आजपासून क्रिकेट वर्ल्डकप, ‘या’ बॅट्समनवर असणार सगळ्यांची नजर

३० मे २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


इन्स्टंट क्रिकेटिंगमुळे बॅट्समनला अच्छे दिन आलेत. प्रत्येकजण आपल्या टीममधे चांगले बॅट्समन असण्यावर भर देतेय. एकहाती मॅच जिंकून देणाऱ्याला तर चांगलीच डिमांड आहे. आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपमधेही यंदा अशाच काही खेळाडूंचा बोलबाला असणार आहे.

इंग्लंडमधे आजपासून सुरु होत असलेल्या वर्ल्डकपमधे चाहत्यांच्या नजरा बऱ्याच प्रमुख खेळाडूंवर असणार आहेत. नुकत्याच झालेल्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातल्या वनडे सिरिजमधे बॅट्समनचाच बोलबाला राहिला. दोन्ही टीम्सनी जवळपास प्रत्येक मॅचमधे ३०० चा आकडा पार केला. त्यामुळे अवघ्या आठवड्याभराने होणाऱ्या वर्ल्डकपवर बॅट्समनच गाजवतील असा कयास लावला जातोय.

बॅट्समनचा बोलबाला

यंदाच्या वर्ल्डकपमधे कॅप्टन कोण असणार यापेक्षा चांगले बॅट्समन कोणकोण आहेत याचीच जास्त चर्चा आहे. जवळपास सगळ्याच टीम आपल्या विजयात निर्णायक भुमिका बजावू शकेल अशा बॅट्समनवर लक्ष दिलंय. त्यामुळे मैदान गाजवून शकतील अशा बॅट्समनची नावं आणि त्यांची कामगिरी आपल्यालाही माहीत असायला पाहिजे. कारण शेवटी क्रिकेट आता बॅट्समनचा खेळ झालाय. ज्याची बॅटिंग चांगली तो विजयाचा प्रमुख दावेदार असणार आहे.

इंग्लंडचा जोस बटलर, पाकिस्तानचा बाबर आझम, भारताचा रोहित शर्मा, दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आणि ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. या पाचही जणांमधे एकहाती मॅच फिरवण्याची क्षमता आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी टीमच्या बॉलर्सकडून या बॅट्समनची विकेट घेणं हेच सगळ्यात मोठं टार्गेट असणार आहे.

हेही वाचाः वर्ल्डकपच्या तोंडावर आयपीएलचा टीम इंडियाला फायदा की नुकसान?

जोस बटलर

इंग्लंडसाठी विकेटकिपिंग करणारा जोस बटलर सध्या भलत्याच फॉर्ममधे आहे. त्याने आयपीएलमधे राजस्थान रॉयल्ससाठी बॅटिंगची धुरा एकहाती सांभाळली. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या वनडेमधेही ५५ बॉलमधे ११० रन काढून वर्ल्डकपमधे आपण रन्सचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिलेत. 

जोस बटलरच्या नावाची येत्या काळात विराट कोहलीला टक्कर देण्याची क्षमता असलेला बॅट्समन म्हणून चर्चा आहे. त्याच्याकडे क्रिकेटिंग शॉट्स बरोबरच इम्प्रोवाईज शॉट खेळण्याचीही क्षमता आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट त्याला ओपनिंगसाठी तसंच मधल्या फळीतही बॅटिंगला पाठवू शकते. त्याने १३० वनडेमधे ४१.५४ च्या सरासरीने ३ हजार ५३१ रन काढलेत. यात ८ सेंच्युरीज आणि १८ हाफ सेंच्युरीजचा समावेश आहे.

हेही वाचाः वर्ल्डकपमधे तगड्या टीमला, लहान टीमने हरवण्याचा रेकॉर्ड भारताच्या नावावर

बाबर आझम

पाकिस्तानचा टीम कायमच त्यांच्या फास्ट बॉलिंगसाठी ओळखली जाते. त्यांच्या बॅटिंगची चर्चा फारशी होत नाही. पण गेल्या एक दोन वर्षात पाकिस्तानच्या बॅट्समननीही चांगली कामगिरी करत आपली आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण केलीय. यामधे प्रामुख्याने बाबर आझमचं नाव घ्यावं लागेल.

तो सध्या पाकिस्तानचा एक प्रमुख बॅट्समन म्हणून नावारुपाला आलाय. त्याने ६४ मॅचमधे ५१.६४ च्या सरासरीने २ हजार ७३९ रन काढल्यात. यामधे ९ सेंच्युरीज आणि १२ हाफ सेंच्युरीजचा समावेश आहे. यंदाच्या वर्ल्डकपमधे तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या बाबर आझमच्या भोवती पाकिस्तानची बॅटिंग फिरेल.

हेही वाचाः ऋषभ पंतचं वर्ल्डकपचं तिकीट का कापलं? ते कार्तिकला कसं मिळालं?

हाशिम आमला

जागतिक क्रिकेट वर्तुळात दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमलाची चर्चा फार होत नसली तरी तो रन फार काढतो. कसोटी बॅट्समन म्हणून सुरवात करणाऱ्या आमलाने वनडे आणि टी-२० फॉरमॅटमधेही आपलं चांगलंच बस्तान बसवलंय. त्याने वनडेमधे २७ सेंच्युरीज ठोकल्यात. त्याने एकदा का खेळपट्टीवर जम बसवला तर तो आऊट होण्याचं नावच घेत नाही.

आमलाची खेळी तांत्रिकदृष्ट्या दर्जेदार असल्याने त्याला आऊट करण्यासाठी बॉलर्सला चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. ओपनिंगला येत शेवटपर्यंत अँकर इनिंग खेळण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. आतापर्यंत त्याने ही जबाबदारी चोख पार पाडलीय. त्यामुळे त्याच्या या भूमिकेवर सध्या तरी कुणी संशय घेऊ शकत नाही.

हेही वाचाः मदतीला धावून येणाऱ्या टीम मॅनेजमेंटकडून नंतर वासीम जाफरने पैसेही घेतले नाहीत

रोहित शर्मा

भारताची बॅटिंग ही विराट कोहलीभोवती फिरत असली तरी ओपनर आणि वाईस कॅप्टन रोहित शर्मा हा यंदाच्या वर्ल्डकपमधला हुकमी बॅट्समन असेल. शर्माची बॅटिंग स्टाईल इंग्लंडमधल्या चांगला उसळी घेणाऱ्या पिचवर उपयुक्त ठरणार आहे. त्याच्याकडे पूल आणि हुक शॉट मारण्याची क्षमता असल्याने तो फास्ट बॉलर्सची चांगलीच धुलाई करेल.

शेवटपर्यंत बॅटिंग केली तर रोहितकडे एकहाती मॅच जिंकून देण्याची क्षमता आहे. त्यामुळे विराटपाठोपाठ रोहितही बॉलर्सचा कर्दनकाळ ठरण्याची शक्यता आहे. त्याच्या नावावर वनडेत ३ डबलसेंच्युरीजची नोंद आहे. त्यामुळे इंग्लंडमधल्या बॅटिंगला पोषक पिचवर रोहितकडून चौथी डबलसेंच्युरीज येते का याची उत्सुकता चाहत्यांना असणार आहे.

हेही वाचाः विनू मंकड महान क्रिकेटर, त्यांना फक्त मंकडिंगसाठी लक्षात ठेवणार?

डेविड वॉर्नर

वर्ल्डकप सुरु होण्याआधी काही महिने अगोदर ऑस्ट्रेलियाची टीम तितकीसी मजबूत नाही असं बोललं जात होतं. पण भारताला होमपिचवर हरवून ऑस्ट्रेलियाची टीम चांगलीच फॉर्मात आलीय. त्यानंतर एका वर्षाच्या बंदीनंतर डेविड वॉर्नर पुन्हा टीममधे आलाय. वॉर्नरने आयपीएलमधेच आपला हात अजमावत ऑस्ट्रेलियाच्या टीमला वर्ल्डकपच्या प्रबळ दावेदारांमधे आणून ठेवलंय. त्याने आयपीएलमधे सर्वाधिक रन करुन वर्ल्डकपसाठी चांगलाच सराव करुन घेतला.

तो टीममधे परतल्याने वर्ल्डकपमधे ऑस्ट्रेलियाला सलामीलाच फायर पॉवर मिळालीय. त्याच्या आक्रमक शौलीमुळे तो कोणत्याही बॉलरेची बॉलिंग फिगर बिघडवू शकतो. त्याची ओळख ही एक झुंजार खेळाडू म्हणून आहे. मोठ्या स्पर्धेमधे तो कायम आपली कामगिरी उंचावतो. त्यामुळे यंदाच्या वर्ल्डकपमधे वॉर्नरची फायर पॉवर बघायला मजा येणार आहे.

हेही वाचाः 

सचिन, आम्ही तुला हृदयातून रिटायर्ड करू शकत नाही

क्रिकेटची पिढी घडवणाऱ्या आचरेकर स्कूलची स्टोरी