सुपरस्टारला कोरोना होतो तेव्हा

२१ जुलै २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना कोरोना वायरसची लागण झाल्याचं कळल्यापासून सगळ्या देशानं देव पाण्यात घातलेत. कुठे त्यांच्यासाठी होम हवन करणं चालूय तर कुठे सॅंड आर्ट वगैरे बनवून त्यांना शुभेच्छा दिल्या जातायत. सोशल मीडियानं अमिताभ यांना राष्ट्रीय कोरोना रूग्ण घोषित केलंय. या सगळ्यात अमिताभ यांना कोरोना वायरसची लागण झाली कशी याचा शोध घ्यायला मात्र आपण विरसलो आहोत.

भारत हा कृषीप्रधान देश आहे असं देशातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता म्हणता येत नाही. पण महानगरांपासून खेडेगावांपर्यंत कुठेही फेरफटका मारला तर सहज लक्षात येतं की भारत हा सिनेमाप्रधान देश आहे. बॉलिवुडचे सिनेमे म्हणजे आपल्या सगळ्यांचा जीव की प्राण. आणि त्यातले हिरो हिरोईन हे तर आपल्या जगण्याचा भाग. त्यामुळे त्यांच्या विषयी जाणून घ्यायचं कुतुहल कधीच पूर्ण होत नाही.

ते काय खातात, काय पितात इथंपासून कुणासोबत डेटवर जातात या सगळ्यात आपल्याला रस असतो. अशात एखाद्या हिरोला कोरोनावायरसची लागण झाली तो चर्चेचा विषय होणारच. त्यातही तो शतकाचा महानायक वगैरे असेल तर मग बोलायचीच सोय नाही. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना कोरोनावायरसची लागण झाल्याचं अभिषेक बच्चन यांनी ट्वीट करून सांगितल्यापासून सगळीकडे चर्चा त्याचीच सुरू आहे.

हेही वाचा : अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी 

अमिताभचा दुसरा वाढदिवस

`ये तुम्हारे बाप का पुलिस स्टेशन नहीं,` असं म्हणत `जंजीर`मधल्या अँग्री यंग मॅनने व्यवस्थेच्या खुर्चीवर लाथ मारली आणि अमिताभ त्यानंतर सगळ्या भारतीय तरुणांच्या पिढ्यांच्या हृदय सिंहासनावर विराजमान झाले. आजही काळानुसार बदलत त्यांनी स्वतःला नव्या पिढ्यांशीही जोडून घेतलंय. मग ते `पा` मधले अमिताभ असोत की `पिंक`मधले.
 
त्यामुळेच अमिताभला काहीही झालं की सगळ्या देशाचाच जीव वरखाली होतो. ऐंशीच्या दशकात कुली सिनेमाच्या शुटिंगमधे अमिताभ यांना अपघात झाला आणि सगळ्या देशाने देव पाण्यात घातले. त्यानंतर अमिताभ हॉस्पिटलमधे शुद्धीवर आले तो २ ऑगस्ट हा दिवस आजही त्यांचा दुसरा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. नवस फेडण्यासाठी आपल्या घरापासून मुंबईतल्या सिद्धिविनायकाच्या देवळापर्यंत चालत जाण्याची तेव्हा सुरू झालेली प्रथा आजही सुरू आहे. कुलीनंतर त्याच्यासाठी इतकी प्रार्थना गेल्या आठवड्याभरात झाली असेल.

‘बाबा आणि मला कोरोनाची लागण झालीय आणि आम्ही नानावटी हॉस्पिटलमधे ऍडमिट आहोत,’ असं ट्वीट अभिषेकने ११ जुलैला रात्री खूप उशीरा केलं. तरीही सगळा सोशल मीडिया सत्तरीत पोचलेल्या अमिताभ यांच्यासाठी दुवा मागत होतं. दुसऱ्या दिवशीची पेपरची हेडलाईनही अमिताभ यांचीच होती. अमिताभ बरे व्हावेत म्हणून पटना, वाराणसी, मुज्जफरनगर अशा अनेक शहरात होम हवनही करण्यात आला. महाकाल मंदिरात त्यांच्यासाठी पूजा झाली. ‘हे २०२० वर्षा, आम्हाला अजून दुःख दाखवलंस तरी चालेल पण आमचा सुपरस्टार आमच्यापासून घेऊन जाऊ नको,’ अशी आर्जवाही केल्या.

