अधूनमधून वाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीच्या बातम्या बाहेर येत असतात. उचलेगिरी करणाऱ्या लेखकांना तर प्रतिष्ठाही प्राप्त होते. समकालीन समाज हा आपल्या कॉपी राईटविषयी विशेष संवेदनशील राहिला नाहीय. त्यामुळे नैतिक जबाबदारी न स्वीकारता कष्ट न करता वाट शोधणारे लोक वाढू लागलेत. वाङ्मयचौर्याला खरंतर अर्थपूर्णतेचा निकष हवा. तो निकष पाळला नाही तर वाङ्मयचौर्य गुन्हा ठरतो.
वाङ्मयाच्या क्षेत्रात केल्या जाणाऱ्या चोरीचा इतिहास खूप मागे नेता येतो. सभोवतालच्या परिस्थितीत झालेल्या बदलानुसार चोरीच्या हेतूत, चोरीच्या पद्धतीत, चोरीच्या सैद्धान्तिक स्पष्टीकरणात बदल होतो. तसंच चोरीपासून होणाऱ्या फायद्या तोटय़ात म्हणजे चोरीच्या परिणामांत अर्थातच स्थित्यंतरं घडत जातात. असं असलं तरी चोरीचं अस्तित्व शिल्लक राहतंच.
तुकारामांचंच पाहा. त्यांना सालोमालो नावाच्या एका वाङ्मयशर्विलकानं बरंच पिडलं होतं. तुकारामांच्या अभंगातली त्यांची नावं काढून स्वतःचं नाव टाकलं जायचं. त्यांचे अभंग सालोमालो स्वतःच्या नावावर खपवायचा. ‘श्री तुकारामबावांच्या अभंगांची गाथा’ या सरकारी गाथेमधे ‘स्वामींचे अभंगींचे नांव काढून सालोमालो आपले नाव घालायचा त्यावर अभंग’ या शीर्षकाखाली एकूण आठ अभंग दिले आहेत. या अभंगांमधे तुकारामांनी सालोमालोची भली खरडपट्टी काढली आहे. त्यातल्या दुसऱ्या अभंगामधे ते म्हणतात,
सालोमालो हरिचे दास। म्हणऊन केला अवघा नास ।।१।।
।।धृ।। अवघें बचमंगळ केले। म्हणती एकांचें आपुलें ।।
मोडूनि संतांची वचनें। करिती आपणां भूषणे ।।२।।
तुका म्हणे कवी। जगामधीं रूढ दावी ।।३।।
तुकारामांनी सालोमालोला आंगडे फाडून घोंगडे करणारा, दुसऱ्यांच्या अलंकारांची चोरी करणारा चोर, विष कालवून अमृताचा नाश करणारा म्हटलंय. तर नाक कापून तिथं सोने लावणारा, बुक्का म्हणून माती विकणारा, पोटावर चिंध्या बांधून गरोदरपणाचं सोंग आणणारा अशी अनेक दूषणं दिलीत. यावर सालोमालोला काय म्हणायचं आहे, ते आपल्याला ठाऊक नाही.
हेही वाचा: वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची
कवी म्हणून मराठी साहित्याच्या इतिहासात सालोमालोचे नाव समाविष्ट झालेलं दिसत नाही. तुकारामांचा एकूण आवेश पाहता वाङ्मयचौर्य करणं या गोष्टीला सतराव्या शतकातल्या महाराष्ट्रात विशेष प्रतिष्ठा नव्हती असं म्हणता येतं. तो केवळ एक गुन्हाच नव्हता, वाङ्मयचौर्य करणं नैतिक दृष्टिकोणातूनही योग्य ठरत नव्हतं. पैसे देऊन दुसऱ्या कवींचे ग्रंथ स्वतःच्या नावावर करून घेणारे सत्ताधीश तेराव्या शतकापासून आढळत असले तरी त्यांचं कुणी कौतुक केल्याचं दिसत नाही.
गंमतीची गोष्ट अशी की स्वतःची लेखनप्रक्रिया स्पष्ट करताना तुकाराम हे लेखन आपलं नाहीच, अशी भूमिका घेताना दिसतात. आपल्याला कविता लिहावीशी वाटते याचं कारण आपल्या अंगात प्रतिभासामर्थ्य आहे, असं ते मानत नाहीत. देवच आपल्या मुखामधून बोलतो आहे असं ते सांगतात. तो आपला बोलवता धनी आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. हा कवित्व करतो असे कोणी म्हणाले तर त्याने माझी वाणी माझ्या स्वतःची नाही हे जाणून घेण्याची गरज आहे, असं ते आवर्जून सांगतात.
आपण काव्यनिर्मिती बद्दल केवळ निमित्त आहोत, दुकान भलत्याचंच आहे, आपण फक्त मापापुरते बसलो आहोत अशी त्यांची भावना आहे. आपलं कवित्व चोरलं म्हणून सालोमालोवर तुटून पडणारे तुकाराम, हे आपले कवित्व नाही अशी भूमिका घेत आहेत. ही भूमिका केवळ विनयामधून घेतली गेली आहे, असं म्हणता येत नाही. ते स्पष्टवक्ते आहेत.
कवीच्या निर्मितीवरच्या हक्कांविषयीच्या भूमिकेला आधुनिक काळात सैद्धान्तिक संदर्भ आहेत. त्यांच्यामुळे एक प्रकारे वाङ्मयचौर्याची विधायक बाजू पुढे येऊ लागली आहे. या प्रक्रियेच्या मुळाशी मुख्यतः भाषेचं आधुनिक तत्त्वज्ञान आहे. सर्वसामान्य माणूस असो किंवा प्रतिभावंत कवी असो, त्यांनी वापरलेला शब्द हा नेहमीच दुसऱ्याने वापरलेला शब्द असतो असे या तत्त्वज्ञानाच्या आधारानं म्हणता येतं. तुकारामांसाठी हा ‘दुसरा’ देव आहे, तर आधुनिक भाषाविज्ञानाच्या दृष्टिकोणातून हा ‘दुसरा’ म्हणजे भाषा निर्माण करणारा आणि कुठल्याही विशिष्ट व्यक्तीच्या अगोदर ती रुळवणारा समाज आहे.
व्यक्तीने किंवा कवीने वापरलेला शब्द हा समाजात अगोदर वापरला गेलेला असल्यामुळे कवीच्या निर्मितीला मूळ, अस्सल, कवीचाच अधिकार असलेली, असं म्हणता येत नाही. सगळ्याच कवी, लेखकांची निर्मिती परावलंबी निर्मिती ठरते. आता मूळ आणि अस्सल यांच्या कल्पनाच बाधित झाल्या तर तत्त्वतः विशिष्ट संहितेवरचा कवी, लेखकाचा अधिकार नाहीसा होतो. कॉपी राईटचा कायदा काहीही सांगो, सैद्धान्तिक पातळीवर, लिहिणाऱ्याला पूर्वी लिहिल्या गेलेल्या लेखनाचा आपल्या लेखनात उपयोग करणं सैद्धान्तिक पातळीवर बरोबर आहे, असं मानता येतं.
इतरांनी लिहिलेल्या संहितांची ठिगळं एकमेकांना जोडत, दुसऱ्याचे शब्द पुन्हा वापरत साहित्यकृतीची निर्मिती करता येते. आधुनिक विचारामुळे सारेच लेखक वाङ्मयचौर्य करणारे ठरतात आणि आधुनिक तुकाराम आणि आधुनिक सालोमालो यांच्यात काही फरक उरत नाही. अलीकडच्या काळात वाङ्मयचौर्य करणाऱ्या लेखकाला एक प्रकारची सैद्धान्तिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. वाङ्मयचौर्य ही संकल्पना साहित्यविचारात, विशेषतः तिच्यामागे प्रभावाची संकल्पना असल्यामुळे, तौलनिक साहित्यविचारात महत्त्वाची मानली जाऊ लागलीय.
हेही वाचा: चर्चा तर होणारचः गुप्तेंच्या भयकथांमागचं उचलेगिरीचं गूढ
आजूबाजूला लिहिल्या जाणाऱ्या संहितांचा अनेक लेखकांना वेगवेगळ्या कारणांमुळे मोह पडत आला आहे. सामान्य दर्जाच्या संहितांची चोरी करून श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झाल्या आहेत. श्रेष्ठ साहित्यकृतींची चोरी करून सामान्य साहित्यकृती निर्माण झाल्या आहेत. दुसऱ्याची संपूर्ण संहिताची संहिताच ढापली गेली आहे. दुसऱ्यांचे शब्द म्हणजे दुसऱ्यांच्या संहितांचे तुकडेच चोरून वापरले गेले आहेत. संकल्पनांची, आशयसूत्रांची, विषयांची, पात्रांची, कथानकांची चोरी तर मोठय़ा प्रमाणात सतत होत असते. ती चोरी आहे, हे स्पष्ट करणंही अवघड असतं.
चोरण्याची कृती तर करायची, पण आरोपातून सुटण्यासाठी आवश्यक असलेल्या युक्त्या योजून चोरलेल्या घटकांची ओळखमोड करण्याचं तंत्रही अलीकडच्या काळात नेटकेपणाने विकसित झालंय. संहिता दुसऱ्याची आहे हे सांगूनसवरून स्वतःचं जोडकाम करणाऱ्या संहिता निर्माण करणंही आजकाल शक्य झालंय.
शेवटी सारे लिहिणारे आणि वाचणारे एका सांस्कृतिक पर्यावरणात एकमेकांशी जोडलेल्या अवस्थेत व्यवहार करतात. प्रत्येकाची स्वतंत्र आणि बिनदरवाज्याची कोठडी नसते. सर्वांचा सर्वांशी संबंध येत असतो. सर्वांचा एकमेकांवर कमीअधिक बरावाईट परिणाम होत असतो. एकमेकांवर प्रभाव टाकण्याची क्षमता साहित्याच्या क्षेत्रातल्या अनेक सर्वसाधारण गोष्टींना जन्माला घालत असते. एक लिहिणारा दुसऱ्या लिहिणाऱ्यासारखा लिहितो म्हणून साहित्यप्रकार निर्माण होतात.
एक लिहिणारा दुसऱ्या लिहिणाऱ्याशी समान आशयसूत्रांच्या आधारावर जोडला गेल्याशिवाय साहित्याच्या क्षेत्रातील चळवळी निर्माण होत नाही. समान सूत्रांच्या आधारे लिहिण्याच्या जगातले समूह एकत्र येतात आणि साहित्य इतिहासाला कलाटणी देणाऱ्या प्रवृत्ती निर्माण होतात. साहित्यव्यवहार हा केवळ व्यक्तींचा खाजगी व्यवहार न राहता सामाजिक व्यवहार होतो आणि साहित्याला सामाजिक गतिविधींशी जोडतो. वेगवेगळ्या समाजांचे परस्परसंबंध, त्यांना असलेले राजकीय संदर्भ, त्यांना वेढून असलेले स्वीकार नकार या सर्व गोष्टी साहित्याला अधिकाधिक व्यामिश्र करतात.
प्रभावाचं क्षेत्र कधी संपतं आणि वाङ्मयचौर्याचं क्षेत्र कधी सुरू होतं, हे निश्चितपणे सांगता येणं अवघड असतं. दुसऱ्यांच्या शब्दांचा, दुसऱ्यांच्या संहितांचा अत्यंत सर्जनशील उपयोग करणारा मराठीतला लेखक म्हणजे आनंद विनायक जातेगांवकर. त्यांची ‘अस्वस्थ वर्तमान’ ही कादंबरी म्हणजे जवळजवळ दुसऱ्यांच्या संहितांच्या वाचनांचा क्रम आहे. जातेगांवकरांनी साधलेली किमया म्हणजे ते अत्यंत सहजतेनं प्रभाव आणि वाङ्मयचौर्य या दोन्ही प्रक्रियांच्या पलीकडे जातात.
या कादंबरीच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत दुसऱ्यांच्या संहिता किंवा दुसऱ्या संहिता कादंबरीतल्या प्रमुख पात्राच्या दृष्टीसमोर उभ्या राहतात. त्यांच्या पुनर्विचारामधून आणि सूक्ष्म वाचनामधून एका बाजूनं आधुनिक महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास आणि दुसऱ्या बाजूने त्याचा शोध घेणाऱ्या समकालीन मनाची अस्वस्थता एकाच वेळी व्यामिश्र स्वरूपात प्रकट होत राहते. जातेगांवकरांनी लिहिलेल्या शेवटच्या कादंबरीमधेही दुसऱ्याच्या संहितांचा उपयोग करण्याचं तंत्र त्यांनी वापरलं होतं.पण इथं ते विशेष प्रभावी वाटत नव्हते.
लिहिणाऱ्याने जातेगांवकरांना ते सांगितल्यानंतर ते अस्वस्थ झाले होते. अत्यंत उमाळ्याने आणि काहीशा आवेशानेच त्यांनी दुसऱ्याच्या शब्दांच्या आधारामुळेच लेखक म्हणून आपला पुनर्जन्म झाला आहे, असं सांगितल्याचं आठवतं. जातेगांवकर अपवाद म्हणायला हवेत. दुसऱ्याच्या संहितांचा सर्जनशील उपयोग त्यांच्या लेखनाच्या आधारे स्पष्ट करता येतो. पण सर्वांसाठी हे शक्य नाही.
हेही वाचा: देशद्रोहाच्या कलमाला किंग ऑफ आयपीसी असं का म्हणतात?
