ओमायक्रॉनच्या लाटेमुळे कोरोना वायरसचा अंत होईल?

२९ जानेवारी २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


ओमायक्रॉन वेरियंटच्या झपाट्याने झालेल्या प्रसारामुळे आणि नगण्य मृत्यूंमुळे हा कोरोना वायरस साथीच्या रोगाचा शेवटचा टप्पा आहे, असं म्हटलं जातंय. त्यामुळे भविष्यात कोरोना वायरसची साथ पुन्हा येईल ही शक्यता फारच कमी आहे. कोरोना वायरसमधे अनेक प्रकारचे बदल  होऊन जरी तो पुन्हा आला तरी त्यामुळे पुन्हा जग बंद करण्याची गरज पडणार नाही.

गेल्या दीड-दोन वर्षांपासून संपूर्ण जगभरातल्या लोकांच्या मनात घर करून राहिलेला आणि पुन:पुन्हा डोकावणारा प्रश्न म्हणजे ‘कोरोना कधी जाईल?’ वास्तविक, या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर आहे - ‘कोरोना जाणार नाही.’ होय! तो समाजात राहणारच! पण, तो सर्वसामान्य सर्दी आणि खोकल्यामधे बदलून जाईल. या बदलाची सुरवात झाली असून, डेल्टानंतर आलेला कोरोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉन हा त्याचाच प्रकार आहे.

हेही वाचाः कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

ओमायक्रॉनची लाट फेब्रुवारीत

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकाच दिवशी १२ कोटी लोकांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला होता. ही संख्या दुसर्‍या लाटेतल्या एका दिवसाच्या पेशंट संख्येच्या दहापट अधिक होती; तर त्याच दिवसाचा मृत्यूचा आकडा मात्र दुसर्‍या लाटेच्या पन्नासपट कमी होता. यावरून दिसतंय की, आपण कोरोनाच्या शेवटाकडे निघालो आहोत. साधारणपणे ज्या दिवशी फक्त कोरोनाच्या संसर्गामुळे कमीत कमी किंवा अगदी नगण्य मृत्यू नोंदवले जातील मात्र पेशंटची संख्या हजारो किंवा लाखो असेल, तेव्हा कोरोना परतीच्या मार्गावर आहे असं म्हणता येईल.

जानेवारी २०२२ ते मार्च २०२२ या तीन महिन्यांच्या काळात जगातल्या ५० टक्के लोकांना ओमायक्रॉनचा संसर्ग होऊन गेलेला असेल, असा अंदाज ‘लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध मेडिकल जर्नलमधे वर्तवण्यात आलाय. अमेरिकेच्या सहा राष्ट्राध्यक्षांचे आरोग्य सल्लागार राहिलेले प्रसिद्ध साथरोगतज्ज्ञ डॉ. फुकूची यांच्या म्हणण्यानुसार, जगभरातल्या ओमायक्रॉनचा सर्वोच्च बिंदू फेब्रुवारीमधे येईल आणि त्यांनतर तो हळूहळू कमी होत जाईल. डॉ. फुकूची यांच्या म्हणण्यानुसार, सध्या आपण कोरोनामधून मुक्ती मिळण्याच्या योग्य दिशेने जात आहोत.

वायरस स्थानिक प्रकारात राहील

ओमायक्रॉन वेरियंटच्या झपाट्याने प्रसारामुळे आणि त्यामुळे होणार्‍या नगण्य मृत्यूमुळे आशा निर्माण झाली आहे की, हा कोरोना वायरस साथीच्या रोगाचा शेवटचा टप्पा आहे. या आशेचा आधारही संसर्गजन्य रोगाच्या इतिहासात आहे. मागच्या शंभर वर्षांतल्या मोठ्या महामारीचा विचार केला, तर याच मार्गाने महामारीचा शेवट झाला आहे.

संपूर्ण जगभरात संसर्गजन्य परंतु कमी प्राणघातक प्रकारातल्या वायरस लोकसंख्येचा मोठा भाग व्यापतो, तेव्हा तो त्या लोकसंख्येमधे एक व्यापक संरक्षणात्मक छत्र तयार करू शकतो. अशा प्रकारचं तयार झालेलं संरक्षणात्मक छत्र लसीमुळे तयार झालेल्या संरक्षणासारखंच असतं आणि त्यामुळेच तो वायरस स्थानिक प्रकारचा बनतो.