आरोग्य सेतूच्या ब्रॅड अॅम्बॅसिडरलाच झाला कोरोना

त्यांच्या चाहत्यांची ही दुखरी नस मीडियाने बरोबर हेरली. न्यूज चॅनलनी अमिताभ यांच्या प्रकृतीचे सगळे अपडेट दणादण द्यायला सुरवात केली. अमिताभ काय खातात, काय पितात इथपर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती चॅनल पुरवत होते. योगायोगाने तेव्हाच रेखा यांच्या बॉडीगार्डला कोरोना वायरसची लागण झाल्याचं समोर आलं. त्यांचा बंगला सील झाला होता. त्यामुळे चॅनलना ब्रेकिंग न्यूजच्या उकळ्या फुटल्या. वर्तमानपत्रांनी या दोन बातम्या एकत्र करूनही छापल्या. त्यात खोडसाळपणाची शंका घेता येण्याजोगी परिस्थिती होती. अगदी अतिशोयक्ती वाटावी इतकं मीडियानं या अमिताभ यांचं आजारपण उचलून धरलं. 
अति तिथे माती. म्हणून सोशल मीडियाही त्यावर टीका करत मैदानात उतरलं. गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरची चर्चा थांबावी म्हणूनच अमिताभ यांच्या कोरोनाचं अती केलं, असा त्यांच्यावरचा प्रमुख आरोप होता. शिवाय या सगळ्यावर टीकात्मक मीम बनवले, जोक तयार केले, वीडियो शुट केले, मेसेज वायरल झाले. रेखा, जया आणि अमिताभ यांच्या एका फोटोवीडियोला `माझ्या नवऱ्याची बायको` या मराठी सिरियलचं टायटल साँगही लावलं. सगळं सोशल मीडिया अमिताभमय झालं होतं.

मीडियाच्या बातम्यांवरूनच नाही तर इतर अनेक गोष्टीवरून अमिताभ यांना ट्रोल करण्यात आलं. जया बच्चन सोडता अमिताभ यांच्या संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाची लागण झाली असल्याने एकीकडे चाहते त्यांच्यासाठी सँड आर्ट वगैरे बनवून त्यांना शुभेच्छा देत होते तर दुसरीकडे आरोग्य सेतू अॅपचा ब्रँड अॅम्बॅसिडरच कोरोनाग्रस्त झाल्याची आठवण करून दिली जात होती. 

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

राष्ट्रीय कोरोना रूग्ण

अमिताभ यांना अगदी सौम्य लक्षणं होती. जवळपास एसिम्टोमॅटीक म्हणजे कोरोना वायरसची लक्षणं न दिसणाऱ्यांच्यातच त्यांना गणावं इतके ते ठणठणीत होते. साधारणपणे अशा पेशंटला शक्य असेल तर घरीच आयसोलेशनमधे राहण्याचा सल्ला दिला जातो. त्यांच्यावर घरीच उपचार केले जातात.

अमिताभ यांचा जलसा हा बंगला बाहेरून पाहिला तरी त्यांना हे सहज जमलं असतं असं कुणीही सांगेल. त्यांच्या घरातल्या पाच माणसांना प्रत्येकी दोन दोन खोल्या वाटल्या तरी खोल्या उरतील एवढं मोठं त्यांचं घर. तरीही त्यांना घराजवळच असणाऱ्या नानावटी हॉस्पिटलमधे ऍडमिट केलं. नानावटी हॉस्पिटलची सेवा, तिथले कर्मचारी त्यांची अतिशय काळजी घेतायत हे सांगणारा अमिताभ यांचा जुना वीडियोही वायरल झाला.

हे नानावटी हॉस्पिटल मुंबईतलं कोविड-१९साठीचं महत्त्वाचं हॉस्पिटल आहे. इथे कोविड १९ आजार झालेल्या पेशंटसाठी फक्त १५० बेड तयार आहेत. त्यातले ४२ बेडआयसीयू विभागात आहेत. अगदी काहीच दिवसांपूर्वी नानावटी हॉस्पिटलविरूद्ध पोलिस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोरोना वायरसच्या पेशंटकडून जास्तीचं बील घेतलं म्हणून त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते.

महानगरपालिकेकडून निघालेल्या परिपत्रकातल्या गोष्टींचं पालन केलं गेलं नाही म्हणून मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांताक्रुझ पोलिस स्टेशनमधे ही एफआयआर दाखल करण्यात आला. अशा नानावटी हॉस्पिटलमधे अमिताभ यांना सगळ्याच चांगली ट्रीटमेंट मिळाली. ९ लाख कोरोना वायरसचे पेशंट असलेल्या देशात फक्त एकाच माणसाचा आजार सोहळा बनतो या असमान वागणुकीवर अनेक जण अजूनही नाराज दिसतायत. अमिताभ देशाचे राष्ट्रीय कोरोना रूग्ण झालेत.

थाळी न वाजवणाऱ्या जया राहिल्या कोरोनामुक्त

नुकतंच अमिताभ यांच्या घराला सॅनिटायईझ करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी गेले होते. कोरोनावायरसची लागण झालेल्या सगळ्यांच पेशंटच्या घरात बीएमसीकडून औषध फवारणी केली जाते. बीएमसीकडून होते म्हणजे सरकारी पैशातून, लोकांनी भरलेल्या टॅक्समधून होत असते. अमिताभ यांच्यासारख्या कोट्यावधी रूपयांच्या प्रॉपर्टीचे मालक असणाऱ्यांनी स्वतःच्या घराची सॅनिटायझेशनची जबाबदारी उचलायला हवी होती, असा सूर उमटतो आहे.

