एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या तान्हाजी सिनेमातले तानाजी मालुसरे बघण्यासाठी तुफान गर्दी होतेय. पण यात तानाजींचा इतिहास सापडतच नाही. आता तर सैफ अली खाननेही ते सांगितलंय. तो म्हणतो तसं या सिनेमातल्या इतिहासामागचं पॉलिटिक्स धोकादायक आहे. काय आहे ते पॉलिटिक्स?
सैफ अली खानने तान्हाजी: द अनसंग वॉरियर मधे मुख्य विलन असणाऱ्या उदयभान राठोडची भूमिका केलीय. पद्मावतमधला रणवीर सिंग आणि पानिपतमधला संजय दत्त यांचं आणखी एक वर्जन आहे. पण त्याने मजा आणलीय. त्याने आणखी मजा आणलीय ती त्याच्या मुलाखतीने. सिनेसमीक्षक अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखती त्याने तान्हाजीतला इतिहास खोटा असल्याचं सांगितलंय.
त्याच्या सांगण्याचा आशय असायः या सिनेमात दाखवलेल्या इतिहासामागचं राजकारण एक नागरिक म्हणून माझ्या चिंतेचा विषय आहे. पण मला भूमिका आवडली होती. ती मी केली. त्याविरुद्ध मला भूमिका घेता आली नाही. कदाचित उद्या घेता येईल. चालतं म्हणून इतिहासाची मोडतोड करणं चुकीचं आहे. धोकादायक आहे. ते न करणाऱ्या फिल्म इंडस्ट्रीचा भाग असलेलं मला आवडेल.
बॉलीवूडमधे एण्ट्री घेणारे डायरेक्टर ओम राऊत यांचा तान्हाजी सिनेमा आहे मात्र जोरदार. डायलॉग, स्पेशल इफेक्ट, अभिनय, म्युझिक सगळं कडक आहे. पण इतिहासाच्या नावाने काढलेल्या या सिनेमात इतिहास चवीपुरताच सापडतो. स्पायडरमॅन, हॅरी पॉटरच्या सिनेमांत असतो तसाच अवास्तव स्टंट करणारा सुपरहिरो पडद्यावर दिसतो. दोन तास पॉपकॉर्न खात या मराठी सुपरहिरोला बघावं, त्यांच्या करामतींनी अवाक व्हावं. मात्र सिनेमात दाखवलं तसं इतिहासातही घडलं असेल, असा विश्वास मात्र ठेवू नये.
शिवकालीन इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी `तान्हाजी` सिनेमा बघितलाय. ते त्याविषयी सांगतात, `तानाजींच्या पराक्रमावर सिनेमा बनला आणि ते जगभर पोचले, ही आनंदाची गोष्ट आहे. यातली सिनेमॅटिक लिबर्टी इतकी ताणलीय की त्यात इतिहास उरतच नाही. इतिहासात नसलेली पात्रं, उपकथानकं, समाजजीवन, भाषा, वेषभूषा, लढाया इथे आहेत. त्यामुळे बुरुजांवरून घोडे उडवणारी ती एक फॅण्टसी उरते.`
हेही वाचाः पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?
तानाजींनी लढलेली सिंहगडची लढाई ही महाराष्ट्राच्याच नाही, तर देशाच्या इतिहासातली एक अमर शौर्यगाथा आहे. १६७० मधे झालेल्या या लढाईला पुढच्याच महिन्यात फेब्रुवारीमधे बरोबर ३५० वर्षं होत आहेत. तानाजींवर शेकडो पुस्तकं लिहिली गेली. त्यावर कथा, कादंबऱ्या, कविता, लेख, पोवाडे, चित्रकथा रंगल्या.
`गड आला पण सिंह गेला` या ह. ना. आपटेंच्या कादंबरीने तर लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडले. त्यावर नाटकं आली. तीन सिनेमे आले. तरीही आता नव्या सिनेमाच्या नावातच तानाजींचं वर्णन `द अनसंग वॉरियर` असं केलंय. त्याचा अर्थ होतो या वीराची कहाणी आजवर कुणी सांगितलीच नाही.
