ट्रम्प यांचं एअर फोर्स वन विमान म्हणजे उडतं व्हाईट हाऊसच!

२० फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात आणणाऱ्या एअर फोर्स वन या विमानाची सध्या जोरदार चर्चा सुरूय. उडतं ‘व्हाईट हाऊस’ असं या विमानाला म्हणलं जातं. राहण्यासाठी जागा, ऑफीस, कॉन्फरन्स रूम अशा अनेक सुखसुविधा या विमानात आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जय्यत व्यवस्थाही आहे. त्यामुळेच अनेक राष्ट्राध्यक्षांचे जीव वाचवण्याचं काम या विमानाने केलंय.

गुजरातमधे सध्या मोठी धामधूम सुरूय. रस्ते वगैरे साफ केले जातायत, उघड्या कचऱ्या पेट्या वगैरे झाकण्याचं काम सुरूय. इतकंच नाही, तर मोठ मोठ्याला भिंती बांधून अहमदाबादमधल्या झोपडपट्ट्या झाकण्याचीही व्यवस्था केलीय. कशासाठी ते कळलंच असेल! अवघ्या ४ दिवसांनी म्हणजे २४ फेब्रुवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची बायको मेलेनिया ट्रम्प गुजरातच्या अहमदाबाद शहरात येणार आहेत. ट्रम्प दाम्पत्याच्या तीन तासाच्या गुजरात दौऱ्यासाठी फार नाही पण जवळपास १०० कोटींचा खर्च केला जातोय.

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणजे फारच मोठा माणूस. एवढ्या मोठ्या माणसाची बडदास्त ठेवायलाच हवी. त्यांच्या बडदास्तीसाठी एका खास गाडीचंही आगमन झालय. बुलेटप्रुफ, बॉम्बप्रुफ अशा या गाडीच्या छतावर हेलिकॉप्टरही उतरवता येतं. ‘द बीस्ट’ असं या कारचं नाव असून खास ट्रम्प यांच्या संरक्षणासाठी अमेरिकेनं भारतात पाठवलीय. सध्या या कारसोबतच आणखी एका गोष्टीची चर्चा चालूय. ती गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे ज्या विमानाने भारतात येतायत ते ‘एअर फोर्स वन’ हे विमान!

हेही वाचा : अमेरिकेच्या हल्ल्यात कासिम सुलेमानींच्या मृत्यूने तिसरं महायुद्ध होणार?

हे तर हवेतलं ‘व्हाईट हाऊस’!

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाला ‘व्हाईट हाऊस’ असं म्हणतात. हा ६ मजल्यांचा पांढरा शुभ्र बंगला आहे. या व्हाईट हाऊसच्या वेबसाईटवर एअर फोर्स वन या विमानाची इत्यंभूत माहिती देण्यात आलीय. या माहितीनुसार, एअर फोर्स वन हे खरंतर एका विमानाचं नाव नाही. ती एक रेडिओ सिग्नल यंत्रणा आहे असं आपण म्हणून शकतो. राष्ट्राध्यक्षांची ने आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अमेरिकन एअर फोर्समधल्या विमानासाठी रेडिओ यंत्रणा वापरली जाते. तिला एअर फोर्स वन म्हणतात. आता ती यंत्रणा असलेल्या विमानालाही एअर फोर्स वन असंच म्हटलं जातं.

हे विमान म्हणजे फारच भन्नाट गोष्टय! एबीसी वर्ल्ड न्यूजच्या एका वीडिओत हे विमान आतून कसं असतं हे दाखवण्यात आलंय. सामान्य विमानांसारखं इकॉनॉमी आणि बिझनेस क्लासच्या चेअर्स, एअरहॉस्टेस, सहप्रवासी वगैरे असली भानगड या विमानात नसते. ही विमानं राष्ट्राध्यक्षांसाठी खास कस्टमाइज्ड केलेली असतात. राष्ट्राध्यक्षांना बसण्यासाठी, काम करण्यासाठी प्रशस्त ऑफीस, बाहेरचं विहंगमय दृश्य बघण्याची छानसी जागा असं बरंच काही आहे.

विमानातली जागा आहे ४००० स्व्केअर फीट. त्यात राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या सोबतीला असणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी क्वार्टर असतात. एक मोठं ऑफीस, कॉन्फरन्स रूम, एकावेळी १०० माणसांचं जेवण शिजू शकेल अशी दोन स्वयंपाकघरं, आंघोळ करण्यासाठी बाथरूम, अशाही सोयी या विमानात आहेत. 

पण राष्ट्राध्यक्षांना फक्त सुखसुविधा पुरवण्यासाठी याची निर्मिती झालीय असं अजिबात नाही. सुविधांसोबतच राष्ट्राध्यक्षांच्या संरक्षणासाठी काही खास टेक्नॉलॉजी या विमानात वापरण्यात आल्यात. म्हणूनच याला आकाशातलं ‘व्हाईट हाऊस’ म्हटलं जातं.

असा झाला विमानाचा जन्म

विकिपीडियावर दिलेल्या माहितीनुसार, साधारण १९३० च्या दशकात हवाई प्रवासाची सुरवात झाली. तेव्हा बोईंग या अमेरिकेतल्याच विमान बनवणाऱ्या कंपनीनं मॉडेल ३१४ नावानं एक खास विमान बनवलं. समुद्रात असणाऱ्या व्हेल माशासारखं त्याचं डिझाईन होतं. पण हे विमान व्यावसायिक कारणासाठी वापरलं जाई. १९४३ मधे अमेरिकेचे तत्त्कालिन राष्ट्राध्यक्ष फ्रेंकलिन रूजवेल्ट हे ब्रिटीश राष्ट्राध्यक्ष विस्टन चर्चिल यांची भेट घ्यायला या विमानात बसून गेले होते. अमेरिकेच्या कुणा राष्ट्राध्यक्षानं विमानात बसून फॉरेन ट्रीप करायची ही पहिलीच वेळ होती.   

पण आपल्या राष्ट्राध्यक्ष्यांनी एका व्यावसायिक विमानातून प्रवास करणं सेफ नाही, असं अमेरिकेच्या हवाई दलाला वाटलं. त्यासाठी काहीतरी खास सोय केली पाहिजे. त्यासाठी बोईंग कंपनीलाच एका खास विमानाची ऑर्डर देण्यात आली. हे विमान म्हणजे अमेरिकेचं पहिलं एअर फोर्स विमान होतं, असं म्हणता येईल. फ्रेंकलिन रूजवेल्ट यांच्यासाठी हे विमान वापरलं गेलं.

त्यानंतर झालेल्या अनेक राष्ट्राध्यक्षांसाठी या मॉडेलच्या जवळपास जाणारी विमानं बनवली जात होती. संशोधन होईल तसं प्रत्येक विमानासोबत काही सुविधा उपलब्ध करून दिल्या जात होत्या. आत्ता जे मॉडेल वापरलं जातं त्याचं पहिलं वर्जन १९६२ मधे जॉन केनेडी राष्ट्राध्यक्ष असताना आणलं गेलं होतं.

हेही वाचा : डॉन को पकडना चापलुसों को मुमकीन नही!

एअर फोर्सचं डिझाईन कुणी ठरवलं?

केनेडी यांच्यासाठी वापरलं गेलेलं हे विमान म्हणजे पहिलं बोईंग जेट विमान होतं. निळा आणि पांढरा असा त्याचा रंग आहे्. ‘युनायडेट स्टेस्ट ऑफ अमेरिका’ असं यावर लिहिलेलंय. शेपटीपाशी अमेरिकेचा झेंडा आहे. जगभरात या विमानाला एअर फोर्स वन अशी ओळख मिळाली. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आणि सुरक्षेसाठी लागणाऱ्या गोष्टींची यात अजूनही भर घातली जाते. आज एअर फोर्स वनचं प्रत्येक विमान हे या डिझाईनचं दिसतं. पण हे डिझाईन मिळण्यामागची गोष्ट मात्र खूप मजेशीर आहे.

बोईंग कंपनी हे विमान बनवत होती. त्यामुळेच सहाजिकच त्याचं डिझाईन करण्याची जवाबदारी कंपनीच्या डिझायनर्सकडे होती. त्यांनी लाल आणि केशरी रंगाचं कॉम्बिनेशन करण्याचा प्रस्ताव केनेडी यांच्यापुढे ठेवला. पण सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानाला नजरेत लगेच भरेल असा भडक रंग वापरणं योग्य नव्हतं.

ही गोष्ट प्रसिद्ध इंडस्ट्रिअल डिझायनर रेमंड लोवी यांच्या लक्षात आली. 'कोकाकोला'च्या लोगोचे डिझाईनर म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. बोईंग कंपनीने सांगितलेला रंग चांगला नाही असं ते व्हाईट हाऊसमधे काम करणाऱ्या कोणत्यातरी कर्मचाऱ्याला म्हणाले. त्या कर्मचाऱ्याने ही गोष्ट केनेडी अध्यक्षांच्या बायकोला जॅकलिन कॅनेडी यांना सांगितली. एवढ्या मोठ्या डिझायनरने टीका केलीय तर त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे असं जॅकलिन यांनी राष्ट्राध्यक्ष कॅनेडी यांना सांगितलं. 

त्यामुळे विमानाच्या डिझाईनची जबाबदारी रेमेंड लोवी यांच्याकडे आली. त्यांनी विमानासाठी निळा आणि पांढरा रंग निवडला. आणि अमेरिकेच्या ‘डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स’ म्हणजे स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर असलेल्या फॉण्टने विमानावर `युनायडेट स्टेस्ट ऑफ अमेरिका’ असं लिहिलं.

विमानाचंही स्वागत करूया

१९९३ ला याच एअर फोर्स वनमधून टेक्सस शहरात गेल्यावर केनेडी यांचा खून करण्यात आला. त्यांच्या खूनानंतर लगेचच उप राष्ट्राध्यक्ष लायडन जॉनसन यांनी राष्ट्राधक्ष पदाची शपथ घेतली ती देखील याच एअर फोर्स वन विमानात! पुढे या विमानाने केनेडी यांचा मृतदेह पुन्हा वॉशिंगटनला परत आणला गेला तोही याच विमानातून.

असा मोठा इतिहास या एअर फोर्स वन विमानाने बघितला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना सिरीयातून घेऊन जाताना अचानकपणे झालेला हल्ला या विमानाने झेलला होता. राष्ट्राध्यक्षांना त्यातून बाहेर काढण्याचं काम त्यानं केलं होतं. २००१ मधे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर हल्ला झाल्यावर तत्त्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांना सुखरूप ठेवण्याचं काम या विमानानं केलं होतं. अमेरिकनवासियांच्या दुःखात हे विमान सहभागी झालं होतं.

असं खास विमान आता भारतातल्या गुजरातच्या धावपट्टीवर धावेल. आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यातून उतरतील. तेव्हा राष्ट्राध्यक्षांसोबत त्या विमानाचंही स्वागत करायला भारतीय विसरणार नाहीत.

हेही वाचा : 

बराक ओबामांचं सध्या काय चालू आहे?

ट्रम्पतात्यांनी भारतासोबत खोटारडेपणा का केला?

क्युबन मिसाईल क्रायसिस : जगाला नवा जन्म देणारे तेरा दिवस

मोदींच्या स्टेजवर ट्रम्पतात्या आले, त्याचा देशाला काय फायदा झाला?