मराठी साहित्यातल्या गटबाजीमुळे माणुसकी पराभूत होतेय!

१८ ऑक्टोबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


स्वातंत्र्यानंतर समाज एक होण्याऐवजी शंभर तुकड्यात विभागला गेला. साहित्यात तर तुमचं-आमचं अशी गटबाजी प्रचंड वाढली. या सगळ्यात कोण हरलं-जिंकलं हे महत्त्वाचं नसून, इथं माणुसकी पराभूत होते. माणसासाठी ही सगळ्यात लांछनास्पद गोष्ट आहे, असं मत ज्येष्ठ लेखक इंद्रजीत भालेराव यांनी नुकतंच व्यक्त केलंय. चंद्रपूरच्या सूर्यांश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातले त्यांचे महत्वाचे मुद्दे.

मला या संमेलनाच्या निमित्तानं एका महत्त्वाच्या गोष्टीची चर्चा करावीशी वाटते, ती आहे आपल्या वाङ्मयीन पर्यावरणाविषयीची. मराठीतला वाङ्मयव्यवहार निर्मळ असावा असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे. पण सध्याचं वातावरण तसं नाही, ही खेदाची गोष्ट आहे. पूर्वी काही मोजक्या साहित्य संस्था, मोजकी मासिकं आणि प्रकाशन संस्थाही मोजक्याच होत्या. तसं लिहिणारेही मोजकेच होते. त्यांच्या त्यांच्यात स्पर्धा आणि असूया असेलच. पण ती बाहेर फारशी दिसत नसेल. त्यामुळं लेखकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आदर्शवादी होता. सगळं काही मोजकं होतं. पण त्यातल्या चांगुलपणाची चर्चा मात्र अमाप व्हायची.

माझा धर्मच खराचा अट्टाहास

स्वातंत्र्यांनं सगळ्यांना कायदेशीर स्वातंत्र्य आणि हक्क दिले. सगळे समाज शिकू, लिहू लागले. वाचणारे वाढले, लिहिणारे वाढले, साहित्य संस्था वाढल्या, मासिकं वाढली, पुरस्कार वाढले आणि साहित्य संमेलनं, साहित्यिक उपक्रमही वाढले. स्पर्धा वाढली, भांडण वाढली आणि आराजकाची स्थिती निर्माण झाली. खरंतर स्वातंत्र्य तुम्हाला जसे हक्क देतं तसंच काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्याही देतं. पण आपण स्वातंत्र्य तेवढं घेतो आणि जबाबदाऱ्या नाकारतो.

दलित साहित्याच्या पहिल्या पिढीचं प्रस्थापित मान्यवर लेखकांनी खूप कौतुक केलं. त्यांना सन्मानानं शेजारी बसवलं. आपलं म्हटलं. त्यांचा विद्रोह मान्य केला. पुढं प्रस्थापित लेखकांची पुढची पिढी आणि दलित लेखकांचीही पुढची पिढी यांच्यातले ऋणानुबंध आधीच्या पिढीसारखे निर्मळ राहिले नाहीत. ते आता एकमेकांच्या स्पर्धेत आले. आधीच्या पिढीचं युद्ध वाङ्मयीन होतं. पुढं ते हातघाईवर आलं. यातून तुमचे तुम्ही आमचे आम्ही अशा वाटण्या झाल्या.

धर्मनिरपेक्षतेचं तत्व घटनेत घालणाऱ्या बाबासाहेबांचे अनुयायीही धर्मसापेक्ष झाले. माझा धर्म तेवढाच खरा म्हटलं की निरपेक्षतेचं तत्व नष्ट होतं. तिथून सापेक्षतेला सुरवात होते. रस्त्यावर येणाऱ्या सर्वच धर्माच्या स्पर्धेत बाबासाहेबांचाही धर्म रस्त्यावर आला आणि सर्वांनाच वाटायला लागलं, बराय आपला गावचा गोठा. इथं कुणी कुणाचा पराभव केला, हा विषय महत्त्वाचा नाही. अशावेळी माणुसकी पराभूत होते आणि माणसासाठी ही सगळ्यात लांछनास्पद गोष्ट असते, असं मला वाटतं.

हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

वाङ्मयाचे निकष राजकीय झाले

दलित लेखकांच्या पहिल्या पिढीत सर्व जाती धर्माचे लेखक होते. त्या साहित्याची दलित लेखक म्हणून सन्मानाने चर्चाही होत होती. हळूहळू ते आपले नाहीत, अशी कुजबुज सुरू झाली. त्यातून सवर्ण बाजूला पडले. पण अववर्णापैकीही बौद्धेतर आपले नाहीत अशीही चर्चा सुरू झाली.

प्रातिनिधीक संपादनातून त्यांची नावं गळू लागली. दलित साहित्याची व्याख्या जसजशी काटेकोर होत गेली, तसतशी ज्यांना काटे टोचू लागले त्यांनी वेगळी वाट धरली. मग जातीवर झालेल्या चिरफाळ्या फारच बारीक होत आहेत म्हटल्यावर काही जाती वर्णावर एकवटल्या आणि त्यांनी आपले समूह मोठे करून दबाव गट निर्माण केले.

राजकारणातले दबाव गट साहित्यात आले, त्याबरोबरच वाङ्मयाचे निकषही राजकीय रूपात बदलले गेले. इथूनच साहित्यात अराजक सुरू झालं. स्वातंत्र्यानंतर समाज एकमय होण्याऐवजी शतखंडित झाला.

प्रतिभावंताचं लक्ष कुणीकडे?

अशावेळी नव्याने लिहिणाऱ्यांना कुणाच्यातरी पालखीचे भोई झाल्याशिवाय दिंडीत प्रवेश मिळेनासा झाला. सगळ्याच दिंड्या साहित्य पंढरीच्या रस्त्यानं निघालेल्या असल्या तरी फडकऱ्यांनी आपापले नियम काटेकोर केल्यामुळे एकाच रस्त्यानं जाणाऱ्या या दिंड्यांचे क्रम ठरले, महंत ठरले, नियम ठरले. आणि विशाल साहित्यदिंडी तयार होण्याऐवजी शतखंडित दिंड्या तयार झाल्या.

पालखीचे भोई मात्र आपापल्या दिंडी पुरतेच मर्यादित राहिले. अख्या मराठी विश्वाचा कवी होण्याऐवजी ते मर्यादित विश्वाचे कवी होऊ लागले. खऱ्या भक्तांमध्ये जेव्हा अराजक सुरू होतं तेव्हा खोटे भक्त याचा फायदा उठवतात. पुन्हा एकदा बडवेच शिरजोर होतात.

हे सगळं जे होतं ते कशासाठी? मान-मरातब, पदक-पुरस्कार, अध्यक्षपद याच्यासाठीच ना? खरंतर ज्यांच्याकडे खरीखुरी प्रतिभा असते, ते या कशातच पडत नाहीत. ते आपल्या भावविश्वात रममाण असतात. निसर्गानं तुम्हाला प्रतिभा दिली, तो तुमचा सगळ्यात मोठा सन्मान असतो. त्यापुढे स्वागत-सत्कार, मान-सन्मान, हार-तुरे, पद-पुरस्कार ह्या सगळ्याच गोष्टी इतक्या तुच्छ असतात की खऱ्या प्रतिभावंताचं तिकडं लक्षही नसतं. आपण भले आणि आपलं लेखन भलं, यातच त्यांना खरा आनंद वाटत असतो.

इतक्या भाषांमधे, इतक्या लेखक-कवींनी, इतकं लिहून ठेवलेलं आहे, की माणसानं आपली कितीही आयुष्य खर्चीली तरी त्यासाठी पुरणार नाहीत. त्यामुळे आपण आपलं वाचत बसावं. बोलावलंच कुणी तर आनंदानं जावं. नाहीच बोलावलं तर त्यापेक्षाही जास्त आनंदानं वाचत लिहीत बसावं.

हेही वाचा: ‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

वर्तमान लेखक, कवींचा कोतेपणा

साहित्यानं माणसं जोडण्याचं आणि समाज घडवण्याचं काम करावं, हे सगळ्यांनाच मान्य असतं. पण तसं होताना दिसत नाही. छोट्या छोट्या कारणासाठी कवी, लेखक एकमेकांवर धावून जातात. शब्दांचा दुरुपयोग करतात. त्यांच्याकडून समाजानं काय अपेक्षा कराव्यात? जगातल्या सगळ्याच गोष्टी आपणाला आवडतील असं नाही. जे पटत नाही, आवडत नाही ते टाळून जगता येतं. आपली स्पर्धा आपली इर्षा कुणाबाबतही नसावी. साहित्यातून काही महत्त्वाकांक्षा अपेक्षित करणं इथूनच आपण चुकायला सुरवात करतो.

साहित्यातून प्रबोधन करताना कुणाला खलनायक ठरवण्याची गरज नसते. त्यातून आपण उलटा परिणाम साधत असतो. अशामुळे खळांची व्यंकटी संपत तर नाहीच उलट ती वाढत जाते. वास्तव न लपवताही आपणाला सामोपचार साधता येतो. कबीर विद्रोही होते पण त्यांचं कुणाशी वैयक्तिक वैर नव्हतं. फुले किती विद्रोही होते पण त्यांचंही कुणाशी वैयक्तिक वैर नव्हतं. हे आपण समजून घेतलं पाहिजे.

वर्तमान लेखक, कवींमधे खुलेपणा, दिलदारपणा राहिलेला नाही. वेगवेगळी निमित्ये आणि कारणं पुढे करून कोतेपणालाच प्रतिष्ठा प्राप्त करून दिली जाते. कधी साहित्याच्या दर्जाचं निमित्त केलं जातं,कधी विचारांची बांधिलकी पुढं केली जाते, कधी कुणी जाणून-बुजून निरपेक्ष राहणार असेल तर त्याला कुणीकडे तरी ओढलं जातं किंवा ढकललं जातं.

तत्त्वाच्या गप्पा मारत वचावचा भांडणाऱ्यांच्या भांडणापाठीमागं निव्वळ स्वार्थ उभा असल्याचं दिसतं. प्रसिद्धी, पुरस्कार, अभ्यासक्रम, लोकमान्यता असल्या शूद्र गोष्टीसाठी गट तयार करून खुन्नस धरले जातात. सूड उगवला जातो. बिभत्स राजकारणही केलं जातं. राजकारण्यांपेक्षा जास्त किळसवाणा प्रकार केला जातो. खरं तर खुल्या मनानं, दिलदारपणे एकमेकांकडं पाहता यावं. सगळ्यांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा.

पसायदानाताला चांगुलपणा पसवूयात

भोवतीच्या वाङ्मयव्यवहारानं मी व्यथित आहे, म्हणून त्याचं थोडंफार आकलन मांडण्याचा मी प्रयत्न केला. त्यात माझं आकलन काही चुकलं असेल तर आपण दुरुस्त करावं. पण आपण सगळे एकत्रित राहूयात. सगळे सगळ्यांना कवेत घेऊयात. पसायदान आपणाला कितीही भाबडं वाटलं तरी ते निदान सामोपचाराचा एक आदर्श आपल्यासमोर ठेवतं. त्याचं आपण आचरण करूयात.

या सुर्यांश साहित्य संमेलनाच्या संयोजनात मला पसायदानातलं चांगुलगुण दिसलं. सगळ्यांना कवेत घेण्याची क्षमता दिसली. आपण आपल्या संस्थेचं नावच सूर्यांश असं ठेवलंय. सूर्याचा अंश म्हणजे प्रकाश. प्रकाश म्हणजे सत्य. आपला वारसा प्रकाशाचा, सत्याचा आहे. आपण तो सर्वांना वाटूयात, पसरवूयात, वाढवूयात. त्या विश्वात्मक देवाचा अंश होऊयात.

हेही वाचा: 

मुलांना कोडिंगचं शिक्षण द्यावं का?

भल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी

आपलं सोशल मीडिया अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून

डिसले गुरुजींकडून आपली शिक्षणव्यवस्था काय शिकणार?

बहिरं व्हायचं नसेल तर डब्ल्यूएचओचा कानमंत्र आताच ऐकायला हवा