कोरोनासाथरोगात आपली मदत करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी २२ मार्चला आपल्या घरात थांबून टाळ्या, थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं. तेव्हा अनेक सेलिब्रेटींनी आपापल्या घरातले वीडियोवायरल केले होते. अमिताभ यांच्यासोबत अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्याही टाळ्या आणि थाळ्या वाजवत होते. शिवाय, या कार्यक्रमाच्या आधी ‘२२ मार्चला आमावस्या आहे. महिन्यातल्या सगळ्यात अंधारलेला दिवस. वायरसबॅक्टेरिया या राक्षसांची शक्ती वाढते. अशावेळी टाळ्या वाजवल्याने, शंखाच्या नादाने वायरसची शक्ती कमी होईल. चंद्रही रेवती नक्षत्रात प्रवेश करेल. वायब्रेशनने आपल्या शरीरातलं रक्ताभिसरण सुधारेल,' अशा आशयाचं ट्वीटही अमिताभ यांनी केलं होतं.

या सगळ्या टाळी, थाळी वादनाच्या वीडियोत आपल्याला जया बच्चन दिसत नाहीत. आणि त्या सोडून संपूर्ण कुटुंबाला कोरोनावायरसची लागण होते, यावरूनही सोशल मीडियावर अनेक तर्क लढवले जात आहेत. फक्त टाळ्या, थाळ्या वाजवून कोरोना थांबवता येत नाही, असा मोलाचा सल्ला अनेकांनी अमिताभ यांना दिलाय.

हेही वाचा : बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?

अमिताभ यांना कोरोना झालाच कसा?

कोरोना वायरसपासून कसं वाचायचं हे सांगण्यासाठी तयार केलेल्या सरकारी जाहिरातीत अमिताभ बच्चन यांचाच सहभाग आहे. सोशल डिस्टसिंग ठेवा, हात धुवा असं सांगणाऱ्या अमिताभ यांना कोरोनाची लागण झालीच कशी या प्रश्नाचं उत्तर काही केल्या मिळत नाहीय. अमिताभ यांच्या घरात काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आलीय. त्यातले २६ रिपोर्ट निगेटिव आलेत.

काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन अंधेरीतल्याच एका स्टुडिओमधे डबिंग करण्यासाठी गेले होते. अमिताभ यांच्या नातवानं नितू कपूर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही हजेरी लावली होती. खरंतर, अमिताभ राहतात तो वॉर्ड कोरोना वायरसचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातोय. या भागातून ५३०० कोरोना वायरसचे पेशंट नोंदवले गेलेत. त्यातल्या जवळपास २५० पेशंटचा मृत्यूही झालाय. इथल्या अनेक रहिवाश्यांना कोरोना वायरसची लागण होतेय.

बॉलिवुडलाच झालाय कोरोनाचा संसर्ग

अमिताभ यांच्यासोबतच बॉलिवुडमधल्या अनेकांना कोरोनावायरसची लागण झालीय. अनुपम खेर यांच्या आई दुलारी खेर आणि भाऊ अभिनेता राजू खेर, अभिनेते किरण कुमार, निर्माता करीम मोरानी, गायिका कनिका कपूर, संगीतकार वाजीद खान हेही कोरोना पॉझिटिव आहेत. त्याचबरोबर रेखा यांच्या शेजारी राहणाऱ्या दिग्दर्शिका झोया अख्तर यांचाही बंगला सील करण्यात आलाय. यातल्या बहुतांश सेलिब्रेटींना त्यांच्या घरी काम करायला येणारे कामगार, सुरक्षा रक्षक, बॉडीगार्ड अशाच लोकांकडून लागण झाल्याचं समोर येतंय.

फक्त या आजारपणामुळे नाही तर लॉकडाऊनमुळे झालेल्या शूटिंगबंदीचा जबरदस्त प्रभाव बॉलिवुडमधे दिसून येतोय. तिथल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या आर्थिक अडचणीपासून ते हिरो हिरोईनीच्या मानसिक आरोग्यापर्यंत सगळ्याची चर्चा वारंवार केली जातेय. त्यामुळे संपूर्ण बॉलिवुडलाच एकप्रकारे कोरोनाचा संसर्ग झालाय. अमिताभ बच्चन कोरोनातून जास्तीजास्त १० दिवसांत बरे होतील. पण कोरोना वायरसचा बॉलिवूडवर झालेला परिणाम पूर्ववत होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी पुरेल की नाही हे सांगता येत नाही.

हेही वाचा : 

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

कादर खान: झीरोतून हीरो बनलेला लाखमोलाचा माणूस

खरंच, भारतात कोरोनाची दुसरी लाट जूनमधे येणार आहे?

हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे