आज डावखुऱ्यांचं उजवेपण समजून घेण्याचा दिवस

१३ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


आज १३ ऑगस्ट. वर्ल्ड लेफ्ट हँडर्स डे. डावखुरं असणं हे वेगळं किंवा कमीपणाचं समजलं जातं. या जगात उजव्यांइतका डाव्यांचाही तेवढाच हक्क आहे. जग पादाक्रांत करणारे सगळे महान लोक डावखुरे आहेत. आपल्या असामान्य बुद्धिमत्ता आणि वेगळेपणातून त्यांनी आपआपल्या क्षेत्रात मोठी प्रगती केलीय.

’तू खाण्यासाठी डावा हात वापरतोस?’ ’तू डावखुरा आहेस का?’ डाव्या हातानं खाणाऱ्या किंवा काम करण्यासाठी डाव्या हाताचा वापर करणाऱ्यांना लहानांपासून मोठ्यांना हा प्रश्न नेहमी विचारला जातो किंवा या प्रश्नार्थक वाक्यातून तुम्ही काही तरी वाईट काम करता असा प्रश्न विचारणाऱ्याला सुचित तरी करायचं असतं. असा प्रश्न-प्रसंग अपमानास्पद असतो. असे अनेक प्रसंग माझ्याही वाट्याला बालपणापासून आलेत.

शाळेतही टोमने मारले जायचे

प्राथमिक शाळेत असताना वऱ्हाडी ’डकन्या’ या शब्दानं माझं नामकरण झालं होतं. डकन्या म्हणजे डावखूरा. नावानं कुणी हाक मारण्यापेक्षा ’डकन्या’ नावानंच मी ओळखला जायचो. वर्गात रांगेत मला वेगळं बसवलं जायचं. मधल्या सुट्टीत डब्बा खाताना वर्गमित्र डाव्याच हातानं खातो म्हणून जवळ बसू द्यायचे नाहीत. वर्गशिक्षक ही तेव्हा डावखुरा असण्यावरून खिल्ली उडवायचे. आपण डावखुरे आहोत याचं तेव्हा खूप वाईट वाटायचं. आपलं काही तरी चुकलंय असा तेव्हा पक्का समज झाला होता.

पुढे माध्यमिक शिक्षण घेतानाही यापेक्षा वेगळा अनुभव आला नाही. उजव्या हातानं गणित केलं तरच मी तपासेन अशी अजब अट तेव्हा शिक्षक घालायचे. घरात तर उजव्या हातानं लेखनाचा सराव होण्यासाठी शिक्षक घरी यायचे. कुठल्याही कामासाठी डावाच हात पुढे व्हायचा तेव्हा समोरच्याचा पहिला शब्द अपमानास्पद असायचा. हातावर प्रसाद वगैरे तर कधीतरी किंवा उजवा हात पुढे केला तरच मिळायचा.

सगळे विचारायचे ’खाणं आणि धूणं एकाच हातानं करतोस का रे?’, ’शिक्षकाचा मुलगा असूनही तुला कुठला हात वापरावा याचं वळण नाही का?’ असे अनेक प्रसंग आणि चेष्टा मी ऐकत आलोय. जन्मदात्या वडलांनी मात्र कधीच डावेपणावरून टोकलं नाही की हिणवलं नाही. कॉलेजमधे शिकताना डावखुरेपणाबद्दल बरंच वाचायला मिळालं. त्यातून डावेपणा ही काही व्याधी नाही तर ती अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. पुढे अनेक गोष्टी कळल्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक डावखुऱ्या व्यक्तींशी ओळख झाली.

१३ ऑगस्ट हा ‘वर्ल्ड लेफ्ट हँडर्स डे’

डावखुरं असणं आजार नाही. ते पूर्णपणे नैसर्गिक आहे. त्याबद्दल समाजाला आणि डावखुऱ्यांच्या पालकांना समजावं हा उद्देश या दिवसामागे आहे. समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या सर्व लोकांपर्यंत डावखुऱ्यांच्या समस्या पोचाव्या, त्यांना योग्य त्या सुविधा मिळाव्यात, सर्वात महत्त्वाचं म्हणजे डावखुरेपणा हे अशुभ नसून ते नैसर्गिक आहे. हे सत्य पालकांपर्यंत पोचावं, जनजागृती व्हावी जेणेकरुन डावखुऱ्यांचं भावविश्व कोमेजून जाऊ नये.

त्यांना मानसिक दडपण येऊ नये यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. लिहिताना किंवा इतर कुठलंही काम करताना एखादी व्यक्ती आपल्या दोन हातांपैकी कुणा एका हाताचा वापर करायला सुरवात करतो. त्यात एका हाताचा वापर हा अधिक प्रमाणात करतो. अत्यंत नॅचरली एखादा व्यक्ती हा डावा किंवा उजव्या हाताचा वापर करायला लागतो.

बऱ्याचदा असंही पाहण्यात आलंय की कुणी व्यक्ती आपले दोनही हात काम करण्यासाठी वापरतो. एखादा लहान मुलगा हा डाव्या हाताने काम करत असेल तर कुटुंबातले लोक त्याला उजव्या हाताने काम करण्याची सक्ती करतात. अशावेळी ते मूल वेगवेगळ्या कामासाठी आपल्या डाव्या किंवा उजव्या हाताचा वापर करतं. सचिन तेंडूलकर हा उजव्या हाताचा फलंदाज आहे पण लिखान किंवा इतर कामासाठी तो डाव्या हाताचा वापर करतो.

हेही वाचा: रशियन फेसअॅपवर फोटो एडिट करताय. मग आपण सावध राहिलं पाहिजे

लेफ्ट हँडर्स विरुद्ध राईट हँडर्स

आपल्याकडे डाव्या हाताने काम करणाऱ्या व्यक्तींना पालक नेहमी मनाई करताना दिसतात. पालकांच्या, समाजाच्या मान्यतेनुसार डाव्या हातानं काम करणं हे शुभ लक्षण मानलं जातं. अनेकदा डावखुऱ्या माणसाला पालकांच्या, शिक्षकांच्या दबावामुळे उजव्या हातानं काम करावं लागतं. डावखुऱ्या व्यक्ती लिहिताना फार विचित्र पोझिशन घेतात. ती समोरुन दिसायला विचित्र वाटते त्यावरून त्यांच्यावर शाळेपासून ते सामाजिक वावरात प्रचंड टीका होते.

जात, धर्म, पंथ यात विभागलेला आपला समाज अजून एका विषारी दुराग्रहानं विभागलाय. डावखुरा अर्थात लेफ्ट हँडर्स अणि उजवा राईट हँडर्स यात. जगात ८७ टक्के लोकं हे उजव्या हाताचे आहेत. १० टक्के लोक हे डावखुरे आहेत. तर ३ टक्के लोक दोन्ही हातांचा वापर लिहिण्यासाठी आणि इतर कामासाठी करतात. जे लोकं दोन्ही हातानं काम करतात त्यांना क्रॉस वायर्ड म्हटलं जातं. कुणी तरी डावखुरं असणं किंवा नसणं ही सामान्य प्रोसेस आहे. फार मोठं रॉकेट सायन्स त्यात अजिबात नाही, असं जाणकार सांगतात.

मानवी शरीर रचना आणि डोक्याची संरचना यावरच सगळं अवलंबून असतं असं संशोधकांचं मत आहे. आपल्या समाजात डावखुरं असणं हे पाप किंवा ईश्वरीय कोप समजलं जातं. आजही डाव्या हाताने काम करण्याला मान्यता नाही किंवा ते कमी दर्जाचं समजलं जातं. आपण वेळोवेळी डावखुऱ्या लोकांच्या यशाचं रहस्य ऐकत आणि वाचत असतो. त्यावर चर्चा करत असतो. पण डावखुरेपणाबद्दल आपल्या मनात अनेक शंकाही आहेत.

डावखुरं असावं की नसावं हे कसं ठरत?

शरीराच्या जेनेटिक, लर्निंग थिअरी, डोक्याची संरचना आणि इतर काही कारणांवर कुणी उजवं असावं की डावं हे ठरतं. डॉ. ओमप्रकाश यांच्या रिपोर्टनुसार, डावखरं किंवा उजवं असण्यामागे मुख्य कारण हे जेनेटीक आहे. हा रिपोर्ट इंटरनेटवर उपलब्ध आहे. काही रिपोर्टनुसार, कुणाचं राईट हँन्ड होणं किंवा लेफ्ट हँन्ड होणं हे आाईच्या गर्भातच निश्चित होत असतं. सांगायचं तात्पर्य इतकंच की आपली सामाजिक कार्यप्रणाली नाही तर आपल्या मेंदुची किंवा डोक्याची कार्यप्रणाली आणि जडणघडण ठरवते की आपण डावं असावं कि उजवं!

जनरल फिजिशियन डॉ अनिल बन्सल यांच्या मते, या सगळ्यामागे ब्रेन थिअरी हे प्रमुख कारण आहे. देश विदेशातल्या अनेक अभ्यासांचा हवाला देत ते नमूद करतात की, मानवी मेंदू हा दोन भागात विभागला जातो. ते म्हणजे डावा भाग आणि उजवा भाग. वैद्यकीय भाषेत सांगायचं तर, उजव्या बाजुच्या मेंदूचा भाग मानवी शरीराच्या डाव्या भागाला नियंत्रित करणं तर डाव्या भागाचा मेंदू हा शरीराच्या उजव्या भागाला नियंत्रित करतो.

यानुसार ज्या व्यक्तीच्या उजव्या भागाचा मेंदू हा जास्त सक्रिय असतो त्या व्यक्तीच्या शरीराचा डावा भाग जसं की, डावा हात, डावा पाय, इतकेच काय तर डावा डोळादेखील तुलनेत जास्त सक्रिय असतो. तसंच उजव्या मेंदूच्या बाबतही होतं.

डाव्यांचं उजवेपण असंही

डॉ. अरूण स्वादी यांच्या मते, डावखुऱ्यांचा उजवा हात हा उजव्यांच्या डाव्या हातापेक्षा अधिक कुशल असतो. त्याचा फायदा डावखुऱ्यांना मिळतो. डाव्या सर्जन मंडळीच्या बाबतीत हे विशेष जाणवतं. आपल्या मुलानं डाव्या हातापेक्षा उजवा हात वापरावा अशी सक्ती पालक अतिरेकीपणे करतात त्यातून हे होत असावं पण याला शास्त्रीय आधार नाही.

त्यांच्या मते ‘वैद्यकीय शास्त्रानुसार पुरुषांमधे डावखुरेपणाचं प्रमाण अधिक आहे. डावखुरे हे उजव्यांपेक्षा अधिक स्मार्ट, क्रिएटीव आणि प्रगल्भ असतात. मानसिक आजारांचं प्रमाणही यांच्यात किंचित जास्त असतं. उजवे लोक पटकन मान्य करणार नाहीत पण संशोधनानुसार डावखुरे लोक हे जास्त विचारी असतात, त्यांना अवघड गोष्टी पटकन समजतात.'

क्रीडा क्षेत्रात डावखुऱ्या व्यक्तींचं वर्चस्व आहे ते त्यांच्या वेगळेपणामुळेच. खेळात ते नेमकी काय भुमिका घेतील याचा अचुक अंदाज बांधता येत नाही, त्यामुळे ते प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवतात.

डाव्यांची ‘उजवी’ अडचण

डावखुऱ्या व्यक्तींची मोठी अडचण आहे ती म्हणजे मानसिक दडपण. डावखुरं असणं हे इतरांपेक्षा वेगळं किंवा कमी पणाच लक्षण आहे असा त्यांच्यासोबतचा व्यवहार असतो. त्याचं डावखुऱ्या व्यक्तींवर प्रचंड मानसिक दडपण असतं. केवळ डावखुरेपणातून कमी लेखणं हे मानसिक त्रासदायक असतं. पुजाअर्चेत सहभागापासून ते लिखाणापर्यंत डाव्यांना आजही हिणवलं जातं. पण सध्या परिस्थिती बदललीय. डावखुरेपणाबाबत भारतीय समाजात जागृती होत असल्यामुळे आज तेवढं दडपण पालक मुलांवर टाकत नाहीत.

डावखुऱ्या व्यक्तींबाबत खरी अडचण आहे ती म्हणजे जगात सगळीकडे वस्तू बनवल्या जातात त्या उजव्यांची सोय लक्षात घेऊनच. साधं उदाहरण द्यायच झालं तर कात्री. किंवा हातानं वापरायचे छोटे छोटे यंत्र. म्युझिक इंस्ट्रुमेंट जसं गिटार, बासरी, व्हायोलिन इ. दुचाकी, चारचाकी वाहनांच ऑपरेटींग हे उजव्या हातांच्या लोकांचाच विचार करून तयार केलेलं आहे. गेल्या काही वर्षांत मात्र विदेशात डाव्यांचा विचार करून यंत्र आणि वस्तू बनवल्या जात आहेत. भारतात मात्र अजून यावर काही काम नाही.

हेही वाचा: जगात सर्वात जास्त वापरलं जाणारं इमोजी कोणतंय?

लेफ्ट हँडर्सचीही असोशिएशन

डावखुऱ्या व्यक्तींसाठी एक संघटनाही आहे. लेफ्ट हँडर्स असोशिएशन नावाची संघटना औरंगाबाद इथुन काम करते. डावखुऱ्या व्यक्तींबद्दल समाजातला दुराग्रह दूर करणं, त्यांच्या समस्या समाजासमोर मांडणं, त्यांच्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करणं अशी कामं ही संस्था करते. तसंच या विषयावर संशोधन आणि लेखनही संस्था सातत्यानं करतेय.

लेफ्ट हँडर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, भारतात डावखुऱ्यांची संख्या आज १२ कोटी आहे. हा आकडा एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात १० टक्के इतका आहे. या संस्थेनं डावखुऱ्या व्यक्तींच्या कार्यावर आधारीत विविध उपक्रम सुरु केलेत. जगातल्या डावखुऱ्या व्यक्तींच पहिलं संग्रहालय गोव्यात आहे. ते लेफ्ट हँडर्स क्लबनं सुरू केलंय. जगातल्या महान कलावंत, साहित्यिक, खेळाडू  इत्यादींचे पुतळे आणि त्यांच्याबद्दल अनोखी माहिती या संग्रहालयात आहे.

काही जगप्रसिद्ध डावखुरे व्यक्ती

महात्मा गांधी, नेपोलियन बोनापार्टा, लिवोनार्द द विंची, अल्बर्ट आईनस्टाईन, न्यूटन, कार्ल मार्क्स, मदर तेरेसा, अमेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी, बिल क्विंटन, बराक ओबामा, लंडनचे युवराज प्रिंन्स विल्यम, भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी, बेंजामिन फँकलीन, एपल मोबाईल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स्, उद्योगपती रतन टाटा, राहूल बजाज, धीरूभाई अंबानी, लक्ष्मी मित्तल, फोर्ड या जगप्रसिद्ध कार निर्माता कंपनीचे संस्थापक हेर्नी फोर्ड हे डावखुरे आहेत.

तसंच फेसबुकचा मालक मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस्, अभिनेत्री अँजेलिना जोली, अमिताभ बच्चन, आशा भोसले, आशा पारेख, आशुतोष गोवारीकर, रजनीकांत, हरिप्रसाद चौरासिया, चार्ली चॅपलीन, वॉल्ट डिस्ने, मायकेल जॅक्सन, टॉम क्रुर्झ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, जगजेता राजा सिकंदर, चित्रकार पाब्लो पिकासो, पत्रकार रवीश कुमार, सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, एलन बॉडर, ब्रायन लारा, ज्वाला गट्टा, मेरी कोम, टेनिस खेळाडू मार्टीना नरवातिलोवा, चेस खेळाडू गॅरी कॅस्पारोव्ह हेही डावखुरेच आहेत.

विज्ञानालाही न समजलेला चमत्कार

उजव्या लोकांना आपण डाव्यांपेक्षा अधिक उजवे असल्याचं सातत्यानं वाटतं. एकेकाळी भारतात डाव्या लोकांची सावली पडलेली चालायची नाही. त्यांचा साधा स्पर्श देखील अशुभ मानला जायचा. आज परिस्थिती इतकी कट्टर नसली तरी डावखुऱ्या लोकांना त्यांच्या डावेपणावरून हिणवलं जातं. उपेक्षित केलं जातं. त्यांनी डाव्या हातानं केलेलं धार्मिक काम, विधी आजही अशुभ मानलं जातं.

धार्मिक लोक आजही डाव्या हातात प्रसाद द्यायला तयार होत नाहीत. डावखुऱ्या व्यक्तींच्या पालकांनी आपल्या पाल्यांच्या हितासाठी कठोर भुमिका घेऊन त्यांच्या डावखुरे पणाबद्दल समर्थन द्यायला हव. त्यामुळे पाल्यांच्या मनात संभ्रम निर्माण होणार नाही. या जगात उजव्यांइतका डाव्यांचा देखील तेवढाचं हक्क आहे. जग पादाक्रांत करणारे सारे महान लोक हे डावखुरे आहेत.

हा काही निव्वळ योगायोग नाही. आपल्या असामान्य बुद्धिमत्ता आणि वेगळेपणातून त्यांनी आपआपल्या क्षेत्रात मोठी प्रगती केलीय. १० ते १५ टक्क्यांच्या मायनॉरिटी ग्रृपचा विज्ञानालाही पूर्णपणे न समजलेला डावखुरेपणा हा चमत्कार आहे.

हेही वाचा: 

आता पूर ओसरतोय, आपण मदत कशी करू शकतो?

इस्त्रोचे संस्थापक विक्रम साराभाईंना गुगलची डूडल सलामी

पुरामुळे वाहन खराब झाल्यास बेसिक विमा काही कामाचा नाही