बॉलीवूडला भुरळ घालणाऱ्या महाठगाची ‘अरेबियन नाईटस्’ स्टोरी

२५ डिसेंबर २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


आपल्या देशात आतापर्यंत हर्षद मेहता, नीरज मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी, राजू रत्नम, मेहुल चोक्सी, तेलगी, सुब्रतो राय, केतन पारीख असे अनेक छोटे-मोठे ठकसेन होऊन गेले, त्यांच्यामधे आता सुकेश चंद्रशेखर याची भर पडली आहे. अवघ्या ३२ वर्षांच्या या महाठगाने बॉलीवूड कलाकारांवर कशी भुरळ घातली आणि लोकांना कसं लुबाडलं, याची कहाणी ‘अरेबियन नाईटस्’पेक्षा सुरस आहे.

जगामधे आणि भारतात महाठगांची काही कमी नाही. एक संपला की, दुसरा त्याची जागा घेतो आणि लोकांची लुबाडणूक, फसवणूक चालूच राहते. आधी ठेच लागूनही लोक शहाणे होत नाहीत. आता सुकेश चंद्रशेखर नावाच्या महाठगाचं नाव गाजतंय. अलीकडेच सुकेश आणि बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांचा एकमेकांचं चुंबन घेतानाचा फोटो वायरल झाल्यावर सुकेशचं नाव देशभर गाजू लागलंय. या महाठगाने बॉलीवूडमधल्या अनेक कलाकारांना आपल्या जाळ्यात ओढल्याचं ‘ईडी’च्या तपासाम दिसून आलं. या प्रकरणाने बॉलीवूडला जबरदस्त हादरा बसलाय.

सुकेशने जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्यावर कोट्यवधी रुपयांची उधळण केल्याचं दिसून आलं असून, त्याने इतर अनेकांना लुबाडण्याचं उघड झालंय. विशेष म्हणजे, सुकेशने तिहार जेलसारख्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणार्‍या कारागृहातून खंडणीचं रॅकेट चालवलं हे समजल्यावर अनेकांची मती गुंग झाली आहे. अवघ्या ३२ वर्षांच्या या महाठगाने बॉलीवूड कलाकारांवर कशी भुरळ घातली आणि लोकांना असं लुबाडले, याची ही ‘अरेबियन नाईटस्’पेक्षा सुरस कथा.

एका महाठगाचा भूलभुलैया

सुकेशचा जन्म १९८९ला बंगळूरच्या भवानीनगर इथं एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचं प्राथमिक शिक्षण बंगळूरच्या बिशप कॉटन बॉईज स्कूलमधे झालं. बारावीनंतर त्याने शिक्षण सोडून दिलं आणि रिअल इस्टेट क्षेत्रात काम सुरू केलं. सामान्य दिसणार्‍या या सावळ्या मुलाने लहानपणापासून अब्जाधीश होण्याची स्वप्नं पाहिली आणि ती साकार करण्यासाठी शॉर्टकट, अवैध मार्ग पत्करला.

वडील चंद्रशेखर हे त्याला सांगत तू भरपूर शिक आणि नाव कमव; पण सुकेशने आपल्या वडलांचा उपदेश न ऐकता भलत्याच मार्गाने नाव कमावलं. सुकेशला बालपणापासून लक्झरी आणि स्पोर्टस् कार्सची आवड. तो शहरात कार शर्यती आयोजित करण्यासाठी हेल्पर म्हणून काम करत होता. सुकेश कायदेशीररीत्या कार चालू शकत नव्हता; पण त्याने आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी बंगळूर पोलिस आयुक्तांच्या बनावट सहीचा वापर केला आणि कर्नाटकात कुठेही गाडी चालवायचा परवाना मिळवला.

नोकर्‍या लावून देतो, मालमत्ता मिळवून देतो किंवा इतर काही कामं करून देतो, अशा आश्नासनांच्या बदल्यात त्याने कित्येकांना टोप्या घातल्या. २००५ला त्याला अटक झाली, त्यावेळी तो अवघा सतरा वर्षांचा होता. त्यावेळी त्याने कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या मुलाचा आपण जवळचा मित्र असल्याचं भासवून बंगळूरमधल्या एका उद्योगपतीला १.१४ कोटी रुपयांना गंडवलं होतं. त्याचप्रमाणे आपण बंगळूर विकास प्राधिकरणाचा अधिकारी असल्याचं भासवून त्याने १०० लोकांना लुबाडलं होतं.

हेही वाचा: ओटीटी प्लॅटफॉर्म थेटरचे बाप बनणार का?

