अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प आले, पण आपले 'खास रे' ट्रम्प तात्या कुठं गेले?

२४ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आलेत. पण या सगळ्यांतून मराठमोळे ट्रम्प तात्या गायब आहे. ट्रम्प तात्या म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचा अस्सल गावरान अवतार. तर या अवतारपुरुषाच्या जन्माची, वायरल आणि गायब होण्याची ही खास रे गोष्ट.

सध्या जमाना मीमचा आहे. ट्रोल करणाऱ्यांची चलतीय. उपहास, आपल्या भाषेत बोलायचं तर सरकॅझम ठासून भरलेल्या कंटेण्टचा बोलबाला सोशल मीडियावर मोठ्या फॉर्मात असतो. अशक्य पानचट, आईच्या गावात बाराच्या भावात अशा कितीतरी मराठमोळ्या फेसबूक पेजची नावं यात घेता येतील.

असंच ट्रम्प तात्या नावाचं एक पेज होतं. २०१७ मधे या पेजची तुफान क्रेझ होती. बार्शी पट्ट्यातल्या बोलीभाषेत इंटरनॅशनल पर्सनॅलिटी असलेले ट्रम्प आपल्या कुटुंबातल्या मनमौजी वडीलधाऱ्या, तात्यांसारखं बोलू लागतात. ठेवणीतल्या शिव्या हासडतात. हे बघून ते लगेचच तमाम मराठी माणसाला आपले, घरातले वाटू लागतात.

विदेशी ट्रम्पला देशी तडका देणारं हे ट्रम्प तात्या फेसबूक पेज सगळ्यांना माहीत आहेच. त्याची दखलही अनेकांनी घेतली. भरभरून कौतुकही झालं. पेपरात बातम्या छापून आल्या. यश मिळालं. पण याची सुरवात नेमकी कुठून झाली?

बाहुबली + ट्रम्प = सुसाट वायरल

कटप्पाने बाहुबलीला का मारलं, याचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं तो दिवस आठवा. एप्रिल २०१७ ला बाहुबली टू रिलीज झाला. बॉक्स ऑफिसचा गल्ला बाहुबली टू च्या नावाने ओसंडून वाहत होता. सोलापूरच्या बार्शीमधल्या एका थेटरात बाहुबली टू बघून संजय श्रीधर नावाचा मुलगा बाहेर पडला. तिकडून थेट आपल्या मित्राच्या म्हणजे विश्वनाश घाणेगावकर याच्या घरी गेला. शॉर्ट फिल्म बनवणारा संजय आणि लेखक व्हायचं स्वप्न उराशी बाळगलेला विश्वनाथ यांच्या डोक्यात ट्यूब पेटली. बाहुबलीचा रिव्यू करायचा, असं ठरलं.

नेमकं तेव्हाच ट्रम्प अमेरिकेची निवडणूक जिंकले होते. त्यामुळे ट्रम्प ट्विटरवर, तर बाहुबली यूट्यूबवर ट्रेण्डिंगमधे होता. सोशल मीडियाचा ट्रेण्ड शेअर मार्केट सारखाच असतो. ट्रेंडमधे असलेल्या गोष्टींचा धागा धरुन कण्टेंट गुंफायचा. कंटेण्ट दमदार असेल तर वायरल होण्याचे चान्स सर्वाधिक असतात. इतकं साधं आणि सोपं असं हे गणित असतं.

हे गणित संजयला साधारण माहीत होतं. त्यानं यूट्यूब चॅनल काढायचं ठरवलं. ट्रेंडिंग विषय ठरला, ट्रम्प आणि बाहुबली. पण गरज होती तगड्या कंटेण्टची. ट्रम्प बोलतानाचा वीडियो म्यूट करुन विश्वनाथ बाहुबलीबद्दल जे वाटेल ते बोलत गेला.

हेही वाचा : ट्रम्प यांच्या बायकोला का बघायचाय केजरीवालांच्या शाळेचा हॅपीनेस क्लास?

तीन तिघाडा, ट्रम्पतात्याचा वाजला नगाडा

विश्वनाथ हा बार्शीतला एक सर्वसामान्य मुलगा. ऍनिमेशनमधे लै स्कोप हाय, असं एका शहाण्यानं सांगितलं, म्हणून बार्शीत बारावीपर्यंतचं शिक्षण घेऊन विश्वनाथ पुण्याला आला. तिथं बीए इन भूगोल विषय घेतला. एक ऍनिमेशनचा क्लास लावला. ऍनिमेशन शिकताना विश्वनाथला लिखाणाचा नाद लागला. गझल म्हणू नका, कविता म्हणू नका, काय वाटेल ते लिहिण्याचं वेड या पोराला लागलं. ते कसं लिहायचं हेही त्यानं शिकून घेतलं.

पाठांतर ही विश्वनाथची जमेची बाजू. चार दिवसात विश्वनाथने गझल कशी लिहायची हे पण शिकून घेतलं. गझल शिकवणारे सरही अवाक झाले. म्हणजे सरांवर अगदी तोंडात बोट घालायचीच वेळ आली. स्टोरी लिहायची, कादंबरी लिहायची, सिनेमा लिहायचा अशी स्वप्न विश्वनाथला पडू लागली. लिहिणारी माणसं बोलायलाही हुशारच असतात. विश्वनाथही तसाच होता.

आणि महाराष्ट्रात कल्ला झाला!

ट्रम्प तात्याचा वीडियो पाहून विश्वनाथच्या कल्पनाशक्तीला धुमारे फुटू लागले. त्यानं बाहुबलीचा मराठमोळ्या मातीतला खतरनाक रिव्यू ट्रम्प तात्याच्या रूपात केला. नंतर एडिटिंगचा सेन्स असलेल्या संजयने त्यातली लाफ्टरची वाक्यं थोडी मागंपुढं केली.

संजय श्रीधरने २७ एप्रिल २०१७ ला यू ट्यूब चॅनेल तयार केलं. त्याचं नाव – खास रे टीवी. या खास रे टीवी चॅनेलवर २९ एप्रिलला हा वीडियो अपलोड झाला. दुसरीकडे फेसबूकवरही हा वीडियो टाकण्यात आला. आणि मग काय. अख्ख्या महाराष्ट्रात एकच कल्ला झाला!

खरंतर या उचापती त्यांनी उगाच केल्या होत्या. त्यामागे कोणताही ग्रेट विचार किंवा उद्देश असं काहीही नव्हतं. पण त्यामुळेच त्यांच्या प्रयत्नाला यश आलं. दुसऱ्या दिवशी संजय आणि विश्वनाथच्या फोनवर त्यांनीच तयार केलेला वीडियो त्यांनाच फॉरवर्ड होऊ लागला. या दोघांना काही कळेना. वीडियो वायरल झालाय. पण हे झालं कसं? हा वीडियो वायरल करण्यामागे हात होता ट्रम्प तात्याचा. ‘ट्रम्प तात्या’ या पेजचा मालक आणि यवतमाळवासी मास्तर अमित वानखडे यानं हा वीडियो वायरल केला होता.

हेही वाचा : नमस्ते ट्रम्पसाठी सजलेलं मोटेरा क्रिकेट स्टेडिअम आतून दिसतं तरी कसं?

वानखडे मास्तरांचा नाद करायचा नाय

अमित वानखडे पाटील असं या तरूणाचं नाव. पेशानं शिक्षक असलेल्या अमितला इंटरनेटचा फार नाद. यवतमाळमधे इंटरनेट तर सोडाच पण नेटवर्कची रेंजही पकडत नव्हती, त्या काळात त्याने ऑर्क्युट, गुगलचे बल्क मेसेज अशी सगळी मुशाफिरी केली होती. अमित वानखडे म्हणजे डबिंग वीडियोचा प्रणेताच म्हणा. आताच्या काळात अनेक जण फॉरेनचे वीडियो डब करतात. त्याला मराठमोळा बाज आणतात. पण याची सुरुवात वानखडे मास्तरांनी केली, असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही.

विदर्भातल्या अमित वानखडेला पहिल्यापासूनच सोशल मीडियाचं खूळ होतं. कोणताही कोर्स न करता, डिजिटल मार्केटिंग कोळून प्यालेला हा माणूस होता. या माणसाने फेसबूकवर अनेक पेज तयार केली. काय केलं की वीडियो वायरल होतो, कोणता वीडियो सहज वायरल करता येतो, कोणता करता येत नाही, लोकांपर्यंत डिजिटल माध्यमातून कसं पोचायचं, याच्या कोणतीही समीकरणं तयार नव्हती तेव्हाच अमितनं त्यातलं सगळं ए टू झेड जाणून घेतलं होतं.

अमितला रात्री राखणीसाठी शेतात जावं लागायचं. तिथंच त्यानं अनेक वीडियो केले. शेतातल्या गोठ्यातच ख्रिस गेलचा वीडियो अमितनं बनवला. मोबाईलमधेच आवाज रेकॉर्ड केला. मोबाईलमधेच एडिट केला आणि अपलोड करुन टाकला. ख्रिस गेल चक्क शेगावच्या कचोरीचं माहात्म्य सांगतोय, असं या वीडियोचं स्वरूप होतं. मोबाईलवर हे इतकं भारी एडिटिंग कसं केलं असेल, याचं नवल वाटतं. 

कोणालाही माहीत नसलेलं हॉटस्पॉट शोधलं

अमितला कम्प्युटरचा प्रचंड वेड!. घरच्यांनी त्याला बीएड करायला लावलं. तेव्हाही अमितला कम्प्युटर आणि त्यातल्या त्यात इंटरनेटच जास्त आकर्षित करत राहिलं. वडील गावचे पाटील होते. त्यामुळे त्या काळातला सगळ्यात चांगल्या लायकीचा नोकियाचा फोन घेणं अमितला सहज शक्य होतं. फोन चांगला असला तरी इंटरनेटचे वांदे होतेच.

एक एमबीची फाईल डाऊनलोड करण्यासाठी ४ ते ५ मिनिटं वाट पाहिल्याचंही अमितनं 'कोलाज'शी बोलताना सांगितलं. इतकी सहनशीलता असलेल्या अमितला इंटरनेटचं किती वेड असेल, याची कल्पना आज फोर जी आणि वायफायच्या युगात करता येऊ शकेल. 

त्या काळात सगळ्यांकडेच बीएसएनलचे फोन असायचे. बीएसएनएलचा रिचार्ज संपला की जीपीआर अनलिमिटेड चालायचं, याचा शोधही अमितने लावला होता. जेव्हा हॉटस्पॉट काय हे आयटी इंजिनिअरलाही माहीत नसेल. तेव्हा नोकियाच्या पीसीसूट सॉफ्टवेअरमधून थेट पीसीला इंटरनेट कसं कनेक्ट करायचं, याचे प्रयोग अमितने केले.

एका क्लिकवर हजारोंशी कनेक्ट कसं राहायचं, याची जीटॉकच्या काळापासून अमितने प्रॅक्टिस केली होती. फेसबूक येईपर्यंत डिजिटल मीडियातले सगळे खाचखळगे अमितला कळले. त्यामुळे अमितच्या डोनाल्ड ट्रम्प या पेजसोबतच इतरही पेजला रिस्पॉन्स मिळत गेला. डिजिटल मीडियावर चालणाऱ्या कंटेटचा सेन्स अमितला कळला होता. 

वीडियोसाठी तामझामाची गरजच नाही

एखाद्या सिनेमाची स्टोरी वाटावी, असा सीन इथं दिसतो. एकमेकांना कधी भेटलीही नाहीत अशी तीन माणसं एकमेकांसोबत काम करतायत. ट्रम्प तात्या नावाचं फेसबूक पेज तयार केलं यवतमाळच्या अमित वानखडेने ट्रम्पचा वीडियो बनवला विश्वनाथ आणि संजयने. तो अपलोड केला खास रे टीवी या यूट्यूब चॅनेलवर. हा वीडियो पाहिला अमित वानखडेनं. अमितनं यू ट्यूबचा वीडियो डाऊनलोड करुन फेसबूकवर टाकला. वीडियो इतका खास होता, की तो ट्रम्प तात्या पेजवरुन लगेच वायरल झाला.

‘खास रे’ला ट्रम्प तात्या पेजनं मदत केली म्हणा किंवा ‘खास रे’नं ट्रम्प तात्याला मदत केली म्हणा. दोघंही एकमेकांच्या हातात हात घालून सोशल मीडिया गाजवू लागले. लोकांचं मनोरंजन करू लागले. यानंतर संजय आणि विश्वनाथने बनवलेले वीडियो एक्स्क्लुझिवली ट्रम्प तात्या पेजवर पडू लागले. तुफान वायरलही होऊ लागले.

वीडियो बनवण्यासाठी संजय आणि विश्वनाथने मोठा तामझाम केला नव्हता. मोबाईलवर रेकॉर्ड करायचं आणि प्रीमिअरमधे किंवा एफसीपीमधे एडिट करायचं. एवढंच! डोनाल्ड ट्रम्पच्या वीडियोमधे खाली टिकर किंवा टॅग लाईन दिसतात, त्यावर विश्वनाथ लिहायचा. एडिटिंग आणि अपलोड संजय करायचा. संजय-विश्वनाथ क्रिएटर आणि वानखडे मास्तरांचा ट्रम्प तात्या डिस्ट्रीब्यूटर, असं सगळं चालू होतं. हा खेळ वर्ष दीड वर्ष चालला. यात विश्वनाथ आणि संजयने वेगळे प्रयोगही केले. पण ज्या प्रयोगात ट्रम्प नव्हता, तो प्रयोग फसला.

हेही वाचा : ट्रम्प यांचं एअर फोर्स वन विमान म्हणजे उडतं व्हाईट हाऊसच!

ट्रम्प तात्या कुठे हरवले?

गेल्या दीड वर्षांपासून खास रे टीव्ही आणि ट्रम्प तात्या फेसबूक पेजवरुन डोनाल्ड ट्रम्प गायब आहे. यशाच्या शिखरावर असताना अचानक गेल्या दीड वर्षात ट्रम्प गायब का झाला, याचं कारण कळलं नाही. पण आज खरोखरचे ट्रम्प भारतात येणार आहेत. त्यावेळी त्यांच्याशी मराठमोळ्या ट्रम्प तात्याने बोलायला हवं.

त्यांच्यानंतर अनेकांनी ट्रम्प तात्याला टेक ओवर करण्याचा प्रयत्न केला. पण ते करणं कुणाला तितकसं जमलेलं नाही. सध्या हे तिन्ही अवलिये आपआपल्या क्षेत्रात जबरी काम करतायत. विश्वनाथ प्रोफेशनल रायटर म्हणून फिल्म इंडस्ट्रीत सेटल होतोय.

संजय श्रीधर सोशल मीडियावर सिनेमांच्या प्रमोशनची कामं करू लागलाय. अमित वानखडे खास रे.कॉम नावाची वेबसाईट चालवतो. सध्याच्या घडीला ही तिन्ही माणसं एकत्र काम करत नाहीत, हे त्यांच्यासोबतच्या बोलण्यावरुन जाणवलं.

यश टिकवण्याचं आव्हान

आज ट्रम्प पुन्हा ट्रेंड होतोय. भारताचा दौरा हा ट्रेंडचा विषय असला, तरी आपला तात्या ऑलटाईम खास रे होता आणि आहे, हे डिजिटल मीडियात काम करणाऱ्या संजय श्रीधर, विश्वनाथ घाणेगांवकर आणि अमित वानखडे यांना माहीत आहेच. त्यांनी महाराष्ट्राच्या ट्रम्प तात्याला पुन्हा जिवंत करायला पाहिजे. कारण आता तो फक्त त्यांचा नाही, अख्ख्या महाराष्ट्राचा झालाय.

यश मिळवणं महत्त्वाचंच. पण ते आलं की टिकवणंही आव्हानात्मक असतं. ट्रम्प तात्याचा खास रे प्रवास सिनेमासारखाच आहे. पण आता त्या प्रवासाच्या पाऊलखुणा धुरकट दिसू लागल्यात. ट्रम्प असला तरी आपला तात्या त्यात नाही. युट्यूबवर टीवी असेल. पण त्यात खास रे नाही, असं का होतंय याचाही विचार एकमेकांच्या हातात हात घालून काम करणाऱ्यांनी आणि त्यांच्या आपल्यासारख्या फॅन लोकांनीही करायला हवा.

हेही वाचा : 

डॉन को पकडना चापलुसों को मुमकीन नही!

ट्रम्पतात्यांनी भारतासोबत खोटारडेपणा का केला?

मोदींच्या स्टेजवर ट्रम्पतात्या आले, त्याचा देशाला काय फायदा झाला?