मराठी आपली राजभाषा. सुमारे बावीसशे वर्षांच्या इतिहासासहित ती उभी आहे. या सगळ्या काळात मराठीसमोर अनेक भाषिक आव्हानं आली. मात्र या सगळ्यांना समर्थपणे तोंड देत मराठी भाषा उत्क्रांत होत राहिली. प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत मराठीचं साहित्यिक अभिजात श्रेष्ठत्व प्रत्येक काळात सिद्ध होत राहिलंय. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठीच्या अभिजातपणाची ही कूळकथा.
मराठीच्या विकासासाठी २०१३ मधे रंगनाथ पठारे समितीनं महाराष्ट्र सरकारला आपला अभिजात मराठी भाषा अहवाल सादर केला. या अहवालात मराठी भाषेची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि आजपर्यंतची तिची वाटचाल याचा आढावा घेण्यात आलाय. वेगवेगळ्या संदर्भानिशी तिचं अभिजातपण सिद्ध केलं गेलंय. आधुनिक मराठी कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त पठारे समितीच्या अहवालाचा हा संपादित अंश.
आजपर्यंतचा मराठीचा प्रवास प्राचीन महारट्ठी, मरहट्टी भाषा, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा झालाय. महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश आणि मराठी या तीन वेगळ्या भाषा नसून ती एकाच भाषेची तीन रूपं आहेत. गाथासप्तशतीला महाराष्ट्राचं आद्य लोकसाहित्य म्हटलं जातं. मराठीतला हा पहिला ग्रंथ सुमारे २००० वर्ष जुना आहे. आपल्या लोकजीवनाची साक्ष देणारा आहे.
लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी हे मराठी भाषा प्रगल्भ झाल्यानंतरचे श्रेष्ठ ग्रंथ आहेत. हे जागतिक तोडीचे ग्रंथ ज्या भाषेत लिहिण्यात आलेत त्याचे असंख्य पुरावे आज शिलालेख, ताम्रपट, पोथ्या आणि हस्तलिखितांमधे उपलब्ध आहेत. मराठी भाषेतला पहिला शिलालेख हा तब्बल २२२० वर्षांपूर्वीचा आहे. ब्राम्ही लिपीतला हा शिलालेख पुण्याच्या जुन्नरजवळच्या नाणेघाटात सापडला. त्यावर ‘महारठीनो’ असा उल्लेख आहे.
डॉ. वा. वि. मिराशी यांनी आपल्या ‘सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख’ या ग्रंथात हा शिलालेख प्रकाशित केलाय. रामायण, महाभारत, हेमचंद्राची देशीनाममाला, शांकुतल, मृच्छकटिक यातले प्राचीन मराठीतील संवाद हे मराठीची प्राचीनता सिद्ध करतात. या सगळ्यालाच ऐतिहासिक संदर्भ आहेत.
मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयी विविध मतमतांतरं आहेत. अभ्यासकांनी वेगवेगळी मतं मांडलीत. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या मते, मराठीची उत्पत्ती ही पाणिनिपूर्वकालीन आर्य भाषा त्याहीपूर्वीची पूर्ववैदिक भाषा यांच्यापासून झालीय. डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी मात्र राजवाड्यांची ही उत्पत्ती वास्तवाला सोडून असल्याचं म्हटलंय.
याउलट ग्रियर्सन आणि डॉ. कृ. पां. कुलकर्णी यांनी आजच्या इंडो आर्यन भाषांच्या विकासाचा आलेख मांडून ठेवलाय. तो वास्तवाला धरून आणि अधिक विश्वासार्ह आहे असं म्हणता येईल. ग्रियर्सनच्या मते, वेदपूर्वकालीन किंवा वैदिक हीसुद्धा एकच भाषा नसून ते विविध बोलींचे समूह होते.
वि. का. राजवाडेंनी मराठीचा जन्मकाळ इसवी सनाचं पाचवं शतक असं सांगितलंय. असंच काहीसं मत कृ. पां. कुलकर्णी यांचंही आहे. शं. गो. तुळपुळे आणि गियर्सन यांची मतं विचारात घेतली तरी त्यापूर्वीच्या अपभ्रंश आणि महाराष्ट्री अपभ्रंश यांचा सुद्धा आधार मराठीच्या उत्पत्तीला झालाय हे विसरून चालणार नाही. आजच्या मराठीची सुरवात आठव्या शतकात झाली असं मानलं तरी त्या पूर्वीच्या अपभ्रंश आणि महाराष्ट्री प्राकृत भाषा ही मराठीचीच आधीची रुपं होतं.
महाराष्ट्राचा इतिहास समजून घेण्यासाठी आणि राजसत्ता आणि मराठी भाषा यांचा प्रवास उलगडण्यासाठी ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांची मांडणी महत्त्वाची आहे. १९२६ ला प्रकाशित झालेल्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या अठराव्या भागात महाराष्ट्राच्या इतिहासाबाबत केतकरांनी मांडणी केलीय. ते म्हणतात, महाभारतात महाराष्ट्र हे नाव नाही. महावंश या बौद्ध ग्रंथात महाराष्ट्र असा उल्लेख आहे. त्यावरून उज्जैनीभोवतालच्या बऱ्याच मोठ्या प्रदेशाला म्हणजे आजच्या मध्य हिंदुस्थानाला महाराष्ट्र म्हणत असावेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आमदानीत मराठी सत्तेचं महत्त्व देशभर वाढलं. छत्रपती शिवराय आणि त्यांच्या वारसांनी पुढच्या काळात मराठी सत्तेची पताका देशभर फडकवली.
बाराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत मराठी साहित्यात श्रेष्ठ दर्जाच्या साहित्यनिर्मितीचा सातत्यपूर्ण आलेख दिसतो. या काळात म्हाइंभटाचं लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, नामदेव, चोखामेळा, एकनाथ, तुकाराम यांचं लेखन आहे. पेशवाईत एकीकडं मोरोपंत, मुक्तेश्वर, वामन पंडित यासारख्या पंतकवींची संस्कृतप्रचुर रचना होत होती त्याच वेळी बहुजन कवी लोकभाषेत लावण्या, पोवाडे रचत होते.
विष्णुशास्त्री चिपळूणकर एकीकडे इंग्रजीतून अरेबियन नाईट्स, शेक्सपिअर यांचे अनुवाद करत होते आणि त्याचवेळी संस्कृतामधून मराठीला बळ देण्याची भाषा आणि कृती करत होते. याच सगळ्या काळात लिखित गद्याची भाषा संस्कृतप्रचुर होण्याकडे कल वाढत गेला.
चिपळूणकरांचे समकालीन महात्मा जोतीराव फुले यांनी याच काळात फार महत्त्वाचं साहित्य लेखन केलं. आज अभ्यासकांनी लक्षात आणून दिलयं की, युरोपात बर्टोल्ट ब्रेख्तनं ‘इपिक थिएटर’ची सैध्दांतिक मांडणी करण्याआधी मराठीत फुल्यांनी ‘तृतीय रत्न’ हे नाटक ही संकल्पना प्रत्यक्षात आणल्यासारखं लिहिलंय. चिपळूणकरी परंपरेचा प्रभाव काही काळ राहिला. पण पुढच्या काळात फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा मानणारे बहुजन लेखक आपल्या भाषेत लिहू लागले. या अठरा पगड जातीतल्या लेखकांनी संस्कृतचा प्रभाव धुडकावून लावला.
मराठीवरचा संस्कृतचा प्रभाव आठव्या शतकापासून पडू लागला. पुढे तो सोळाव्या शतकात कमी झाला. कारण मुसलमानी राजवटीतील मराठा सरदारांचे दक्षिणोत्तर अनेक ठिकाणी वास्तव्यासोबतच दक्षिणेतील मुसलमानांच्या उर्दू भाषेवर मराठीचा प्रभाव पडला. मराठीवर फारशीचा प्रभाव बराच पडून बरेच फारसी, अरबी शब्द मराठीत आले आणि रूढ झाले. पण मराठीचा मूळ ढाचा बदलला नाही. शिवाजीकालीन पत्रव्यवहार, पेशवेकालीन पत्रव्यवहार पाहिला की याची कल्पना येते.
मराठी फक्त प्राचीन भाषा आहे असं नाही तर तिच्यात श्रेष्ठ साहित्याची परंपरा आहे. अश्मक, कुंतल, अपरान्त, विदर्भ या प्रदेशात प्राकृत महाराष्ट्री प्रचारात होती. सातवाहनांच्या काळात त्यांचा राज्यविस्तार कुरुक्षेत्र, पेशावर इथपर्यंत झाला. महाराष्ट्र हा प्रदेशवाचक शब्द सर्वप्रथम ज्या शिलालेखात येतो तो इसवी सन ६३४ मधे कोरला गेला. हा चालुक्यसम्राट द्वितीय पुलकेशीच्या ऐहोळ्याचा शिलालेख ब्राम्ही लिपीची पुढची अवस्था दाखवतो.
नवव्या शतकापासून देवनागरी लिपीचा विकास झालेला दिसतो आणि मराठी भाषेनेही त्याचा स्विकार केल्याचं आढळतं. दिवेआगर इथे शके ९८२ चा ताम्रपट आणि श्रावणबेळगोळ, पंढरपूर, अंबेजोगाई इथले शिलालेख याची साक्ष देतात. केवळ धार्मिक ग्रंथच नाही तर मराठीतलं संतसाहित्यही देवनागरीत लिहिलेलं असावं हे सांगणारे पुरावे आज उपलब्ध आहेत.
‘गाहासत्तसई’ अर्थात ‘गाथासप्तशती’ या हाल सातवाहन राजाने संकलित केलेल्या गाथांच्या प्रतींची हस्तलिखितं देशभर अनेक ठिकाणी सापडलेली आहेत.
मराठी ही जगातली दहाव्या ते पंधराव्या क्रमांकाची भाषा आहे. संपन्न ज्ञानभाषा असणारी मराठी महानुभावांची धर्मभाषाही आहे. सातवाहन, राष्ट्रकूट आणि मराठी हे राज्यकर्ते भारतभर राज्य करत होते. आजच्या पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानावरही मराठी सत्तेची पताका फडकत होती.
मराठीत दरवर्षी सुमारे दोन हजार पुस्तकं प्रकाशित होतात. पाचशे दिवाळी अंक निघतात आणि छोटी-मोठी सुमारे दोनशे साहित्य संमेलनं होतात. या सगळ्याच अंगाने मराठी भाषा ही अधिक समृद्ध होतेय. मराठी भाषेवर सामान्य लोकांच उदंड प्रेम आहे. तिचं अस्तित्व आणि तिची समृद्धी हा महाराष्ट्रीय लोकांच्या आस्थेचा आणि अभिमानाचा भाग आहे.
जगातल्या सर्व महत्वाच्या भाषांप्रमाणे मराठी भाषा इंग्रजीच्या दबावाखाली आहे. ही गोष्ट नाकारता येत नाही. पण जागतिकीकरणाचा उलटा परिणाम होऊन ही भाषा टिकण्यास आणि वाढण्यास हातभारच लागेल. मराठीचं अभिजातपण टिकून राहिल.