धर्म कसला बघताय क्रिकेटपटूंची जिगर बघा

२८ जून २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


कोणतंही क्षेत्र असो. मुस्लिमांकडे बघण्याचा एकूण दृष्टीकोन हा पूर्वग्रहदूषितच असतो. कधी व्यक्ती म्हणून तर कधी समाज म्हणून. क्रिकेट हे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. जगभरातल्या अनेक क्रिकेट संघांमधे आज मुस्लिम खेळाडू आहेत. त्यांचा धर्म मुस्लिम असला तरी त्यांनी आपल्या क्षमतेच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय.

क्रिकेट जाती धर्माच्या भिंती उद्ध्वस्त करणारा खेळ आहे. हा सांघिक खेळ असल्यानं संघातल्या प्रत्येकाला दिलोजानसे खेळावं लागतं. इथं कोण कुठल्या जातीधर्माचा आहे हे बघायचा प्रश्नच येत नाही. खेळ तेढ संपवणाराच असतो. यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत दहा टीम सहभागी झाल्यात आणि ते सगळे एकमेकांशी गुण्यागोविंदानं लढताहेत. मुस्लिमांकडे नेहमी संशयानं पाहिलं जातं.

या स्पर्धेतले संघ बघितले तर दिसतं की पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश या तीन संघांमधे मुस्लिमांचा भरणा अधिक आहे. बांग्लादेशच्या संघात जरुर काही हिंदू आहेत. पण भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका ह्यांच्या संघात एक तरी मुस्लिम आहे. श्रीलंका, न्यूझीलंड, आणि वेस्ट इंडिजमधे कुणी मुस्लिम नाही. ह्याचा अर्थ ह्या स्पर्धेत मुस्लिम खेळाडू बरेच आहेत आणि ते व्यवस्थित खेळताहेत. त्यांच्याकडे खिलाडूवृत्ती आहे आणि सांघिकरित्या खेळायची वृत्ती आहे.

मानवतावादी दृष्टीकोन असलेले खेळाडू

इंग्लंडच्या संघात दोन मुस्लिम चेहरे आहेत. एक मोईन अली तर दुसरा आदिल रशिद. दोघंही फिरकीपटू आहेत. म्हणजे इंग्लंडच्या फिरकी विभागाचे ते आधार आहेत. हे दोघंही मूळचे पाकिस्तानातले. मोईन पाकव्याप्त काश्मिरमधल्या मिरपुरी जमातीचा आहे. त्याचे आजोबा मिरपूरहून इंग्लंडमधे स्थायिक झाले. त्यांनी ब्रिटिश बेट्टी कॉक्स हिच्याशी विवाह केला. म्हणून मोईन तसा संमिश्र वंशाचा ठरतो. त्याचे वडील टॅक्सी ड्रायवर होते. त्यांच्या आजूबाजूची सगळी मुलं क्रिकेट खेळणारी होती. म्हणून मोईनही त्यांच्यात राहून क्रिकेटपटू झाला.

कबीर अली हा तर त्याचा चुलत भाऊ. मोईन लहान वयातच वारविकशायरसाठी खेळायला लागला आणि इंग्लंडच्या यंग टीमकडूनही खेळला. तो ह्या टीमचा यंग वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधारही होता. तो लगेचच इंग्लंडच्या मुख्य संघातही आला. २०१४ मधे भारताविरुद्धच खेळताना त्याने आपल्या रिस्टबॅन्डवर सेव्ह गाझा आणि फ्री पॅलेस्टाईन असा लोगो वापरला होता. त्याचा तेव्हाचा दृष्टीकोन मानवतावादी होता. पण आता धोनीच्या बलिदान लोगोवरुन झालं तसंच तेव्हा झालं. त्याला तो लोगो काढावा लागला. मोईन हा भरपूर चॅरिटी करत असतो.

त्याचा सहकारी आदिल रशिद मूळचा पाकिस्तानचा. त्याचा जन्म इंग्लंडमधल्या ब्रॅडफर्डचा. पण तोही मिरपुरी आहे. पाकव्याप्त काश्मिरमधून १९६७ मधे त्याचे वडील इंग्लंडमधे आले. ह्याचा जन्म १९८८ चा. दोन्ही भाऊ हसन आणि अमिर हेही चांगले क्रिकेटपटू आहेत. आदिलला ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू हेरी जेन्नर ह्याने प्रतिभाशोध योजनेंतर्गत हेरला. इंग्लंडला याचा लाभ करुन देणारा ऑस्ट्रेलियाचाच आहे लेहमन. त्याने आदिलला खूप सहाय्य केलं. पाकिस्तानातल्या पंजाबमधे तो लोकांसाठी काम करतोय.

हेही वाचा: टीम इंडिया निळ्याऐवजी केशरी रंगाच्या जर्सीमधे का खेळणार?

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे विक्रमवीर

दक्षिण आफ्रिकेच्या संघात दोन मुस्लिम आहेत. त्पापैकी हशिम अमला तर त्यांचा आघाडीचा फलंदाज आहे. वनडे आणि कसोटी दोन्ही प्रकारात त्यांच्या नावावर विक्रम आहेत. त्याचे वाडवडील गुजरातमधल्या सूरतचे अन्सारी कुटुंबातले. सगळे जण पक्के धार्मिक. हशिमचा मोठा भाऊ अहमदही छान क्रिकेट खेळायचा. दक्षिण आफ्रिकेत ते चांगल्या शाळेत शिकले. हशिम युवा विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार होता. नंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही.

श्रीलंकेविरुद्धच्या एका सामन्यात समालोचन करणाऱ्या ऑस्ट्रेलियन डीन जोन्सने अमलाची लांबलचक दाढी पाहून त्याचा टेरिरिस्ट असा उल्लेख केला यावरुन मोठा वाद झाला. जोन्सचे करारपत्र रद्द करण्यात आले. त्याने अमलाची माफी मागितली. पण अमलाने कुठलीही तक्रार केलेली नव्हती.

मॉलमधे काम करताना मिळाली संधी

इम्रान ताहिर हा गुगली टाकण्यात माहिर आहे. आज तो ४० वर्षांचा आहे. तरीही दक्षिण आफ्रिकेचा त्याच्यावर भरोसा आहे. त्याचा जन्म लाहोरचा. घरची परिस्थिती बेताची. एका मॉलमधे तो नोकरीही करत होता. त्याला पाकिस्तानच्या यंग टीम आणि अ टीममधे खेळायची संधी मिळाली. पण तो चमकला नव्हता. इंग्लडमधे कौंटी खेळता खेळता त्याला दक्षिण आफ्रिकेत जायची संधी मिळाली आणि तिथंही काही वादानंतर तो स्थिरावला. सर्वाधिक २७ संघांकडून खेळण्याचा एक वेगळाच विश्वविक्रम त्याच्या नावावर आहे.

ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा पहिला पाकिस्तानी असा मान उस्मान ख्वाजाने मिळवलाय. तो आज संघाच्या प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. त्याला वाटचाल करताना बरेच टोमणे, शेरेबाजी सहन करावी लागल्याचं तो सांगतो. त्याचा जन्म इस्लामाबादचा. वयाच्या पाचव्या वर्षी त्याचा परिवार ऑस्ट्रेलियात आला. तो हुशार विद्यार्थी होता. तो वैज्ञानिक होणाऱ्या परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याचा भाऊ अरसलान तारिक मात्र काही बेकायदेशीर कृत्यांमुळे तुरुंगात आहे.

हेही वाचा: ख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मगुरूंची क्रिकेट टीम

शमी: तेज आणि अचूक माऱ्यामुळे टीम इंडियात

भारताच्या शमी मोहम्मदने एक तेज गोलंदाज म्हणून आपलं नाव दुमदुमत ठेवलंय. शम्मी हाही साध्या कुटुंबातला. उत्तर प्रदेशातल्या अमरोहामधल्या साहसपूर ह्या गावचा. त्याचे वडील शेती करणारे. पण ते चांगले गोलंदाजी करायचे. त्यांची तिन्ही मुलं वेगात गोलंदाजी करायच्या वेगानं झपाटलेली. त्यांच्यापैकी शम्मीने प्रगती केली. त्याला वडलांनी बट्ठदिन या प्रशिक्षकाकडे सोपवलं आणि मग देवव्रत दास या भल्या माणसानं त्याचे गुण हेरून त्याला सर्वोतोपरी सहाय्य केलं.

आपल्या घरीही त्याला ठेऊन घेतलं आणि कलकत्यात आणलं. तिथे त्यांनीच निवड समिती सदस्य संबारन बॅनर्जीला त्याला बघायला लावलं. संबारनही प्रभावित झाला आणि एके दिवशी नेटमधे सौरव गांगुलीलासुद्धा त्याच्यात गुणवत्ता आढळली. मग काय शम्मीने सर्वांच लक्ष वेधलं. आणि भारतीय अ संघातून चमकला. त्याने अल्पावधित आपल्या तेज आणि अचूक माऱ्याने आपली भारतीय संघातली जागा बळकट केली.

दुखापतींमुळे त्याच्यावर संघाबाहेर राहण्याची वेळ वारंवार येत असते आणि पत्नी बरोबरच्या झगड्यामुळे त्याच्यावर पोलीस कारवाईही झाली. ह्या प्रकरणाबाबत मंडळाने नरमाईचं धोरण घेतल्यानं तो आज भारतीय संघात आहे. मात्र त्याचे सर्व सहकारी तो एक मनमिळाऊ, शांत स्वभावाचा असल्याचं सांगतात.

खरं तर हेच क्रिकेटचे बंदे

इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, भारत या संघातले हे मुस्लिम खेळाडू आपल्या संघासाठी मन लावून खेळताना आज दिसताहेत. त्यांची कामगिरी समाधानकारकही झालेली आहे. याचबरोबर बांग्लादेश टीमने अतिशय एकजूट दाखवत स्पर्धेत चमकदार कामगिरी केलीय. तर पाकिस्तानचा संघ भारताविरुद्धची लढत गमावल्यानं आपल्या चाहत्यांना पचवून मैदानात उतरताना दिसलाय.

अफगाणिस्तानचा संघ ह्या स्पर्धेतला लिंबू टिंबू संघ त्यांच्यात बेबनाव असल्याचं म्हटलं जात. पण तरीही त्यांनी भारताविरुद्धच्या लढतीत चांगली झुंज दिली. तेव्हा हे सारे खेळाडू कुठल्या धर्माचे आहेत त्याचा विचार न करता त्यांच्या जिगरीला मानलं पाहिजे. हेच खरं तर क्रिकेटचे बंदे आहेत.

हेही वाचा: 

पाकिस्तानने महाराजा रणजित सिंहांचा पूर्णाकृती पुतळा का उभारला? 

बसभाडं ५ रुपये केल्याने, बेस्ट पुन्हा मुंबईची लाईफलाईन बनेल?

पाकसोबत मॅच नको म्हणणारा गौतम गंभीर आता काय म्हणतोय?