विराट कोहलीच्या माथ्यावर ‘३६’चा शिक्का लावणारी टेस्ट सिरीज

३१ डिसेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


७० वर्षांत ऑस्ट्रेलियातली टेस्ट सिरीज जिंकणारा विराट कोहली हा पहिला आणि एकमेव भारतीय कॅप्टन. यंदा मात्र कोहलीला अ‍ॅडलेडच्या टेस्टमधे अपयशी सलामीला सामोरं जावं लागलं. भारतीय टीमची वाताहत झाली. अवघ्या ३६ धावातच भारतीय टीम गारद झाली. ८८ वर्षांच्या भारतीय टेस्ट क्रिकेट इतिहासातली भारताची ही नीचांकी धावसंख्या! त्यामुळे होईल काय तर भारतीय क्रिकेटला अव्वल क्रमांकावर नेणार्‍या कॅप्टन विराट कोहलीच्या माथ्यावर मात्र ‘३६’चा शिक्का कायम बसेल.

अवसानघातकी बॅटिंग हे भारतीय क्रिकेटचं व्यवच्छेदक लक्षण. अ‍ॅडलेड ओवलवर गेल्या शनिवारी कमिन्स, हेझलवूड या ऑस्ट्रेलियन तेज जोडगोळीनं भारताचा ३६ धावात खुर्दा उडवला. पहिल्या डावात ५३ धावांनी पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियाने तीन दिवसांतच खेळ खल्लास करून डे, नाईट टेस्टमधली आपली विजयी परंपरा कायम राखली. ८ पैकी ८  डे, नाईट टेस्ट जिंकून त्यांनी निर्भेळ यश मिळवलंय.

नाणेफेकीचा कौल विराट कोहलीच्या बाजूने लागला खरा; पण नाणेफेक जिंकूनही त्याच्या पदरी पराभव पडला. महत्वाचं म्हणजे त्याच्या बाबतीत हे पहिल्यांदाच घडलं. बोर्डर गावस्कर करंडक सिरीजमधे कोहलीच्या भारतीय टीमला अपयशी सलामीला सामोरं जावं लागलं. चुकीची टीम निवड, कचखाऊ बॅटिंग, ढिसाळ फिल्डिंग, डे नाईट टेस्ट खेळण्याचा तुटपुंजा अनुभव या गोष्टी भारताच्या दारुण पराभवाला कारणीभूत ठरल्या.

हेही वाचा: आरसीबीचा विराट म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार!

अर्धशतकी आघाडीवरच समाधान

अ‍ॅडलेडच्या खेळपट्टीवर पहिल्या डावात भारताचंच वर्चस्व होतं. कोहलीनं कॅप्टनला साजेसा खेळ करत ७४ धावा पटकावताना वाइस कॅप्टन रहाणेसोबत ८८ धावांची भागीदारी केली. स्कोरबोर्ड ३ बाद १८८ असा सुदृढ दिसत असताना रहाणेला चोरटी धाव घेण्याची सुरसुरी आली आणि कॅप्टन कोहली आउट झाला. हा सामन्याला कलाटणी देणारा क्षण! सेनापती माघारी परतल्यानंतर वाइस कॅप्टनही बाद झाला, रंगाचा बेरंग झाला.

स्टार्क, कमिन्स, हेझलवूड यांनी शेपटाला झटपट गुंडाळल्यामुळे भारताचा डाव २४४ धावांवरच आटोपला. अश्विनच्या फिरकीच्या साथीने बुमराह, शमी, यादव या तेज त्रिकुटाने कांगारूंना एकापाठोपाठ एक धक्के दिले; पण मोक्याच्या क्षणी सुटलेल्या कॅचमुळे ऑस्ट्रेलियाचं शतक झळकलं. जीव तोडून मारा करणार्‍या शमीच्या बॉलिंगवर किमान २,३ कॅच सुटल्या. त्याचा फायदा लबुशेन तसंच कॅप्टन टीम पेननं उठवला.

बुमराहने लबुशेनची कॅच सोडली. शमीच्या बॉलिंगवर, त्याने ४७ धावा केल्या. बॅट्समनना अनेकदा चकवूनही शमीची बळींची पाटी कोरीच राहिली. सुदैवी पेनने बेडर खेळ करत तळाच्या बॅट्समनच्या साथीने ८० धावांची भर घातली, ती भारताला भारी पडली. शतकी आघाडीऐवजी अर्धशतकी आघाडीवरच भारताला समाधान मानावं लागलं.

४६ वर्षांपूर्वीची गोष्ट

स्टार्क, कमिन्स, हेझलवूड यांनी दुसर्‍या डावात आपल्या आक्रमणाचा रोख उजव्या स्टम्प बाहेर म्हणजे आऊटसाईड द ऑफ स्टम्प ठेवला. भारतीय बॅट्समन या जाळ्यात आपसूक अडकलेे. विकेटकीपर पेनने ५ कॅच घेतल्या; शिवाय ऑस्ट्रेलियाची स्लीपमधली फिल्डर्सची साखळी दक्ष, सक्षम असल्यामुळे कॅच अचूक टिपल्या गेल्या. ऑस्ट्रेलियन तेज जोडगोळीने अचूक मारा करताना स्विंगवर नियंत्रण राखलं. कमिन्स, हेझलवूड यांनी कुकाबुरा चेंडूचा टप्पा अचूक राखल्यानं बॅट्समनना चेंडूला बॅट लावण्याचा मोह टाळता आला नाही.

बॅटची कडा घेऊन चेंडू थेट, फिल्डर्सच्या हातात विसावला. कमिन्स, हेझलवूड यांच्या अचूकतेला दाद द्यावीच लागेल, त्यांनी स्विंंग, बाऊन्सचा मोह टाळला. लॉर्डस्वर ४६ वर्षांपूर्वी इंग्लंडनं भारताला ४२ धावांतच गुंडाळलं होतं, तेव्हाही अजित वाडेकरच्या भारतीय टीमवर टीकेची झोड उठली होती. सुनील गावस्कर, फारूख इंजिनिअर, अजित वाडेकर, गुंडप्पा विश्वनाथ, ब्रिजेश पटेल हे पाच बॅट्समन ओल्ड, अरनॉल्ड यांच्या स्विंगपुढे चकले आणि झटपट माघारी परतले.

‘सनी डेज’ या आपल्या आत्मचरित्रात सुनील गावस्कर म्हणतो, 'ओल्ड आणि अरनॉल्ड यांनी टाकलेले ५ उत्कृष्ट चेंडू, त्यावर आमचे ५ चांगले बॅट्समन बाद झाले. त्यानंतर फारसा प्रतिकार झालाच नाही अन् सारी टीम ४२ धावांतच कोसळली.' अ‍ॅडलेडच्या घसरगुंडीबाबतही सुनीलने काहीसं असंच मत व्यक्त केलं असून, ऑस्ट्रेलियन बॉलर्सच्या उत्तम बॉलिंगमुळे भारताच्या विकेटस् काढल्या.

हेही वाचा: महात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का?

भारताची ढिसाळ फिल्डिंग

भारतीय बॅट्समनच्या तंत्रावर टीका होतेय, खासकरून पृथ्वी शॉवर. पृथ्वीच्या तंत्राबाबत बरीच उलटसुलट चर्चा रंगतेय.राहुल द्रविड, रिकी पाँटिंग, रवी शास्त्री यांनी पृथ्वीला तंत्र सुधारण्याबाबत सूचना करूनही तो चुका करतोच आहे. अ‍ॅडलेड कसोटीत दोन्ही डावांत ६ चेंडूत ४ धावा, या त्याच्या कामगिरीमुळे मेलबर्न टेस्टसाठी त्याला डच्चू देऊन शुभमन गिलला टेस्टमधे पदार्पणाची संधी मिळाली.

रवी शास्त्री, विराट कोहली यांच्या हट्टामुळे पृथ्वीचा टेस्ट टीममधे समावेश झाला, त्यांच्या गफलतीचा फटका भारतीय टीमला बसला. पितृत्वाच्या सुट्टीमुळे विराट कोहली मायदेशी परतला असून, त्याच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणेकडे कॅप्टनशिप असेल. ‘कॅचेस विन मॅचेस’ असं म्हटलं जातं. अ‍ॅडलेड टेस्टमधली भारताची ढिसाळ फिल्डिंग ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडली. याआधी झालेल्या वन डे, टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेतही भारताची फिल्डिंग गलथान होती. परिणामी, भारताने वन डे सिरीज गमावली.

दोन वर्षांपूर्वी कोहलीच्या भारतीय टीमने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच २ - १ असं हरवून टेस्ट सिरीज जिंकण्याचा पराक्रम केला होता. ७० वर्षांत ऑस्ट्रेलियात टेस्ट सिरीज जिंकणारा विराट कोहली हा पहिला आणि एकमेव भारतीय कॅप्टन. यंदा मात्र कोहलीला अ‍ॅडलेडच्या टेस्टमधे अपयशी सलामीला सामोरं जावं लागलं.

हेही वाचा: भारत उगाच वर्ल्डकप खेळत नाही, तिथे घसघशीत कमाईही होते

कोहलीचा उद्धार केला जाईल

भारतीय टीमची वाताहत झाली. अवघ्या ३६ धावांतच भारतीय टीम गारद झाली. ८८ वर्षांच्या भारतीय टेस्ट क्रिकेट इतिहासातली भारताची ही नीचांकी धावसंख्या! भारतीय क्रिकेटला अव्वल क्रमांकावर नेणार्‍या कॅप्टन विराट कोहलीच्या माथ्यावर ‘३६’चा शिक्का कायम बसेल. याआधी अजित वाडेकरच्या भारतीय टीमचा लॉर्डस्वर ४२ धावांत खुर्दा उडाला होता. त्यामुळे अजित वाडेकरच्या टीमला ‘समर ऑफ ४२’ असं संबोधलं जायचं.

आता वाडेकरऐवजी कोहलीचा उद्धार केला जाईल. कोहलीच्या गैरहजेरीत भारताचं नेतृत्व करणार्‍या अजिंक्य रहाणेला महमद शमीची उणीव प्रकर्षाने जाणवेल. अ‍ॅडलेड टेस्टच्या दुसर्‍या डावात कमिन्सच्या उसळत्या चेंडूचा प्रसाद शमीला मिळाला. त्याच्या मनगटाला दुखापत झालीय. तो आता बाकी मसिरीज म्हणजे तीन टेस्ट तसंच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या चेन्नई टेस्टला मुकेल.

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात असूनदेखील मेलबर्न टेस्टमधे खेळू शकणार नाही. बीसीसीआयच्या अभूतपूर्व गोंधळामुळे ही परिस्थिती उद्भवली. १५ डिसेंबरला रोहित ऑस्ट्रेलियात उशिरानेच दाखल झाला. १५ ऐवजी ७ डिसेंबरला रोहित ऑस्ट्रेलियात पोचला असता, तर मेलबर्न टेस्टमधे खेळायची संधी त्याला मिळाली असती.

हेही वाचा: 

२०२१ : कल, आज और कल

महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’

ख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मगुरूंची क्रिकेट टीम

उगवत्या वर्षात नुसतं न्यू नॉर्मल नको, ‘न्यू निर्भय’ही हवं!

लॉकडाऊनमधल्या स्थलांतरितांच्या व्यथा का वाचायला हव्यात?

फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन