कोरोनाकाळात असं मिळवूया आरोग्य विम्याचं संरक्षण

३० एप्रिल २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


ज्यांच्याकडे कोरोनाशी निगडित विमा योजना आहेत, त्या कंपन्या लसीकरणानंतर होणार्‍या उपचाराचा खर्च देत आहेत. पण सामान्य आरोग्य विमा पॉलिसीधारकांना मात्र खर्च द्यायला काही कंपन्या नकार देतायत. ही गोष्ट विमा नियामक संस्था इर्डाच्या समोर आल्यानंतर त्यांनी तातडीने पावलं उचलत सर्व विमा कंपन्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

कोरोनाचं संकट अधिक गडद झालंय. मोठ्या प्रमाणात नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणही वेगात सुरू आहे. पण काही मंडळींना लस घेतल्यानंतर त्याच्या दुष्परिणामाला सामोरं जावं लागतंय. ही गोष्ट पाहता विमा नियामक संस्था इर्डाने सर्व विमा कंपन्यांना काही सूचना केल्यात.

विमा कंपन्यांना सूचना

लस घेतल्यानंतर एखाद्या विमाधारकाला साईड इफेक्ट होत असेल, तर आणि तो हॉस्पिटलमधे दाखल होत असेल आणि त्यांनी उपचाराच्या खर्चासाठी दावा केला असेल, तर त्याची भरपाई करणं गरजेचं आहे. सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. काही मंडळी लस घेतल्यानंतर बाधित झाले नाहीत, पण दुष्परिणामामुळे त्यांची तब्येत अधिक बिघडल्याची उदाहरणं आहेत.

ज्यांच्याकडे कोरोनाशी निगडित विमा योजना आहेत, त्या कंपन्या लसीकरणानंतर होणार्‍या उपचाराचा खर्च देत आहेत. पण सामान्य आरोग्य विमा पॉलिसीधारकांना मात्र खर्च द्यायला काही कंपन्या नकार देतायत. ही गोष्ट इर्डा संस्थेच्या समोर आल्यानंतर त्यांनी तातडीने पावलं उचलत सर्व विमा कंपन्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. सामान्य पॉलिसीधारकांना लसीकरणानंतर होणार्‍या शारीरिक त्रासापोटी होणार्‍या खर्चाचा मोबदला द्यावा, असं सांगितलं आहे.

हेही वाचा: लस असतानाही आपल्याला वायरसवरच्या औषधांची गरज पडेल?

दावा केल्यानंतर खर्च मिळणार

लस दिल्यानंतर येणारे दुष्पपरिणाम पाहता विमा नियामक संस्थेनं म्हटलंय की, विमा कंपन्यांनी लस घेतल्यानंतर आजारी पडलेल्या लोकांचा खर्च उचलावा. जर एखादा व्यक्‍ती लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या त्रासाला, आजारपणाला सामोरा जात असेल तर त्याचा संपूर्ण खर्च विमा कंपन्यांनी देणं बंधनकारक आहे.

जर एखाद्याला हॉस्पिटलमधे दाखल करावं लागत असेल, तर विमा कंपनी त्याचा खर्च नाकारू शकत नाही. याशिवाय आजारी व्यक्‍तीला हॉस्पिटलमधे बेड मिळाला नाही आणि त्याला खासगी हॉस्पिटलमधे जावं लागत असेल, तर त्याचा खर्च विमा कंपन्यानी उचलणं आवश्यक आहे.

अर्थात खासगी हॉस्पिटलमधे उपचार करताना विमा कंपन्यांकडून त्याची खातरजमा केली जाणार आहे. सामान्य आरोग्य विमा असलेल्या नागरिकांना अडचणी आल्या तर विमा कंपन्यांना संपूर्णपणे खर्च उचलावा लागेल.

आरोग्य कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांना यश

काही काळापूर्वी आरोग्य कर्मचार्‍यांनी विमा नियामक संस्थेला काही गोष्टी लक्षात आणून दिल्या. लस दिल्यानंतर काही आरोग्य कर्मचारी आजारी पडत असून काही कंपन्या उपचाराचा खर्च उचलायला नकार देत असल्याचं त्यांनी सांगितलं. आरोग्य कर्मचार्‍यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत विमा नियामकने सर्व कंपन्यांना याबाबत सूचना देत खर्च उचलण्याची तंबी दिली.

जर एखाद्या व्यक्‍तीकडे कोरोनाशी संबंधित विमा पॉलिसी नसेल, पण त्याच्याकडे सामान्य पॉलिसी असेल, तर लस घेतल्यानंतर होणार्‍या उपचारापोटीचा खर्च हा अन्य आजारांप्रमाणेच उचलावा, असं सांगितलं आहे. उपचाराच्या खर्चासाठी केला जाणारा दावा हा इतर आजारांसाठी केल्या जाणार्‍या दाव्याप्रमाणेच राहील, असंही इर्डाने सांगितलंय.

हेही वाचा: कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

हॉस्पिटलचं विमा कवच

कोरोना प्रतिबंधक लस दिल्यानंतर त्याच्या दुष्परिणामामुळे एखादा व्यक्‍ती हॉस्पिटलमधे दाखल होत असेल, तर त्याचा संपूर्ण खर्च विमा कंपनी उचलेल. पण त्या व्यक्‍तीवर घरीच उपचार सुरू असतील, तर त्याची भरपाई कंपनी देणार नाही.

काही जण उपचारापोटीची खोटी वैद्यकीय बिलं दाखल करू शकतात, असा संशय इर्डाने व्यक्‍त केला आहे. कोणत्याही नोंदणीकृत डॉक्टरकडून उपचार केल्यानंतर विमाधारक हा खर्चाचा दावा करू शकतो. पण यासाठी विमा कंपनीकडून पडताळणी केली जाईल. या तपासणीत विमा कंपनी समाधानी नसेल, तर ती दावा द्यायला नकार देऊ शकते.

लस घेणार्‍याला जादा व्याज

देशात कोरोना प्रतिबंधक लस घेणार्‍या खातेदारासाठी एका बँकेने अनोखी योजना आणलीय. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने नवीन मुदतठेवी योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार जी मंडळी लस घेतल्यानंतर मुदतठेवी करतील, त्यांना बँक ०.२५ टक्के अतिरिक्‍त व्याज देईल.

लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी बँकेने विशेष योजना आणलीय. या योजनेला इम्यून इंडिया डिपॉझिट स्कीम असं नाव दिलं आहे. त्याचा कालावधी हा १,१११ दिवस असेल. बँक या योजनेनुसार ज्येष्ठ नागरिकांना त्यांना मिळणार्‍या व्याजापेक्षा ०.२५ टक्के अधिक व्याज देईल. लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकालाही या योजनेचा लाभ मिळेल.

हेही वाचा: 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

क्वारंटाईनमधेही लोकांना जातीची माती का खावी वाटते?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

(अपर्णा देवकर यांचा लेख दैनिक पुढारीतून साभार)