`मी तुले सांगून ठेवतो, येणारा काळ मराठी गझलचाच आहे`

१५ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


मराठी गझलचे खलिफा सुरेश भट यांची भटांची गझल असो, गीतं किंवा कविता, मराठी रसिकाला त्यांनी बेधुंद केलं. त्यांच्या गझलने तर मराठी काव्यजगताला नवं वळण लावलं. आज १५ एप्रिल भटांचा जन्मदिन. यानिमित्तानं भटांचा मराठी गझलचा वारसा पुढे नेणारे गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा हा लेख.

आज मी जो काही आहे, तो अमरावतीने केलेल्या संस्कारांमुळेच. मालटेकडीवर एक दर्गा आहे. तिथे नातिया कव्वाल्या व्हायच्या. सुफी कव्वाली हा गायकीचा एक भन्नाट प्रकार आहे. रात्री सुरू झालेल्या कव्वाल्या दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सुरू असायच्या. के महावीर, गोविंदप्रसाद जयपूरवाले अशी दिग्गज गझलगायक मंडळी अमरावतीत यायची. एकही कार्यक्रम चुकवायचो नाही.

त्यातून माझा गझलशी चांगलाच परिचय होता. माझ्या घरच्या आणि अमरावतीतल्या उर्दूनुमा वातावरणाचा परिणाम होताच. मुशायरा, मैफिली वगैरे कळायच्या. त्यामुळे गझल, शेरोशायरी आपलीच वाटायची. तिची जमीन तयारच होती. पण एक दिवस मी एक चमत्कार पाहिला.

हेही वाचाः दीडशे वर्षांनंतरही मराठी कवितेत गालिब जिवंत

अमरावतीत मुक्कामी असताना राजकमल चौकात आम्ही मित्र फिरायला जायचो. तिथे एक गड्डा हॉटेल आहे. गड्डा म्हणजे खड्डा. तिथे क्वचित कधीतरी भजी मिसळही चापायचो. तिथेच एक भक्कम शरीराचा माणूस सायकल रिक्षावर बसून दणदणीत आवाजात गात होता. आजूबाजूला घोळका जमला होता. त्यात प्राध्यापक, डॉक्टरांपासून रिक्षावाले, टपरीवाल्यांपर्यंत सगळेच होते.

जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही

एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही

वा क्या बात हैं! हीच सुरेश भटांची पहिली भेट. आम्ही हाफ चड्डीत असायचो. लहान मुलं म्हणून कुणी हाकलून देऊ नये, म्हणून घाबरत चोरूनमारून ऐकायचो. एकेक शब्द म्हणजे मोत्याचा दाणाच. आपल्या आवडीची गझल आपल्या भाषेत एवढ्या ताकदीनं कुणी मांडतंय, याचा त्याही वयात खूप आनंद होता.

या सगळ्याचा परिणाम म्हणून मी नववीत असतानाच चाली बांधायला लागलो. ते त्याचं वय नव्हतं, हे खरं. पण कवितेचं गारूड लहानपणापासूनच होतं. एकदोनदा भटांच्या राजकमल चौकातल्या मैफिलीत मित्रांनी जबरदस्तीने गायला लावलं. भट दुर्लक्ष करायचे. कारण ते कुणाचंच ऐकणाच्या मूडमधे नसायचे. पण या गाण्यामुळे अमरावतीतल्या वर्तुळात मी अनेकांच्या परिचयाचा झालो होतो. त्यात भटांचे मित्र किशोरदादा मोरे होते. त्यांनीच माझ्या जीवनाला आकार दिला.

स्वतःची कंपोझिशन करायचा नाद जडला होता. त्यात खूप आनंद मिळायचा. विशेषतः उ. रा. गिरींची गाणी करायचो. सुरेश भटांचं ‘जगत मी आलो’ केलं होतं. काही भजनं, गीतंही बांधली होती. विसाव्या वर्षीच नागपूर आकाशवाणीवर मी ऑडिशन देऊन सिलेक्ट झालो.

गाण्याच्या मैफिली होतच होत्या. पण १९७२ साली पहिली संपूर्ण गझलची मैफल झाली. अकोल्याच्या महाराष्ट्र कन्याशाळेतल्या एका मोठ्या वर्गात पन्नास साठ रसिक आले होते. त्यात भटांची ‘जगत मी आलो असा की’, ‘आसवांनो माझिया डोळ्यांतूनी वाहू नका’ अशा रचना गायल्याचं आठवतंय

हेही वाचाः विष्णू सूर्या वाघः जखमांचे चर्च बांधणारा आनंदभोगी

या मैफलीनंतर माझा गझलगायनाचा प्रवास पुढं सरकत होता. पुढे अकोला आणि महाराष्ट्राबाहेरही दौरे मग सुरू झाले. गझलगायनाचा अभ्यास, चिंतन सुरूच होतं. आशयप्रधान गझलगायकीचा सुरू असलेला प्रयत्न, शब्दांना स्वरांनी ट्रीट करण्याची पद्धत मी अभ्यासत होतो. भटांची ओळख झालेलीच होती. त्यांना मी माझ्या बंधलेल्या चाली दाखवायचो. तेही मला चांगल्या सूचना करायचे.

मलाही वाटायचं की गाण्यासाठी काही करायचं असेल तर अकोल्यात राहून काही उपयोग नाही. मी अकोला सोडलं आणि नागपूरला आलो. नागपूरला मी रामदास पेठेत रहायचो. तिथं जवळच धंतोलीला कवीवर्य सुरेश भटही रहायचे. जवळच असल्यानं आमच्या भेटी होत होत्या. गझलबाबत आमच्या सतत चर्चा व्हायच्या. मी त्यांच्याकडून गझलबाबत माहिती घ्यायचो. कोण कोण गझल लिहितंय याची माहिती त्यांच्याकडून घ्यायचो.

तसं बघायला गेलं तर मराठीत गझलची जमीन माधव जुलियन यांनी तयार केली. आणि त्या जमिनीवर गझलचं रोपटं मात्र सुरेश भटांनीच लावलं. सुरेश भट हे मराठी गझलचे गालिब आहेत. मी त्यांना आदरानं गझलचे खलिफा म्हणतो. त्यांच्याबद्दल माझ्या मनात अपार श्रद्धा आहे.

आम्ही दोघं गझल लेखन आणि संगीताबाबत चर्चा करायचो. संगीताच्या विषयावर आम्ही दोघं वादही खूप करायचो. अगदी भांडणाचीही पाळी यायची. हा वाद कंपोझिशनबाबत असायचा. मी एखाद्या गझलचं कंपोझिशन भटांना ऐकवलं की ते काही ना काही शंका उपस्थित करायचे. अमकी जागा इथं अशी नसायला पाहिजे. काही तरी वेगळं कसं हवं असं ते सूचवत रहायचे. मी मात्र माझ्या कंपोशिझनवर ठाम रहायचो.

हेही वाचाः जावेद अख्तरनी कैफी आझमींवर कविता लिहिलीय

भटांचा विशिष्ट रागासाठी आग्रह असायचा. आणि मला एखाद्या गझलसाठी अमूक एक राग अगदी ठरवून ओढून ताणून आणणं मुळीच आवडायचं नाही. मी म्हणायचो की असं होत नाही, चाली ओढून ताणूण आणता येत नाहीत. भटही हट्टाला पेटलेले असायचे आणि मी ही माझ्या निर्णयावर अगदी ठाम असायचो.

एकदा मी त्यांच्या ‘विसरून जा, विसरून जा, तुजलाच तू विसरून जा’ या गीताला अहिरभैरव चालीत बांधलं आणि ती चाल भटांना ऐकवली. पण त्यांना ही चाल पसंत पडली नाही. त्याचं म्हणणं पडलं की हा राग या गीताला सूटच होत नाही. मी म्हणायचो की नाही, या गीताला हाच राग योग्य आहे. ही चाल मला आपोआप सुचली आहे आणि यापेक्षा दूसरी चाल या गीताला लागणारच नाही.

पण माझं म्हणणं ते नाकारायचे. मी म्हणायचो की जर ही सुरावट या गीताला सूट होत नाही तर मग तुम्हीच एखादी सुचवा. त्यावर ते म्हणायचे की तू संगीतकार आहेस ते तुझं काम. अशी आमची कधीकधी बाचाबाचीही व्हायची. पण समारोप हसतखेळतच व्हायचा.

मला आठवतं भटांच्या पत्नींचा म्हणजे पुष्पा वहिनींचा स्वभाव खूप छान होता. त्या मला माया लावायच्या. मी जायला निघालो की शंभराची नोट देऊन हळू आवाजात त्या मला म्हणायच्या, बॅँकेतून एकच्या नोटांचं बंडल आणशील का रे भीमराव?

मी नागपूरात असताना भट नव्या कवींना पत्र लिहायचे. त्यांना कार्यक्रमांना बोलवायचे. मीही जिथं जिथं कार्यक्रमांना जायचो तिथं तिथं गझल लिहिणारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचो. मलाही मग गझल हा काव्यप्रकार समजून घेण्याची ओढ निर्माण झाली. राज्यात साहित्यिक वर्तुळात तेव्हा गझलविरोधी वातावरण होतं. भट विरोधकांना उत्तर देत होतेच. पण आपणही गझलसाठी काहीतरी करायला हवं, असं मनापासून वाटायचं.

हेही वाचाः आपण कवी प्रदीपना विसरून चालणार नाही

मी जेव्हा गायनाचे कार्यक्रम करायचो. ते ऐकून अनेक कवी गझलकडं आकृष्ट व्हायचे. गझल वाढायची असेल तर या मंडळींची भीती घालवली पाहिजे असं मला वाटायचं. मी गझल लिहू इच्छिणाऱ्या कवींना भटांना पत्र लिहिण्याचा सल्ला द्यायचो. यामुळं अनेकांची भीड चेपली. मला आठवतंय  ७४ सालापासून कवींशी पत्रव्यवहार सुरू केला. तो आजतागायत सुरूच आहे. अनेकांशी मी गझलवर चर्चा केली, त्यांना लिहितं केलं. त्याची प्रेरणा सुरेश भटच.

तंत्रशुद्धता आणि आशयघनता यांचा अप्रतिम सुंदर मिलाफ असलेली भटांची गझल स्वरबद्ध करणं म्हणजे एक अवर्णनीय आनंदाचा ठेवाच असतो. एक तर स्वर शब्दांच्या आसपासच घोटाळत असतात आणि गझलच्या एकेका शेरातली अभिव्यक्ती इतकी तीव्र असते की आपण केवळ साक्षी राहूच शकत नाही. शेरातला तो अनुभव जगावाच लागतो. असं जगणंच मला समृद्ध करत आलंय.

मी मुंबईत आलो. जगण्याचा संघर्ष सुरू होता. मुंबईत येऊन बहुतेक महिना होत आला असेल किंवा दुसरा महिना असेल. माझ्या आयुष्यात चांगली घटना घडली. ठाण्याच्या गडकरी रंगायतन मध्ये सुरेश भटांचा गझल वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भटांचे दोस्त मुरलीधर नाले, प्रविण दवणे सोबत काही गझलकार असे आम्ही सगळे कार्यक्रमाला निघालो.

गडकरीचा कार्यक्रम सुरू झाला. अचानक मधेच भटांनी मला स्टेजवर बोलावलं आणि गझल गायला सांगितली. वाद्य वगैरे काही नाही. फक्त माईक आणि मी. तू नभातले तारे माळलेस का तेव्हा, नाही म्हणावयाला आता असे करूया अशा गझला मी सादर करत गेलो. लोकांना प्रचंड आवडलं. इतका छान प्रतिसाद तिथं मला मिळाला म्हणून सांगू. लोकांनी हॉल डोक्यावर घेतला. तो जल्लोष अजूनही आठवतो. ते वातावरण आठवून आजही अंगावर काटाच उभा राहतो.

दूरदर्शनचे निर्माते अनील दिवेकर या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी मला भेटीला बोलावलं. दूरदर्शनला त्यांनी माझं पहिली मैफल केली. इथून मग दूरदर्शनच्या कार्यक्रमांचा सिलसिला सुरू झाला. दूरदर्शनचे दूसरे निर्माते अरूण काकतकर यांनी शब्दांच्या पलीकडलेमधे सुरेश भट आणि माझा संयुक्त कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमाला खूप लोकप्रियता लाभली. माझे दूरदर्शचे कार्यक्रम चांगले गाजायला लागले. कार्यक्रमांची थेट प्रक्षेपणंही व्हायला लागली.

हेही वाचाः मोमीनच्या या शेरावर खुद्द गालिबही फिदा

नंतर शेफाली या संस्थेने १९८८मधे पार्ल्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉलमधे एल्गार हा आम्हा दोघांचा मिलाजुला कार्यक्रम ठेवला होता. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात माझी मैफल रंगली. मधेच भटसाहेब स्टेजवर आले. माईक हातात घेतला आणि त्यांनी माझ्या वाटचालीतला एक अविस्मरणीय क्षण दिला. ते म्हणाले, `गझल कशी गावी, हे मला कुणी विचारलं. तर मी भीमरावकडे बोट दाखवीन. आज तुम्हा सर्वांच्या साक्षीने मी भीमरावला गझलनवाज ही उपाधी देतोय. गझलने ज्याच्यावर कृपा केली तो गझलनवाझ` हे मनपसंत बिरुद मी आयुष्यभर मिरवतोय.

मराठीत गझलला कुणी विचारायचं नाही. उलट नावं ठेवली जायची. तेव्हा भट मला सांगायचे, `हे पाहा, मी तुले सांगून ठेवतो भीमराव. येणारा काळ मराठी गझलचाच आहे. लक्षात ठेव.` ते माझ्यासाठी ब्रह्मवाक्य ठरलं. त्या वाक्याने माझ्या जगण्याच्या प्रवासाची दिशा ठरवली.

२००२साली भटांचा सत्तरावा वाढदिवस भव्य प्रमाणात साजरा करायचा आम्ही ठरवला. त्यानिमित्त त्यांच्यावर विशेषांक केला. त्यांच्या गझलांची मी गायलेली सीडी `पुन्हा तेजाब दुःखाचे` आली. पुढचं गझल संमेलन भटांच्या गावी अमरावतीत करायची घोषणा केली. पण ते संमेलन बघायला भटसाहेब नव्हते.

१४ मार्च २००३ ला भटसाहेब आपल्याला सोडून गेलेत. आज भटसाहेब नाहीत. पण त्यांचं ब्रह्मवाक्य खरं ठरतंय. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले शायर मराठी गझल ताकदीने लिहिताहेत. माझ्या छोट्याशा गावात मी भट साहेबांच्या नावाने छोटंसं सभागृह बांधलंय. लायब्ररी सुरू केलीय. भटांनी रुजवलेलं मराठी गझलचं अमृताचं रोपटं फुलावं. बहरावं, त्याचा डेरेदार वृक्ष व्हावा यासाठी तनमनधनाने झटणं, हीच मला खरी श्रद्धांजली वाटते.

जाणते ही बाग माझ्या

सोसण्याच्या सार्थकाला

मी इथे हे अमृताचे

रोपटे रुजवून गेलो

हेही वाचाः

नागपाड्यातल्या भिंतीवरचा गालिब पाहिलाय का?

सफदर हाश्मीः नाटक थांबवत नाही म्हणून त्याचा भररस्त्यात खून केला

फैज अहमद फैजः जगणं समृद्ध करणारा शायर 

(प्रसिद्ध गझलगायक भीमराव पांचाळे यांनी सांगितलेल्या आठवणींचं शब्दांकन)