पत्नी लीना मारियाही ठगबाजीत

सुकेश हा अगदी वेगळ्या प्रकारचा महाठग आहे. तो आपल्या सावजांना लुटताना हिंसाचाराचा वापर करत नाही. त्याला अनेक भाषा येतात आणि तो मृदुभाषी आहे. तो इतका छान बोलतो की, समोरचा माणूस भारावून जाऊन त्याचा लगेच मित्र बनतो. सावजाला तो आपण एखाद्या अतिमहत्त्वाच्या बड्या व्यक्तीचा नातेवाईक असल्याचे भासवतो. त्याला पहिल्यापासूनच आलिशान राहणीची, चैनीची, महागड्या वस्तूंची आणि सुंदर ललनांची चटक आहे, असं त्याचं वर्णन मीडियाने केलेलं आहे.

सुकेशने मल्याळी अभिनेत्री लीना मारिया पॉल हिला आपल्या जाळ्यात ओढून नंतर तिच्याशी लग्नही केलं. लीनाने ‘मद्रास कॅफे’ या गाजलेल्या सिनेमात भूमिका केली होती. मग सुकेशच्या ठगबाजीमधे तीही सामील झाली. २०१५ला सुकेश लीनासोबत मुंबईत राहायला गेला आणि त्याने तिथं एक पोंझी स्कीम सुरू केली. त्याच्या कंपनीत ४५० ठेवीदारांनी आपले पैसे ठेवले होते. या ठेवीदारांचे २० कोटी रुपये लुबाडण्याचा गुन्हा सुकेशविरुद्ध दाखल करण्यात आला.

२०१७ला गाजलेल्या निवडणूक आयोग लाचलुचपतप्रकरणी सुकेश आणि त्याची पत्नी लीनालाही अटक करण्यात आली होती. अण्णाद्रमुकचे ‘दोन पाने’ हे निवडणूक चिन्ह तुमच्या गटाला मिळवून देतो, असं आश्वासन देऊन सुकेशने टीटीवी. दिनकरन गटाकडून ५० कोटी रुपये उकळले, असा आरोप होता. त्यावेळी क्राईम ब्रँच पोलिसांनी सुकेशविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. सुकेशने आपल्याकडे पैसे नसल्याचं सांगितलं होतं; पण त्याच्या हॉटेलच्या खोलीत पोलिसांना दीड कोटी रुपये सापडले. ही रक्कम आणि हॉटेलबाहेर उभी केलेली त्याची मर्सिडिज बेंझ कार पोलिसांनी जप्त केली होती.

सुकेशच्या जेलमधूनही कुरापती

त्यानंतर सुकेशला दिल्लीच्या तिहार कारागृहामध्ये डांबण्यात आले; पण तिथून त्याने आपलं खंडणीचं रॅकेट आपल्या आतल्या आणि बाहेरच्या हस्तकांमार्फत सुरू ठेवलं. या जेलमधे सुकेशला सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. बाहेर संपर्क साधण्यासाठी तो वेगवेगळ्या मोबाईलचा उपयोग करायचा. तो पंचतारांकित हॉटेलमधून जेवण मागवायचा. पार्टी करायचा. त्याबदल्यात सुकेश हवाला डीलर्स, पोलिस आणि कारागृह अधिकार्‍यांना महिन्याला एक कोटी रुपये द्यायचा. याप्रकरणी दोन जेल अधिकार्‍यांना अटक झाली होती.

सुकेशने आपण कायदा खात्यातला अधिकारी असल्याचं भासवून रॅनबॅक्सी कंपनीचे माजी प्रमोटर शिविंदर सिंग यांच्या पत्नी आदिती सिंग यांना २०० कोटी रुपयांना टोपी घातली. आदिती सिंग कारागृहात आपल्या पतीला भेटण्यासाठी येत. त्यावेळी सुकेशने त्यांच्याशी संपर्क साधून तुमच्या पतीला जामीन मिळवून देतो, असं आश्वासन देऊन त्यांना अशाप्रकारे गंडवलं. यावर्षी तो जामिनावर बाहेर आल्यावर याच प्रकरणी त्याला दिल्ली पोलिसांनी पुन्हा अटक केली आणि मग हे प्रकरण गाजू लागलं. ‘ईडी’ने यावर्षी जुलैपासून या प्रकरणाचा तपास सुरू केला.

डिसेंबरमधे सुकेश आणि इतर आठजणांविरुद्ध आरोपपत्र तयार केलं आणि १७५ साक्षीदार तयार केले. ‘ईडी’नेे सुकेशच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. चेन्नईतल्या त्याच्या समुद्रकिनार्‍यालगतच्या आलिशान बंगल्यावरही छापे टाकण्यात आले. यावेळी ‘ईडी’च्या अधिकार्‍यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण, त्याच्या बंगल्यासमोर सोळा अल्ट्रा लक्झरी मोटारींचा ताफा खडा होता. त्यात रोल्सराईस मोटारींचाही समावेश होता.

हेही वाचा: भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या

असं फसवलं जॅकलीन फर्नांडिसला

सुकेश २०२० पासून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या मागावर होता. जेलमधून तो तिला वारंवार फोन करायचा. त्याने आपण सरकारी अधिकारी असल्याचं भासवून जॅकलीनचा मेकअप आर्टिस्ट शान मुथीलच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्याने आपली ओळख रत्न वेला अशी सांगून आपण सन टीवीचा मालक असल्याचं तिला सांगितलं. आपल्याकडे बरेच प्रोजेक्ट असल्याचंही त्याने तिला सांगितलं होतं. त्यानंतर त्यांचं एकमेकांना भेटणं सुरू झालं.

सुकेशने जॅकलीनला सोनं आणि हिर्‍याचे इअररिंग्स, ब्रेसलेटस्, ब्रँडेड शूज, बॅग अशा अनेक किमती वस्तू दिल्या. याशिवाय तिला ‘इस्क्युअला’ नामक एक महागडा घोडा आणि मिनी कूपर कारही भेट म्हणून दिली. त्याशिवाय तिच्या अमेरिकेत असलेल्या बहिणीला त्याने १ लाख ५० हजार डॉलर्स कर्जरूपात दिले. ऑस्ट्रेलियातल्या तिच्या भावाला पंधरा लाख रुपये दिले. जॅकलीनने तशी कबुली ‘ईडी’समोर दिलेली आहे. सुकेशने जॅकलीनला भारत फिरण्यासाठी विमान उपलब्ध करून दिलं होतं. या विमानाचं दोन महिन्यांचं भाडं एक कोटी ३९ लाख रुपये.

बॉलीवूडचे स्टार जाळ्यात

सुकेशने बॉलीवूड डान्सर नोरा फतेहीच्या एंटरटेन्मेंट कंपनीच्या माध्यमातून तिच्याशी ओळख करून घेतली आणि तिला चेन्नईतल्या एका इवेंटसाठी निमंत्रण दिलं. त्यानंतर या दोघांची मैत्री फुलत गेली. सुकेशने तिलाही अनेक महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या. एक कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू कारही तिला भेट म्हणून दिली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ‘एसीबी’ने जेव्हा ड्रग्ज केसप्रकरणी अभिनेत्री श्रद्धा कपूरला चौकशीसाठी बोलावलं तेव्हा त्यातून बाहेर काढण्यासाठी आपण तिला मदत केली होती, असं सुकेशने ‘ईडी’ला सांगितलं.

पोर्नफिल्मप्रकरणी राज कुंद्राला जामिनावर सोडवण्यासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्याशी संपर्क साधला होता, अशी माहिती त्याने ‘ईडी’ला दिली. श्रद्धा आणि शिल्पा या आपल्या जुन्या मैत्रिणी आहेत, असं तो सांगतो. हर्मन बावेजा हासुद्धा आपला जुना मित्र असून, त्याच्या ‘कॅप्टन’ या आगामी सिनेमात आपण पैसा गुंतवणार होतो, अशी माहिती त्याने ‘ईडी’ला दिलेली आहे.

बॉलीवूडमधल्या आघाडीच्या किमान दहा अभिनेत्री आणि कलाकार सुकेशच्या संपर्कात होते, अशीही माहिती ‘ईडी’ला मिळाली आहे. त्यांची नावं हळूहळू बाहेर येतील. देश-विदेशात सुकेशच्या बँक खात्यांमधे रग्गड पैसा आहे. सुकेशने काळा पैसा पांढरा कसा केला, याची चौकशी आणि तपास ‘ईडी’ करत आहे. त्यातून आणखी चक्रावून टाकणारी माहिती उघड होत राहणार आहे.

आपल्या देशात आतापर्यंत हर्षद मेहता, नीरज मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी, राजू रत्नम, मेहुल चोक्सी, तेलगी, सुब्रतो राय, केतन पारीख असे अनेक छोटे-मोठे ठकसेन होऊन गेले, त्यांच्यात आता सुकेश चंद्रशेखर याची भर पडलीय. हे भामटेगिरीचं चक्र असंच फिरत राहणार आहे आणि लोक पुन्हा टोपी घालून घेण्यासाठी आपली डोकी पुढे करत राहणार आहेत.

हेही वाचा: 

ऑस्करच्या आयचा घो!

सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट? 

ऋषी कपूर : ‘ढाई किलो’च्या हाताखाली दबला गेलेला हिरो

हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

द सोशल डायलेमा: सोशल मीडियाने  आपल्याला विकायला काढलंय