टी. एस. एलियटच्या मते, ‘अप्रगल्भ कवी दुसऱ्याची नक्कल करतात. प्रगल्भ कवी चोरतात. वाईट कवी जे घेतलंय ते विद्रूप करतात तर चांगले कवी जे घेतले आहे त्यातून काहीतरी अधिक चांगली, किमान वेगळी गोष्ट तयार करतात’. एलियट विशिष्ट वाङ्मयचौर्याचे समर्थन करतो आहे आणि त्याच्या सार्वत्रिक उपस्थितीविषयी बोलतो आहे हे स्पष्टच आहे. सोबत तो वाङ्मयचौर्याच्या अर्थपूर्णतेचा निकषही सांगतो हे लक्षात घ्यायला हवं.
हा निकष पाळला गेला नाही तर वाङ्मयचौर्य म्हणजे निखळ गुन्हा ठरतो. असे गुन्हे जाणते अजाणतेपणी करणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला वावरत असतात. चोरी करणं योग्य नाही असं मनापासून वाटणारे असंख्य लिहिणारे आणि संशोधन करणारे अजूनही कार्यरत आहेत. असं असलं तरी तुम्ही आयुष्यातला अमूल्य वेळ आणि तुमची शक्ती खर्च करून संहिता लिहिता. ही संहिता उद्या कुणाच्या नावावर कुठे झळकताना दिसेल याची खात्री देता येत नाही.
आपला आजचा समकालीन समाज संहितांच्या कॉपी राईटविषयी विशेष संवेदनशील राहिला नाहीय. या बाबतीतली नैतिक जबाबदारी न स्वीकारता जवळची विना कष्टाची वाट शोधणारे लोक वाढू लागलेत. अलीकडच्या काळात दुसऱ्यांच्या संहितांची चोरी करणं, परिच्छेदच्या परिच्छेद जसेच्या तसं उचलणं, स्वतः कष्ट न करता दुसऱ्याच्या संहिता स्वतःच्या नावावर खपवणं, दुसऱ्यानं निर्माण केलेले प्रबंध, निबंध, साहित्यकृती या गोष्टी अत्यंत सहजतेनं स्वतःच्या म्हणून समोर आणणे, हे करताना कायद्याच्या कचाटय़ात सापडू नये यासाठीच्या चातुर्यपूर्ण योजना अगोदरच करणं असे प्रकार मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत.
इंटरनेटवरून डाऊनलोड करण्याच्या सोयीमुळे सर्व संहितांचं रूपांतर चोरी करण्यासाठी योग्य अशा संहितांमधे झालं. यामुळे एका बाजूने विशिष्ट संहितेमधे वाङ्मयचौर्य करून दुसऱ्या कुणाचा मजकूर मोठय़ा प्रमाणात भरला जातो. याचा शोध घेणाऱ्याठी सिस्टीम निर्माण होऊ लागल्या आहेत. अनेक विद्यापीठांमधे विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रबंध अशा प्रणालीकडून तपासले जातात. दुसऱ्या बाजूनं यांना कसं फसवायचं याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे उपक्रम सुरू झालेत.
अलीकडे प्रत्येक प्राध्यापकाने संशोधनात्मक लेखन करायला हवं असा आग्रह युनिवर्सिटी ग्रॅंट कमिशनने धरल्यापासून आणि पीएचडीसारख्या डिग्रींचं व्यावसायिक दृष्टिकोणातून महत्व वाढल्यापासून या गुन्हेगारी प्रवृत्ती अधिक प्रमाणात वाढल्या आहेत. आजही मान्यताप्राप्त नियतकालिकांमधल्या लेखांचं मूळ शोधण्याचे प्रयत्न केले तर प्रभाव, सर्जनशीलता आणि वाङ्मयचौर्य यांच्या सीमारेषांवर वावरणाऱ्या काही संहितांचं अस्तित्व नजरेत भरू शकेल असं वाटतं.
हेही वाचा:
सामान्य माणसांना स्वप्न दाखवणाऱ्या टिकटॉकची जागा टँगी घेणार?
दिल्ली विधानसभा २०२०: निवडणूक सर्वे सांगतायत, लगे रहो केजरीवाल
आता तरी राज ठाकरेंचं नवनिर्माण स्वनिर्मित, स्वयंप्रकाशित असेल का?
बजेट२०२०ः इन्कम टॅक्स सवलतीने भलं कुणाचं, सरकारचं की करदात्यांचं?
शाळेच्या पुस्तकांमधे आपण कधी जग जिंकणारे ग्लोबल संत नामदेव वाचलेत?
(मुक्त शब्द मासिकाच्या फेब्रुवारी २०२० अंकात आलेल्या लेखाचा हा संपादित अंश आहे)