कोरोना काळातल्या लॉकडाऊनमधे सुरवातीला कोरोनापेक्षाही जा्स्त वायरल झाली ती ज्ञानदा. फेसबुकवर कोरोनाचं काय करायचं यापेक्षा काय सांगशील ज्ञानदा हाच प्रश्न लोक विचारू लागले. एबीपी माझाची अँकर असलेल्या ज्ञानदा कदमनंही लोकांना या साऱ्या प्रश्नांची उत्तर दिली. हे सारं एका ट्रेंडमुळे घडलं. त्या ट्रेंडची आणि ज्ञानदाची ही गोष्ट. आज ११ मेला ज्ञानदाचा बड्डे आहे.
लास्ट... थ्री... टू वन... क्यू...
आताच एक मोठी बातमी आपल्या समोर येतेय. या बातमीचा अँकरपण लिहिलेला नाहीय. आणि मला आता ही मोठी बातमी तुम्हाला सांगावी लागणारे. आऊटपूटचं नेहमीचं झालंय हे! पण जाऊ दे. तुम्ही काळजी करु नका. तुम्हाला मोठी बातमी मी सांगणारंय. बातमी 'काय सांगशील ज्ञानदा' या पेजची आहे. दहा दिवसांच्या आत ज्ञानदा काय सांगशील. माफ करा...' काय सांगशील ज्ञानदा' या पेजने दहा हजार लाईक्स आणि दहा हजार फॉलोअर्सचा टप्पा ओलांडलाय.
याला घवघवीत यशच म्हणावं लागेल. याच संदर्भात अधिक माहिती येणार आहोत, आमच्या प्रतिनिधींकडून. काय सांगशील ज्ञानदा? कोलाजला वर्ष झालं. १ हजार लाईक्स काढताना नाकी नऊ येत आहेत. आम्हाला शक्य झालं नाही. तू कसं काय शक्य केलंस? हे यश इतक्या पटकन कसं काय मिळवलं? काय सांगशील ज्ञानदा?
ज्ञानदा - नक्कीच. हे शक्य झालं, लोकांच्या प्रेमामुळे. आणि याला मुख्य कारण ठरलंय ते मी दिलेला कंटेट. कंटेटच इतका भारी मी देते, की फुलटॉसवर सिक्स कसा मारायचा, हे माझ्या चाहत्यांना शिकवावं लागत नाही. त्यामुळे एवढं स्टारडम, एवढी पब्लिसिटी, एवढे मिम्स, एवढं सगळं काही भारी ज्यांनी केलं, त्यांचे आभार मानावेत तितके कमी आहे. कदाचित मीच काय खांडेकरदेखील माझं इतकं ग्रेट प्रमोशन करु शकले नसते. पण हॅट्स ऑफ आहे.
सध्यापुरतं ज्ञानदा एवढंच सांगेल, की हे असंच सुरु राहावं. लोकांनी असंच प्रेम करत राहावं. कंटेट काय मी देत राहीनच. त्यामुळे तुम्हाला नवनवीन मिम्स बनवण्याचीही संधी मिळत राहिलच. त्यामुळे कसं आहे की. कारण ज्ञानदा खूप बोलते.
टॉकबॅकवरुन आवाज येतो. चला बस करा. धन्यवाद द्या! त्यामुळे अँकर मधेच तोडत-
- नक्कीच ज्ञानदा. धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. ताजे अपडेट्स वेळोवेळी तुझ्याकडून जाणून घेण्यापेक्षा आम्ही तुझे मिम्स पाहत राहू. शुभेच्छा तुला. तू अशीच प्रमोट होत राहा. तूर्तास धन्यवाद.
हुश्शsssss! संपेश बुलेटीन? नाही भावा बुलेटीन तर आता सुरु झालंय. कारण ज्ञानदा काय सांगशीलचे चाहते लगेच आता कंटेट तयार करण्याच्या गडबडीत आहेत. त्यांच्या क्रिएटिव डोक्यात सतराशे साठ मिम्सचा स्लाईड शो आत्ता डोळ्यासमोरुन स्क्रोल झालाय. एबीपी माझा या मराठी न्यूज चॅनलच्या अँकर्समधे गेल्या दहा वर्षात ज्ञानदा हे नाव कुणाला माहीत नव्हतं अशातला भाग नाही.
हेही वाचाः कोरोनाला हरवण्यासाठी जग वेगवेगळे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात?
'चला हवा येऊ द्या'मधे एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांची डॉक्टर निलेश साबळेनं नक्कल केली होती. इतकंच काय नम्रता वागळेचीदेखील नक्कल करण्याचे एक-दोनदा प्रयत्न झाले. निखिल वागळेंची नक्कल तर अनेकांनी केलेली आपण पाहत आलोय. पण 'काय सांगशील ज्ञानदा' हे तीन शब्द गेल्या दहा दिवसांत ज्या पद्धतीनं चर्चेत आलेत, त्या पद्धतीमुळे ज्ञानदालाही सुखद धक्का दिलेला असू शकतो.
गेल्या दहा वर्षात अशा पद्धतीनं कुठल्याच अँकरचं प्रमोशन झालेलं आपल्या पाहण्यात नाही. चाहत्यांनी कुठल्याच न्यूज अँकरला अशाप्रकारे डोक्यावर घेतलेलं नाही. थोडसं खोडकर असलं तरी यात चाहत्यांचा आपलं प्रेम व्यक्त करण्याचा निरागस प्रयत्न दिसतो. तो इतका ब्युटीफूल आहे, की ज्ञानदाच काय तिच्यासोबत स्पर्धा करणाऱ्या प्रत्येक अँकरला आपलंही असं एखादं पेज निघावं असं वाटलं, तर नवल नाही!
पण ज्ञानदाचं अशा पद्धतीनं पेज निघणं, अवघ्या काही तासांत त्याला काही हजारात लाईक्स मिळत राहणं, ही कौतुकास पात्र अशीच गोष्ट आहे. तुम्हाला ती राम कदम यांची बातमी आठवत असेलच. पोरीला पळवून घेऊन येईन, सांगणारी. दहीहंडीतल्या इवेटमधली. या बातमीवर ज्ञानदा फोनवरुन राम कदम यांना ज्या पद्धतीने झापते, ते सध्याच्या घडीला दुसरी कुठली न्यूज अँकर करु शकली असती का, याबाबत जरा शंकाच वाटते. इतकंच काय, निलेश खरेंनी गाजवलेलं बिग बॉसचं फिमेल वर्जनही तितक्याच ताकदीनं ज्ञानदानं करुन दाखवलं होतं.
हेही वाचाः महागुरू सचिन पिळगावकरांना लोक शिव्या का घालतायंत?
मूळ रिपोर्टर असणारी ज्ञानदा, फिल्डवर रिपोर्टींग करताना स्टुडिओत बसून अँकरिंग करायला लागली. अँकर झालो म्हणजे आपण थोर आहोत, असं अनेकवेळा अँकरिंग करणाऱ्यांच्या बाबतीत घडतं. पण ज्ञानदा याला अपवाद आहे. काम आवडलं तर मनापासून दाद देणाऱ्या डाऊन टू अर्थ माणसासारखी मनस्वी असणारी ही अँकर म्हणून अनेकांना आपल्या प्रेमात पाडू शकते. सगळ्यातलं सगळं कळतं, असं भासवत अँकरिंग करणारे एका बाजूला आणि शांतपणे, आरडाओरडा न करता, साधेपणाने, कसलाही आव न आणता, बडेजावपणा न करता एखादी ब्रेकिंग सहजपणे आणि तितक्याच प्रभावीपणे मांडणारी ज्ञानदा एका बाजूला.
आधी चव्हाण आणि आता कदम असा प्रवास असणाऱ्या ज्ञानदाचा ऑनस्क्रिन वावर एका सर्वसामान्य मुलीसारखाच असतो. त्यामुळे कदाचित सो कॉल्ड मराठी मुलांना जशी मुलगी आवडते, तशी ज्ञानदा भासत असेल, तर हे तिचं मोठं यशच आहे. काय सांगशील ज्ञानदा, या ट्रेंडच्या निमित्तानं तिचं नाव चर्चेत येत असेल, तर ही काही छोटी गोष्ट नाही. ही तर आतापर्यंतच्या न्यूज अँकरिंगच्या इतिहासातली ऐतिहासिक घटनाच आहे. तिच्यापेक्षा चांगलं अँकरिंग करणारे चेहरे नाहीत असं नाही, पण तिच्यासम तिच.
हेही वाचाः कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय
आपल्याला निखिल वागळेंवर टीका करणाऱ्यांच्या किंवा त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीची खिल्ली उडवणाऱ्याच गोष्टी माहिती आहेत. नम्रता वागळेच्या अँकरिंगच्या बाबतीही तेच झालं. राजीव खांडेकरांची निलेश साबळेने केलेली नक्कल पाहिल्यानंतर लोकांनी खांडेकरांना अँकर म्हणून थोडं जरा निरखून पाहिलं असावं. पण ज्ञानदाची बातच निराळी. लोक एकेकाळी मिलिंद भागवतांना बघायचे. पण आता रोज ज्ञानदाला बघतात, हे कोण नाकारेल.
हेही वाचाः अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प आले, पण आपले 'खास रे' ट्रम्प तात्या कुठं गेले?
कॉलेजमधे असणाऱ्या एनसीसीच्या गणवेशात ज्ञानदाने केलेला शो तुम्हाला आठवतोय का? नसेलच आठवत. पण तुम्हाला रॉकेट घातलेला दीपक चौरसिया लगेच आठवेल आणि ते आठवल्यावर ओठांवर हसूदेखील नकळतपणे आलं असेल. पण ज्ञानदाला एनसीसीच्या गणवेशात पाहून हसू येत नाही. उलट अभिमान वाटतो. असं का होतं, याचा विचार करायला पाहिजे.
ज्ञानदाची मूर्ती लहान असली, तरी तिची किर्ती मोठी आहे. डोंबिवलीकर असल्यामुळे स्पष्ट उच्चार वगैरे तर ज्ञानदाकडे आहेतच. पण कुठं सुरु करायचं, कुठे थांबायचं आणि कसं जोडायचं, हे जमणाऱ्या फार थोड्या फिमेल अँकरमधे सध्या ज्ञानदाचं नाव सगळ्यात आधी घेतलं पाहिजे. ज्ञानदा चुकली असेल, अशातला भाग नाही. अँकरींग काही कुणी आईच्या पोटातून शिकून येत नाही. चुका होणारच. होतातच. पुढेही होत राहतील.
इलेक्ट्रॉनिक मीडियाच शंभर चुका करतो. पण तो शंभर वेगवेगळ्या चुका करतो. एकच चूक पुन्हा पुन्हा करणारा इलेक्ट्रॉनिक मीडियात टिकूच शकत नाही. ज्ञानदा टिकली आणि मोठी झाली, ते तिने काळाप्रमाणे स्वतःमधे केलेल्या बदलांमुळे.
हेही वाचाः देशपांड्यांची मृण्मयी बोलली गोड, तरी नेटकऱ्यांनी मोडली खोड
आपल्यावरची टीका, आपल्यावरचे आरोप स्पोर्टिंगली घेणारी लोक फार कमी राहिलीत जगात. या फार थोड्या लोकांमधे ज्ञानदा मोडते. काय सांगशील ज्ञानदा, असं पोरं विचारुन विचारुन थकली. म्हणूनच की काय ज्ञानदानेही प्रेमाला सल्ला दिला. त्याची बातमी केली. त्यामुळे येत्या काळात एबीपी माझावर काय सांगशील ज्ञानदा असा कार्यक्रमच सुरु झाला, तरीही आश्चर्य़ वाटायला नको.
खरंतर ज्ञानदावर मिम्स बनवणारेही काही कमी हुशार नाहीत. तेही ज्ञानदा इतकेच टॅलेंटेड आणि क्रिएटिव लोक्स आहेत. फक्त हसण्या, हसवण्याच्या नादात, काय सांगशील ज्ञानदाचा इनोसंटपणा टिकवून ठेवला, म्हणजे मिळवलं! 'काय सांगशील ज्ञानदा' ही थोर गोष्ट आहे. ती जपली पाहिजे आणि वाढवलीसुद्धा पाहिजे.
हेही वाचाः
कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया
विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव
जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर
(लेखक हे आघाडीचे तरुण पत्रकार आहेत. )