वाचा, फणीश्वरनाथ रेणूंची प्रसिद्ध कथाः रसूल मिस्त्री

११ एप्रिल २०१९

वाचन वेळ : १० मिनिटं


आधुनिक हिंदी साहित्यातले प्रसिद्ध साहित्यिक फणीश्वरनाथ रेणू यांचा आज स्मृतिदिन. त्यांनी हिंदी कथा लेखनात नवा प्रवाह आणला. त्यांच्या मैला आंचल, परिती कथा, ऋणजल धनजल आदी कथासंग्रह, कादंबऱ्या खूप गाजल्या. दुसऱ्या जगण्याचा आदर्श घालून देणारी ‘रसूल मिस्त्री’ ही १९४६ मधे प्रसिद्ध झालेली त्यांची कथा तर आजही तितकीच समकालीन आहे. 

मराठीमधे भाषांतरासाठी वाहून घेत मायमावशी हे नियतकालिक काम करतंय. या नियतकालिकाच्या सप्टेंबर २०१८ मधे आलेल्या पावसाळा विशेषांकात रसूल मिस्त्री या कथेचा अनुवादित भाग प्रसिद्ध झाला. गोरख थोरात यांनी ही कथा अनुवादित केलीय.

 

या लहानश्या खेडवळ शहरात अल्पावधीत खूपच बदल झालाय. अपेक्षेपेक्षा किंवा गरजेपेक्षाही जास्त. शाळा आणि वसतीगृहाची भव्य इमारत पाहून कोणाचा विश्‍वासही बसणार नाही की, आठ वर्षांपूर्वी इथले बहुतेक वर्ग हे पिंपळाच्या झाडाखाली भरत होते आणि पावसाळ्यात वसतिगृहाचे विद्यार्थी पाण्यातच रात्र काढत. संपूर्ण शहराचा केरकचरा जिथं फेकला जाई, तिथंच आज भव्य टाऊन हॉल उभा आहे. त्यातच क्लब आणि ग्रंथालय स्थापन झालंय. गफूरमियांचं चामड्याचं गोदाम आता ‘चित्र महाल’ झालंय.

एकेकाळी ह्या गल्लीतून जाताना भागी भंगीण देखील नाकावर पदर घ्यायची. आणि आज स्वच्छतेची आणि पावित्र्याची प्रत्यक्ष प्रतिमा असलेली मिस छायाही ह्या गल्लीतून जाताना मनातल्या मनात गुणगुणते - ‘हमको हैं प्यारी हमारी गलियाँ.’ खलीफा फरीदच्या खटखडाट करणार्‍या जुनाट सिंगर मशीनचे आणि त्याच्या कात्रीच्या कटकटीचे दिवस संपले. आता मॉडर्न कट-फिटच्या लत्तू मास्टरचा जमाना आलाय.

रेस्टॉरंट आणि चहाच्या टपर्‍या तर भाजीपाल्याच्या दुकानांपेक्षाही जास्त झाल्यात. चीनच्या युद्धामुळे महागाई असूनही नवीन नवीन योजना जाहीर होतात, फसतात. तरीही संपूर्ण शहराचा कायापालट झालाय.
पण, या रोडवरील जुन्या वडाच्या झाडा शेजारच्या रसूल मिस्त्रीच्या दुकानाला बदलत्या काळाचं वारं लागलं नाही. जुन्या वस्तूंच्या दुरुस्तीचं दुकान. त्यात काहीही बदल नाही. नेहमी फाटक्या सतरंजीवर बसलेला रसूल आणि त्याचा मुलगा रहीम दुरुस्तीच्या कामात मग्न त्यांच्या बसायच्या जागाही त्याच. दुरुस्तीसाठी आलेल्या वस्तू सायकलींची जुनी चाकं, ट्युब, सीटं, पायडलं, चेन, हँडल, ब्रेक, गॅसबत्त्या, स्टोव्ह, हार्मोनियम, ग्रामोफोन वगैरे वस्तू आसपास विखुरलेल्या. अवतीभवती अवजारं, लहान मोठे नटबोल्ट, एका जुनाटलाकडी पेटीत जवळ जवळ सगळ्या वस्तूंचे जुने सुटे भाग, छिन्‍नी, हातोडी, पान्हे, तुटक्या स्प्रिंगा इत्यादी.

हेही वाचाः नामवर सिंहः पण बोलावं तर लागेलच

शेजारीच एका लहानश्या कपाटात नव्या-जुन्या डिझाईनचे लहान मोठे बिघडलेले टाईमपीस, डनलॉप ट्यूबचे दोन तीन रिकामे डबे, लहान मोठ्या कितीतरी वस्तू, पण सगळ्या जुन्या आणि बिघडलेल्या. कपाटावर जुन्या ग्रामोफोनचा भोंगा पालथा पडलेला, भिंतीवर डनलॉप, गुडइयर आणि काही घड्याळ कंपन्यांची ३५, ३६ आणि ३८ सालांची जुनी कॅलेंडरं, मिस कज्जनचं एक फाटकं रंगीत चित्र, दोन घड्याळं - एकबिगर डायलचं आणि दुसरं बिगर पेन्डुलमचं. ह्या बिगर पेन्डुलमच्या घड्याळात न जाणे किती दिवसांपासून फक्‍त तीनच वाजताहेत. दुसरं घड्याळ आपल्या आत मधली यंत्रं दाखवतंय. त्याच्या स्प्रिंगजवळ कोळ्यानं जाळं विणलंय.

दुसरीकडं रहीम बसलेला. शांतपणे काम करतोय. पत्र्याच्या खुर्चीवर बसलेलं गिर्‍हाईक आपल्या बिघडलेल्या वस्तूची दुरुस्ती होताना पाहतंय. समोर वडाच्या झाडाच्या बुंध्याला रोज नव्या दुकानांच्या जाहिराती, औषधांची हँडबिलं, नॅशनल वॉर फ्रंटच्या घोषणा, सिनेमांच्या जाहिराती चिकटवलेल्या असतात, तिथं पत्र्याचा एक जुना बोर्ड लोंबकळतोय. त्यावर गिचमिड अक्षरात लिहिलंय : ‘रसूल मिसतरीः इथं दुरूस्ती होते.’

शिकल्यासवरल्या लोकांनी या साईनबोर्डवर खूप दिवस चर्चा केली, त्याची टिंगलटवाळी केली आणि रसूल मिस्त्रीला त्यात काही दुरुस्ती करायला सूचवलं. पण आजही तो बोर्ड तसाच लोंबकळतोय. होय, मध्यंतरी कोणा उनाडपोरानं खडूनं त्याच्यावर लिहिलं होतं : इथं माणसाचीही दुरुस्ती होते. पण रसूलला बहुतेक तेही पुसण्याची गरज वाटली नाही.

हेही वाचाः आपण कवी प्रदीपना विसरून चालणार नाही

रसूल मिस्त्री! मध्यम बांधा, कामगारासारखी देहयष्टी आणि टोकदार चेहर्‍यावर मूठभर काळीपांढरी दाढी. साठ वर्षं वयाची एकही खूण शरीरावर नाही. तरुणांनाही लाजवणारी चपळाई. साधेपणाचा पुतळा : जाड्याभरड्या कापडाची लुंगी आणि कुडता. पान, चहा आणि विडीचा भक्‍त. बिनकामाचं शांतपणे बसून राहाणं, हे त्याला माहितच नाही. गप्पीश्टही एकनंबर, पण आपली जबाबदारी कधी न विसरणारा. काम करता करता तो गप्पाही मारू शकतो.

‘ठुक्ठुक्ठुक्,  ठुक्ठुक्ठुक्’. 

‘तर आलं ना ध्यानात की, दोजख, बहिश्त, स्वर्ग, नरक सगळं इथंच असतं. चांगल्या वाईट कर्माची फळं इथंच भोगावी लागतात. आता रामचंदर बाबूचं उदाहरण घ्या ना, अरे रहीम! जरा तो पान्हा फेक.
रामचंदर बाबू, अरे बाबा लहान! हा लहाश पान्हा! तू तसाच राहिलास भो. 
रहीम! 

रसूल मिस्त्रीचा एकमेव सुपुत्र. सावळ्या रंगाचा, कमालीचा पितृभक्‍त आणि गरजेपेक्षाही अधिक नम्र. बापा समोर कधीही जास्त न बोलणारा. दोन चार माणसं काही काम घेऊन आली की, रहीमच्या सहिष्णुतेची परीक्षा सुरु. क्षुल्लक कारणावरूनही रसूलमियां भडकायचे.

दिवसभर कामात मग्न असूनही त्याला आळशी, कामचुकार, निष्काळजी आणि कधी कधी उडाणटप्पू अशी बिरूदं मिळायची. रसूल मियाची बडबड चालू असायची आणि हा मात्र शांतपणे समोरच्या माणसाला समजून सांगत असायचा - ‘याची ही स्प्रिंग तुटलीय आणि होल्डींग नट.’  पण इथंही रसूल मिया मध्ये तोंड खुपसायचा. ‘बघू काय झालंय. हूं, वा रे मिस्तरी! फक्‍त इसपिरिंग तुटलीय काय? ही मी नवी स्प्रिंग टाकून देतो, होल्डिंग नटही टाकून देतो, आता मशीन चालू करून रेकॉर्ड वाजवून दाखव बरं, तरंच मानेन मी की, झाला तू पक्‍का मिस्तरी! अरे घुबडा! बॅलेंस कसा नीट होईल, बॅलेंस!’ रहीमच्या ओठांवर ओशाळवाणं हसू यायचं आणि तो खाली पाहू लागायचा.

शहरापासून दोन मैल पूर्वेला एका लहानश्या वस्तीत मिस्त्रीचं घर. मिस्त्रीचे पूर्वज एकेकाळी खाऊन पिऊन सुखी शेतकरी, पण आज जमीन जुमल्याच्या नावानं फक्‍त तीन झोपड्या आणि गुराढोरांच्या नावानं काही शेळ्या नि कोंबड्या उरल्यात. आमदनी अशी की ज्यादिवशी दुकान बंद त्यादिवशी चूलही बंद. पण खर्च मात्र नवाबासारखा.

महिन्याचे तीसही दिवस कबाब-कलेजी आणि हलवा शेवया. मुलगा नि सून काय बोलणार. उरली म्हातारी, बिचारी तीही तिच्या तरुणपणापासून काटकसरीचे नि बचतीचे सगळे मार्ग चोखाळून दमलेली. रसूलमियांच्या उमरखैय्यामी तत्त्वज्ञानापुढे तिचा एकही युक्तिवाद टिकला नाही आणि रसूलनं कधी तिचं ऐकून घेतलंही नाही. तरीही ती बोलत असते. रहीमच्या हातात एखादी गाठोडी पाहिली की, लगेच विचारणार – ‘गाठोडीत काय आहे रे रहीमा?’

‘कलेजी आहे.’ रहीम तोंडातल्या तोंडात पुटपुटत म्हणायचा. 

किती आहे?  शेर भर? काय भाव? या अल्लाह! दोन रुपये शेर? जळ्ळी मेली जीभ! दोन रुपये शेर कलेजी? मी म्हणते रहीम, अल्लामिया तुला अक्‍कल कधी देणार? त्यांच्या अंगात तर खावडं रहीम! भूत शिरलंय, पण तुला तरी बोलायला तोंड दिलंय ना अल्लामियानं?’ म्हातारी कलेजी खायच्या सवयीला शिव्या देत बसायची आणि रहीम गुपचुप तिथून सटकायचा. 

हेही वाचाः एक अनुवाद नवराबायकोच्या `ट्युनिंग`चा

म्हातारीच्या मांडीवर बसलेला नातू गाठोडीकडं पुन्हा पुन्हा झेप घ्यायचा आणि म्हातारी त्याला पुन्हा पुन्हा थोपवायची, ‘हाय अल्ला, मला तर काहीच सुचत नाही.’ ती तासनतास बडबडत बसायची की, बाप-बेटा दोघांची बुद्धी भ्रष्ट झाली, जगाचं काही भानच नाही. खाण्यापिण्यापायी किती लोकांची बरबादी झाली आणि डोळ्यासमोरची अनेक उदाहरणं देऊन ती हे सिद्ध करायची की, असे चटावलेले लोक मरताना स्वत:च्या कफनासाठीसुद्धा पैसे शिल्लक ठेवीत नाहीत. नंतर ती आपल्याच नशिबाला दोष देत बसायची आणि त्याच वेळी रसूल मिया घरी येऊन धडकायचे. सगळ्यात अगोदर ते तिला फैलावर घ्यायचे की, अजून कलेजी अशीच पडून का? म्हातारी चेहरा पाडून गप्प बसायची.

रसूल मिया आत जाऊन कुडता काढून ठेवायचे आणि ओसरीत येऊन बसायचे. सून हुक्‍का आणून द्यायची आणि मग दोन वर्षांचा खोडकर नातू करीम आजीच्या मांडीवरून उतरून आजोबाच्या मांडीवर येऊन बसायचा आणि आजीकडं बोट दाखवून बोबड्या भाषेत तिची तक्रार करू लागायचा, ‘कतकती म्हताली कटकटी म्हातारी.’ बक्षीस म्हणून लेमनगोळी आणि बिस्किट मिळाल्यावर जोराजोरानं ओरडून आजीला चिडवायला लागायचा ‘हे कतकती म्हताली, कतकती म्हताली.’ रसूल मिया हुक्क्याचा झुरका घेत गंभीर होत जात आणि म्हणत, ‘मी म्हणतो रहीमची अम्मा, तुझी ही रोज-रोज कटकट करायची सवय जाणार कधी! जेव्हा पाहावं तेव्हा तेच, ऐकावं तेव्हा तेच. तुला काही हया, शरम.’

‘गप्प बसा, माझी शरम-हया काढताय,’ म्हातारीही भडकायची, ‘मला गप्प करणारा अजून जन्माला यायचाय.’ रसूल मियाही गरम व्हायचे, ‘शंभरदा नाही, हजारदा म्हणेन की, तू शरम-हया सगळं कोळून प्यालीस. तुला वाटतं, सगळ्यांनी उपाशी मरावं. आवडीनं एखादी वस्तू घरी आणावी, पण तुला कटकट केल्याशिवाय चैन कुठं?

‘कतकती म्हताली!’ बिस्किट खाता-खाता करीम खिदळत म्हणायचा. बिचार्‍या म्हातारीला रडू कोसळायचं, ‘अल्लातालानं आता मला उचलावं, कोणता दिवस पाहायसाठी जगू मी? ह्या घरात माझी औकात तरी काय, चांगलं सांगायला जावं तरी मीच बेशरम, मीच बेहया.’ सून कलेजीची गाठोडी घेऊन कलेजी चिरायला बसायची. 

रहीम आपल्या खोलीतून बाहेर निघून जायचा, म्हातारी बिचारी हुंदके देत असायची.

‘रसूलचाचा आहेत का घरात?’ बाहेरून कोणीतरी हाक मारायचं. 

‘कोण? फक्रुद्दीन! ये, आत ये. काय झालं रे?’ रसूलमिया हुक्क्याची नळी तोंडापासून दूर करून विचारायचे. 

‘चाचा, दुपारपासून रशीद आजारी पडलाय. औषधानंही काही फरक नाही. शरीर गार पडायला लागलंय.’ 

‘अरे मग दिवसभर कानात तेल घालून झोपला होतास का?’ रसूलमिया मधेच त्याचं बोलणं तोडत उठून उभे राहायचे. ‘चल, पाहू. घाबरू नको, काही होणार नाही, काहीतरी खाण्यात आलं असेल, बरा होईल,’ असं म्हणत आत जायचे. 

‘इस्मैला कसा आहे रे फक्रू?’ म्हातारी विचारायची. 

‘तुझ्या आशीर्वादानं आता चांगला आहे, चाची! पण तू अलीकडं तिकडं येतच नाहीस. इस्मैलाची आई म्हणत असते की, चाची रागावलीय की, काय?’ 

‘चल वेडा कुठला! रागावू कशाला? करीमपासून फुरसत मिळेल तेव्हा ना!’ 

रसूल मिया खिश्यात लहानमोठ्या बाटल्या कोंबून निघायचे, ‘चल.’ म्हातारी स्वत:शीच बोलायची, ‘जरा नीट बघा, औषध नसलं तर शहरातून मागवून घ्या.’

आजोबा गेल्यावर करीममिया हळूहळू आजीजवळ येऊन बसायचा आणि उगीच हसून तडजोडीसाठी लाडीगोडी लावायचा. आजीनं अर्ध्या बिस्किटावर तडजोड केली तर काहीच हरकत नाही.

‘चल दूर हो इथून सैताना! जा तुझ्या आज्याकडं. आला मोठा बिस्किट देऊन फूस लावायला. मी कटकटी म्हातारी काय?’ असं म्हणून रुसून बसायची. पण अशा वेळी काय करायचं असतं ते करीममियांला चांगल ठाऊक. बळेबळेच तो मांडीवर चढून आज्याची तक्रार करू लागायचा, ‘आजोबा फकत. आजोबा चताव.’ आजोबा फक्‍कड, आजोबा चटावलेला. 

हेही वाचाः प्रा. रंगनाथ तिवारीः साहित्यातली संस्कृती

आजीच्या ओठांमधे लपलेलं हसू तो ओळखायचा आणि विचित्र भाषेत हसून - बोलून आजीला खूश करू पाहायचा. त्याचा अर्थ असा असावा की, आजोबांशी तर बिस्किटांसाठी तात्पुरता तह झाला होता. पाहा, कसं आजोबांना फसवून बिस्किट मिळवलं, यालाच म्हणतात डावपेच.

कलेजी चिरता चिरता अम्मी डोळे वटारून म्हणायची, ‘अस्सं, आत्ता येतील तुझे आजोबा, मग तुझी सगळी हुशारी बाहेर काढतील.’ 

पण करीममियांला अम्मीचं बोलणं सहन कसं व्हावं? अम्मी तर घरातला सगळ्यात गरीब आणि तुच्छ प्राणी. करीम मियानं कधी तिची खुशामत केलीही नाही आणि कधी करणारही नाही. आणि तरी तिचं एवढं धाडस की, तिनं मला धमकी द्यावी? थोडा वेळ गंभीर होऊन बसल्यावर तो हसणार्‍या अम्मीला दरडवायचा, ‘गप बत आलानी म्हणजे गप्प बस अडाणी!’ 

‘येऊ दे तुझ्या आज्याला,’ अम्मी पुन्हा धमकी द्यायची. आता करीममियांला आणखी चेव चढायचा. आजीच्या मांडीवरून खाली यायचा आणि आसपास मारण्याजोग्या वस्तूचा शोध घेऊ लागायचा. जाड काठी उचलता आली नाही की, मग रिकाम्या हातानंच अम्मीवर हल्ला करायचा. केस धरून ओढायचा. मग अम्मी ओरडत म्हणायची, ‘सोड सैताना, सोड. नाही सांगणार आज्याला, सोड.’

आजी हसत हसत जाऊन त्याला धरायची. करीममियां आपल्या भाषेत धमकी द्यायचा, ‘फक्‍कड आजोबाला, अब्बाला आणि तुला हाणून मारून घरातून हाकलून देईन.’ 

आणि जर अम्मीनं तोंड वेडावलं की, पुन्हा लढाईच्या मैदानात उतरायचा प्रयत्न सुरू. पण आजी त्याला थोपवायची. मग दात ओठ खाऊन वटवट करून गप्प बसायचा. आजी आणि अम्मीला त्याचे हे नखरे कळतात. म्हातारी म्हणते, ‘आज दूध पिताना तुला रडवणार बघ हा - सांगून ठेवते.’

करीमनं अलीकडं एक नवाच प्रकार शोधून काढलाय. दूध पिताना तो वारंवार त्याचा वापर करतो. अम्मी किंचाळते, ‘अम्मा री!’ आणि आपल्या हुशारीवर आणि अम्मीच्या किंचाळण्यावर करीम खळखळून हसतो. 

सून सैपाकघरात कलेजी बनवत असायची. म्हातारी तिला आवाज देऊन म्हणायची, ‘हे बघ, खूप जास्त कडक करू नको, नाहीतर खाताना पुन्हा तो भांडण उकरून काढायचा.’ दोन तीन वेळा बाहेरून मिरची मसाल्याचा इशारा देऊन झाल्यावर ती स्वत:च सैपाकघरात जायची. करीमला सुनेच्या कडेवर देऊन म्हणायची, ‘याला खेळव. मी बघते कालवण.’ सून हसत हसत सैपाकघरातून बाहेर पडायची. रहीम गावातून चक्‍कर मारून आल्यावर आपल्या खोलीत येऊन बसायचा. मग नवरा, बायको आणि मुलगा, तिघं मिळून जुन्या जपानी ग्रामोफोनवर कमला झरियाचं गाणं ऐकण्यात तल्लीन व्हायचे, ‘अदा से आया करो पनघटपर, जब तकरहे जिगर में दम.’

हेही वाचाः दिल्लीत रंगलेल्या ट्रान्सजेंडर कवी संमेलनाची गोष्ट

रसूल मिया जेव्हा घरी यायचे, तेव्हा त्यांच्या हातात बसंती ताडीचं मडकं असायचं. अंगणात जेवणाच्या ताटाखाली चादरी अंथरल्या जायच्या. पेंगणारे करीममियांही उठायचे - ताटली, पातेलं आणि पेला आजोबाकडं नेले जायचे. तिघं जण मिळून मनसोक्‍त कलेजी-रोटी खायचे. मधेमधे ताडीही. म्हातारी जवळ बसून वाढत असायची. ‘वा, कालवण खूपच झकास झालंय.’ ऐकताच म्हातारी संतुष्ट व्हायची.

करीममियांही एखादा घोट घेऊन डुलायला लागायचे. मडक्यात उरलेली ताडी म्हातारीच्या हवाली करतांना रसूलमिया आदेश द्यायचे, ‘एक ग्लास उरली असेल, सूनबाईला दे. अलीकडं अगदीच वाळलीय ती. रोज एक ग्लास घेतला तर अंग भरून येईल. ताडी आहे, चेष्टा नाही. अरे हो, पण तू तर कधी घेतलीच नाही. तुला कसं कळणार?’

थोड्या वेळानं झोपड्यांमधे झोपेचं साम्राज्य पसरायचं. कधी कधी रसूलमियांला रात्री उठून एखाद्या कॉलवर जावं लागायचं आणि रात्रभर रोग्याजवळ बसून राहावं लागायचं.

सकाळी न्याहारी झाली की रसूलमियां निमूटपणे शहराकड निघायचे. रहीम दुपारचं जेवण घेऊन येईल. घरून निघतांना ते अगदी वेळेवर निघायचे, पण तरी रहीमच रोज जेवण घेऊन त्यांच्या आधी दुकानवर पोहोचायचा. घरून निघताच गावातलं लग्नकार्य, वादावादी, रोग, दवादारू, मृत्यू वगैरे संदर्भात सल्ला देत-घेत बारा वाजायचे. गावाबाहेर राहतोय म्हणून काय झालं? शेतकर्‍यांना शेतीवाडीच्या कामाच्या दोन गोष्टी सांगायला नकोत! असं कसं होईल? 

‘अरे महंगू, तुझं जत्रेतलं वासरू कुठंय? 

‘काय सांगू चाचा! आज दोन दिवस झाले, चाराही खात नाही नि पाणीही पीत नाही. काय झालं, देव जाणे.’ 

लगेच रसूल मिया मागं फिरायचे. वासराला पाहून, त्याच्या रोगाचं निदान करून काहीतरी जडीबुट्टी सांगायचे. एवढंच नाही तर कोणाच्या मळ्यात, कोणत्या झाडाच्या जवळपास ती जडीबुट्टी सापडेल, हेही सांगायचे किंवा स्वत: आणून द्यायचे. 

दुकानात पोहोचल्यावर जागेवर बसल्या- बसल्या स्वत:शीच बडबडायचे, ‘अरे! आजही खूपच उशीर झाला.’ मग रहीमच्या कामाकडंजरा काळजीपूर्वक पहात म्हणायचे, ‘बघू इकडं, दाखव. तोवर तू जरा भोलाचं घड्याळ बघ.’

हेही वाचाः आरपार जगणं मांडणाऱ्या गौरी देशपांडे

तुटक्या खुर्चीवर बसलेला माणूस विचारायचा की, हा भोला कोण? मग कामाबरोबर लगेच भोलाची कथा सुरु, ‘अहो, भोला, काँग्रेसी भोला. माहीत नाही? जेलमधेच बी.ए. केलं त्यानं. खूप हुशार मुलगा आहे भोला. हे बघा, तुमच्या घड्याळाचं हेअर इसप्रिंग इतकं तकलादू झालंय की, काय सांगू? म्हणूनच म्हणतात ना, महँगा रोये एकबार, सस्ता रोये बारबार. पण भोला आपल्या कामात अगदी वाघ. तसे खूप पोरं पाहिलीत मी, पण.’

ऐकणारा अनोळखी माणूस भोलाच्या लांबलचक कथेची प्रस्तावना ऐकूनच वैतागायचा, ‘अहो मियां, कोणत्या भोलाचं एवढं गुणगाण करताय तुम्ही? तो लांब लांब केसावाला?. 

‘तो नाही हो’, त्याचं बोलणं मधेच तोडत रसूल मिया म्हणायचे, ‘तो लांब केसांवाला पोरगा ना, तो अबनींदर. तोही भोलाचाच जोडीदार म्हणा. पण तो अगदी जगावेगळा पोरगा आहे. कवी आहे, कवी, कळलं? कविता लिहिण्यात अगदी वस्ताद. वरवर पाहता उनाड वाटतो, पण आहे अगदी गायीसारखा.’

‘अहो रसूलचाचा! जरा चला पाहू.’  एक गवळण रडत रडत येऊन उभी रहायची, ‘बघा ना रसूलचाचा, त्यानं माझं दुधाचं मडकं फोडलं, हात धरला, अंगाला झटला.?’ 

‘आँ! कोण? कोण?’ 

‘सतीश बाबूचा पोरगा.’ 

‘सतीश बाबूला नाही सांगितलंस जाऊन?’ 

‘सतीश बाबू उलटे माझ्यावरचं कावले. म्हणाले, चल निघ इथून हरामजादी.’ रसूलमियाच्या भुवया उंचावतात. काम सोडून त्यांची बडबडसुरु होते.

‘हे श्रीमंत लोक आहेत ना, सगळे एक नंबरचे चोर आहेत साले चोर. सुदामे, तू जा आणि जरा सौदागरसिंहला बोलावून आण.’  सुदामी गवळण डोळे पुसत निघून जाते पण इकडं रसूलमियांची बडबड चालूच – ‘पैशाची गुर्मी चढलीय, बाईच्या इज्जतीला हात घालतो? पाजी कुठला!’

‘अरे मिस्त्री, ह्या पोरींना कमी समजू नको तू. चांगल्या पोचलेल्या असतात ह्या. सांग बरं, अशा जानजवान पोरींनी शहरात येऊन दूध विकायचचं तरी कशाला.?’

‘गप बसा हो तुम्ही मालक! ही पोर माझ्या लेकीसारखी आहे. गावातल्या पोरी अगदी सरळ असतात, कळलं. तुमच्या शहरातल्या सारख्या नसतात. मी म्हणतो, दुधाच्या आमदनीवरच जे घर चालतं आणि जिथं ही पोर सोडून बाकी सगळे आजारी पडलेत, तिथं डॉक्टरला बोलवायला, दूध विकायला ह्या जानजवान पोरीनं नाही जायचं तर मग कोणी जायचं? बोला. आणि भल्या माणसाचं हेच लक्षण आहे का की, दुसर्‍याची लेकसून संकटात पाहून तिच्यावर बळजबरी करायची’ 

हेही वाचाः लेखक कवींनो, कळपात नका राहू, माणसांत मिसळा

सुदामी येऊन सांगते, ‘सौदागरकाका घरी नाहीत.’ रसूलमिया सुदामीबरोबर एकटेच निघतात. 

मग दिवस मावळतीला गेल्यावर ते परत येत आणि दुकानात प्रवेश करत – ‘बेट्याला येऊ दे गावात. एखाद्या दिवशी भर रस्त्यात नाही वाजवला तर रसूल नाव सांगणार नाही.’ नंतर दुकानात एका कोपर्‍यात बसलेल्या भाजीवाल्या बाईला विचारायचे, ‘काय गं अब्दुलची आई, आज अगदी सकाळी सकाळी?’ लगेच भाजीवाल्यांची टोळी तुटून पडायची, ‘कवापासून बसलोय इथं, जरा हिशोब करून दे ना बाबा’

‘थांबा. थांबा. एकेकीनं या. हा, तुझी कारले किती होती हमीदन?. तेरा शेर. काय भावानं विकले? चार आणे?  हा, तेरा चोक बावन. बावन आणे म्हणजे सव्वा तीन रुपये. बघू पैशे?. हां, बरोबर आहेत. बरं, तुझे पडवळ?. ए बाबा, तिकडं रहीमला दाखव, मी आता कामात आहे, दिसत नाही का?’

हिशोब आणि खरे-खोटे पैशे बघता बघता संध्याकाळ होते. रहीम काम बंद करायची तयारी करतो. ‘अरे यांनाही बरोबर घेऊन जा रहीम, संध्याकाळ झाली ना. मी जरा तिकडून चक्‍कर मारून येतो.’ भाजीवाल्यांच्या टोळीबरोबर रहीम निघतो. भाजीवाल्या बायका धेनू सावकाराच्या दुकानात जाऊन दोन पैशांची जिलेबी आणि शंकरपाळे घ्यायला तासभर लावतात आणि रहीम रस्त्यावर उभा. निमूटपणे सगळ्यांची वाट पाहत.

रसूल मिस्त्रीकडं वस्तू अगदी खात्रीशीरपणे दुरुस्त होते. सगळ्यांना वाटतं की, रसूलमियांकडेच आपली बिघडलेली वस्तू नीट व्हावी. पण तो दुकानात ठाण मांडून बसतोय कुठं आणि कधी बसलाच तरी अर्धवट काम मुलाच्या माथी मारून कुठंही निघून जातो. हिच लोकांची तक्रार आहे. तो माणूस सच्चा असल्यामुळं स्पष्ट बोलतो. म्हणूनच गिर्‍हाईकं कमी येतात त्याच्याकडे. तो रघू, पूर्वी रसूलमियांकडंच कामाला होता, आता स्वत:चं दुकान थाटून मालामाल झालाय. पण रसूलमियांची दुनिया आजही होती तशीच आहे.

दहा अकरा वर्षांपूर्वीची गोष्ट. स्टोव्ह नीट करायला मी रसूलकडं गेलो. तो स्टोव्ह खोलून बघतच होता की, तेवढ्यात एका मध्यम वयाच्या खेडूतानं येऊन रडक्या आवाजात सांगितलं, ‘दागिने देत नाही तो. म्हणतो की, आधी व्याज दे.’ 

ऐकताच रसूल मिया हातातलं काम टाकून उभे राहिले. मी हटकलं, ‘अहो, माझा स्टोव्ह!’ 

‘उद्या होईल.’ 

मग मी स्टोव्ह परत घेऊन जातो. मीही जरा चिडून म्हटलं. ‘जा, घेऊन जा!’- रसूलंही खडसावून उत्तर दिलं, ‘इथं माणसाला इज्जतीचं पडलंय आणि दुसर्‍याला कामाचं. बिचार्‍याच्या लेकीचा आज रात्री गौना आहे. दागिने गहाण पडलेत. सावकार द्यायला तयार नाही.’

मी मनातल्या मनात प्रतिज्ञा करून स्टोव्ह घरी घेऊन आलो की, याच्या दुकानात पुन्हा कधी पाय ठेवायचा नाही आणि मित्रांनाही येऊ द्यायचं नाही.

पण आज रसूल मियाला मी चांगलं ओळखलंय. लहानपणीच्या त्या प्रतिज्ञेचं आजही मला वाईट वाटतंय. सायकल दुरुस्तीसाठी दिलीय. पंधरा दिवसांनी आलोय, पण रसूलमियांची भेट होत नाही. रहीम म्हणतो, तेच नीट करू शकतील. एखाद्या दिवशी योगायोगाने भेट होते, पण पाहातो तर त्यांच्या खांद्यावर सायकल दुरुस्तीपेक्षाही मोठं काम. ‘गरीब स्त्रियांना कपडे घेऊन द्यायचे आहेत. बिचार्‍या सात दिवसांपासून हेलपाटे मारताहेत. दमछाक करीत गर्दीत रांगेत उभं राहूनही रिकाम्या हातानं परत येतात त्या.’ 

एखाद्या दिवशी कानावर येतं, गावात मलेरियानं थैमान घातलंय, कोयनेल मिळत नाही, म्हणून मिस्त्री अनेक जडीबुट्टींचा काढा करून आज गावात वाटताहेत.
रोज निमूटपणे परत येतो आणि वडाच्या झाडाच्या बुंध्याला लोंबकळणारा बोर्ड पुन्हा वाचतोः रसूल मिसतरी - इथं दुरूस्ती होते. कोणा टारगटपोरानं खडूनं जे लिहिलंय - इथं माणसाचीही दुरूस्ती होते. मनातल्या मनात कौतुक करूनही मी हे विसरून जातो की, सायकल न मिळाल्यामुळे आपल्याला खूप त्रास होतोय.

हेही वाचाः ...तर मी नक्कीच नोबेल स्वीकारला असता

(मायमावशी अंकासाठी संपर्कः सुरेश कराळे ९०७६२८२३९२)