हवामान बदल हे मानवजातीच्या अस्तित्वासमोरचं मोठं आव्हान

१४ जून २०१९

वाचन वेळ : ९ मिनिटं


हवामान बदल. जगाला भेडसावणारी सगळ्यात गंभीर समस्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासारख्या भागात जे दुष्काळाचं अस्मानी संकट आलंय त्यामागे हवामानातले घातक बदल हेही एक कारण आहे. हल्लीच पुण्यात पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकरांच ‘हवामान बदल आणि आपण’ या विषयावर व्याख्यान होतं. पुण्याच्या मैत्री संस्थे आयोजित केलेल्या या व्याख्यानाचाच हा काही भाग.

आपण जी उष्णतेची लाट सहन करतोय ती खंडप्राय, देशव्यापी अशी लाट आहे. त्यात वेगळेपण आहे. एक वेगळेपण असंय की, यंदा कित्येक वर्षानंतर काही ठिकाणी ५ ते ६ अंश सेल्सीअसने तापमान वाढलेलं आहे. रात्रीचं तापमानही वाढतंय. रात्रीही उष्णतेच्या झळा पोचतायत. या लाटेचा कालावधीपण जवळजवळ १२ ते १५ दिवसांचा आहे. कदाचित तो २० दिवसांपर्यंतही पोचेल.

शास्त्रज्ञांच्या मते, पुढच्या वर्षी याची तीव्रता वाढू शकते. शहरांमधे याला ‘अर्बन आयलांड इफेक्ट’ असं म्हणतात. उष्णतेचं एक बेट तयार होतंय. त्याची कारण अशी आहेत. काँक्रीटीकरण, झाडं कमी होणं, वातानुकूलित यंत्रातून येणारी गरम हवा या सगळ्यामुळे जे प्रत्यक्ष तापमान आहे त्यापेक्षा ३ ते ४ अंशांनी  आपल्याला जास्त भासतं आणि रात्रीसुद्धा पटकन थंडावा आपल्याला मिळत नाही. हे वाढत जाणारेय आणि याचा थेट हवामान बदलांशी संबंध आहे.

वैज्ञानिकांचं ऐकतंय कोण?

अखेरच्या काळामधे स्टिफन हॉकिंग हा प्रज्ञावंत असं म्हणाला होता की, अण्वस्त्र आणि हवामान बदल यामुळे पृथ्वीची अंतिम घटिका जवळ आलीय. २१ व्या शतकाच्या अखेरीस आपण दुसरा कोणतातरी ग्रह गाठला पाहिजे. तरच आपली पुढची पिढी वाचू शकणारेय.

या जुलैमधे डॉ. जेम्स लव्हलॉक या वैज्ञानिकाचं जन्मशताब्दी वर्षय. तो असं म्हणतो, ‘पर्यावरणाचं स्वरुप मुळात जागतिक आहे. ते स्थानिक नाही. त्याला सीमा नाहीत. हे आव्हान सामाजिक आणि राजकीय आहे. आपला समाज सुसंस्कृत आणि जबाबदार होत नाहीय. त्यामुळे संपूर्ण मानवजात संकटात आलीय. या संकटाला सामोरं जाणं आता अधिकाधिक अवघड होणारेय.’ त्यामुळे खरी आव्हानं आणि भासणारी आव्हानं  यांचा शोध घ्यायला हवाय.

नार्सिसचं एक चित्र आहे. ज्यात तो स्वत:चीच प्रतिमा पाहतोय. या प्रतिमेच्या प्रेमात तो  पडलाय. आता त्याच काळाचं सार्वत्रिक आणि जागतिकीकरण झालेलं आपण पाहतो आहोत. आत्ममग्न अवस्थेतून आपण नेमकं कुठल्या प्रतिमेमधे जातोय. मी, माझं ही जी सेल्फी संस्कृती आहे. हा जो अतिरेकी व्यक्तीवाद आहे हा सर्वव्यापी आहे. तो कौटुंबिक आहे, सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे आणि त्यामुळे तो अतिशय राजकीय आहे. याच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही.

हेही वाचा: तर आपण विचार करणंही डिजिटल यंत्रांकडे सोपवून देऊ

सामाजिक  विनाशाकडे वाटचाल सुरुय

सामाजिक मानसशास्त्रज्ञ शेरी टर्कले यांची दोन पुस्तकं आहेत. एक ‘अलॉन टूगेदर’ आणि दुसरं ‘रिक्लेमिंग कन्वर्सेशन : द पॉवर ऑफ टॉक इन अ डिजिटल एज’. आपण सेल्फी अर्थात मोबाईल मग्न का होतोय? आपली स्थिती अलॉन टूगेदर अशी झालीय का? म्हणजे घरामधे दोघेजणं एकएकटे राहतायत. हे पार अमेरिकेपासून भारतापर्यंत आहे आणि गाव ते शहरापर्यंत. गावामधे गेल्यावरसुद्धा मुलं मोबाईलवर असतात. ते पटकन बोलायला येतं नाहीत. मग दुष्काळ असू देत की आत्महत्या.

संवाद तुटत जाणं म्हणजे खुप मोठ्या सामाजिक विनाशाकडे आपण चाललोय. मैत्री करायचं आपण म्हणतोय पण इथं इतकं आपण स्वत:पासून तुटत चाललेलो आहोत. आपला कोणाशीच संवाद होत नाहीय. १९६२ मधे जेव्हा रशेल कार्सन यांनी ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक लिहीलं तेव्हा त्यांनी पर्यावरण विनाशाचा धोका जगाला सांगितला होता. त्यानंतर आपण पर्यावरण, पर्यावरण बोलायला लागलो. त्या म्हणतात की, आता हा सामाजिक विनाश आम्ही थांबवला नाही तर आधी सामाजिक विनाश होईल आणि मग पर्यावरण विनाश होईल.

हवामान बदल ही एक दुष्ट समस्या आहे

ही अतिशय दूरची समस्या वाटते. आपली वाटतचं नाही. हवामान बदल गुंतागुंतीची दुष्ट समस्या आहे असं भासवलं जातं कारण आपण याच्या खोलात जात नाही. माझ्यापर्यंत आलंय हेच आपल्याला जाणवत नाही. आपण आरोग्यातून याची किंमत चुकवत असतो हे आपल्याला माहित नसतं. उष्माघात असेल, साथीचे रोग असतील. जी काही आपल्यापर्यंत रोगराई येतेय त्याचा हा उपभाग आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हाच आपण प्रयत्न करायला लागू.

२०१० चा ‘द एज ऑफ स्टुपिड’ नावाचा एक सिनेमा आहे. त्यात २०५० साल दाखवलंय. २०५० ला जंगलं नष्ट झालीत. दोन्ही ध्रुवांवर बर्फ शिल्लक नाहीय. अगदी दोन ते तीन जणं जिवंत आहेत. त्यातला एक संग्राहालयासाठी काही गोष्टी जतन करतोय. त्यातला एक म्हणतोय, ‘तेव्हा आम्ही एवढे मुर्ख होतो कि संधी असूनही आम्ही जगाला वाचवलं नाही.’ आणि हा आताचा काळ आहे. आपला मुर्खपणा अमर्याद आहे. यातून आपण जर काही शिकू शकलो तर आणि तरच आपली पुढची पिढी नीट जगू शकेल.

हेही वाचा: उद्या गुजरातमधे धडकणाऱ्या वादळाला वायू हे नाव कोणी दिलं?

हा बदल म्हणजे नेमकं काय?

२०१० पासून प्रत्येक वर्ष हे आधीच्या वर्षापेक्षा उष्ण आहे. दोन वर्षांपूर्वी आपण ५१ अंश सेल्सीअस तापमानापर्यंत गेलो होतो राजस्थानात. त्यामुळे आपण कुठपर्यंत जाऊ शकतो याची नुसती कल्पना करा. याचं कारण कार्बन उत्सर्जन आहे. कार्बन उत्सर्जन हे आपल्या कर्तृत्वामुळे वाढतंय. गेल्या पाच वर्षात भारतातलं जवळजवळ १० लाख हेक्टर जंगल नष्ट झालं असं संयुक्त राष्ट्र संघटनेचा जैवविविधतेसंबंधीचा अहवाल सांगतो. १९७० पासून ५२ टक्के जैवविविधता नष्ट झालीय.जंगलातली साफसफाई करणारे किडेच आम्ही नष्ट केलेत. आणि म्हणून वेगवेगळे आजार, पक्षी, प्राणी यांच्यापासूनचे व्हायरसेस वाढतायत.

हवेत कार्बन उत्सर्जन वाढतोय. कार्बन उत्सर्जनाची पातळी दिवसेंदिवस वाढतेय. याचे परिणाम आपल्याला भोगणं भाग आहे. पॉरिसमधे हवामान बदलाविषयी जी चर्चा झाली त्यामधे याविषयी चिंता करण्यात आली. ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर ती थांबली. त्यानंतर ब्राझील, अमेरिकेसारख्या देशांच्या भुमिकाही बदलल्या. वैज्ञानिक असं सांगतायत, की ताशी ३०० ते ३५० किमी वेगाच्या वाऱ्याचं चक्रिवादळ सुद्धा येऊ शकतं. आपण कल्पना केली नसेल अशी सगळी आपत्ती ह्या हवामान बदल आणि कार्बन उत्सर्जनामुळे येतेय. आपल्या कुठल्याच सार्वजनिक चर्चेचा हा विषय भाग का बनत नाही?

शहरांचा समतोलही ढासाळतोय

आपल्या बाजूचा चिमुकला बांगलादेश. तिथल्या ढाक्यामधे आंतरराष्ट्रीय पातळीवरची एक संस्था आहे. ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड डेवलोपमेंट’. तिथं हवामान बदलाशी जुळवणूक कशी करायची याचा अभ्यास केला जातोय. जगभरातले तज्ञ इथं येतात. आपण इतक्या सगळ्या झळा सहन करतोय मग आपल्याकडे अशी एखादी संस्था नकोय का? २०१७ मधे देशात ४० टक्के जिल्ह्यात दुष्काळ होता. २५ टक्के जिल्ह्यात अतिवृष्टी होती. हे दरवर्षी सहन कराव लागतंय.

शहरांचा सगळा समतोल आज जवळजवळ ढासाळतोय. मुंबईत २००५ मधे आलेला पुर हे त्याचं उत्तम उदाहरण. काश्मीर, चेन्नईला हेच झालं. आणि असे पाऊस वारंवार पडणारं आहेत. हवामान बदलामुळे तासाभरात १०० मिली पाऊस पडणार. आणि आपली शहरं याला तोंड देऊ शकणार नाहीत. दिल्ली तर ‘अस्थम्याची राजधानी’ बनलंय. कार्बन उत्सर्जनातले घनकणाचा आकार २.५ मेक्रॉन आहे. त्याची जी स्टँडर्ड संख्या असली पाहिजे त्याच्या २०० ते ३०० पटीने जास्त तर मुंबईत आहे. लहान वयात जे आजार होतायत त्याला हे कारणीभूत आहे.

जगभरातल्या २० गलिच्छ शहरांमधे १४ शहर भारतातली आहेत. जगातली जी उत्तम हरित शहरं आहेत त्यात आपलं एकही नाहीय. रस्ते माणसांसाठी की गाड्यांसाठी अशी आजची स्थिती आहे.  रस्ते हे सगळ्या आविष्काराचं महत्त्वाचं ठिकाण आहे हेचं आपण विसरत चाललो. प्रदुषण कमी करणारं, उर्जा कमी करणारं, पाणी कमी करणार डिझाईन आपल्याला करता येऊ शकतं. लॉरी बेकर या माणसाने हरित वास्तू उभ्या करुन हे करुन दाखवलं होतं. दिल्ली, कर्नाटक, गुजरात अशा ठिकाणी या वास्तू आज उभ्या आहेत.

हेही वाचा: १९८४: सत्तर वर्षांपूर्वीच्या कादंबरीत आपल्याला आजचं राजकारण दिसतं

पाण्यासाठी जगभर संघर्ष होतोय

भारतातल्या सगळ्या शहरांमधे पाण्याचं व्यवस्थापन करताना जल वाहिण्यांतली गळती ही ६० टक्के आहे. लंडनमधे हेच प्रमाण १० टक्के होतं ते आता ५ टक्क्यांवर आलंय. ही टेक्नॉलॉजी आणणं आपल्यासाठी अवघड नाहीय. पण ती इच्छाशक्ती आपल्यात नाही. भूजलाविषयीचा एक अहवाल आलाय. त्यात म्हटलंय की, २००० ते २०१० मधे भूजलाची पातळी ही २३ टक्क्यांनी खालावलीय. त्यामुळे दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद आणि बेंगलोर इथं येत्या पाच वर्षांमधे भूजलाचा साठा मृतावस्थेत जाईल. दरडोई जलउपलब्धता ही झपाट्याने कमी होतेय. एके काळी जिथून शेती उगम पावली त्या मेसोपोटोमिया संस्कृतीतल्या सिरीयातनं युद्ध आणि दुष्काळ यामुळे मोठ्या प्रमाणात आज स्थलांतर होतंय. पाण्यासाठी जगभरात संघर्ष सुरु आहेत.

गरीब देशांमधे ७० ते ८० टक्के पाणी शेतीसाठी. ८ ते १० टक्के पाणी घरगुती वापरासाठी तर उरलेलं उद्योगासाठी वापरलं जातं. श्रीमंत देशांमध्ये ५० ते ६० टक्के उद्योगांसाठी. २० टक्के पाण्याचा शेतीसाठी वापर केला जातो. पाण्याचा पुनर्वापर करून ते काटकसरीने वापरण्याची गरज आहे. भारतात एक किलो कापसासाठी ८,३०० लिटर पाणी लागतं. तर अमेरिकेत हेच प्रमाण २००० आहे. ही जी बचत करायची गोष्ट आहे ती करायची की नाही? तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पुढे हेच सगळ्यात मोठं आव्हान आहे. यात कार्यक्षमता कशी आणता येईल, वैज्ञानिक संशोधन कस करता येईल ह्याचा विचार व्हायला हवा.

जगभरातले शेतीतले आधुनिक प्रयोग

दक्षिण आफ्रिकेच्या डॉ. जेनिफर थॉमसन या हवामान बदलासाठी एडॉपटेशन कसं करायचं ते सांगतात. दुष्काळात जिथं २५% कोरडी माती होती तिथं आज त्यांनी मक्याच पीक घेऊन दाखवलंय. तर चीनमध्ये चक्क वाळूपासून माती बनवली जातेय. बांगलादेशात समुद्राचं पाणी वाढण्याचा धोका आहे. अशा स्थितीत समुद्राच पाणी शेतात आलं आणि १० दिवस तिथं राहीलं तर तांदूळ टिकला पाहिजे म्हणून त्यांनी स्कुबा राईस अर्थात पाणबुड्या भात शोधून काढलाय. 

युरोपात सगळी अद्ययावत तंत्रप्रणाली वापरली जातेय. तिकडे रोबोच्या आधाराने शेतीची काम करवली जातायत.जपानमध्ये तर मातीविना, प्रकाशाविना काचेतली उभी शेती केली जातेय. अशाप्रकारे उत्पादन होतं राहीलं तर त्यांना धान्य आयातीची गरज उरणार नाही. हे सगळे आधुनिक शेतीसाठीचे प्रयोग आहेत. त्यांची काटेकोर शेती आहे आणि आपली काटाकुट्यांची.

हेही वाचा: इस्रायलला घडवणाऱ्या आयर्न लेडी गोल्डा मेयर

मराठवाडा ही हवामान बदलाची केस स्टडी

दरदिवशी साधारण दोन-तीन आत्महत्या ह्या मराठवाड्यात होतात. २०१२ ला १९८ तर २०१८ ला ९६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद सरकार दरबारी आहे. पाऊस जून-जुलैमधे पडत नाही. नंतर येतो तो थेट सप्टेंबरमधे पीक काढायच्या वेळेस. त्यात पीकही नष्ट होतं. पुन्हा मग दोन-तीन पीक घेतली जातात. पाण्याअभावी तीही वायाच जातात. मुळात जी हताशा आहे ती हवामान बदलामुळे आहे. या सगळ्यासाठी समाज म्हणून आपण काय करतो आहोत का? की काही करायचंच नाहीय?

१९९५ ते २००५ या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्रात ६५,००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. आतापर्यंत जवळजवळ ७० ते ७२ हजार मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. जितके शेतकरी मेलेत तितक्याच विधवा बायका आहेत. त्यांना सहानभूती चेक देण्यापूरतीच नंतर त्यांचं काय होतं? त्यांच्या नावावर जमीन होतं नाही. सातबारा त्यांच्या नावावर होत नाही. कुठल्या सवलती मिळत नाहीत. कित्येकवेळा नवऱ्याचा पोस्टमार्टम करायला पैसे नसतात. त्यातचं मुलांच शिक्षण त्यामुळे स्वत:कडे बघायला अजिबात वेळ मिळत नाही. यावर एक पुस्तकं येतंय. दिव्य मराठीच्या पत्रकार दिप्ती राऊत यांच ‘यातनांची शेती’ या नावानं.

आपण एवढं करु शकत नाही का की आयआयएम सारख्या मेडिकल असोसिएशनी का म्हणु नये आत्महत्या झालेल्या घरांना आम्ही तपासू. निदान पुरेशी वैद्यकीय मदत तरी का केली जाऊ नये. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो म्हटलं तरी त्या या आधारानं कशाबशा जगु शकतील. त्यांना आधार मिळेल. या बाया कितीतरी आघाड्यांवर आज लढतायत. त्यांच आपणं देणं लागतो.

हेही वाचा: हे साधे, सोपे व्यायाम करा आणि मोबाईलमुळे होणारी दुखणी टाळा

आदिवासींच्या सन्मानाचं काय?

त्रिवेंद्रमच्या संशोधकीने ही माहिती समोर आणलीय. वैज्ञानिक जगताला चार हजार वनस्पतीच्या प्रजाती महितीयत. तर आदिवासींना ९,५०० प्रजातींची माहिती आहे. आहाराशी संबंधित १२०० आणि औषधाशी संबंधित ३,५०० वनस्पती वैज्ञानिकांना शोधल्यात तर आदिवासींना आहाराच्या ४,००० आणि  ७,५०० औषधी वनस्पतींची माहिती आहे. आदिवासींच्या या स्थानिक बुद्धिमत्तेचा सन्मान आपण कधी करणार? राजकीय आणि सामाजिक पटलावरून आपण त्यांना जवळपास बहिष्कृत केल्या सारखी स्थिती आहे.

जगात वनौषधींच्या वाट्यात चीन एक नंबरला आहे आणि आपण सहाव्या क्रमांकावर आहोत. ९ ऑगस्ट हा त्यांच्या सन्मानाचा दिवस असतो. जागतिक पातळीवर तो घोषितही करण्यात आलाय. आदिवासी पर्यावरण जपणारे आणि हवामान बदलाला सामोरे जाणारे आहेत हे आपण विसरता नये.

या चिमुरड्यांनी हे करून दाखवलं

डॉ. जेम्स हँसन हे नासामध्ये हवामान शास्त्रज्ञ होते. ते असं म्हणालेत की, जगातल्या कार्बन प्रदूषणाला अमेरिका ही २० टक्के कारणीभूत आहे. अमेरिकेतल्या कोळशाच्या खाणी कारणीभूत आहेत. याविरोधात त्यांनी आवाज उठवला. निदर्शन करताना ते बारा वेळा तुरुंगात गेलेत. हवामान बदलाची तीव्रता लक्षात घेऊन पाच वर्षांपूर्वी त्यांनी एक पुस्तक लिहीलंय. 'माझ्या नातवंडांच्या आयुष्यातील वादळे'.

त्यांच्या नातीने १५ वर्षाची असताना हवामान बदलाला तुम्ही कारणीभूत आहात, प्रदूषण कंपन्यांच्या सोबत जात आहात असं म्हणत आपल्या मित्र मैत्रिणींना सोबत घेऊन युनायटेड स्टेटच्या विरोधात खटला भरला. या खटल्यासंबंधी वाद झाले. खटला दाखल होऊ नये म्हणून अमेरिकेतल्या बड्या कंपन्यांनी दबाव आणला. ‘ज्युलियाना वर्सेस युनायटेड स्टेट’ या नावाने हा खटला चालू आहे. जगभरात तो गाजतोय.

ग्रेटा थुनबर्गची जगाला आश्वासक हाक

अवघ्या १६ वर्षांची ही मुलगी. ९ वर्षांपूर्वी भयंकर डिप्रेशनने ग्रासलेली. वयाच्या अकराव्या वर्षी तिने क्लायमेट चेंजबद्दल ऐकलं. आईवडील दोघेही कलाक्षेत्रातले. त्या दोघांनाही तिने प्लेनचा प्रवास कधीच न करण्याचं फर्मान काढलं. का तर तिला उमगला या कोवळ्या वयात हवामान बदलाच्या धोक्याच गणित.

एकेदिवशी ती हवामान बदल थांबवा असा फलक घेऊन स्वीडनच्या पार्लमेंट बाहेर थांबली. दुसऱ्या दिवशी या घटनेची माध्यमांनी दखल घेतली. तिचं भाषण 
झालं. भाषण प्रभावी ठरलं. किंबहुना गाजलच. आजपर्यंत तिने दहा आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सना संबोधित केलंय. फ्रान्सच्या पोप पासून बराक ओबामांपर्यंत सर्वांना तिची दखल घेणं भाग पडलं. याला प्रतिसाद म्हणून या २३ मार्चला १२५ देशातल्या जवळपास १२५ लक्ष विद्यार्थ्यांनी शाळा बंद ठेवल्या का तर हवामान बदलाविषयी जनजागृती व्हावी म्हणून.

२७ मेला टाईम मॅगझीनच्या लेखात पुढच्या पिढीचा नेता म्हणून ग्रेटा थनबर्गचं नाव आलंय. नॉर्वे सरकारने तर तिची नोबेलसाठी निवड केलीय. अतिशय कळकळीने आवाहन करणं, नैतिकतेचं सामर्थ्य असणं आणि किंचितसाही स्वार्थ नसणं यातून एक छोटी मुलगी जगाचं नेतृत्व करतेय. अशा सगळ्यांना आपण पाठबळ देण्याची गरज आहे. उत्तम पर्यावरणासाठी उत्तम राजकारण आणि उत्तम प्रशासन आवश्यक आहे. आपण विविध मार्गाने यासाठी रेटा दिला तरच हा बदल होऊ शकेल.

हेही वाचा: आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?

(लेखक हे पर्यावरणतज्ज्ञ आणि अभ्यासक आहेत.)