चेन्नईचे श्रीराम कृष्णन ट्विटरचे सीईओ होणार?

०५ नोव्हेंबर २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


इलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यावर त्यांची गाडी सुसाट चाललीय. सीईओ असलेल्या पराग अग्रवाल यांच्यासोबत अनेक कर्मचाऱ्यांना मस्कनी काढून टाकलंय. तसंच ट्विटरच्या बदलाचे संकेत देत अनेक महत्वाचे निर्णयही घेतलेत. सध्या ट्विटरच्या सीईओपदासाठी चेन्नईच्या श्रीराम कृष्णन यांची जोरदार चर्चा आहे. कृष्णन यांना सीईओ करण्यासाठी सोशल मीडियातून मस्कना गळ घातली जातेय.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरचा ताबा इलॉन मस्क यांच्याकडे आलाय. स्पेसएक्स या कंपनीचे संस्थापक असलेले मस्क आजच्या घडीला जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत झळकतायत. ट्विटरची मालकी त्यांच्याकडे येणार याची घोषणा झाल्यापासूनच ते यात नेमके काय बदल करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आता ट्विटर ताब्यात येताच त्यांनी निर्णयांचा सपाटा लावलाय.

मस्क यांनी ट्विटरमधे महत्त्वाचे बदल करत असतानाचा मोठ्या अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. इतकंच नाही तर ट्विटरच्या सगळ्याच संचालकांना त्यांनी घरचा रस्ता दाखवलाय. मस्क यांच्याशी दोन हात करू पाहणाऱ्या पराग अग्रवाल यांनाही कायमची रजा दिली गेलीय. त्यामुळे त्यांच्या जागी कोण येणार याची चर्चा होतेय. त्यात चेन्नईच्या श्रीराम कृष्णन यांचं नाव चर्चेत आहे.

एण्ट्री टेक्नॉलॉजीच्या जगात

श्रीराम कृष्णन हे गुंतवणूकदार आहेत. त्यांचा जन्म चेन्नईमधे झाला. तिथल्या प्रतिष्ठित अशा अण्णा युनिवर्सिटीच्या एसआरएम इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी माहिती तंत्रज्ञान विषयात पदवीचं शिक्षण घेतलं. २००१ ते २००५ या काळात शिक्षण पूर्ण करून श्रीराम अमेरिकेत गेले. तिथं मायक्रोसॉफ्ट कंपनी जॉईन केली. मायक्रोसॉफ्टच्या 'विज्युअल वीडियो' या कार्यक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती. तिथं त्यांनी तंत्रज्ञानातले वेगवेगळे प्रयोग केले.

मायक्रोसॉफ्टनंतर त्यांनी फेसबुकच्या 'फेसबुक ऑडियन्स नेटवर्क'साठी काम केलं. फेसबुकच्या मोबाईलवरच्या जाहिरातींचं श्रेय श्रीराम कृष्णन यांना दिलं जातं. इथं त्यांनी इतरही अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं. पुढे अमेरिकेतली कॅमेरा आणि सोशल मीडिया कंपनी असलेल्या स्नॅपचॅटसाठीही जाहिरातीसाठीचं नवं तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं. त्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म तयार केले.

स्नॅपनंतर श्रीराम कृष्णन यांची एण्ट्री ट्विटरमधे झाली.  ट्विटरच्या उत्पादन विभागामधे वरिष्ठ संचालक म्हणून  ते रुजू झाले. इथही त्यांचं वेगवेगळ्या प्रयोगांचं काम चालूच होतं. आपल्या तांत्रिक कौशल्य आणि भन्नाट आयडियांच्या जोरावर त्यांनी ट्विटरचे युजर्स वाढवले. त्यावेळी ट्विटरच्या युजर्समधे वार्षिक २० टक्क्यांची वाढ कृष्णन यांनी करून दाखवली. त्यामुळे आताच्या ट्विटर भरारीत त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे.

हेही वाचा: स्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ

इलॉन मस्क यांच्यासोबत भेट

अमेरिकेतली खाजगी गुंतवणूक कंपनी असलेल्या अँड्रीसेन होरोविटजमधे कृष्णन सध्या भागीदार आहेत. 'ए १६ झेड' या नावाने ही कंपनी ओळखली जाते. क्रिप्टो आणि वेब ३.० या तंत्रज्ञानातल्या एकूण २३ कंपन्यांमधे कृष्णननी आपल्याकडचा पैसा गुंतवलाय. त्यांची पत्नी आरती राममूर्ती याही स्वतः गुंतवणूकदार आहेत. आरती यांनीही याआधी मायक्रोसॉफ्ट, नेटफ्लिक्स, फेसबुकमधे काम केलंय.

२०२१ला 'क्लबहाऊस' या ऍपवर श्रीराम आणि आरती यांचा 'गुड टाइम शो' आला. नवनवे उद्यमशील स्टार्टअप, तंत्रज्ञान, फिटनेस आयडिया जगासमोर आणणं हा त्यामागचा महत्वाचा उद्देश होता. २०२२ला हा शो युट्यूबवरही आला. त्याला प्रसिद्धी मिळाली. यामधे फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग, लोकप्रिय गायक आणि गीतकार असलेल्या काल्विन हॅरिस, ए. आर. रेहमान, डिझायनर हिल्टन जॅसी अशा दिग्गज लोकांनी कृष्णन यांच्या शोमधे हजेरी लावली होती.

इलॉन मस्क आणि कृष्णन यांची पहिली भेट स्पेसएक्सच्या कॅलिफोर्निया इथल्या कार्यालयात झाली होती. त्याचवेळी मस्क यांनी कृष्णन यांच्याकडच्या आयडिया हेरल्या होत्या. कृष्णन यांनीही मस्कना आपल्या 'गुड टाइम शो'चं निमंत्रण दिलं होतं. ते स्वीकारत मस्क यांनी फेब्रुवारी २०२१ला या कार्यक्रमामधे हजेरी लावली.

ट्विटरचे सीईओ होणार?

इलॉन मस्क ट्विटरचा ताबा घेण्याच्या चर्चांना मध्यंतरी वेग आला होता. ही बातमी सगळीकडे पसरताच उलटसुलट चर्चाही चालू झाल्या. त्याआधीच ट्विटरमधल्या बदलांचे संकेत मस्क यांनी दिले होते. पण हे डिल होत असताना त्यात अनेक अडचणीही आल्या. ट्विटरच्या मॅनेजमेंट टीमशी मस्क यांचे खटके उडाले. त्यामुळे ट्विटरचा ताबा घेताच सीईओ पराग अग्रवाल आणि पॉलिसी हेड असलेल्या विजया गाडे यांना मस्कनी बाहेरचा रस्ता दाखवला.

ट्विटरची मालकी येताच मस्क यांची गाडी आता सुसाट चाललीय. त्यांनी ट्विटरचं संचालक मंडळही बरखास्त केलंय. असं म्हटलं जातंय की, ट्विटरच्या ब्लू टिकच्या वेरिफिकेशनसाठी पैसे आकारणी करणं ही कृष्णन यांचीच कल्पना असावी. २०१७ला कृष्णननी ट्विटर जॉईन केलं होतं. अवघ्या दोन वर्षांमधे त्यांनी ट्विटरला नवं डिझाइन देत त्यांचं रूप बदलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आता पराग अग्रवाल यांना ट्विटरमधून काढून टाकल्यावर त्यांच्या जागी श्रीराम कृष्णन यांच्या नावाची चर्चा होतेय.

कृष्णन यांनी मध्यंतरी एक ट्विट केलं होतं. आपण इलॉन मस्क यांची मदत करत असल्याचं या ट्विटमधे म्हटलं होतं. त्यामुळेच त्यांची नेमणूक ट्विटरच्या सीईओपदी होईल या चर्चांना अधिकच बळ मिळालंय. हा मुद्दा सोशल मीडियातूनही उचलला गेला. शार्क टॅंक इंडियाचे परीक्षक असलेल्या अनुपम मित्तलसारख्या उद्योगपतींनीही कृष्णनना ट्विटरचे सीईओ करण्याची मागणी लावून धरलीय. त्यामुळे येत्या काळात खरंच कृष्णनना अशी संधी मिळतेय का ते पहायला हवं.

हेही वाचा: 

ती १५ मिनिटं ठरवणार आपल्या चांद्रयानाचं भवितव्य

पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी

विज्ञानदिनी ना सीवी रमण यांचा जन्मदिन, ना स्मृतिदिन

चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता