अभिनंदन वर्धमान यांना मिळाले ते शौर्य पुरस्कार कोणते आहेत?

१५ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला लष्करी सेवेतल्या प्रतिष्ठित अशा शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. जवानांचं शौर्य, धाडस आणि त्यांची लष्करी सेवेतली कामगिरी लक्षात घेऊन १९५० मधे या पुरस्कारांची सुरवात झाली. यंदा वीर चक्र पुरस्कार हा हवाई दलाचे कमांडर अभिनंदन वर्धमान यांना जाहीर झालाय.

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र पुरस्कार जाहीर झालाय. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्ताननं भारतीय सीमेत विमान घुसवलं. त्यांचं एफ १६ हे लढाऊ विमान अभिनंदन यांनी पाडलं. भारताच्या मिग २१ च्या तुलनेत पाकिस्तानचं एफ १६ हे लढाऊ विमान शक्तिशाली होतं. पण त्यांनी ही कामगिरी केली. यात २७ फेब्रुवारीला त्यांना पाकिस्तानच्या सैन्यानं आपल्या ताब्यात घेतलं. नंतर सोडलं.

सीआरपीएफ कमांडन्ट हर्षपाल सिंह यांना किर्तीचक्र जाहीर झालंय. बेळगावचे शहीद जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्तीचक्र तर स्‍क्‍वाड्रन लीडर मिनटी अग्रवाल यांना युद्ध सेवा मेडल पुरस्कार देण्यात येणार आहे.

हे पुरस्कार दरवर्षी राष्ट्रपती भवनात दिले जातात. भारतीय लष्करातल्या काही अन्य पुरस्कारांचाही त्यात समावेश असतो. परम वीर चक्र आणि अशोक चक्र हे पुरस्कार मात्र राजपथावर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दिले जातात.

स्वातंत्र्यापासूनचा इतिहास

परमवीर चक्र, अशोक चक्र, महावीर चक्र, किर्ती चक्र, वीर चक्र, शौर्य चक्र हे सहा मानाचे शौर्य पुरस्कार समजले जातात. या पुरस्कारांना जसं ऐतिहासिक महत्त्व आहे तशीच ऐतिहासिक पार्श्वभूमीही आहे. २६ जानेवारी १९५० ला तीन शौर्य पुरस्कारांची घोषणा झाली. परमवीर चक्र, महावीर चक्र, आणि वीर चक्र या पुरस्कारांचा यात समावेश होता. सैन्य दलात हे पुरस्कार प्रतिष्ठेचे समजले जातात.

भारत सरकारनं ४ जानेवारी १९५२ ला आणखी तीन पुरस्कारांची घोषणा केली. ज्यात अशोक चक्र हा पुरस्कार अशोक चक्र १, अशोक चक्र २ आणि अशोक चक्र ३ अ अशा तीन कॅटेगरीमधे वर्गण्यात आला. १९६७ मधे हे तिन्ही पुरस्कार अशोक चक्र, किर्ती चक्र आणि शौर्य चक्र या नावाने ओळखले जाऊ लागले.

परम वीर चक्रः लष्करातलं सर्वोच्च मेडल

परमवीर चक्र हे लष्करातलं सगळ्यात मोठं मेडल समजलं जातं. हे ब्राँझ धातूपासून बनवण्यात येतं. मेडलच्या मध्यभागी वर्तुळावर भारताची राजमुद्रा असते. तसंच चारही बाजूंना चार तलवारी असतात. या तलवारी शिवरायांच्या भवानी तलवारीचं प्रतिनिधित्व करतात असं म्हटलं जायचं. पण खरं तर चारही बाजूंनी ते इंद्राचं वज्रास्त्र लावलेलं दिसतं.

३ नोव्हेंबर १९४७ मधे पहिल्यांदा हे मेडल दिलं गेलं. या पदकाला ३२ मिलीमीटरची जांभळी रिबन असते. एखाद्याने पुन्हा हे पदक मिळवलं किंवा परमवीरचक्र मिळण्यासारखी मोठी कामगिरी केली, तर त्या रिबिनला आणखी एक पट्टी लावली जाते. आजपर्यंत २१ परमवीर चक्र देण्यात आलीत.

महावीर चक्रः शत्रूविरुद्धच्या शौर्याचा गौरव

महावीर चक्र हे जल, वायू अथवा पृथ्वी अशा ठिकाणी शत्रूविरुद्ध दाखवलेल्या शौर्याबद्दल दिलं जातं. हे मेडल चांदीच्या धातूपासून बनवण्यात येतं. मेडलच्या एका बाजूला पाच टोकं असलेली आणि ती टोकं पदकाच्या किनाऱ्याला असतील अशी चांदणी या पदकाच्या एका बाजूला असते. मेडलचा व्यास १.३८ इंचाचा असतो.

मेडलच्या दुसऱ्या बाजूला महावीर चक्र असं देवनागरी आणि इंग्रजीमधे लिहिलेलं असतं. या दोन भाषांमधल्या अक्षरांना दोन कमळांनी विभागलेलं असतं. या पदकाला जोडणारी रिबिन अर्धी पांढरी, तर अर्धी नारंगी रंगाची असते. १९७१ च्या भारत-पाक युद्धात हे पदक ११ लोकांना देण्यात आलं. इतर पदकांप्रमाणं हे पदक त्याच व्यक्तीला दुसऱ्यांदाही शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल दिलं जाऊ शकतं. आतापर्यंत २१८ जणांना महावीर चक्राने सन्मानित करण्यात आलंय.

हेही वाचाः जवाहरलाल, विजयालक्ष्मीः भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे बहीणभाऊ

वीर चक्रः शत्रुविरुद्धचं धाडस

१९५० मधे या पुरस्काराची सुरवात झाली. जमीन, जल आणि हवा इथे शत्रुविरोधात धाडस दाखवलेल्या जवानाला या पुरस्काराने गौरवलं जातं. हे मेडल चांदीच्या धातूपासून बनवलं जातं. मेडलच्या एका बाजूला पाच टोकं असतात. तर एका बाजूला ती टोकं मेडलच्या किनाऱ्याला अशी रचना असते. अगदी मधे अशोकचक्र आणि अशोक चक्रावर भारताची राजमुद्रा असते. दुसऱ्या बाजूला वीर चक्र असं देवनागरी आणि इंग्रजीमधे लिहिलेलं असतं.

या दोन भाषांमधल्या अक्षरांना दोन कमळांनी विभागलेलं असतं. मेडलला जोडणारी रिबिन अर्धी निळी आणि अर्धी नारंगी रंगाची असते. लेफ्टनंट कर्नल हिरानंद यांना पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला होता. जम्मू काश्मीरमधे दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. आतापर्यंत १३२२ जणाना वीर चक्र देण्यात आलंय.

अशोक चक्रः शांततेच्या काळातलं शौर्य

१९५२ मधे अशोक चक्र द्यायला सुरवात झाली. परमवीर चक्रानंतर अशोक चक्राला विशेष मान असतो. अशोक चक्र हे शांततेच्या काळात दाखवलेलं शौर्य, त्याग, धाडस यासाठी दिलं जातं. खरंतर परमवीर चक्र आणि अशोक चक्र एकच मानलं जातं. पण दोघांमधे फरक इतकाच की परमवीर चक्र हे शत्रूसोबत लढताना केलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल दिलं जातं, तर अशोक चक्र हे शत्रू आणि युद्धभूमीपासून दूर असताना शांतता निर्माण करण्यासाठी दाखवलेल्या शौर्यासाठी देतात.

अशोक चक्र हे भारतीय नागरिक किंवा लष्करी अधिकारी दोघांनाही दिला जाऊ शकतें. या पदकावर अर्थातच, एका बाजूला अशोक चक्र तर दुसऱ्या बाजूस अशोक चक्र असं देवनागरी, इंग्रजीत लिहिलेलं असतं. याच्यामधे ३२ मिलीमीटर लांबीची केशरी पट्टा असते. त्याला हिरवी रिबन लावलेली असते.

फ्लाईट लेफ्टनंट सुहास बिस्वास यांना पहिलं अशोक चक्र मिळालं होतं. ते चालवत असलेल्या विमानाच्या इंजिनात बिघाड झाला. आगही लागली. प्रसंगवधान बाळगत त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. धोका लक्षात घेऊन त्यांनी विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केलं आणि सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले. १९५२ पासून ८३ जनांनाना हे मेडल मिळालंय.

कीर्ती चक्रः शांततेसाठीचं शौर्य

२७ जानेवारी १९६७ मधे अशोक चक्र दोनचं नामकरण कीर्ती चक्र असं झालं. चांदीच्या  धातूपासून हे बनवलेलं असतं. म्हणजेच अशोक चक्राप्रमाणे हा सन्मानही शत्रूशी लढण्यासाठी नाही तर इतरवेळी शौर्य दाखवून शांतता निर्मितीच्या कामासाठी दिला जातो. मेडलवर मधे अशोक चक्र आणि बाजूनं कमळाची फुलं आणि कळ्यांचं कडं असतं. तर पाठीमागच्या बाजूला देवनागरी आणि इंग्रजीमधे किर्ती चक्र असं लिहिलेलं असतं. या दोन्ही भाषांच्या अक्षरांमधे दोन कमळं असतात.

मेडलला जोडणारी रिबिन हिरव्या रंगाची असते. दोन उभ्या नारेंगी रंगांच्या रेघाही असतात. त्यांनी या हिरव्या रंगाच्या पट्टीचे तीन समान भाग केलेले असतात. सर्वात पहिल्यांदा कॅप्टन जोगिंदरसिंग घराया यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. रझाकारांविरुद्धच्या मोहिमेत त्यांनी पोलिसांना दिलेलं सहकार्य हे यासाठी महत्वाचं मानलं गेलं. आतापर्यंत ४५८ जणांना हा पुरस्कार देण्यात आलाय.

शौर्य चक्रः  अन्य वेळच्या शौर्याचा गौरव

शौर्य चक्राची सुरवात १९५२ मधे झाली. १९६७ मधे त्याच्या नावात बदल करण्यात आला. पूर्वीच्या अशोक चक्र ३ चं नाव शौर्य चक्र असं झालं. या मेडलचा व्यास १.३८ इंच इतका असतो. अशोक चक्राप्रमाणे हा सन्मान शत्रूशी लढण्यासाठी नाही, तर इतर वेळी शौर्य दाखवून शांतता प्रस्थापित करण्याच्या आव्हानात्मक कामगिरीकरता दिला जातो.

ब्राँझ धातूपासून हे मेडल बनलेलं असतं. त्याच्याभोवती कमळाची महिरप असते तर दुसऱ्या बाजूला शौर्य चक्र असं देवनागरी आणि इंग्रजीत लिहिलेलं असतं. या दोन भाषांमधल्या अक्षरांना दोन कमळांनी विभागलं जातं. मेडलची रिबिन हिरव्या रंगाची असते. तीन उभ्या केशरी पट्ट्या असतात. त्यात हिरव्या रंगाला चार भागांत विभागलेलं असतं.

पी. एस. गहून यांना पहिला शौर्य पुरस्कार देण्यात आला होता. १९४८ ला हैदराबादमधे झालेल्या पोलिस कारवाईमधे त्यांनी शौर्य दाखवलं. त्यामुळे हा पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. आजपर्यंत १९९७ जणाना हा पुरस्कार देण्यात आलाय.

हेही वाचाः 

खुळी न जनता फसेल आता, पुरे करा हे ढोंग!

इस्त्रोचे संस्थापक विक्रम साराभाईंना गुगलची डूडल सलामी

पंडित नेहरूंनी ३७० कलम आधीच कमजोर कसं केलं होतं?

खरोखरचा फुन्सुक वांगडू सांगतोय, लडाखमधे बाहेरचे लोक नकोतच

विशेष दर्जा काढल्याने काश्मीरचा प्रश्न सुटला की अधिक गुंतागुंतीचा झाला?