थोरांचे अज्ञात पैलूः आधुनिक महाराष्ट्रेतिहासाचा नवा अन्वयार्थ

२८ मार्च २०१९

वाचन वेळ : १९ मिनिटं


ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. सदानंद मोरे यांचा ‘थोरांचे अज्ञात पैलू’ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. ज्या व्यक्ती आणि घडामोडींनी आधुनिक महाराष्ट्राचं महाभारत आकाराला आलं, अशा व्यक्ती आणि त्यांच्या कार्यावर नव्याने प्रकाश टाकावा या हेतूने हे लेखन घडलं. विस्मृतीत गेलेल्या माणसांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करण्याच्या भावनेतून हे लेखन झालंय.

डॉ. सदानंद मोरे हे संतसाहित्य आणि महाराष्ट्रीय लोकव्यवहाराचे साक्षेपी अभ्यासक म्हणून परिचित आहेत. अर्धशतकाहून अधिक काळ ते ‘महाराष्ट्र विद्ये’चा एकांड्या निष्ठेने अभ्यास, लेखन करताहेत. महाराष्ट्राच्या अभ्यासाला चालना देणारी मोठी सामग्री त्यांनी उपलब्ध करून दिलीय. ‘तुकाराम दर्शन’, ‘लोकमान्य ते महात्मा,’ ‘गर्जा महाराष्ट्र’च्या महाग्रंथातून त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या समाज-संस्कृती इतिहासाची साक्षेपी मांडणी केलीय.

प्रदीर्घ कालपटावरच्या समाजजीवनातल्या अनंत धाग्यादोऱ्यांच्या गुंफणी अन्वेषणातून स्मृतिआड झालेला इतिहास प्रकाशमान केला. न्यायमूर्ती म. गो. रानडे, राजारामशास्त्री भागवत, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, श्रीधर व्यंकटेश केतकर, वि. का. राजवाडे, शं. बा. जोशी, इरावर्ती कर्वे, य. दि. फडके, वि. भि. कोलते, रा. चिं. ढेरे या विचारवंत-अभ्यासकांनी महाराष्ट्र अभ्यासाला नवी दृष्टी दिली. त्या वाटेवरूनच डॉ. सदानंद मोरे ‘महाराष्ट्र विद्ये’चा अलक्षित समाजपट समोर आणत आहेत.

अलक्षित माणसांवर प्रकाश

‘आधुनिक महाराष्ट्र’ हा त्याचा विशेष आस्थेचा विषय आहे. त्यादृष्टीने एकोणिसावं शतक आणि संपूर्ण विसाव्या शतकातल्या घडामोडींचा इत्यर्थ हा त्यांच्या अभ्यासाचा प्रमुख भाग आहे. तुकारामास केंद्रस्थानी ठेवून त्यांनी आधुनिक महाराष्ट्र समाजमनाचा धांडोळा घेतला. तसंच ‘लोकमान्य ते महात्मा’ या द्विबिंदूत महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण न्याहाळलं. या पार्श्वभूमीवर अलीकडेच डॉ. मोरे यांचा ‘थोरांचे अज्ञात पैलू’ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. दै. ‘सकाळ’च्या रविवार आवृत्तीतून प्रकाशित झालेल्या सदरलेखनाचं हे ग्रंथरूप आहे.

याआधी आधुनिक महाराष्ट्राविषयी ग्रंथलेखन करताना मोरे यांनी अनंत प्रकारची संदर्भसाधनं जमवली होती. मात्र ती त्या त्या ग्रंथाच्या विचारसूत्रांमुळे संबंधित ग्रंथात समाविष्ट केली नव्हती. त्याचबरोबर ज्या व्यक्ती आणि घडोमोडींनी आधुनिक महाराष्ट्राचं महाभारत आकाराला आलं, त्याचा पसारा हा अतिशय विस्तृत स्वरूपाचा होता. अशा व्यक्ती आणि त्यांच्या कार्यावर नव्याने प्रकाश टाकावा या हेतूने हे लेखन घडलं. यानिमित्ताने महाराष्ट्रेतिहासातल्या अलक्षित महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश पडला.

या लेखनाचा आणखी एक व्यापक दृष्टिकोण असा, की ‘समाजाचं यश काही व्यक्तींच्या वैयक्तिक अपयशाच्या पायावर उभं असतं. अशा व्यक्तींच्या यशोगाथांमधल्या प्रत्येक दोन ओळींच्या मधला न लिहिला गेलेला मजकूर अशा व्यक्तींच्या अपयशाचा असतो. त्यामुळे आपल्याला यश मिळालेलं असतं.’ अशा विस्मृतीत गेलेल्या माणसांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करण्याच्या भावनेतून हे लेखन झालंय.

विसाव्या शतकाचं पहिलं अर्धशतक केंद्रस्थानी

आधुनिक महाराष्ट्राच्या वाटचालीविषयीचं हे सखोल लिखाण आहे. समाज, धर्मचिंतन, राजकारण, सांस्कृतिककारणाची खोलवरची मीमांसा या लेखनात आहे. मात्र मोरे यांच्या महाराष्ट्रेतिहासाचा पाहणीबिंदू व्यक्ती आणि त्यांचं जीवनकार्य असा आहे. या ग्रंथात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, डाव्या पक्षांचं राजकारण, महर्षी शिंदे, संतवाङ्मय, ब्राम्हणेतर चळवळ आणि महानुभावीय साहित्याविषयाचे जवळपास ५० लेख या ग्रंथात समाविष्ट आहेत.

विसाव्या शतकाचं पहिले अर्धशतक हा या लेखनाचा केंद्रबिंदू असला तरी त्याची मुळं एकोणिसाव्या शतकात तसंच त्याचा विस्तार विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पसरल्याचं त्यांनी सूचित केलंय. त्यामुळे विसाव्या शतकातल्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडी हा या लेखनाचा लक्ष्यविषय आहे. या काळातला महाराष्ट्राचा वर्तनव्यवहार, विचारप्रवाह आणि त्याचा समाजजीवनावर झालेल्या प्रभाव परिणामाची विस्तृत चर्चा या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे. आधुनिक महाराष्ट्रातल्या धर्मचिंतन परंपरेचा परामर्ष या ग्रंथात आहे. महाराष्ट्रातल्या धर्मचिंतनाच्या मंदिराचा पाया तर्खडकरांनी रचला असून डॉ. आंबेडकरांनी त्यावर कळस चढवल्याचं मोरे सांगतात.

भारतीय राजकारणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं म्हणून एक विशिष्ट स्थान राहिलंय. जवळपास शतकभराच्या काळातल्या संघउदय, वाटचाली, यासंबंधीचं मौलिक असं विवेचन मोरे यांनी केलंय. संघासंबंधी यापूर्वी केलेल्या लेखनापेक्षा हे लेखन वेगळ्या स्वरूपाचं आहे. अर्थात संघ उदयाची पार्श्वभूमी आणि वाटचाल हा ‘महाराष्ट्रा’च्या संदर्भात इथे आलाय. संघ उदयाच्या पूर्वखुणा, विचारधारा, संघ आणि हिंदू महासभा, संघ परिवर्तने, गोळवळकर, हेगडेवार, सावरकर, हर्डीकर यांच्या संदर्भात संघपाहणी केलीय.

आरएसएसबद्दलची महत्त्वाची निरीक्षणं

मातृभूमी आणि पितृभूमी, नित्यानित्यविवेक, भगवंताचे अधिष्ठान या दृष्टीने त्यांनी संघवाटचालीचा परामर्ष घेतलाय. मातृभूमीची लोकप्रिय प्रतिमा ही बंगालमधून आल्याचं डॉ. मोरे नोंदवतात. ‘शिवाजीचा आदर्श ठेवून महाराष्ट्राने हिंदू समाजाचं नेतृत्व करून धुरीणत्व स्वीकारुन हिंदू राष्ट्राची स्थापना करावी’ या राजवाडे सूत्राचा उल्लेख करुन ते संघाचे वैचारिक पूर्वज म्हणून राजवाडे यांच्याकडे बघतात.

आरएसएसची जडणघडण, वैचारिक भूमिका आणि व्यवहाराची वस्तुनिष्ठ चर्चा या ग्रंथात आहे. हे सांगत असताना त्यांनी काही गंमतशीर गोष्टीही नमूद केल्यात. लोकव्यवहाराचा एक भाग म्हणून ज्योतिषविशारदाने केलेली संघाची पत्रिका आणि त्यावरचं भाष्यही दिलं. तसंच काळानुरुप भाषिक चिन्हवापरचा अर्थसंकोच किंवा विस्तार झाल्याची उदाहरणं त्यांनी दिलीत.

‘वंदे मातरम्’ शब्दाच्या बाबतीत तसं घडलं. त्यासोबतच ‘भक्ती’ हा शब्द आज देवतांसंदर्भात वापरला जात असला तरी तो एकेकाळी ‘राजकीय संदर्भात’ वापरला जात होता. ‘भक्ती म्हणजे सेवकाची राजावरची निष्ठा’ या अर्थाने तो वापरला जात होता हे नमूद करायलाही ते विसरत नाहीत.

महाराष्ट्रातल्या मार्क्सवादी, साम्यवादी पक्षांचं राजकारण आणि त्यांचा व्यवहार हाही मोरे यांच्या लेखनाचा महत्त्वाचा विषय आहे. कार्ल मार्क्सच्या विचारांचे पडसाद महाराष्ट्रीय जीवनात कसे उमटले याची चर्चा या ग्रंथात ठिकठिकाणी आहे. मार्क्सवादी पक्षाबरोबरच रॉयवादी, शेकाप, समाजवादी विचारप्रवाहांचाही परामर्ष आहे. एका अर्थाने महाराष्ट्र घडणीत विविध विचारधारांनी केलेल्या भरणपोषणाची ही चर्चा आहे.

अर्थात ती सलग एकरेषीय नसणारच त्यामुळे वाढ, विस्तार आणि अंतर्विरोधाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र समाजमन कसं आकारास आलं त्याची चिकित्सा त्यांनी केलीय. मानवेंद्रनाथ रॉय, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, कॉ. भुस्कुटे ते महर्षी शिंदे यांच्या वर्गमांडणीचा परामर्ष मोरे यांनी घेतलाय. संयुक्त महाराष्ट्र चळवळींपासून ते धरणग्रस्तांच्या आंदोलनापर्यंतच्या डाव्या पक्षाच्या कामगिरीचा परामर्ष आहे. अर्थात हे विवेचन करताना डाव्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारामुळे स्थानिकत्वाचं तसंच बहुप्रसरणाचं भान लोप पावल्याचं सांगायलाही ते विसरत नाहीत.

लोकमान्य टिळक आणि त्यांचं विचारविश्व

लोकमान्य टिळक आणि त्यांचं विचारविश्व हा सदानंद मोरे यांच्या विचारविश्वाचा एक महत्त्वाचा भाग राहिलाय. टिळकांच्या तत्कालीन आणि उत्तरकालीन व्यक्तिमत्त्वाचं आकर्षण आणि प्रभाव समाजजीवनात पसरल्याच्या अनेक नोंदी मोरे यांच्या लेखनात आहेत. टिळकांच्या समाज, राजकारण आणि धर्मकारणांच्या चिकित्सेसोबतच टिळकांच्या अज्ञात सहकाऱ्याच्या चरित्रकार्याची रूपरेखाही यामधे आहे.

टिळकांचा विचारवारसा चालवणाऱ्या व्यक्तींचा इतिहास इथे नोंदवला आहे. ग. वि. केतकर, सदाशिव बापट, वासूकाका, बाळंभट्ट तसंच इतेरजणांवरही पडलेल्या टिळक प्रभावच्या नोंदी यात आहेत. या पुस्तकातला पहिलाच लेख हा टिळकांचे सहकारी आणि चरित्र संकलनकार सदाशिव बापट आणि म्हाइंभट यांच्यावर आहे. ‘लीळाचरित्र’ आणि ‘टिळकचरित्र’ याच्यातल्या दृष्टिकोणाचा तुलनात्मक पद्धतिशास्त्रधारे लिहिलेला लेख म्हणजे एखाद्या आदर्श लेखाचा नमुनाच म्हणायला हवा.

समाजेतिहासातल्या अनेक कर्तबगार व्यक्ती मोरे यांच्या चिंतनाचा विषय आहेत. दुर्लक्षित व्यक्तींचं कार्य त्यांनी नव्याने पुढे आणलं. एकाअर्थांने पायातले दगड हे नेहमी अदृश्य राहतात. या दुर्लक्षित अदृश्य वाटांचा निरंतर शोध हे या ग्रंथाची प्रमुख प्रेरणा आहे. टिळकांचे अत्यंत निकटचे सहकारी वासूकाका जोशींच्या कार्यावर त्यांनी दोन लेखातून प्रकाश टाकला. टिळकांच्या नित्य कार्यात आणि प्रवासात कायम त्यांच्याबरोबर असणाऱ्या वासू काकांच्या अनेक आठवणी आणि त्यासंबंधीची नवी माहिती या लेखांत आहे.

वासूकाकांची कल्पशक्ती, कार्यक्षमता आणि चळवळ्या स्वभावाची अनेक उदाहरणं दिलीत. त्यांच्या अफाट प्रवासामुळे त्याकाळी भारतात वासूकाका इतका प्रवास केलेला भारतात आणि भारताबाहेर अपवाद्भूतच कोणी केला असंल असं त्यांनी म्हटलंय. त्याकाळी वासूकाकांनी अफगानिस्तानात महानुभाव पंथाचा आणि चक्रधरांच्या भ्रमंतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. वासूकांकाच्या या प्रचंड उद्यमशीलतेची इतिहासकारांनी फारशी नोंद घेतली नसल्याचं सांगून टिळाकांच्या भव्य चरित्राखाली वासुकांकांचं चरित्र झाकोळून गेल्याचंही मोरे सांगतात.

एखाद्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे स्त्रोत समाजजीवनात दूरवर आणि सखोलपणे झिरपलेले असतात. याचे अनेक ध्वन्यर्थ मोरे यांनी शोधलेत. टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाचं जादुई आकर्षण समाजातल्या विविधस्तरीय लोकांना होतं. शिक्षित, पत्रकार, वारकरी ते अनेक भिन्न भिन्न वृत्तीच्या लोकांना टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाचं गारूड होतं. त्याचे अनेक सुसंगत तपशील ग्रंथात पानोपानी आहेत.

अगदी जोग महाराजांसारखं वारकरी सांप्रदायिक टिळक इंग्लंडला जाताना त्यांच्या मिरवणुकीत सहभागी होतात. त्यांना खांद्यावर घेतात. त्यांच्यावर अभंगरचना करतात. अर्थात व्यक्ती महात्म्य जसं त्यास कारणीभूत असतं तसंच त्या काळाचा दबावही अप्रत्यक्षपणे कार्यरत असतो. ‘लोणावळा ते आळंदी’ आणि ‘जोग महाराज ते साखरे महाराज’ या लेखांतून वारकरी संप्रदायातल्या परिवर्तन कामगिरीचा परामर्ष घेतलाय. जोग महाराज परंपरेतल्या जगन्नाथ महाराज पवार यांच्या कामगिरीचं वर्णन ते ‘वटवृक्षा’च्या रूपकाद्वारे केलंय. बीज, झाड, फांद्या, डहाळ्या, पारंब्या आणि त्यावर विहरणारे पक्षी या विस्तारणाऱ्या रूपकातून वारकरी परंपरेतल्या या टप्प्याचा विचार करतात.

महात्मा फुले परंपरेचा अन्वयार्थ

एकोणिसाव्या शतकातल्या महात्मा फुले यांचं इतिहासदत्त कार्य आणि विसाव्या शतकाच्या आरंभकाळातल्या या विचारपरंपरेची उपस्थिती आणि फलश्रुतीवर मोरे यांनी नवा प्रकाश टाकला. फुले विचारपरंपरेला नव्या काळात फुटलेल्या नव्या धुमाऱ्यांची चिकित्सा आहे. भालेकर, मुकुंदराव पाटील, दा. सा. यंदे, ते जागृतिकार पाळेकरांच्या अज्ञात कार्याचं दिग्दर्शन आहे. ‘जोडोनिया धन’ या लेखात जोतीराव फुले यांच्या अर्थाजनाचा आणि दानतवृत्तीचा वेगळा आणि सर्वस्वी नवा लेखाजोखा आहे.

एक उत्तम बागायतदार शेतकरी, ठेकेदार, कंत्राटदार अशा फुले पैलूंची माहिती सांगत मिळवलेल्या अर्थप्राप्तीचा फुले यांनी सामाजिक कामासाठी किती कल्पक उपयोग केला याची उदाहरणं दिलीत. फुले यांचा २५ एकर ऊस होता. त्याकाळी हडपसर-मांजरी परिसरातले फुले हे ‘पहिले बडे बागायतदार’ होतं अशी विपुल माहिती त्यांच्या लिखानात आहे.

मराठी ग्रंथप्रकाशन आणि मुद्रण व्यवसायात असामान्य कार्य करण्याऱ्या दामोदर सावळाराम यंदे यांच्या कार्यावरचे दोन लेख या ग्रंथात आहेत. पारनेर, मुंबई, बडोदा आणि मुंबई असा प्रवास घडलेल्या यंदे यांनी अवघ्या सतराव्या वर्षी प्रकाशन व्यवसायात आपला वेगळा ठसा उमटवला. महात्मा फुले आणि सयाजीरावांशी स्नेह असणाऱ्या यंदे यांनी मातृऋण आणि मित्रकर्तव्य म्हणून भागवत ग्रंथाचं प्रकाशन  केल्याची दखल मोरे आवर्जुन घेतात.

भारतीय इतिहासातला ‘पॅराडाइम शिफ्ट’

हजारवर्षांनंतर फुले यांनी भारतीय इतिहासात ‘पॅराडाइम शिफ्ट’ करण्याचं काम केलं. इथे फुले कार्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीने पाहिलंय. फुलेंनी धर्माची फेरमांडणी केली. फुले प्रत्यक्ष परमहंस सभेचे सदस्य नसले तरी या समाजाच्या मंडळींशी त्यांचा ऋणानुबंध होता. म्हणूनच ते फुले यांचा ‘अ-दीक्षित परमहंस’ असा उल्लेख करतात. ‘अ-ब्राह्मणी पॅराडाइम’ असं त्यांनी फुलेकार्याचं वर्णन केलंय.

पारंपरिक वैदिक पॅराडाइमला गौतम बुद्धानंतर नवा पर्याय फुले देतात. मोरे जसं परमहंस सभा आणि फुले यांच्यातले अनुबंध शोधतात. तसंच वारकरी पंथ आणि फुले यांच्यातल्या परस्पर अनुबंधांविषयी तुलनात्मक निरीक्षणं नोंदवतात. त्यात तुकारामपरंपरेचा धागा अनुस्यूत असल्याचं सांगतात. अभंग आणि अखंड यांच्यातल्या संहितावाचनाची सूक्ष्म तुलनात्मक निरीक्षणं या लेखात आहेत.

ब्राम्हणेतर चळवळीतले जागृतीकार पाळेकर यांच्या प्रगल्भ पत्रकारितेचं स्वरूपही सांगितलंय. बहुजन समाजासाठी निघालेल्या ‘जागृती’ या पत्राने पुढे सामाजिक, राजकीय जाणीवजागृतीमधे महत्त्वाची भूमिका बजावली. विरोध पत्करून ठामपणाने पाळेकरांनी विचार मांडला. त्यामुळेच ‘कोणत्याही पत्रकाराने आदर्श म्हणून पुढे ठेवावा असा हा निःपक्ष आणि प्रगल्भ पत्रकार होता’ अशा शब्दांत त्यांचा गौरव केला.

ब्राम्हणेतर पत्रकारिता असा एक लेखच या ग्रंथात आहे. ‘ब्राम्हणेतर’ हा शब्द राजारामशास्त्री भागवत यांनी पहिल्यांदा वापरल्याचं मोरे नोंदवतात. आधुनिक काळातली ब्राम्हणेतर पत्रकरिता ही मुख्यत्त्वे ‘माळी मंडळीनी व्यापली होती आणि गाजवली’ होती. त्यात मराठा समाजातल्या व्यक्ती नव्हत्या. मुकुंदराव पाटील यांनी मराठा जातीच्या बौद्धिक उदासीनतेवर टीका केली होती. या संदर्भातली मोरे यांची समाजशास्त्रीय मीमांसा अधिक भेदक आणि मूलगामी स्वरूपाची आहे.

मराठा समाजाचं पत्रकारितेकडे दुर्लक्ष

अठराव्या शतकापर्यंत मराठे हे जहागिरी, वतनात रममाण होते. त्यांचं हे ऐश्वर्य एकोणिसाव्या शतकात लयाला गेलं. त्यानंतर तो शेतीकडे वळला. ही शेती जिराईत आणि अडचणीची असल्यामुळे हा वर्ण सर्वच क्षेत्रांतून बाजूला पडला. या परिप्रेक्ष्यात मोरे समाजमीमांसा करतात. त्यामुळे मुळचे नाशिकचे असलेले फुले यांचे अनुयायी पाळेकर यांनी बडोद्याला पत्रकरितेत वेगळा ठसा उमटवला.

मोरे यांच्या व्यक्तींच्या या कर्तृत्त्व विश्लेषणाला कायम तुलनात्मक दृष्टीची जोड देतात. तुलनात्मक दृष्टिबिंदूतून ते व्यक्तीकार्याची मीमांसा करतात. यादृष्टीने वा. रा. कोठारी, प्रबोधनकार ठाकरे तसंच प्रबोधनकार आणि बाळासाहेब या विषयावर मोरेंनी लिहिलंय. वा. रा. कोठारी यांच्या कार्यातली विविध वळणं व्यापक पटावर सांगितलीत.

शरद जोशी, शरद पाटील दुर्लक्षित महानायक

वयाच्या पंचविसाव्या वर्षी कोठारी यांनी गीतारहस्यावर टीकालेख लिहिला. तो लेख वाचून टिळकांनी प्रभावित होऊन कोठारींना चर्चेसाठी बोलवलं. चर्चेत कोठारी काही नमले नाहीत, असं सांगून मोरे यांनी लिहिलंय. ‘कोठारी यांच्या भात्यात आणखी एक बाण होता. तो जोतीराव फुलेप्रणित सत्यशोधकी ब्राम्हणेतरी विचारांचा.’ तर तडजोड न करणारे आणि कर्मकांडाचा निषेध करणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे यांचा ते ‘एकांडे’ असं वर्णन करतात. याच तऱ्हेची तुलना मोरे यांनी ठाकरे पिता-पुत्राची केलीय.

ठाकरे यांच्यातल्ये विरोध भूमिकांची केलेली चर्चाही तितकीच महत्त्वाची आहे. प्रबोधनकाराची चौकट ब्राम्हणेतरांची होती. पुढच्या टप्पावर हिंदुंत्वाचा विस्तार करायचा असेल तर ‘मराठी माणसा’च्या हितसंबंधावर लक्ष केंद्रीत करायला हवं हे बाळासाहेबांनी हेरल्याचं मोरे सांगतात. या परिप्रेक्ष्यात ते प्रबोधनकार आणि बाळासाहेब यांच्या कामाची दखल घेतलीय.

या दृष्टीने स्वातंत्र्योत्तर काळातल्या शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी आणि विचारवंत कॉ. शरद पाटील यांच्या कर्तृत्त्वाची दखल ‘दुर्लक्षित महानायक’ या परिप्रेक्ष्यात घेतलीय. परोपकारी प्रेरणांना दाबून टाकत परहिताची कृत्यं करू पाहणाऱ्या व्यक्तींचा अतंर्गत संघर्ष शरद जोशीमधे त्यांना दिसतो. तर समताधिष्ठित समाजरचनेचा पुरस्कार करणाऱ्या शरद पाटील यांच्या वैचारिक कामगिरीचा त्यांनी यथातथ्य परामर्ष घेतलाय. पाटील यांनी डाव्या विचारांची कोंडी फोडून नवसाम्यवाद ते धर्मकीर्ती, दिग्नाग या बौद्ध वाटांवरून मार्क्स-फुले आंबेडकर वादाची मांडणी करून अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र  मांडल्याचं मोरे सांगतात.

महर्षी शिंदे यांचा कार्याचा अन्वयार्थ

लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, महात्मा फुले, वि. का. राजवाडे, महर्षी शिंदे ही मोरे यांच्या विचारविश्वातलं प्रमुख विसावा केंद्रं आहेत. महर्षी शिंदे यांच्या कार्याविषयी आणि कर्तबगारीविषयी त्यांच्या मनात नितांत आदर आणि खोलवरची आस्था आहे. महर्षींच्या कार्याचं द्रष्टेपण महाराष्ट्राने ध्यानात न घेतल्यामुळे ते पुन्हा पुन्हा महर्षींच्या कामगिरीकडे लक्ष वेधतात. समाजेतिहासातल्या वाटा आणि वळणांवर इतिहासदत्त कामगिरी बजावणाऱ्या व्यक्ती कार्याकडे पाहण्याची मोरे यांची ही दृष्टी आहे. त्यामुळे महर्षी शिंदे यांच्या राजकारण आणि समाजकारणाच्या अलक्षित बाबीकडें ते जाणीवपूर्वक लक्ष वेधतात.

महर्षींच्या समन्वयवादी विधायक कार्याच्या अनेक नोंदी त्यांच्या लेखनात आहेत. महर्षींच्या कार्याचं मोठेपण सांगताना मोरेंनी महर्षींनी काढलेल्या बहुजन पक्षाच्या जाहीरनाम्याकडे वर्गजाणिवांचा पहिला राजकीय आविष्कार म्हणून पाहिलं. ‘स्वातंत्र्याप्रेमी परंतु, समतेविषयी बेफिकीर असणारा टिळकानुयांयाचा पक्ष आणि समताप्रेमी परंतु स्वातंत्र्याबद्दल उदासीन अशा ब्राम्हणेतरांत विरोधविकास घडवून आणणाऱ्या महर्षी शिंदे यांच्या कार्याकडे दुर्लक्ष झालं,’ असं मोरे सांगतात.

वि. रा. शिंदेंनी बहुजनांना नेलं काँग्रेसकडे

महर्षी शिंदे यांनी आपली ‘डावी’ भूमिका कधीही लपवून ठेवली नाही. तसंच महाराष्ट्रातल्या ब्राम्हणेतरांच्या काँग्रेस प्रवेशाचं रहस्य ते महर्षी शिंदे यांच्याकडे देतात. त्या काळातले विविध अंतःप्रवाह ध्यानात घेऊन बहुजन समाजाला काँग्रेसमधे प्रवेशास प्रवृत्त करण्यात शिंदे यांचा महत्त्वाचा वाटा होता. ‘स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रीय बहुजन समाजाला काँग्रेसच्या मध्यामातून जी सत्ता मिळाली त्याचं श्रेय विठ्ठल रामजी शिंदे यांच्याकडे जातं. खेदाची गोष्ट अशी की, ही वस्तुस्थिती ती सत्ता उपभोगणाऱ्या मंडळीपैकी बहुतेकांसाठी अज्ञातच आहे’ असं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवतात.

शिंदे यांच्या कर्तृत्वाबद्दल एक निरीक्षण असं नोंदवलंय. ‘रानडे यांचा उदारमतवाद, फुले यांचा सत्यशोधनावर आधारित समताविचार, नि लोकमान्यांची स्वातंत्र्यप्रियता आणि गांधींचा सत्याग्रही विचार या विविध प्रभावांना आपल्यात रिचवून-पचवून सिद्ध झालेलं महर्षी शिंदे हे एकमेव व्यक्तिमत्त्व होय. असा अष्टपैलू परत होणं नाही.’ या शब्दांत शिंदे यांच्या कार्याची थोरवी मोरे नमूद करतात.

अस्पृश्यतानिवारण कार्याच्या इतिहासाला अनेक पैलू आहेत. काळाच्या वेगवेगळ्या टप्यांवर त्यासंबंधी जागृती झाली. विसाव्या शतकाच्या प्रारंभपर्वात अस्पृश्यतानिवारणाचं काम करणाऱ्यांमधे गांधीवादी समतानंद अनंत हरी गद्रे यांचा समावेश होतो. ‘ब्राम्हणांदिकाची सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक अशी सर्वांगीण प्रतिष्ठा भंग्याला प्राप्त करून देणं’ अशी अस्पृश्यता निवारणाची व्याख्या गद्रे यांनी केली होती. त्यांच्यावर टिळक आणि गांधींचाही प्रभाव होता. त्यांनी लिहिलेल्या नाटकात तलवारीचं नाव ‘सनदशीर तलवार’ असं असून तिची मूठ नीती आणि तिची धार सत्यपालन असल्याचं नोंदवलंय. यात मोरे उत्तरकाळातल्या गांधीयुगाच्या चाहुलीचं दर्शनही शोधतात.

राजवाडेंच्या मांडणीतली थोरवी आणि मर्यादा

मोरे यांना इतिहास संशोधक वि. का. राजवाडे यांच्याबद्दल कमालीचं आकर्षण असावं. राजवाडे यांच्या संशोधन आणि विचारकार्याबद्दल त्यांनी नवे मुद्दे मांडलेत. अर्थात तेही एकारलेल्या प्रेमापोटी नाही तर राजवाडे समजुतीचा नवा अन्वयार्थ मांडतात. राजवाडे यांच्या मांडणीतली थोरवी आणि मर्यादा सांगून राजवाडेंच्या विचारांत झालेल्या परिवर्तनाची नोंद घेतलीय.

प्रखर राष्ट्रवाद, जातीय अहंगड, हिंदुत्ववाद्यांना गोंजारणी मांडणी करणारे राजवाडे, उत्तरकाळात सुधारणावादी होत गेल्याचं मोरे सांगतात. गोत्रपुरुषांचा पंचनामा करून, मार्क्सच्या जवळ जाणारी भौतिकवादी मांडणी राजवाडे अखेरच्या काळात करतात. राजवाडेंनी महाराष्ट्रातल्या कर्तबगार पुरुषांची कसून केलेल्या यादीचं महत्त्व ते सांगतात. श्रीधर व्यंकटेश केतकरांनी आपल्या कादंबरीत उत्तरकाळातले राजवाडे चित्रित करून त्यांच्या आकलनाला नवी दिशा मिळवून दिल्याचं सांगतात. एकंदरीत राजवाडे यांच्या विचारांतला वाक्वळणांचा हा साक्षेपी वेध आहे.

एकांडे शिलेदार ठरलेल्या व्यक्तींची थोरवी डॉ. मोरे यांनी मोठ्या समाज फलकावर नमूद केलीय. पूर्वरचित ठरीव मतांपेक्षा तत्कालीन काळ, त्यातले अंतःप्रवाह, वाद-विवाद, स्पर्धा संघर्ष जाणून घेण्याची भूमिका या लेखांमागे आहे. या दृष्टीने त्यांनी अहिताग्नी राजवाडे यांच्या कार्याची दखल घेतलीय. पारंपरिक विचार हे आधुनिक ज्ञान-विज्ञानाच्या परिभाषेत राजवाडे यांनी मांडलाय. जिज्ञासू चौकसवृत्ती, ज्ञानपिपासू, स्वतंत्र निर्भिड विचारपद्धती आणि निःस्पृहता ही त्यांची वैशिष्ट्यं कुणालाही भुरळ पाडणारी अशी आहेत, असं त्यांनी म्हटलंय.

विस्मृतीत गेलेल्यांचा स्मृतिगाथा प्रकाशमान

बलोपासना हा स्वातंत्र्यलढ्यापूर्वीचा राष्ट्रवादाचा एक महत्त्वाचा आविष्कार होता. देशहितासाठी शरीर साधना केली पाहिजे. भारताचं हिंदूकरण आणि त्यासाठी हिंदूच्या सैनिकीकरणासाठी तालमी, आखाडे बांधले गेले. याचं विवरण ‘बाळंभटदादा देवधर आणि त्यांची परंपरा’ या लेखात केलंय. भटांच्या बलोपासना परंपरेचा इत्यर्थ मांडताना मोरे मिथककथांचे नवे अर्थ शोधतात. प्रत्यक्ष हनुमानाने बाळंभटाना दीक्षा दिली याचा अन्वयार्थ एका पुस्तकाधारे सप्तशृंगगडावर माकडांच्या कळपातल्या हालचालीतून मल्लखांबाची कल्पना सुचल्याचं मोरे सांगतात.

मोरे यांच्या या लेखनातून व्यक्ति समाजदर्शनासोबतच एक मूल्यदृष्टीही आहे. समाज वाटचालीतली स्थित्यंतरं हे व्यक्तीव्यक्तींच्या आणि समूहाच्या संदर्भात घडत असतात. काळाच्या ओघात कर्तबगार व्यक्तींच्या कार्याचं विस्मरण घडतं. समाजासाठी अहर्निश झटणाऱ्या ध्येयवादी व्यक्तीच्या कार्यात त्याचं वैयक्तिक अपयश लपलेलं असतं. अशा अपयशातूनच समाज अधिक उन्नत होत असतो. अशा विस्मृतीत गेलेल्या ‘जाणोनि नेणत्या’ व्यक्तींच्या स्मृतिगाथा प्रकाशमान करण्याची दृष्टी डॉ. मारे यांच्या लिखाणामागे आहे.

सदानंद मोरे यांचा ‘थोरांचे अज्ञात पैलू’ हा ग्रंथ मराठी विचारविश्वात मोलाची भर घालणारा आहे. महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराच्या विविध अंगांचा साक्षेपी वेध घेणारा हा ग्रंथ आहे. सिद्धांतन आणि प्रमेयदर्शनाऐवजी छोट्या छोट्या घटना, प्रसंग, घडामोडी, व्यक्तिस्वभाव, त्यातल्या अंतर्गत संगती, विसंगती संबंध शोधातून मोठ्या चित्रफलकाचा अन्वयार्थ त्यांनी लावलाय. बिंदूवत सरणीने काही एका निष्कर्षापर्यंत येणं हा त्यांच्या लेखनाचा विशेष आहे.

विसावं शतक आणि त्यातला लोकव्यवहार अर्थात तो समाजकारण, राजकारण आणि नागरी चर्चाविश्व या अंगाने जाणार असला तरी त्याची मुळं एकोणिसाव्या शतकातही ते शोधतात. महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण कोणत्या घडामोडींनी घडलं, विसाव्या शतकात त्यांचं वाहणं कोणत्या दिशांचा वेध घेत आकाराला आलं त्याचा आलेख या ग्रंथात आहे. विविध राजकीय विचारांच्या अंतःप्रवाहांनी समाजाला मिळलेल्या वळणांचे दिग्दर्शन आहे.

रंग आणि झेंड्याच्या परिभाषेत बोलायचं झालं तर लाल, भगवा, पिवळा, हिरवा, निळ्या आणि इतरही झेंड्याच्या उभारणीचा, घोडदौडीचा आणि गजबजाटाचा रंगावकाश विशाल अशा महाराष्ट्र लोकव्यवहारातून शोधलाय. रूढ इतिहासात आणि सामाजिक लेखनातून विस्मरणात गेलेल्या व्यक्ती कार्याची एकाअर्थाने ही स्मरणंच होत.

व्यक्तिगुणवर्णनाला फाटा देत व्यक्तिदर्शन

मोरे यांच्या लेखनदृष्टीचा एक विशेष म्हणजे अमूक एक प्रमेय गृहीत धरून ते विवरण करत नाहीत. लोकव्यवहारातल्या छोट्या-छोट्या संदर्भबिंदूची जोडणी करत ते एका निष्कर्षापर्यंत येतात. या लेखनाचा आणखी एक महत्त्वाचा विशेष म्हणजे ते वस्तुनिष्ठ आणि समतोल विवेकीपणाने लिहिलं गेलेलं हे लेखन आहे. आजच्या सामाजिक चर्चेत असं लिखाण अभावरूपानेचं आढळतं. गेल्या तीनेक दशकात ज्या एकांगी आग्रहीपणाने, वितंडवादाने चर्चा होतेय, त्या पार्श्वभूमीवर हा लेखनविशेष नजरेत भरतो. टोकाच्या अस्मिताकेंद्रांच्या आग्रहाने सध्याचं विचारविश्व गजबजलंय.

बऱ्याचदा आवडत्या विचारांच्या आग्रहामुळे सामाजिक इतिहासाचा अपलापही केला जातो. समग्रतेऐवजी तुकड्या तुकड्यांनी विचार मांडला जातो. पुरोगामी आणि प्रतिगामी विचारांच्या रणभेदी गर्जनांनी महाराष्ट्र आसंमत व्यापल्याचं चित्र आहे. त्यामुळे विचारांबद्दलचा संभ्रम तयार केला जातो. या अवडंबराने बव्हंशी सत्यस्वरूप झाकोळून जातं.

मराठीत विपुल प्रमाणात लिहिलं जाणारं व्यक्तीविषयक लेखन पाहिलं तर ते केवळ व्यक्तिगुणवर्णनपर स्वरूपाचं असतं. अशा लेखनाचा केंद्रबिंदू हा केवळ व्यक्तिकेंद्र असतं. त्यामुळे त्याच्या विस्ताराला स्वाभाविकच मर्यादा पडतात. मोरे यांच्या या लेखनाचा केंद्रवर्ती विषय हा व्यक्तीदर्शन असला तरी तो महाराष्ट्र समाजाच्या पार्श्वभूमीवरचा आहे.

एकाच वेळी व्यक्तीकार्य आणि त्याचा महाराष्ट्राच्या समाजजीवनावर उमटलेला ठसा या दुहेरी प्रकाशात हे लेखन घडलं. त्यामुळे हे लेखन व्यक्तिकेंद्री न राहता समाजकेंद्री होतं. ते घडत असताना त्या त्या व्यक्तिकार्याचं अनेकरंगी कोणातून दर्शनही घडवलंय. कप्पेबंद विचारवंताच्या आघाड्यांच्या पार्श्वभूमीवर डॉ. मोरे यांच्या या लेखनाला विशेष महत्त्व आहे. भावना गोंजारण्याच्या आणि भावना दुःखीच्या काळात नव्या पिढीसमोर असा लेखनादर्श दुर्मिळच म्हणावा लागेल.

आधुनिक महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचं दर्शन

मोरे यांच्या ग्रंथमांडणीतला विचारदृष्टीच्या पसारा पाहिला की थक्क व्हावं इतकी संदर्भ साधनांची जोडणी त्यास आहे. विविध ज्ञानशाखांच्या बहुल संदर्भांनी या लेखनाचं बांधकाम घडलं. सामाजिक शास्त्रापासून, वाङ्मयादी ग्रंथपासून ते लोकव्यवहारातल्या अनेक गोष्टींचा अंतर्भाव ते लेखनात करतात. विपुल घटना-प्रसंग तपशीलाच्या मांडणीतून त्या त्या काळातल्या लोकव्यवहाराला ‘अनेकआवाजीपण’ मिळवून दिलं. तसंच व्यक्ती-व्यक्तीचं कार्य आणि स्वभावरंग तपासताना तुलनात्मक दृष्टीचा फार कल्पक आणि सर्जनशील वापर त्यांनी केला. त्यामुळे या ‘तुळवसंहितेने’ अदृश्य समाजेतिहास उलगडलाय, तो सर्वस्वी वेगळा ठरतो.

मोरे यांच्या अन्वेषणदृष्टीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते त्याकाळातल्या घटनाप्रसंगाचे दुवे सामाजिक, वैचारिक, राजकीय लेखाणातून शोधतात. तसंच ललित वाङ्मयाचाही कानोसा घेतात. यादृष्टीने केतकरांच्या कादंबऱ्यातलं राजवाडे प्रतिमानाचं वाचन नवं ठरतं. तसंच अ. ब. कोल्हटकरांच्या कादंबऱ्यातून टिळक आणि शाहू महाराज, पुणे विरूद्ध कोल्हापूर यातल्या आंतरिक संबंधावर नवा प्रकाश पडतो.

‘कोल्हापूरचा जरिपटका आणि पुण्याचा भगवा झेंडा एकत्र येऊ द्या’ या कादंबरीतल्या म्हणण्याचा अन्वयार्थ नवा ठरतो. त्यांच्या लेखरूपावर सांगण्यांच्या कथनाचा प्रभाव आहे. हरदासी कीर्तनकाराप्रमाणे ही लेखनशैली निरूपणाची आहे. लेखशीर्षकांच्या निवडीतही या कथन आवाहनाचा प्रत्यय आहे.

डॉ. मोरे यांच्या व्यापक लेखनदृष्टीचं नातं राजा दीक्षित महाराष्ट्राच्या ‘भव्य सांस्कृतिक रंगपटावरील महाराष्ट्रविश्वरूप दर्शनात’ शोधतात. त्यामुळे डॉ. मोरे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या अज्ञात पैलूंचं घडवलेलं हे विहंगदर्शन मौलिक स्वरूपाचं आहे. विसाव्या शतकाचा पूर्वार्ध आणि काही प्रमाणात उत्तरार्ध हा त्याचा लक्ष्यबिंदू असला तरी त्याचे लागेबांधे एकोणिसाव्या शतकातही शोधलेत.

आधुनिक महाराष्ट्राची घडण होत असताना लोकव्यवहार कोणत्या दिशांनी निष्पन्न झाला त्यांच्या असंख्य नोंदी या ग्रंथात आहेत. पूर्वरचित मतांना वळसा घालून समाजजीवनाच्या समग्रतेला भिडण्याचा हा प्रयत्न आहे. लोकव्यवहार हा एकरंगी नसतो तर तो बहुआवाजी असतो याचं भान देणारा हा दस्ताऐवज आहे. त्यामुळे सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या या लेखनाचं विशेष महत्त्व आहे.

(लेखक हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक आहेत.)