तमिळनाडूच्या नेतृत्व पोकळीतली निवडणूक कोण जिंकणार?

०२ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे पक्ष तमिळनाडूच्या सत्ता वर्तुळाचं केंद्र आहेत. करुणानिधी, जयललिता यांच्या निधनानंतर राजकारणात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. अण्णाद्रमुकमधे दोन गट पडले. तमिळनाडूचं व्यक्तिकेंद्री राजकारण सध्या मुद्द्यांकडे वळतंय. जयललिता आणि करुणानिधी यांच्या हयातीत हे शक्य नव्हतं. या दोन नेतृत्वामधल्या पोकळीचा फायदा स्टॅलिन यांना होताना दिसतोय.

तमिळनाडूचं राजकारण व्यक्तिकेंद्री राहिलंय. पेरियार, अण्णादुराई, एमजी रामचंद्रन, करुणानिधी, जयललिता यांची छाप तिथल्या राजकारणावर आजही कायम आहे. द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे पक्ष तिथल्या सत्ता वर्तुळाचं केंद्र आहेत. या दोन पक्षांभोवती तिथलं राजकारण आजपर्यंत फिरत आलंय.

एमजीआर हे अण्णाद्रमुकचे तर करुणानिधी हे द्रमुक पक्षाचे शिल्पकार होते. साधारण १९७० ते १९७५ नंतर या दोन व्यक्तींच्या भोवती तमिळनाडूचा राजकीय सत्ता संघर्ष फिरत राहिला. पुढं एमजीआर यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा जयललिता यांच्याकडे आली. त्यानंतरचं तमिळनाडूचं राजकारण जयललिता आणि करुणानिधी यांच्या भोवती फिरताना दिसतं.

तमिळनाडूच्या राजकारणाची खासियत

कधी करुणानिधी तर कधी जयललिता हे आलटून-पालटून मुख्यमंत्री पदावर राहिले. पुढे या दोघांच्याही निधनानंतर तमिळनाडूच्या राजकारणात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. मात्र, व्यक्तिकेंद्री राजकारण आता मुद्द्यांकडे वळायला सुरवात झाली होती. इतर राजकीय पैलूंकडेही राजकारण फिरू लागलं होतं. हे राजकारण जयललिता आणि करुणानिधी यांच्या हयातीत शक्य नव्हतं.

जयललिता या कन्नड ब्राह्मण होत्या. तर तमिळनाडूच्या राजकारणात अण्णा द्रमुकचं राजकारण द्रविडी विचारधारेचं राहिलेलं आहे. आणि ही विचारधारा ब्राम्हण्यवादाला कट्टररपणे विरोध करत आलीय. मात्र, जयललिता या ब्राम्हण असूनही त्यांची प्रतिमा ही जातीपातीपलीकडे जाणारी अशीच तयार झाली. त्यांच्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे तमिळनाडूच्या जनमानसात त्या लोकप्रिय झाल्या.

कष्टकरी, कामगार आणि महिला सक्षमीकरणाच्या योजनांची अंमलबजावणी यावर जयललिता यांच्या पक्षाचा भर राहिला. त्यामुळे लोकांनी त्यांना मनापासून स्वीकारलं. तमिळनाडूच्या राजकारणाचं एक वैशिष्ट्यं म्हणजे ते नेहमीच लोककल्याणकारी योजनांभोवती फिरताना दिसतं. उदा. निवडणुकीत घरगुती गॅस सिलेंडर किंवा अम्मा कँटीनची योजना असेल.

हेही वाचा: पश्चिम बंगालच्या रणांगणात कुणाचं पारडं होतंय जड?

जातीपातीपलीकडच्या जयललिता

जयललिता यांच्या लोककल्याणकारी दृष्टिकोनामुळे त्यांना जातीचा टॅग कधी लागलाच नाहीय. या विविध योजनांच्या माध्यमातून कष्टकरी, शेतकरी आणि महिलावर्ग यांना आकर्षित करण्यात त्या यशस्वी ठरल्या. त्यामुळेच त्या ६ वेळा मुखमंत्री पदावर विराजमान होऊ शकल्या.

एक महिला एखाद्या राज्याचं मुख्यमंत्रीपद इतका काळ टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरते त्याला काही कारणंही आहेत. पहिलं म्हणजे जयललिता यांनी जातीपातीच्या राजकारणापेक्षा गुड गव्हर्नन्स आणि लोककल्याणकारी राज्यावर भर दिला. दुसरं म्हणजे राजकीय परिघाबाहेरच्या छोट्या-छोट्या जाती-जमातींचं राजकीय महत्व वाढायला लागलं. या जाती आपल्यामागे आणण्यात जयललिता यांना यश आलं.

स्टॅलिन यांचं नेतृत्व

अण्णाद्रमुक पक्षाकडे बहुमत असलं तरीही जयललिता यांच्या जनमानसातल्या या प्रतिमेमुळे इतर पक्षातले मतदारही त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले. एकंदरीत जयललिता जातीपातीच्यापलीकडे जाऊन त्यांच्या सामाजिक आणि लोककल्याणकारी दृष्टिकोनामुळे मतदारांना आपल्याकडे खेचण्यात यशस्वी ठरल्या.

करुणानिधी यांचा द्रमुक पक्ष आक्रमक, गुंडागर्दी टाईपचा पक्ष म्हणून ओळखला जायचा. तर दुसरीकडे जयललिता यांची मोठी इमेज तयार झाली होती. यामुळे झालं असं की, जयललिता या तमिळनाडूत निवडणुका जिंकत राहिल्या. करुणानिधींचा पक्षही अस्तित्वात होता पण त्यांच्यावर नेहमीच भ्रष्टाचाराचे आरोप होत राहिले. त्यात दिवसेंदिवस खालावत चाललेल्या प्रकृतीमुळे करुणानिधी मागे पडले.

सध्याच्या घडीला दोघांच्या निधनानंतर त्यांच्या तोडीचा एकही नेता तमिळनाडूच्या राजकारणात राहिलेला नाहीय. सध्या करुणानिधी यांचा मुलगा स्टॅलिन हेच प्रमुख नेते म्हणून उभे राहताना दिसतात. कारण स्टॅलिन यांची उपमुख्यमंत्री आणि महापौर म्हणून राजकीय कारकीर्द राहिलीय. त्यामुळे जयललिता आणि करुणानिधी यांच्या नंतर जे तमिळनाडूत नेतृत्व उभं राहिलंय ते स्टॅलिन यांचं आहे.

हेही वाचा: पेट्रोलची शंभरी पार, जबाबदार आधीचं सरकार?

जयललिता यांच्यानंतर दोन गट

जयललिता यांच्या मृत्यूनंतर अण्णाद्रमुकचे दोन गट पडले. एका गटाचं नेतृत्व ओ पनीरसेल्वम यांनी केलं. सुरवातीच्या काळात ते मुख्यमंत्री राहिले. तर शशिकला यांच्या नेतृत्वातल्या गटानं पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री पदावर बसवलं. पनीरसेल्वम, पलानीस्वामी यांच्यात अंतर्गत वाद आहेत. त्याचा फटका निवडणुकीत भाजप आणि अण्णाद्रमुकला बसू शकतो.

शिवाय मुस्लिम, दलित, ख्रिश्चन अशी मोट बांधण्यात हे सगळे कमी पडतायत.  त्याच कारण जयललिता यांच्यासारखी त्यांच्याकडे इमेज नाहीय. पलनास्वामी शशिकला यांच्यामुळे मुख्यमंत्री होऊ शकले. पण त्यांच्यातला एक गट शशिकला यांच्या विरोधात आहे.

शशिकला यांच्या बाजूनं सामाजिक समीकरणाची गणितं होती. ती जुळवणं या दोन गटांना शक्य नाही. शशिकला यांनी राजकारणातून निवृत्ती घेतलीय. त्यामुळे सोशल इंजिनिअरिंगचं राजकारण उभं करण्यात त्यांच्या समोर समस्या उभी राहतेय.

करिष्म्याने उमेदवार जिंकायचे

स्टॅलिन यांच्या बाजूने सकारात्मक राजकीय वातावरण निर्मिती झालीय. त्यांचं वय झालेलं असलं तरी अण्णाद्रमुकच्या विरोधात १० वर्षांच्या सत्तेमुळे विरोधातलं वातावरण आहे. त्यामुळे स्टॅलिन यांची लोकांमधे एक प्रतिमा तयार होताना दिसतेय. त्यामुळे  याच कारणामुळं स्टॅलिन भारी पडतायत. ताकदवान नेते म्हणून नावारूपाला येताना दिसतात.

करुणानिधी आणि जयललिता यांच्या करिष्माई राजकारणाचा अंत झाल्यानंतर तमिळनाडूतलं राजकारण वेगळं वळण घेतंय. पूर्वीपेक्षा सध्या  तमिळनाडूच्या राजकारणात जातीय समीकरणाची मोट बांधण्यात पक्ष गुंतलेले दिसतात. यापूर्वी हे होत होतं. पण इतकं उघडपणे होत नव्हतं.

सध्या स्थानिक पातळीवरचं काम पाहून निवडणुकीत उमेदवार उभं करावे लागत आहेत. पूर्वी जयललिता किंवा करुणानिधी यांच्या करिष्माई राजकीय इमेजमुळं कोणताही उमेदवार जिंकून यायचा. आता ते शक्य नाहीय.

हेही वाचा: चार राज्यांमधला सत्तासंघर्ष नेमका कुणाच्या फायद्याचा?

द्रविडी राजकारणाचं वेगळं वळण

अण्णाद्रमुककडे शशिकला यांच्यानंतर कोण? या संभ्रमातच हा पक्ष गुंतून पडल्याचं चित्र पहायला मिळतंय. यातून अण्णाद्रमुक अजूनही सावरलेला दिसत नाहीय. त्यामुळे हा पक्ष अंतर्गत गटबाजीला बळी पडताना दिसतोय. साहजिकच  या दोन पक्षांच्या अंतर्गत गटबाजी आणि संघर्षामुळे स्टॅलिन यांना फायदा होणार.

आता अण्णाद्रमुक पक्ष जयललिता यांच्या इमेजचा पुरेपूर राजकीय उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. म्हणजे भलेही जयललिता जिवंत नसतीलही पण त्यांच्या लोकप्रिय प्रतिमेचा पक्षाकडून फायदा घेण्याचे जोरदार प्रयत्न चाललेत. कारण, या पक्षाला भीती अशी आहे की, जयललिता यांना वगळून ही निवडणूक लढवली तर आपण हरण्याची शक्यता वाढू शकते.

अजूनही जयललिता यांच्या लोककल्याणकारी योजनांचा, सामाजिक कामाचा प्रभाव लोकांच्या मनात आहे.  त्यामुळं पक्षाला जयललिता यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या इमेजचा आधार घ्यावा लागतोय. यातूनच हा पक्ष जयललिता यांच्या जाण्यानं पोरका आणि असहाय्य झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळे त्यांना निवडणुकीत जयललिता यांचं नाव घेऊन मतं मागण्याशिवाय दुसरा मार्ग सापडत नाहीय.

अशा प्रकारे तामिळनाडूतलं राजकारण  एम. करुणानिधी, जयललिता यांच्या लोकप्रिय इमेजच्या भोवती फिरताना दिसत होतं. म्हणजे व्यक्तीकेंद्री राजकारण अधिक होतं. मात्र, सध्याचं राजकारण स्थानिक पातळीवरचं काम आणि जातीय समीकरणांची बांधणी कशी करायची या मुद्द्यांकडे वळण घेताना दिसतंय.

स्टॅलिनची करुणानिधींसारखी इमेज नाही

स्टॅलिन अगोदरपासूनच करुणानिधी यांच्यासोबत होतेच. त्याच बरोबर करुणानिधी यांनीही त्यांना थोडाफार पाठींबा देऊन प्रोजेक्टही करण्याचा प्रयत्न केलाय. स्टॅलिन यांचं वाढणारं महत्व लक्षात घेता त्यांना करुणानिधी यांच्या राजकीय घराणेशाहीचा वारसा लाभलाय.

तसं स्टॅलिन यांना  स्वतःचं राजकीय, सांस्कृतिक कर्तृत्व काहीच नाहीय. तामिळनाडूच्या चित्रपट क्षेत्रात, साहित्यिक वर्तुळात आणि राजकारणात करुणानिधी यांचा मोठा दबदबा राहिलेला आहे. तसं स्टॅलिन यांचं काहीही योगदान नाहीय. कलाकार म्हणून फ्लॉप झाल्यानंतर स्टॅलिन यांनी राजकारणाकडे मोर्चा वळवला.

राजकीय वारसा लाभल्यानं थोडा टिकाव लागलाय. पण करुणानिधीसारखी लोकांमधे असणारी इमेज ते बनवू शकले नाहीत. त्यांची राजकीय धडपड तशी दिसून येतेय. पण ते करुणानिधी होऊ शकत नाहीत. ते म्हणतात ना, मोठ्या वटवृक्षाच्या सावलीखाली दुसरं झाड वाढू शकत नाही. तसं स्टॅलिन यांच्या व्यक्तिमत्वाबाबत लागू पडतंय.

हेही वाचा: सरकारला धडकी भरवणारं महुआ मोईत्रा यांचं वायरल भाषण

भाजपची अवघड स्थिती

तमिळनाडूतली पेरियार यांची द्राविडी आणि आंबेडकरी चळवळ ही ब्राह्मण्यवादी विचारधारेच्या कट्टर विरोधात राहिलीय. तरीही भाजप तमिळनाडूच्या राजकारणात पाय रोवण्याचा प्रयत्न करतेय. पण भाजपची ब्राम्हणांचा पक्ष म्हणून तिथं इमेज आहे. त्यामुळे त्यांना लोकांमधे जाऊन या विचारधारेच्या विरोधात काम करणं अवघड जातंय.

सुपरस्टार रजनीकांत आपल्या नव्या पक्षाचं नाव घोषित केलं होतं. पण रजनीकांत थलैवा ठरतील का? हा प्रश्न उभा राहण्याआधीच त्यांनी माघार घेतली. कमल हसन यांनी मक्कलं निधी मय्यम या पक्षाची स्थापना करत नवीन पर्याय देण्याचा प्रयत्न केलाय. त्याला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीय.

एकंदर तमिळनाडूचं सध्याचं निवडणुकीचं राजकारण द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन पक्षांभोवती फिरताना दिसतंय. स्टॅलिनच्या द्रमुकचं पारडं त्यात जड आहे.

हेही वाचा: 

चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण

भारतानं आधी आर्थिक युद्धाच्या सीमेवर लढायला हवं!

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग १

चीनने धोका दिल्यानंतर नेहरूंनी आपली युद्धनीति कशी बदलली?

(लेखक पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून तमिळनाडूत काम करत आहेत)