लोकसभेच्या जागांनुसार देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. यूपीखालोखाल महाराष्ट्रात ४८ जागा येतात. त्यामुळे साऱ्या देशाचं लक्ष महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतात याकडे लागलंय. गेल्यावेळी ४८ पैकी ४२ जागा जिंकणाऱ्या भाजप युतीला यंदा तेवढ्या जागा मिळणार का सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विविध अभ्यासक, पत्रकारांच्या अंदाज वर्तवणाऱ्या कोलाज स्पेशल लेखांमधला हा एक.
उत्तर प्रदेशनंतर देशात सर्वाधिक लोकसभा जागा असलेल्या महाराष्ट्रात निवडणुकीचा कल काय असणार, याविषयी सर्वत्र उत्सुकता आहे. २९ एप्रिलला चौथ्या टप्प्याचं मतदान झालं आणि महाराष्ट्रातली लोकसभा निवडणूक ६० टक्क्यांच्या आसपास मतदान होऊन पार पडली. २०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्क्यात फारसा फरक पडला नाही. तरी मतदारांच्या वर्तनात मात्र लक्षणीय फरक दिसतो.
गेल्यावेळी हिंदी भाषिक पट्ट्यासारखंच महाराष्ट्रही मोदीलाटेच्या तडाख्यात सापडला. ४८ पैकी ४२ जागा मिळवून भाजपच्या आघाडीने सरशी प्राप्त केली. यंदा मात्र तशी कुठली लाट नसल्याचं दिसतंय. गेल्या निवडणुकीत प्रत्येक जागेवर जणू मोदीच उभे आहेत, असं समजून मतदान करण्याचं आवाहन मतदारांनी गांभीर्याने घेतलं होतं आणि त्यामुळे स्थानिक उमेदवाराचा फारसा विचार न करता मतदान झालं होतं.
यंदा इतर राज्यांसह महाराष्ट्रातही स्थानिक समीकरणं महत्त्वाची ठरताहेत, असं दिसतं. २०१४ च्या तुलनेत राष्ट्रीय कथन अर्थात नरेटीवचा मतदारांवर कमी प्रभाव पाहायला मिळतो.
हेही वाचाः अशोक चव्हाणांच्या जागी कोण होऊ शकतं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष?
निवडणुकीच्या रिंगणात चार प्रमुख पक्ष असले तरी मुख्यतः ही दुरंगी लढत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध भाजप, शिवसेना युती. भारिपने एमआयएमला सोबत घेऊन तयार केलेल्या वंचित बहुजन आघाडीने काही ठिकाणी तिरंगी लढत करण्याचा प्रयत्न केला. वंचित बहुजन आघाडीच्या दाव्यानुसार त्यांचा लढा काँग्रेस आणि भाजप या दोघांविरुद्ध आहे. तरी काँग्रेस आघाडी आणि वंचित आघाडी यांच्या मतदानाच्या सामाजिक आधारांमधे साम्य आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीसमोर आव्हान निर्माण झालं.
भाजपने महाराष्ट्रात दोन पातळ्यांवर विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न केला. विखे पाटील, मोहिते पाटील यासारख्या विरोधी पक्षातल्या मातब्बर नेत्यांना आपल्या पक्षात सामील करुन घेतलं. त्यातून विरोधकांचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या पातळीवर प्रचाराची दिशा राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर आणण्याचा प्रयत्न केला.
देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमने बालाकोटचा मुद्दा हिरीरीने मांडला. नरेंद्र मोदींच्या प्रचाराची भिस्त यावरच होती. मोदींनी तर शहिदांच्या नावाने मला मतं द्या, असं थेट आवाहनच केलं. रोजगार, कृषी संकट यापासून स्वतःचा बचाव करत धार्मिक ध्रुवीकरण आणि आक्रमक राष्ट्रवाद या दोन मुद्यांवर निवडणुकीचं रिंगण आखण्याची ही योजना होती.
पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भोपाळमधे प्रज्ञा ठाकूरला उमेदवारी देऊन हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन धार्मिक ध्रुवीकरणाचा भाजपचा अजेंडा स्पष्ट झाला. अपेक्षेप्रमाणे मोदींच्या भाषणाच्या शब्दकोशातून ‘विकास’ हा शब्दच गायब झाला. यंदा मोदींच्या सभांना २०१४ इतका प्रतिसाद मिळाला नाही. उलट आलेले लोकही भाषण सुरु असताना परत गेल्याचं समोर आलं. मोदींच्या पठडीबाज अभिनिवेशी भाषणांना लोक कंटाळल्याचं दिसलं.
भाजप आघाडी चाचपडत होती तेव्हा काँग्रेस आघाडीची घडीही विस्कटलेलीच होती. काँग्रेसला अंतर्गत संघर्ष सोडवण्यात पुरेसं यश आलं नाही. काँग्रेसच्या उमेदवार निवड आणि प्रचार या प्रक्रियांमधेही फारसं नीट नियोजन नव्हतं. तुलनेनं राष्ट्रवादी काँग्रेसने तगडे उमेदवार रिंगणात उतरवून चांगली लढत दिली. पक्ष कार्यकर्त्यांचं संघटनही उत्साहाने आणि आत्मविश्वासाने काम करत असल्याचं दिसून आलं.
यावेळी सर्वाधिक अपयशी ठरेल असा पक्ष म्हणजे शिवसेना. गेली पावणेपाच वर्षे भाजपवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेने लोकसभेच्या तोंडावर भाजपशी युती केली. पण मतदारांचा विश्वास प्राप्त करण्यात शिवसेनेला अपयश येईल, असं चित्र आहे.
हेही वाचाः दिल्लीत जिंकण्यासाठीच नाही तर दुसऱ्या नंबरसाठीही लढाई
स्वतःच्या पक्षाचा एकही उमेदवार नसताना या निवडणुकीत सर्वाधिक गाजले ते राज ठाकरे. राज यांच्या व्यक्तिमत्वाचं गारुड पहिल्यापासून आहेच. मात्र यंदा त्यांनी सादरीकरणाच्या शैलीतही मोठा बदल केला. विडियोज, विज्युअल्सचा वापर करत एखाद्या कार्पोरेट प्रेझेंटेशनप्रमाणे त्यांनी भाषणं केली. ‘लाव रे तो विडीओ’ करत त्यांनी ‘हा सूर्य, हा जयद्रथ’ या प्रकारे लोकांसमोर वास्तव आणलं.
मोदी सरकारच्या तथाकथित यशस्वी कामगिरीची पोलखोल राज यांनी केली. त्यांच्या सभांना काँग्रेस, राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा असला तरी उत्स्फूर्त प्रतिसादही मिळतं असल्याचं दिसलं. राज यांच्या सभांचा निवडणूक मतदानावर लक्षणीय प्रभाव पडेल, अशी चिन्हं आहेत.
हेही वाचाः एक्झिट अंदाज: दुसऱ्या टप्प्यात कोण जिंकलंय, कोण हरलंय?
महाराष्ट्रातल्या लोकसभा जागांची पाच विभागानुसार ४८ जागांची विभागणी विदर्भ (१०), मराठवाडा (८), उत्तर महाराष्ट्र (६), मुंबई कोकण (१२), पश्चिम महाराष्ट्र (१२) या प्रकारे होते. २०१४ मधे मोदींचा उदय झाल्यापासून महाराष्ट्रातल्या राजकारणाचं केंद्र पश्चिम महाराष्ट्राकडून विदर्भाकडे शिफ्ट झालं. नागपूरच्या बालेकिल्ल्यासह भाजपने २०१४ मधे विदर्भातल्या सर्वच्या सर्व जागा जिंकत इतिहास केला.
यंदा मात्र विदर्भात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अगदी वर्ध्यातच मोदींची सभा ज्या प्रकारे फसली तेव्हाच भाजपला धोक्याची सूचना मिळाली. शेती आणि पाण्याच्या संकटाविषयी काहीच भाष्य भाजपने केलं नाही. मराठवाड्यातही या प्रश्नांविषयी भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली नाही. उत्तर महाराष्ट्रात दुष्काळाच्या प्रश्नासह वन हक्क कायदा आणि धनगर आरक्षण मुद्यांवरुन भाजपविषयी नाराजी दिसली. या भागात आदिवासी आणि धनगर समाजाची भूमिका निर्णायक ठरेल.
मराठ्यांना १६ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाने निर्माण झालेल्या ओबीसी वर्गातल्या अस्वस्थतेचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रात दिसून येईल. राष्ट्रवादीचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या परिस्थितीचा राजकीय फायदा मिळवण्यात मोलाची भूमिका बजावलीय. सर्वच प्रदेशांमधे बेरोजगारीचा प्रश्न कळीचा असल्याचं दिसतं. शहरी मतदारांच्या तुलनेत ग्रामीण मतदार मोठ्या प्रमाणावर भाजपवर नाराज आहे. शहरी आणि मध्यमवर्गीय मतदारांमधे भाजपविषयी अजूनही पसंती होती.
काँग्रेसमधे सक्षम नेतृत्वाचा अभाव आणि शरद पवार यांचं राजकीय कौशल्य यामुळे महाराष्ट्रातलं आताचं राजकारणही पवारांभोवती फिरतंय. राजकीय वातावरणाचा अंदाज घेत पक्षाचं संगठन करण्याचा जोरकस प्रयत्न यांमुळे आघाडीमधे काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी वरचढ ठरेल.
आकड्यांच्याच भाषेत बोलायचं तर युपीए २० जागांचा आकडा पार करेल. एनडीएच्या जागा ३० हून कमी होतील. सेना, भाजपने राष्ट्रीय सुरक्षा आणि हिंदुत्वाच्या मुद्यांवर केलेल्या प्रचाराला काँग्रेस राष्ट्रवादीने मनसेच्या मदतीसह बेरोजगारी, कृषी संकट यांसंबंधीचे प्रश्न उपस्थित करत उत्तर दिलं. सर्वसामान्यांचे प्रश्न प्रचारात परिणामकारकरित्या मांडले गेले नाहीत.
निवडणुकीच्या गणिताच्या पलीकडे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण अस्थिर आहे. विचारधारा दुबळ्या होत जाणं आणि जातीय ध्रुवीकरण वाढीस लागणं यातून महाराष्ट्राच्या राजकीय वैचारिक प्रवासाची दिशा सुस्पष्ट होत नसली तरी तूर्तास भाजपची गाडी उताराला लागली असल्याचं ठामपणे म्हणता येतं.
हेही वाचाः
आपला आपला अंदाजः महाराष्ट्रात भाजप महायुतीला मोठा फटका
कोण जिंकणार, निवडणूक अंदाज मांडणाऱ्या देशातल्या सगळ्यात विश्वासार्ह संस्थेच्या प्रमुखाचा अंदाज
एक्झिट अंदाजः मुंबईसह चौथ्या टप्प्यावर राज्य कुणाचं?
(लेखक हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात टीचिंग असोसिएट म्हणून कार्यरत आहेत.)