलंबून असतं.

२०१८मधे या व्यवसायाच्या उत्पन्नात ९ टक्क्यांनी वाढ झाली. मेक माय ट्रिप, ट्रिप ऍडवायजर, यात्रा इत्यादी टॉप वेबसाईटचे महिन्याचे विजिटर हे ३०० ते ७०० कोटींच्या घरात गेले असल्याची माहिती द न्यूयॉर्क टाईम्स या अमेरिकेतल्या इंग्रजी वर्तमानपत्राने आपल्या बातमीत दिली.

रिव्यू देणाऱ्यांवर ग्राहकांचा विश्वास नाही

या कंपन्यांचं उत्पन्न वाढत असलं तरी या कंपन्या ग्राहकांचा विश्वास मिळवण्यात मात्र कमी पडतायत. नुकतंच ट्रीप ऍडवायजर कंपनीला ग्राहकांची माफी मागावी लागली. कारण त्यांनी दिलेल्या जगातल्या टॉप १० हॉटेलांची यादी फेक होती. ट्रीप ऍडवायजर ही अमेरिकेतली कंपनी. ती गेल्या अनेक वर्षांपासून भारतातही काम करते आहे. या कंपनीने ऑनलाईन रिव्यू क्षेत्रात सर्वात पहिलं पाऊल टाकलं. पण यांनाही ग्राहकांचा विश्वास जिंकता आला नाही.

कित्येक महिन्यांपासून ही कंपनी वादात अडकली आहे. सातत्याने फेक रिव्यू या तक्रारींमुळे कंपनी त्रासली आहे. त्यांनी रिव्यू देणाऱ्या रिव्यूअर किंवा इन्फ्युएन्सरचे नियम कडक केले. पण त्याचाही काहीच फायदा झाला नाही. ही गोष्ट फक्त ट्रॅवल कंपन्यांपुरताच मर्यादित नाही, तर झोमॅटो, गुगल लोकल गाईडपासून सर्वच ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ग्राहकांचा विश्वास बसावा म्हणून मेक माय ट्रीपने फोटोत दिसतंय आणि रिव्यूत लिहिलंय तसे हॉटेल रुम किंवा सोयी नसतील तर पैसे परत मिळतील किंवा लगेचच हॉटेल बदलून मिळेल असे उपक्रमही राबवलेत.

हेही वाचा: जो मजा साथ दौड़ने में है...

रिव्यूअर तुरुंगात गेल्याने धक्का

एका महिन्यापूर्वी इंडिया टुडे मासिकात फेक रिव्यूवर लेख आला होता. त्यात दोन वर्षांपूर्वी इटलीत घडलेल्या एका घटनेची माहिती दिली होती. एक अमेरिकेतलं वृद्ध जोडपं इटलीत फिरायला गेलं होतं. त्यांनी इटलीतल्या एका ट्रॅवल रिव्यू एजन्सीचे रिव्यू वाचून सर्व ट्रीप प्लॅन केली. पण त्यांची फसवणूक झाली.

ट्रीपच्या जागा, हॉटेल हे सगळं प्रत्यक्षात वेगळंच निघालं. त्यांच्या पैशांचं नुकसान तर झालंच पण मानसिक त्रासही सहन करावा लागला. म्हणून त्यांनी फेक रिव्यू दिल्याबद्दल त्या एजन्सीची तक्रार केली. आणि इतिहासात कधीच घडलं नव्हतं ते घडलं. रिव्यू देणारी व्यक्ती तुरुंगात गेली.

या घटनेचा धसका घेत सर्वच कंपन्यांनी रिव्यू तपासणं, रिव्यू देणाऱ्यांच्या प्रोफाईल बघणं, रिव्यूत काय असावं या सगळ्याचे नियम कडक केले. पण तरीही ब्रिटीश कन्ज्युमर काऊन्सिलने दिलेल्या माहितीनुसार अजूनही फेक रिव्यू थांबवण्यात जगातल्या कोणत्याच कंपनीला यश आलेलं नाही.

हेही वाचा: आसाममधे फेल गेलेली एनआरसी महाराष्ट्राच्या उरावर बसणार?

रिव्यूअर खोटे रिव्यू का देतात?

मागच्या आठवड्यातल्या मनोरमा साप्ताहिकात काही भारतीय ऑनलाईन रिव्यू एजन्सींनी बाजू मांडलीय. सोशल मीडिया, शॉपिंग वेबसाईटवरसुद्धा फेक रिव्यू देतात. मग फक्त ट्रॅवल इंडस्ट्रीलाच नियम कडक का? एकूणच फेक रिव्यूवर बंधनं आणली पाहिजेत असं म्हणणं रिव्यू एजन्सींचं होतं.

रिव्यूअर किंवा इन्फ्लुएन्सर आता सेलिब्रेटी झालेत. त्यांनी स्वत:ची पेज, वेबसाईटपासून यूट्युब चॅनल वगैरे काढलेत. त्यांच्याकडे अनेक हॉटेल, रिसॉर्ट कंपन्या त्यांच्या प्रमोशनसाठी येतात किंवा त्यांना स्पॉन्सर करतात. अशावेळी हे इन्फ्युएन्सर अनेकदा फेक रिव्यू देतात. तसंच कधी इतर इन्फ्युएन्सरचे रिव्यू घेऊन त्यात बदल करून पब्लिश करतात. स्वत:चा फायदा करताना मात्र ग्राहकांची मात्र फसगत होते, ही माहिती सोशल मीडिया मॅनेजर आदित्य पाटील यांनी कोलाजला दिली.

खोटे रिव्यू कसे ओळखायचे?

रिव्यू वाचताना किंवा बघताना आपण काही गोष्टींवर लक्ष दिलं तर फेक रिव्यू ओळखता येऊ शकतात. पाटील यांनी फेक रिव्यू ओळखताना कोणते मुद्दे बघावेत याबद्दल काही टीप्स कोलाजच्या वाचकांना दिल्यात.

१. रिव्यूच्या वेळा बघणं. दोन ते तीन तासाच्या अवधीत किंवा एकाच दिवसात किंवा एकाच आठवड्यात एकाच हॉटेलचे रिव्यू आलेत का हे बघणं.

२. रिव्यू अतिरंजित लिहिलाय का किंवा विशेषणांचा अतिवापर झाला आहे का हे बघावं.

३. रिव्यू लिहिणाऱ्याचं नाव, फोटो आणि त्यांची प्रोफाईल तपासावी. बऱ्याचदा कोणत्याही निक नेमनी रिव्यू दिलेले असतात. आणि बऱ्याचदा हे फेक रिव्यूअर असतात.

४. रिव्यूमधे सतत हॉटेलच्या अनुभवापेक्षा हॉटेलची वैशिष्ट्यं सांगितली असतील तर तो स्पॉन्सर्ड रिव्यू असू शकतो.

५. फक्त सुरवातीचे किंवा शेवटचे रिव्यू न वाचता मधलेसुद्धा वाचावेत.

हेही वाचा: 

दिल क्यों पुकारे आरे आरे?

‘आरे’ला कारे केल्याने मुंबईतली एक संस्कृती हरवणार आहे!

भारताला मोहालीच्या खेळपट्टीची देणगी देणारे दलजित सिंग

आवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट