बीड जिल्ह्यातलं तुकारामांचं मंदिर पाहिलंय का?

१६ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ३ मिनिटं


आज संत तुकामांची जयंती. देशाच्या संतपरंपरतेले ते अतिशय महत्त्वाचे संत. वारकरी संप्रदायात विठ्ठल या देवतेबरोबरच संतांची मंदिरही उभारण्याची परंपरा आहे. त्यामुळे कीर्तनकार प्राचार्य परशुराम मराडे यांनी बीड जिल्हात तुकोबारायांचं अतिशय देखणं मंदिर उभारलंय. या मंदिरासोबत स्थापन केलेल्या सेवापीठातून अनेक उपक्रमही आयोजित केले जातात.

तुकोबाराय हे वारकरी परंपरेच्या कलशस्थानी असलेले अधिकारी संत. त्यामुळेच तुकोबारायांच्या विचारांच्या प्रकाशात लाखो वारकरी आपलं जीवन जगत असतात. तुकोबारायांच्या विचारांनी भारावून गेलेलं असंच आणखी एक व्यक्तीमत्व म्हणजे ह.भ.प. प्रा. परशुराम मराडे.

१९८५ पासून ते कीर्तन, भजन आणि प्रवचनातून वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार करतायत. संतसाहित्यावरची अनेक छोटी पुस्तकं त्यांनी लिहिलीयत. वेगनेगळ्या स्थानिक वृत्तपत्रांमधून संतसाहित्यावर त्यांनी विपुल लिखाण केलंय.

हेही वाचा : तुकोबांच्या अभंगांना तात्विक अधिष्ठान मिळवून देणाऱ्या संत बहिणाबाई

मायावाद नाही चिद्विलासवाद

संतविचारांचा हा वारसा त्यांना त्यांच्या वडलांकडून मिळाला. त्यांच्या वडलांना थोर वारकरी सत्पुरुष भगवान बाबा आणि बंकटस्वामी यांचा सहवास मिळाला होता. वडलांबरोबरच त्यांना संतसाहित्याची गोडी लागली ती महाराष्ट्रातले प्रसिद्ध संतसाहित्य लेखक जगन्नाथ महाराज पवार यांचा अनेक वर्षं सहवासाने.

त्यांच्याकडूनच त्यांना संतसाहित्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळाली. संतसाहित्यात मायावादाला स्थान नसून ज्ञानदेवांनी मांडलेला स्वतंत्र चिद्विलासवाद हाच वारकरी संप्रदायाचा पाया आहे, याची त्यांना जगन्नाथ महाराज पवार यांच्यामुळेच जाणीव झाली.

अलिकडे वारकरी संप्रदायात मायावादी तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करणारे लोक बिगर वारकरी ग्रंथांचा आधार घेऊन संतसाहित्याचा खुंटीसारखा वापर करतात याची त्यांना खंत आहे.

तुकोबाराय सेवापीठाची स्थापना

बीडमधल्याच एका शिक्षण संस्थेतून प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं. त्यानंतर त्यांनी उभं केलेलं लक्षवेधी काम म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय सेवापीठाची स्थापना. वारकरी संप्रदायात विठ्ठल या उपास्य देवताबरोबरच संतांची मंदिरंही उभारण्याची परंपरा आहे. त्यामुळेच परशुराम मराडे यांनी तुकोबारायांचं अतिशय देखणं मंदिर उभारलंय.

बीड शहरापासून ३ किलोमीटरवर तळेगाव इथं हे मंदिर आहे. मंदिरात तुकोबारायांची सुबक मूर्ती बसवलीय. शिखराच्या शिरोभागीही तुकोबारायांची मूर्ती आणि सभामंडपावरही तुकोबारायांचा भव्य दिव्य स्वरूपातला पुतळा उभारण्यात आलाय. याच मंदिरात त्यांनी तुकोबाराय सेवापीठ सुरू केलंय. या तुकोबाराय सेवापीठाच्या माध्यमातून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवलेत.

दर महिन्याच्या बीज वारीला कीर्तन, भजन आणि प्रवचन असे वारकरी संप्रदायिक कार्यक्रम सेवापीठाकडून आयोजित केले जातात. त्यानंतर सर्वांना फराळ दिला जातो. हे सगळे कार्यक्रम लोकसहभागातून केले जातात. तसंच प्रत्येक शुद्ध एकादशीला १००-१२५ वारकऱ्यांची दिंडीही काढली जाते. तुकोबारायांच्या बीजसोहळ्यानिमित्त सप्ताहाचंही आयोजन केलं जातं.

हेही वाचा : दाढी वाढवून गुरुदेव होता येत नाही आणि खादी वापरून महात्मा

अभंगांवर चर्चेचा उपक्रम

अलिकडेच सेवापीठानं आणखी एक महत्वाचा उपक्रम सुरू केलाय. तो म्हणजे तुकोबारायांच्या अभंगावर चर्चा करण्याचा. ह.भ.प. श्रीकृष्ण उबाळे, ह.भ.प. माधव डाके, ह.भ.प. सुधाकर शिंदे, ह.भ.प. संतोष डोंगरे, नितीन मानकर असे सेवापीठाशी नव्याने जोडले गेलेले लोक दर एकादशीला तुकोबारायांच्या अभंगावर चर्चा करतात. अभंगांचं गायन करतात आणि त्याच अभंगाच्या निरूपणाचा वीडियो युट्यूबला अपलोड करतात.

तुकोबारायांच्या अभंगांच्या आधारे सेवापीठात होणारी ही उपासना पाहिल्यावर आपल्याला आठवण येते ती प्रार्थना समाजाच्या उपासनेची. महाराष्ट्राच्या धार्मिक-सामाजिक जीवनात प्रार्थना समाजाचं मोठं योगदान आहे. या प्रार्थना समाजातल्या उपासना तुकोबारायांच्या अभंगावर चालत. प्राध्यापक सदानंद मोरे म्हणतात त्याप्रमाणे प्रार्थना समाजासाठी तुकोबाराय 'हिरो' होते.

न्यायमूर्ती रानडे, रामकृष्ण भांडारकर, नारायण चंदावरकर आणि विठ्ठल रामजी शिंदे यांसारख्या प्रार्थना समाजाच्या धुरिणांचं तुकारामप्रेम सर्वश्रुत आहे. बीडमधल्या या सेवापीठाने तुकोबारायांच्या अभंगावर चर्चा करण्याचा सुरू केलेला उपक्रम प्रार्थना समाजाच्या उपासनेची जणू आधुनिक आवृत्ती आहे. 

आणखीही खूप करायचंय

तुकोबाराय सेवापीठाच्या माध्यमातून आणखी काही उपक्रम करण्याचा परशुराम मराडे महाराजांचा मानस आहे. त्यांना तिथे वारकरी शिक्षण संस्था उभारायचीय. 

त्याबरोबरच अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता यांच्या विरोधात संतविचारांचा जागर करणारं अभियानही राबवण्याचा त्यांचा विचार आहे. 'सत्य संकल्पाचा दाता नारायण' या तुकोक्तीप्रमाणे त्यांचे हे संकल्प पांडुरंगाच्या कृपेने पूर्ण होतीलच.

हेही वाचा :  

गांधीजींना तुकोबा भेटले होते

खरंच संत नामदेव चमत्कार करायचे?

बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं

संत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