नमस्ते ट्रम्पसाठी सजलेलं मोटेरा क्रिकेट स्टेडिअम आतून दिसतं तरी कसं?

२२ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष २४ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. आपल्या दोस्ताच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सारी प्रतिष्ठा लावलीय. अजूनही एकही मॅच न झालेलं अहमदाबादमधलं जगातलं सर्वांत मोठं सरदार वल्लभभाई पटेल मोटेरा स्टेडिअम नमस्ते ट्रम्प इवेंटसाठी सज्ज झालंय. या स्टेडिअमची वस्तुनिष्ठ माहिती देणारा हा रिपोर्ट.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जंगी स्वागतासाठी गुजरातच्या अहमदाबादमधलं ‘सरदार वल्लभभाई पटेल मोटेरा स्टेडियम’ नटून थटून सज्ज झालंय. जगातलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असा लौकिक असलेल्या या स्टेडिअमवर अजून एकही मॅच खेळली गेली नाही. त्याआधीच ट्रम्प यांच्या सभेनं या स्टेडिअमचं एका अर्थाने उद्घाटन होतंय.

जवळपास १ लाख १० हजार प्रेक्षक सामावून घेण्याची क्षमता असणाऱ्या या भव्य स्टेडियमला उद्घाटनानंतर जगातलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियमचा मान मिळेल. अर्थात हा दर्जा मिळवण्यासाठी स्टेडियमच्या उद्घाटनानंतर त्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच खेळवण्याची औपचारिकताही पूर्ण व्हावी लागणार आहे.

हेही वाचाः टी२० महिला क्रिकेट वर्ल्डकपमधे भारताची सारी भिस्त या पाच जणींवर

नरेंद्र मोदी करतील उद्घाटन

सध्या ऑस्ट्रेलियातलं मेलबर्न क्रिकेट स्टेडियम हे जगातलं सगळ्यात मोठं स्टेडियम म्हणून ओळखलं जातं. १८५३ मधे हे स्टेडियम बांधण्यात आलंय. एकावेळी ९० हजार प्रेक्षक यात बसू शकतात. जागतिक क्रिकेटच्या इतिहासातली पहिली टेस्ट मॅच १८७७ मधे मेलबर्नच्या याच स्टेडियमवर झाली होती. शिवाय १९९२ आणि २०१५ ची वर्ल्डकप फायनलही या स्टेडियमनं पाहिलीय.

मेलबर्न स्टेडिअमचा जवळपास दीडेकशे वर्षांचा हा मान आता अहमदाबादेतल्या मोटेरा स्टेडिअमच्या नावावर नोंदला जाणार आहे. आतापर्यंत या स्टेडियमचं ९० टक्के काम पूर्ण झालंय. अमेरिकी राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘नमस्ते टम्प’ या कार्यक्रमातच स्टेडियमचं उद्घाटनही उरकून घेतलं जाणार आहे, असं आतापर्यंतच्या वेगवेगळ्या बातम्यांतून स्पष्ट झालंय.

पण अद्याप स्टेडियमच्या उद्घाटनाची कसलीही योजना नसल्याचं गुजरात क्रिकेट असोशिएशनचे उपाध्यक्ष परिमल नाथवानी यांचं म्हणणं आहे. काल २१ फेब्रुवारीला पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे नव्या स्टेडियमचं उद्घाटन ट्रम्प करणार या बातम्यांना आता पूर्णविराम लागलाय. पुढच्या काही दिवसांमधे पंतप्रधान नरेंद्र मोदीच स्टेडियमचं उद्घाटन करतील, असा अंदाज आता बांधला जातोय.

हेही वाचा : खरंच पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणं म्हणजे देशद्रोह आहे का?

स्टेडिअमचं अपडेटेड वर्जन

२०१३ मधे नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना या स्टेडियमच्या निर्मितीचा प्रस्ताव समोर आला होता. मोदी त्यावेळी गुजरात क्रिकेट असोशिएशन म्हणजेच जीसीएचेही अध्यक्ष होते. आता उभारण्यात आलेलं हे स्टेडियम काही पूर्णपणे नवं कोरं करकरीत नाही. इथल्या सरदार पटेल स्टेडियमचं हे एका अर्थाने अपडेटेड वर्जन आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या एका बातमीनुसार, या भव्य स्टेडियमच्या निर्मितीसाठी २०१५ पासून जीसीएकडून सरदार पटेल स्टेडियम बंद ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच २०१७ पासून स्टेडियमच्या निर्मितीचं काम सुरू झालं. ते आता तीन वर्षानंतर पूर्ण झालंय.

पूर्वीच्या स्टेडियमची क्षमता फक्त ४९ हजार प्रेक्षकांना सामावून घेण्याची होती. म्हणजेच नव्याने बनवण्यात आलेलं हे स्टेडियम पूर्वीपेक्षा दुप्पट मोठं आहे. सगळ्या आधुनिक सोयीसुविधा इथे आहेत. या स्टेडियमच्या निर्मितीवर जीसीएने जवळपास ७०० कोटी रुपये खर्च केलेत.

हेही वाचा : मोदींच्या स्टेजवर ट्रम्पतात्या आले, त्याचा देशाला काय फायदा झाला?

पावसानंतर अर्ध्या तासात स्टेडियम तयार

बीबीसी हिंदीच्या एका बातमीनुसार, हे स्टेडियम तब्बल ६३ एकर जमिनीवर पसरलंय. प्रेक्षकांसाठी बांधण्यात आलेल्या प्रत्येक स्टँडमधे स्वतंत्र फूड कोर्ट आणि हॉस्पिटॅलिटी एरिया आहे. स्टेडियममधेच इनडोअर क्रिकेट अकॅडमी आणि ५५ खोल्यांचं क्लब हाऊससुद्धा आहे. ११ वेगवेगळ्या प्रकारचे पिच आणि ४ ड्रेसिंग रूमही या स्टेडियममधे असतील.

पाऊस पडल्यानंतर मैदानातलं पाणी बाहेर काढून ग्राउंड वाळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेली व्यवस्था आहे. या टेक्नॉलॉजीमुळे अवघ्या अर्ध्या तासात ग्राउंड खेळण्यालायक बनवणं शक्य असल्याचा दावा केला जातोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच स्टेडियममधे ४० वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांच्या सरावाचीदेखील व्यवस्था असणार आहे.

स्टेडियमसाठी वापरण्यात आलेले एलइडी फ्लडलाईट म्हणजे मोठे पांढरे दिवे हॉलंडमधून मागवण्यात आलेत. भारतातल्या बहुतेक सगळ्याच स्टेडियममधे फ्लडलाईट असतात. साध्या मैदानावरच्या फ्लडलाईटसपेक्षा हे दिवे वेगळे असतील. स्टेडियमच्या बांधकामावेळी मात्र फ्लडलाईटची जागाही बदलण्यात आलीय. त्यामुळे कुठल्याही खेळाडूच्या चेहऱ्यावर फ्लडलाईटचं रिफ्लेक्शन येणार नाही याची काळजी घेतली जाईल.

हेही वाचा : ट्रम्प यांचं एअर फोर्स वन विमान म्हणजे उडतं व्हाईट हाऊसच!

 

यंदाची आयपीएल ‘मोटेरो’मधे

डे-नाईट मॅचमधे अनेकवेळा खेळाडूंना फ्लडलाईट डोळ्यावर चमकण्याचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय त्यामुळे बऱ्याचदा उंचावरचे कॅच सुटतात. स्टेडियममधे मात्र फ्लडलाईटची जागा बदलण्यात आल्याने हा त्रास कमी होण्यास मदत होईल, असं सांगण्यात येतंय.

ग्राउंड तयार असलं तरी थोड्याफार प्रमाणात स्टेडियमचं काम बाकी आहे. यंदा मे महिन्यात आयपीएलची फायनल मॅच या मोटेरा स्टेडियमवर खेळवण्यात येईल, अशी चर्चा सुरू होती. पण बीसीसीआयने मात्र ही गोष्ट फेटाळून लावली. 

स्टेडियम पूर्णपणे तयार झाल्यानंतर बीसीसीआयच्या एका टीमकडून मैदानाची पाहणी केली जाईल. त्यानंतरच या ग्राउंडवर मॅच आयोजित करण्यासंबंधी विचार करण्यात येईल, असं बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलंय. असं असलं तरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या जोरदार स्वागतासाठी हे मैदान सज्ज आहे.

हेही वाचा : 

डॉन को पकडना चापलुसों को मुमकीन नही!

ट्रम्पतात्यांनी भारतासोबत खोटारडेपणा का केला?

ऐन निवडणुकीत ट्रम्पतात्यांचा मोदींच्या धोरणाला झटका

टेस्ट मॅचेस चार दिवसांच्या, पण यात नक्की फायदा कुणाचा?

ट्रम्पतात्यांचा दोस्त नरेंद्र मोदींना शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी झटका