भारतीय पुरुष आणि महिला हॉकी टीमची ऑलिम्पिकमधली कामगिरी फिनिक्स भरारी ठरली आहे. भारतीय टीम ऑलिम्पिकमधे ब्राँझ मेडलपर्यंत पोचू शकते हा आत्मविश्वास संघटनांप्रमाणेच प्रायोजकांमधेही निर्माण झालाय. त्यामुळेच ही एका सुवर्णयुगाची पायाभरणी ठरतेय.
स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात जागतिक हॉकी क्षेत्रात भारताने सुवर्णयुग निर्माण केलं होतं. स्वातंत्र्यानंतरही १९५६ पर्यंत भारताचा जागतिक स्तरावर दबदबा होता. भारतीय टीमविरुद्ध खेळताना प्रतिस्पर्धी देशांना धडकी भरायची. पण गेल्या चाळीस वर्षांत भारतीय टीमला कोणी घाबरेनासं झालं.
भारतीय हॉकी क्षेत्र म्हणजे जागतिक स्तरावर टवाळकीचा विषय झाला होता. पण भारताने यंदाच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत घेतलेली झेप लक्षात घेतली तर भारतीय टीम पुन्हा हॉकीमधे सुवर्णयुग निर्माण करेल, असं चित्र दिसून येऊ लागलंय.
भारतीय पुरुष टीमने गेल्या चार वर्षांत ऑलिम्पिक आणि विश्वविजेत्या टीमविरुद्ध सनसनाटी विजय मिळवले होते. तसेच जागतिक हॉकी लीग, आशिया ट्रॉफी स्पर्धा, चॅम्पियन ट्रॉफी, अझलन शाह ट्रॉफी स्पर्धा या स्पर्धांमधे टीमची कामगिरी लक्षणीय झाली होती.
भारतीय टीमला यंदाच्या ऑलिम्पिकमधे बाद फेरीत स्थान मिळेल याचीच सर्वांना खात्री होती. या आत्मविश्वासाला जबरदस्त कामगिरीची जोड देत त्यांनी ब्राँझपदकावर आपली मोहर नोंदवली. मॉस्कोत १९८० ला झालेल्या सुवर्णपदकानंतर ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्यात भारतीय टीमला यश आलं.
हेही वाचा: मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला
भारतीय महिला टीमने २०१६ ला झालेल्या आशियाई चॅम्पियन स्पर्धेत सोनेरी कामगिरी करत ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला होता. त्या पाठोपाठ त्यांनी २०१७ ला झालेल्या आशिया ट्रॉफी स्पर्धेतही गोल्ड मेडल पटकावलं. तरीही जागतिक स्तरावर इतर देशांच्या हॉकी टीमचा असलेला वरचष्मा लक्षात घेता भारतीय महिला हॉकी टीम सेमी फायनलमधे स्थान मिळवेल, अशी कोणी अपेक्षाही केली नव्हती.
उत्कृष्ट टीमच्या कौशल्याला राणी रामपालचं कुशल नेतृत्व आणि शोर्ड मरिन यांचं मार्गदर्शन याच्या जोरावर भारतीय महिला टीमने न भूतो न भविष्यती अशी कामगिरी केली आहे. भारताच्या पुरुष आणि महिला टीमची ही कामगिरी म्हणजेच गेल्या सहा-सात वर्षांमधे राष्ट्रीय स्तरावर हॉकीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घेण्यात आलेले अपार कष्ट, संघर्षपूर्ण करिअर करताना खेळाडूंनी दाखवलेली खेळावरची निष्ठा आणि अफाट मेहनत याचंच प्रतीक आहे.
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांनी जागतिक स्तरावर भारतीय हॉकी टीमला कीर्तीच्या शिखरावर नेलं होतं. त्यांनी एकट्याने ऑलिम्पिकमधे ५१ गोल केले होते. दोन महायुद्धांच्या काळात ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकल्या नाहीत, नाहीतर त्यांनी ऑलिम्पिक कारकिर्दीत गोलांचं शतक नोंदवलं असतं. त्यांच्या स्टिकमधे बॉल आला की प्रतिस्पर्धी टीमवर गोल होणारच अशीच त्यांची हुकूमत होती. त्यांच्यासह अनेक श्रेष्ठ खेळाडू भारताला मिळाले होते, त्यामुळेच हॉकीत भारताची निर्विवाद सत्ता होती.
भारताने १९७२ ला पुरुषांच्या हॉकीत ब्राँझपदक पटकावलं आणि तिथून भारतीय हॉकीची घसरगुंडी सुरू झाली. अपवाद फक्त १९८० च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा. या स्पर्धेवर अनेक मातब्बर टीमनी बहिष्कार घातला होता. त्याचा फायदा घेत भारताने ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल जिंकलं होतं. त्यानंतर भारताची ऑलिम्पिकमधल्या मेडलची पाटी कोरीच राहिली होती. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता पूर्ण न होण्याची नामुष्कीही भारतावर ओढवली होती.
त्यातच भारताच्या राष्ट्रीय स्तरावरच्या हॉकी टीममधे मतभेद, एकाच राज्यांमधे समांतर स्तरावर काम करणाऱ्या २-३ संघटना, खेळाडूंमधली उदासीनता यामुळे आपल्या देशातला हॉकी नामशेष होणार की काय, अशी शंका निर्माण झाली होती. त्यातच क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे इतर खेळांकडे प्रायोजकांनी फिरवलेली पाठ याचा परिणाम हॉकी क्षेत्रावर खूपच झाला. पुरुष हॉकीप्रमाणेच भारताच्या महिला हॉकी क्षेत्रालाही मोठा फटका बसला. स्थानिक स्तरावर प्रशिक्षक मिळेनासे झाले आणि सहभागी खेळाडूंची संख्याही कमी झाली.
हेही वाचा: फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन
भारताला जागतिक स्तरावर पुन्हा नावलौकिक मिळवून द्यायचा असेल तर राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर भक्कम संघटना उभारण्याची आवश्यकता आहे हे संघटकांच्याही लक्षात आलं. नरेंद्र बात्रा आणि त्यांच्या सहकार्यांनी हॉकी इंडियाची सूत्रं हाती घेतल्यानंतर अनेक क्रांतिकारी बदल घडवून आणले. सब ज्युनिअर आणि ज्युनिअर स्तरावरच्या खेळाडू नैपुण्य चाचणी आणि विकास, हॉकीसाठी पोषक वातावरण असलेल्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण केल्या.
तसंच परदेशी खेळाडूंबरोबर स्पर्धात्मक अनुभव मिळावा यासाठी आपल्या देशात विविध आंतरराष्ट्रीय आणि जागतिक स्पर्धांचे आयोजन करणं, कनिष्ठ आणि वरिष्ठ भारतीय टीमना परदेशात आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमधे, प्रशिक्षण शिबिरांमधे भाग घेण्याची संधी देणं, वेगवेगळ्या ठिकाणी अकादमी सुरू करून अनुभवी प्रशिक्षक नियुक्त करणं या प्रशिक्षकांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन करणं अशा अनेक योजना राबवल्या.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पंधरा मिनिटांचा चार डावांचा सामना आयोजित करायला सुरवात झाल्यानंतर खेळाडूंनाही अधिक गतिमान कौशल्य दाखवण्याची आवश्यकता आहे हे लक्षात आल्यानंतर हॉकी इंडियाने फाईव अ-साईड स्पर्धांचं आयोजन सुरू केलं. त्याचा फायदा खेळाडूंचं कौशल्य वाढवण्यासाठी निश्चितच झाला.
भारतात अजूनही अनेक ठिकाणी मातीवरच स्पर्धा आणि सराव सुरू असतो. शक्यतो राज्य आणि अखिल भारतीय स्तरावरच्या स्पर्धांचं आयोजन कृत्रिम मैदानावरच करण्याचा निर्णय घेण्यात आला. हॉकी इंडियाच्या आणि इतर काही राज्य संघटनांच्या हाकेला वेळोवेळी दाद देत संबंधित शासनानेही भरपूर आर्थिक सहकार्य केलं.
कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या दोन वर्षांत सगळ्याच देशांच्या हॉकी टीमना स्पर्धा आणि सर्वांपासून दूर राहण्याचा खूप फटका बसला होता. भारतीय खेळाडूही त्याला अपवाद नाहीत. पण ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी भारतीय टीमला परदेश दौर्यावर जाण्याची परवानगी मिळाली आणि त्याचा फायदा दोन्ही टीमना निश्चितच झाला.
ग्रॅहम रीड यांचं मार्गदर्शन, मनप्रीत सिंग याचं कुशल नेतृत्व, गोलरक्षणासाठी असलेली पोलादी भिंत म्हणजेच पी.आर. श्रीजेश यांच्याबरोबरच टीमचे इतर सर्व सहकारी, स्टाफ यांचा भारताच्या ब्राँझपदकात मोठा वाटा आहे. भारतीय टीममधे असलेले रूपिंदर पाल सिंग आणि वरुणकुमार या ड्रॅग फ्लिकरबरोबरच गुर्जंटसिंग, हरमानप्रीत सिंग, हार्दिक सिंग, सिमरनजीत सिंग यांनीही वेळोवेळी गोल करत भारताच्या विजयास हातभार लावला.
ब्राँझपदकाच्या लढतीत दोन वेळा पिछाडीवर असूनही जर्मनीसारख्या बलाढ्य टीमला नमवणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. टीमचा तिरंगा फडकवण्याच्याच उद्देशाने खेळताना भारतीय खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, आत्मविश्वास आणि झुंजार वृत्ती खरोखरीच अतुलनीय आहे. हे ऑलिम्पिक पदक म्हणजे एकशे तीस कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारताच्या हॉकी क्षेत्रासाठी सन्मानच आहे.
हेही वाचा: फारुख इंजिनिअर बीसीसीआयच्या कारभारावर बोलले, त्यात चूक काय?
भारतीय महिला टीम गेले तीन वर्ष मरिन यांच्या मार्गदर्शनाखालीच सराव करत आहे. साहजिकच भारतीय खेळाडूंच्या गुणदोषांचा अतिशय बारकाईने अभ्यास करत मरिन यांनी वेगवेगळे डावपेच आखले होते. खरं तर ऑलिम्पिकपूर्व म्हणावं तसा सराव शिबिर आयोजित करणं शक्य झालं नाही. तरीही त्यांनी भारतीय खेळाडूंमधे ऑलिम्पिकसाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास निर्माण केला.
प्रत्येक मॅचनंतर आपणच आपल्या कौशल्याचं आत्मपरीक्षण करत त्याप्रमाणे आपल्या खेळात सुधारणा करण्याची जबाबदारी त्यांनी प्रत्येक खेळाडूवरच सोपवली होती. ऑस्ट्रेलियासारख्या श्रेष्ठ टीमवर विजय मिळवणं म्हणजे एक कठीणच परीक्षा होती. मॅचच्या सुरवातीलाच आघाडी घेतली की आपोआपच मनोधैर्य उंचावलं जातं आणि ही आघाडी कायम ठेवणं सोपं जातं हीच रणनीती भारतीय टीमने अमलात आणली होती.
भारतीय महिला टीमच्या अनेक खेळाडूंनी अनेक स्तरावर संघर्ष करत हॉकीत करिअर केलंय. भारतीय महिलाचं क्षेत्र म्हणजे चूल व मूल एवढंच राहिलं नसून त्याही हॉकीत मर्दुमकी गाजवू शकतात हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवत राणी रामपाल आणि तिच्या सहकार्यांनी हॉकीत आश्वासक करिअर केलं.
आघाडी फळीमधे गुरजित कौर, नेहा गोयल, ऐतिहासिक हॅट्ट्रिक नोंदवणारी वंदना कटारिया, शर्मिला देवी यांनी आघाडी फळीत आपल्यावर सोपवण्यात आलेली कामगिरी चोख बजावली. भारताची गोलरक्षक सविता कुमारी हिने या स्पर्धेत किमान दोन डझन तरी गोल रोखले असतील. तिला बचावफळीतल्या सुशीला चानू, दीप ग्रेस एक्का यांचं बहुमोल सहकार्य मिळालं.
भारताच्या दोन्ही टीमची कामगिरी देशाच्या हॉकी क्षेत्रास फिनिक्स भरारी ठरली आहे. भारतीय टीम ऑलिम्पिकमधे ब्राँझ मेडलपर्यंत पोचू शकते हा आत्मविश्वास संघटनांप्रमाणेच प्रायोजकांमधेही निर्माण झाला आहे. आपल्या देशात अधिकाधिक जागतिक स्पर्धांचं आयोजन करण्याची संधी मिळत आहे आणि त्याचा फायदा ग्रामीण आणि युवा वर्गातल्या खेळाडूंना या खेळात आर्थिक स्थैर्य देणारं करिअर घडवण्यासाठी होणार आहे.
आपल्या मुलांना हॉकीमधे प्रोत्साहन देण्यासाठी पालकांमधे आत्मविश्वास निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे भावी काळात हॉकीचं सुवर्णयुग निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारं व्यासपीठ निर्माण झालंय. २०२२ ला होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि त्यापाठोपाठ २०२४ ला होणारी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा या स्पर्धांसाठी भारतीय टीमने भावी सुवर्णयुगाची पायाभरणी केली आहे. या स्पर्धांमधे भारतीय टीम दोन्ही गटांत सुवर्ण पदकांचं स्वप्न साकार करू शकेल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा:
सचिन बाद झाल्यानंतर, युवराजने टीवी सुरु ठेवला
योग दिवस २१ जूनला साजरा करण्यामागची दोन कारणं
(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)