साडेतीनशे वर्षांपूर्वी हे असंच घडलं असेल, असं छातीठोकपणे कुणीही सांगू शकत नाही. पण सिनेमा ते इतिहासाच्या जास्तीत जास्त जवळ नेण्याचा प्रयत्न करायला हवा. ते या सिनेमात सापडत नाही. साधे शेतकरी असणाऱ्या तानाजींचा सिनेमात दाखवलाय तसा एकमजली वाडा असणं शक्य नाही. कारण वाड्या, गढ्या उभारू नयेत, हा शिवरायांचा हुकूम आहे. सिनेमात अजिंक्य देवने भूमिका केलीय, तो चंद्राजी पिसाळ नावाचा कुणी व्यक्ती इतिहासात नाहीच.
तानाजींच्या शृंगारपूरच्या लढाईचं गमतीशीर वर्णन शिवभारतात आहे. त्यात पिलाजी नीळकंठ नावाचा आपला ब्राह्मण सेनापती पळून जात असतो. तानाजी त्याला दगडाला बांधून ठेवतो आणि सांगतो बघ असं युद्ध करतात. ते युद्ध जिंकतातदेखील. पण इतिहासातल्या अशा लढायांऐवजी भलत्याच लढाया यात आहेत. अत्याधुनिक ग्राफिक्सच्या साहाय्याने त्या लढाया रोमांचक बनवल्यात. पण मराठ्यांचा गनिमी कावा वीएफएक्सपेक्षाही जास्त आकर्षक आहे.
तानाजींनी नाही, तर शेलारमामांनी उदयभानाला दांडपट्ट्याने चिरलं, असं वर्णन सापडतं. अगदी तिसरीच्या इतिहासाच्या पुस्तकातही. पण सिनेमात मेन हिरोचं उदात्तीकरण करण्यासाठी ते श्रेय तानाजींना दिलंय. उदयभानाने तानाजींना मारल्यानंतर त्यांचा भाऊ सूर्याजी यांनी खऱ्या अर्थाने गड जिंकला.
`तुमचा बाप इथे मरून पडलाय, तुम्ही भेकडासारखे पळून काय जाताय?`, असं पळून जाणाऱ्या मावळ्यांना बजावणारे सूर्याजी सिनेमात दिसले असते, तर काय बिघडलं असतं? इतर खोटीनाटी कथानकं दाखवण्यापेक्षा या दोन भावांची कहाणी आली असती, तर ती इतिहासाला अधिक धरून असती.
हेही वाचाः मध्यरात्री नझरुल काझींनी जन्मस्थळी बसवला जिजाऊंचा पुतळा
सैफ अली खानने रंगवलेलं उदयभान राठोड याचं पात्र तर नावाखेरीज कुठेच इतिहासाशी प्रामाणिक नाही. उपलब्ध इतिहासात त्याचं कोणतंही प्रेमप्रकरण नाही. आहे ते कादंबऱ्यात. सिनेमातली राजकन्या कमलही काल्पनिक आहे आणि तिचा भाऊही. तो शूर होता, पण औरंगजेबाच्या दरबारात थेट संधी मिळेल, इतका तो मोठा नव्हता. तो कोंढाण्यावर आला तेव्हा ना त्याच्याकडे कोणती तोफ होती. ना तिचं नाव नागीण होतं. ना बऱ्हाणपुरातून सिंहगडावर येण्यासाठी कोणता जलमार्ग आहे.
सिंहगडावरून तोफ डागल्यावर तर राजगडावरच्या माचीवर उभे असणारे शिवाजी महाराज संपणारच, असं सिनेमात दाखवलंय. एकतर या दोन गडांवरचं अंतर फार आहे. तितकं अंतर कापणाऱ्या तोफा तेव्हा नव्हत्याच. तान्हाजी सिनेमाच्या सुरवातीला पडद्यावर डिस्क्लेमर येतो की हा इतिहास नाही. यातले तानाजी हे एक `पौराणिक पात्र` आहे. त्यामुळे तानाजींच्या नावाने काहीही दाखवण्याचं लायसन्स सिनेमाला मिळालंय. मात्र सिनेमाच्या ट्रेलरमधे बेस्ड ऑन ट्रू स्टोरी असं वारंवार बिंबवण्यात आलंय. लोक तेच बघतात, सिनेमाच्या सुरवातीच्या सूचना नाहीत.
या सिनेमाच्या सुरवातीला आणखी एक सूचना आहे. ती म्हणजे, मराठा हा शब्द या सिनेमात कोणत्याही जातीशी संबंधित नाही, तो मराठी समाज या अर्थाने आलाय. त्यामुळे यात तानाजी `एक मराठा लाख मराठा` म्हणताना दाखवता आलेत. त्याने मराठा मोर्चा काढणाऱ्यांनी हुरळून जाण्याची गरज नाही. या घोषणेला इतिहासाचा कोणताही दाखला नाही. ती मोर्चांच्या निमित्ताने पुढे आलेली ताजी घोषणा आहे.
एक सरदार सव्वालाख के बराबर, ही शिखांचं उदात्तीकरण करणारी घोषणा हिंदी सिनेमात वारंवार आल्यानंतर त्यावरून मराठा मोर्चाची ही घोषणा तयार झालीय. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये ही घोषणा आल्यानंतर महादेव कोळी आणि क्षत्रिय कोळी समाजाच्या लोकांनी थेट दिल्लीत कोर्टात जाऊन आक्षेप घेतला. जुन्या इंग्रजी ग्रंथांचे दाखले देत तानाजी मालुसरे मराठा नसून कोळी असल्याचा दावा केला. त्यामुळे ही सूचना सिनेमाच्या सुरवातीला दाखवावी लागतेय.
हा सिनेमा तानाजींचा असल्यामुळे शिवरायांना स्कोपच ठेवलेला नाही. महाराज एकतर पूजेत दिसतात नाहीतर चिंतेत. जणू काही स्वराज्य तानाजींनीच शिवरायांना मिळवून दिलंय, असा सिनेमाचा अविर्भाव आहे. शिवरायांकडे तानाजींसारख्याच ताकदीचे किमान पंचवीसेक तरी सरदार मोजता येतील. शिवरायांचं मोठेपण सिनेमात ठळक दिसलं असतं तर त्यांचे पाईक म्हणून तानाजीही तितकेच मोठे ठरले असते.
हेही वाचाः रानडे-फुले यांच्यात मतभेद असूनही दोघांची समाजसुधारणा तत्त्वं एक होती!
सिनेमाच्या ट्रेलरमधे तानाजींच्या हातातल्या झेंड्यावर ओम होता. आक्षेप घेतल्यामुळे प्रत्यक्ष सिनेमात तो गायब झालाय. एकदा ओमवाला भगवा झेंडा दिसतो, पण तो कोंढाणा किल्ल्यातल्या देवळावर. ओम असलेला भगवा झेंडा हा आज विश्व हिंदू परिषदेची ओळख आहे. आक्षेप घेतला गेला नसता तर ऐतिहासिक गडबड झाली असती. पण सिनेमात भगव्यावरून वारंवार प्रचारकी भाषणबाजी आहे.
ट्रेलरमध्ये काजोलच्या तोंडी एक डायलॉग होता की शिवाजी महाराज की तलवार चलती हैं, तब औरतों के घुंघट और ब्राह्मणों के जनेऊ सलामत रहते हैं. त्यावर संभाजी ब्रिगेडसह सर्वसामान्य नेटकऱ्यांनीही आक्षेप नोंदवला होता. तो प्रत्यक्ष सिनेमात अर्थातच बदलावा लागलाय. मुळात सर्व जातभेदाच्या पलीकडे असलेले शिवराय फक्त ब्राह्मणांच्या रक्षणासाठी लढणारे गोब्राह्मणप्रतिपालक कसे असतील? हे मान्य करून बाबासाहेब पुरंदरेंसह अनेकांनी हे विशेषण मागे घेतल्याचे प्रसंग पूर्वी घडलेत. त्यामुळे तसा डायलॉग असणं, हा खोडसाळपणाच ठरतो. त्यातून शिवरायांविषयीचा बुरसटलेला संकुचित दृष्टिकोनच समोर येतो.
चित्रमहर्षी भालजी पेंढारकरांनी सिनेमातून त्यांना हवे तसे हिंदुत्ववादी पठडीतले शिवाजी महाराज मांडले. मुस्लिमांचा द्वेष करणारी ही मांडणी होती. तीच प्रतिमा बहुसंख्य नाटककारांनी आणि कादंबरीकारांनी पुढे नेली. बाबासाहेब पुरंदरेंनी आपल्या प्रतिभेच्या आणि प्रचाराच्या जोरावर ती ओळख अधिक घट्ट केली. हे शिवराय फक्त देव, देश आणि धर्मासाठी लढणारे होते. जणू त्यांचं साध्या माणसांशी काहीच घेणंदेणं नव्हतं.
त्यावर सत्यशोधक चळवळीपासून आतापर्यंत अनेक अभ्यासकांनी जोरदार हल्ले केले. त्यातून रयतेचा आणि शेतकऱ्यांचा राजा म्हणून शिवराय पुढे आले. जात, धर्म, प्रदेश याच्या संकुचितपणापासून दूर असणारे ग्लोबल ठरू शकतील असे हे शिवराय होते. आपल्या डोक्यातल्या हिंदुत्त्ववादावर शिवरायांचा शिक्का मारायचं काम आजही सुरू असतं.
ते या सिनेमातही ठळकपणे येतं. शिवराय आणि जिजाऊंची प्रतिमा यात सतत देववादी आणि दैववादी ठरते. तानाजीही देवदेव करताना दिसतात. युद्ध सुरू असताना यज्ञयाग करणाऱ्या जिजाऊ आपल्याला दिसतात. औरंगजेबाने काशी विश्वनाथाचा विध्वंस केला, त्याचा आधार घेऊन तानाजी कोंढाण्याच्या मराठी पहारेकरांना आपल्याकडे वळवताना दिसतात.
पण हेच खरं असेल, तर मिर्झाराजे जयसिंग महाराष्ट्रावर चालून येण्याआधी काशी विश्वनाथासमोर होमहवन आणि नवस कसं काय करतात? त्यांचा राजपूत हिंदू किल्लेदार उदयभान राठोड आणि शिवाजी महाराजांचे सरदार तानाजी मालुसरे या दोन हिंदूंमधला संघर्ष ही या सिनेमाची खरी कहाणी आहे. ती हिंदू आणि मुसलमानांमधली नाही. उदयभान हा हिंदू असला तरी त्याला एक मुसलमान असल्यासारखंच रंगवण्यात आलंय. तो राजपुतांसारखे फेटा किंवा कपडे घालत नाही. तर इतर मुसलमान सैनिकांसारखेच काळे कपडे घालतो. काळं जाड काजळ लावतो. शेवटी तर तो अल्लाहू अल्लाहू अशा गाण्यावर नाचतोही.
हेही वाचाः ‘मिशन मंगल’ सिनेमा बघून आपलं मंगलयानही आत्महत्या करेल!
उदयभान मिर्झाराजे जयसिंगांचा एक शिलेदार होता. तो त्यांच्यासारखा शूर, चतुर आणि दिल्लीशी निष्ठावान होता. तो मिर्झाराजेंसारखाच श्रद्धावानही असण्याची शक्यता खूपच जास्त आहे. तरुणपणी एका मुलीला प्रपोज केल्यानंतर तिने नकार दिला, म्हणून उदयभान मुगलांना मिळाला, असं सिनेमात दाखवलंय.
उदयभानासारखे हजारो हिंदू किल्लेदार आणि सरदार पिढ्यानुपिढ्या मुगलांची सेवाचाकरी करत होते. त्या प्रत्येकाचा प्रेमभंग झाला नव्हता. त्यांची कारणं वेगळी होती. प्रतिष्ठेच्या, शौर्याच्या आणि निष्ठेच्या खोट्या कल्पनांपायी त्यांनी आपलं सर्वस्व मुगलांच्या चरणी अर्पण केलं होतं.
एकीकडे राजाला विष्णूचा अवतार मानून त्याला आंधळेपणाने शरण गेलेले मिर्झाराजे आणि उदयभान यांच्यासारखे हिंदू योद्धे होते. दुसरीकडे शिवाजी महाराजांचं सैन्य रयतेतून रयतेसाठी उभं राहिलं होतं. एकीकडे पराभूतांची लुटालूट ही उत्पन्नाचं साधन होतं, दुसरीकडे शिवाजी राजे सैनिकांना बजावत होते की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये. त्यामुळेच शिवरायांचं स्वराज्य जातिधर्माचे बांध तोडून सगळ्या प्रजेला आपलं वाटत होतं. म्हणून उदयभान हा शोषण करणाऱ्यांचा प्रतिनिधी ठरतो आणि तानाजी त्यांच्या शोषणाने भरडले जाणाऱ्यांतून उठलेल्या क्रांतीचा आवाज बनतात.
हा इतका साधा संघर्ष आहे. द्वेष आणि प्रेम यांच्यातला तो अनादी अनंत संघर्ष आहे. तो दाखवणं खरंतर सोपं आहे. कारण सत्य नागडं असतं. खोट्याला लपण्यासाठी भरजरी पोषाखांची आणि दागदागिन्यांची गरज असते. खोटे हिंदुत्ववादी शिवाजी महाराज खरे करून दाखवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा बडेजाव लागणारच होता. त्यातून गल्ला भरणारा सिनेमा होऊ शकतो. पण खऱ्या शिवरायांचा खरा संघर्ष दाखवायला नवी दृष्टी लागते. त्यातून जगाला आपलासा वाटणारा ग्लोबल सिनेमा बनू शकतो. तिचा `तान्हाजी` सिनेमाशी दूरदूरचाही संबंध नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सिंहगडाच्या लढाईवर एक पोवाडा रचलाय. तसाच महात्मा जोतिराव फुलेंचाही शिवाजी महाराजांवरचा पोवाडा आहे. दोघांच्याही काव्याला काळाच्या मर्यादा आहेत. पण दोघांचा वेगवेगळा दृष्टिकोन आहे, तो महत्त्वाचा आहे. महात्मा फुले शिवरायांना शेतकऱ्याचा राजा म्हणून उभं करतात. दुसरीकडे सावरकर `हिंदूनृसिंह प्रभो शिवाजी राजा` म्हणून आरती गातात. `तान्हाजी` सिनेमातून सावरकरी शिवरायांचा आधुनिक पोवाडा रचलाय.
त्यामुळे आता जोतिरावांच्या अनुयायांनी शिवाजी महाराजांची आधुनिक पुरोगामी राजा म्हणून पुढे आणलेली खरी प्रतिमा पुन्हा उलटवण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं पाहिजे. त्याला उत्तर देता आलं नाही तर नवी पिढी `तान्हाजी`मधल्या शिवरायांनाच खरं मानत राहील.
हेही वाचाः
दीपिकाच्या मौनातही जय हिंदचा नारा घुमतो!
शिवरायांच्या डच चित्राच्या दंतकथांचा पर्दाफाश
शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?
(साप्ताहिक चित्रलेखामधल्या लेखाचा संपादित भाग.)