एका ठराविक काळानंतर कोरोनाचा वायरस पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात येणार्‍या सर्दी-तापाच्या वायरससारखा होईल आणि पुढे त्याची नवीन म्युटेशन येतील; पण ती धोकादायक नसतील. हा बदललेला पण कमी तीव्रतेचा वायरस प्रसारित होत राहील, पण लस आणि सामूहिक संसर्गाच्या परिणामामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळे संक्रमण कमी होईल, गंभीर आजार आणि मृत्यू फार कमी होतील आणि जीवन महामारी पूर्वीच्या सामान्य स्थितीत परत येऊ शकेल.

हेही वाचाः कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत

कोरोनापूर्वी, कोरोनानंतरचं जग

कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न साचून राहिला आहे. गेले दोन वर्ष झाले याचं उत्तर सापडलं नाही. पण आपल्याला आठवत असेल, तर कोरोनाच्या साथीची सुरवात झाल्यापासून अनेक देशातले शास्त्रज्ञ सांगत होते की, आपलं आयुष्य आणि हे संपूर्ण जग दोनच भागात विभागलं जाईल. एक म्हणजे कोरोनापूर्वीचं आणि कोरोनानंतरचं जग.

आपण आपल्या कोरोनापूर्वीच्या जगात आहे तसे जाऊच शकत नाही किंवा हे जग पुन्हा पूर्वीसारखं होणारच नाही. गेल्या दोन वर्षांत आपल्या आयुष्यात आणि संपूर्ण जगाच्या दैनंदिन व्यवहारात अनेक बदल झालेत. यातले अनेक बदल कोरोना निघून गेला तरी आहे तसेच पुढे राहतील आणि आपणही त्या बदलांना जुळवून घेतलेलं असेल.

सध्या भारतामधल्या तिसर्‍या लाटेची तीव्रता आणि होणारे मृत्यू यांचा विचार केला, तर मार्च महिन्याच्या सुरवातीपासून आपण नॉर्मल दैनंदिन व्यवहाराकडे वळू शकू. साधारपणे जिथे जिथे ओमायक्रॉनची मोठी लाट आली, त्या सर्व देशांमधे हीच परिस्थिती दिसून आली आहे. ज्या वेगाने ओमायक्रॉनची लाट आली त्याच वेगाने ती ओसरली आहे.

बदल भविष्यासाठी गरजेचेच

भारतामधेसुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती राहील. आपली लोकसंख्या जरी मोठी असली तरी दुसर्‍या लाटेच्या दुप्पट ते तिप्पट पेशंट संख्या दिसून येईल; मात्र मृत्यू फारच कमी राहतील. ही परिस्थिती आपल्यासाठी आपलं जीवन पूर्वपदावर येण्यासाठी आशादायी असेल. जीवन जरी पूर्वीसारखं होणार नसलं तरी झालेले काही बदल भविष्यासाठी गरजेचेच असतील.

उदारणार्थ, पूर्वी लोक आपल्या वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष देत नव्हते, घरात किंवा सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत होते. कोरोनानंतरच्या जगात आपल्याला हे बदललेलं दिसून येईल किंवा सध्या हा बदल दिसून येत आहे. लोक मास्कचा वापर स्वतःहून करतील; ज्यामुळे प्रदूषण, धूळ आणि वातावरणीय बदलामुळे होणारे विषाणूजन्य आजार यांच्यापासून आपलं संरक्षण होईल.

हेही वाचाः कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

कोरोनाचं पुन्हा आगमन?

कोरोना कधी जाईल, या प्रश्नाइतकाच हासुद्धा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे किंवा विचार करायला लावणारा आहे. आपल्याला साधारणपणे माहीत असलेल्या मागील ५०० वर्षांच्या इतिहासात डोकावून पाहिलं, तर एकाच प्रकारच्या वायरसची साथ पुन:पुन्हा आली नाही किंवा त्या वायरसची साथ जाऊन पुन्हा दहा-वीस किंवा पन्नास-शंभर वर्षांनी पुन्हा आली नाही. त्यामुळे भविष्यात कोरोना वायरसची साथ पुन्हा येईल ही शक्यता फारच कमी आहे.

समजा, जर कोरोना वायरसमधे अनेक प्रकारचे बदल जरी होऊन जरी तो पुन्हा आला तरी त्यामुळे पुन्हा जग बंद करण्याची गरज पडणार नाही. याचं मुख्य कारण म्हणजे आताच्या कोरोनाच्या साथीत जगातल्या ७० ते ८० टक्के लोकसंख्येला लसीमुळे किंवा कोरोना संसर्ग झाल्यामुळे प्रतिकारशक्ती तयार झाली आहे आणि हीच प्रतिकारशक्ती भविष्यातल्या कोरोनाची लाटसुद्धा सहजच थांबवू शकते.

उदाहरणच द्यायचं झालं, तर ज्या लोकांना कोरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग झाला, त्यामधल्या १० टक्के लोकांनाच दुसर्‍या लाटेत पुन्हा संसर्ग झाला आणि त्या लोकांचे मृत्यू मात्र अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके झाले. ज्या लोकांना पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत कोरोनाचा संसर्ग झाला, त्या लोकांना तिसर्‍या लाटेत कोरोनाचा संसर्ग झालेलासुद्धा समजला नाही आणि अशा लोकांच्या मृत्यूची नोंदसुद्धा सापडली नाही.

याउलट या तिन्ही कोरोनाच्या लाटा मात्र बदलून आलेल्या कोरोना वायरसमुळे आल्या. यावरून भविष्यातली परिस्थिती अधिक स्पष्ट होत आहे. जरी कोरोना वायरसमधे नवीन बदल झाले तरी, त्यामुळे अत्यंत जीवघेणी लाट येणार नाही. यामधे कोट्यवधी लोकांना एकाचवेळी झालेला ओमायक्रॉनचा संसर्ग आणि त्याचबरोबर त्यांना दिलेली लस या दोन्हींचा एकत्रित परिणाम आहे.

खरंच कोरोनाचा अंत शक्य?

निसर्गाचा एक साधा नियम आहे. निसर्गात जेवढी मोठी वस्तू तेवढी तिचा अंत सोपा असतो. याउलट जेवढी लहान वस्तू तेवढा तिचा अंत अवघड असतो. उदाहरणच बघूया. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर महाकाय असे डायनासोर प्राणी होते, त्याचवेळी पृथ्वीवर वायरस आणि मुंगीही होती. निसर्गातल्या एका घटनेमुळे महाकाय असे डायनासोर प्राणी नष्ट झाले; मात्र लाखो वर्षांनी आजही मुंगी आणि वायरस आहेत.

अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर मानवी हस्तक्षेपामुळे वाघ, चित्ते, हत्ती हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत; पण मानवाने कितीही हस्तक्षेप केला तरी तो मुंगीला नष्ट करू शकणार नाही. वायरस तर मुंगीपेक्षा लाखो पटींनी लहान आहे. मानव त्याला नष्टच करू शकणार नाही. मग तो कोणत्याही प्रकारचा वायरस असो.

जगातून पोलिओ रोगाचे समूळ उच्चाटन झालं आहे असं जरी आपण जाहीर केलं असलं तरी पोलिओचा वायरस कुठे ना कुठेतरी निसर्गामधे आहेच. अशाच प्रकारे कोरोना वायरससुद्धा काही प्राण्यांमधे किंवा मानवी शरीरातच राहू शकतो. याचं अलीकडचं उदाहरण म्हणजे क्षयरोगाचा जिवाणू. क्षयरोग समाजातून संपूर्णपणे नाहीसा जरी झाला नसला तरी त्याचं प्रमाण गेल्या २५ वर्षांत कित्येक पटीने कमी झाले आहे.

अलीकडच्या संशोधनातून दिसून आलंय की, हा जिवाणू कोट्यवधी लोकांच्या शरीरात निपचिप पडून आहे. मानवाची प्रतिकारशक्ती खूपच कमी होते तेव्हा तो पुन्हा त्रासदायक ठरतो. वायरस इतकी वर्ष मानवी शरीरात निपचिप पडून राहणं शक्य नसतं; पण कदाचित तो इतर प्राण्यांमधे कोणताही त्रास न देता निपचिप राहील अशीही शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा अंत होणारही नाही आणि आणि पुन्हा भविष्यात फक्त याच कोरोनामुळे जग बंद करण्यासारखी परिस्थितीसुद्धा निर्माण होणार नाही. या दोन्ही शक्यता तेवढ्याच बरोबर असतील.

हेही वाचाः 

कोरोनाचा प्रादुर्भाव ही माणसाचीच चूक आहे!

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

भारताची इटली बनणाऱ्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉडेल बनवलं

(लेखक ऑक्सफर्ड युनिवर्सिटी, इंग्लंड इथल्या मेडिकल सायन्स डिविजनमधे वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत)