इंग्लंडच्या राजघराण्याची लक्तरं वेशीवर टांगणारा प्रिन्स!

१५ जानेवारी २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


इंग्लंडच्या राजघराण्यानं एकेकाळी अर्ध्याहून अधिक जगावर राज्य केलं. पण आता या राजघराण्यातला राजपुत्रच त्यांची लक्तरं वेशीवर टांगतोय. प्रिन्स हॅरीचं 'स्पेअर' हे आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं असून, ते खपाचे नवनवे विक्रम नोंदवतंय. अभिनेत्री मेघन मार्केलबरोबर संसार थाटल्यावर हॅरीनं लिहिेलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल चार लाख प्रती विकल्या गेल्या आहेत.

वंडरफूल! नाऊ यू हॅव गिवन मी एन हेअर अँड ए स्पेअर... माय वर्क इज डन!' अर्थात तू मला एक वारसदार दिला आहेस आणि एक 'राखीव'ही दिला आहेस, आता माझं काम झालं!... हे उद्‌गार होते ब्रिटनचे सध्याचे महाराज चार्ल्स तृतीय यांचे. प्रिन्स हॅरीचा जन्म झाला त्यावेळी त्यांनी तत्कालीन पत्नी आणि हॅरीची जन्मदात्री प्रिन्सेस डायना यांना उद्देशून हे उद्गार काढले होते.

हॅरीने आता जे आत्मचरित्र किंवा आपल्या आयुष्याच्या आठवणी लिहिल्या आहेत त्याचं नावही 'स्पेअर' असंच आहे. आपल्याकडे सुरवातीपासूनच एखाद्याची सावली, आधारभूत व्यक्‍ती किंवा 'प्लॅन बी' म्हणूनच पाहिलं गेलं असं त्याचं म्हणणं, 'काही तरी अघटित घडलं तर याचा उपयोग होईल', अशीच दृष्टी यामागे होती. थोरला भाऊ विल्यम हा राजसिंहासनाचा वारसदार होता आणि त्याचं काही बरंवाईट झालं तर कुणीतरी असावा म्हणून आपल्याकडे पाहिलं जात होतं, असं हॅरीने म्हटलंय.

पित्याने आईसमोर हे उद्गार काढले आणि ते आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी निघून गेले, असं सांगायलाही हॅरी या आत्मचरित्रात विसरला नाही. एकंदरीतच शाही कुटुंबापासून वेगळं होऊन अमेरिकेत आपल्या अभिनेत्री पत्नीबरोबर, मेघन मार्केलबरोबर संसार थाटल्यावर हॅरीने राजघराण्यावर सातत्याने जी टीकेची झोड उठवली आहे, ती या आत्मचरित्रातून अधिकच प्रकर्षाने पुढे आली आहे. त्यामुळेच की काय, हे पुस्तक प्रकाशित होताच त्याच्या प्रती हातोहात खपल्याही जात आहेत!

हॅरी-मेघनची चर्चा

हॅरी आणि मेघनने राजघराण्याच्या बंधनात राहण्याऐवजी तसंच नेहमीच विल्यम आणि त्याची पत्नी केटच्या मागे राहत 'स्पेअर' होण्याऐवजी आपली वेगळी वाट चोखाळण्याचा निर्णय घेतला होता. महाराणी एलिझाबेथ द्वितीय हयात असतानाच त्यांनी शाही घराण्याशी फारकत घेऊन अमेरिकेत स्थायिक होण्याचं ठरवलं होतं. 'आम्ही आर्थिकदृष्ट्याही स्वतंत्र होऊ इच्छितो', असं त्यांनी म्हटलं होतं. तसंच शाही घराण्याची बिरुदं, सुरक्षा, सोयी-सवलती झिडकारून देण्याचीही तयारी दर्शवली होती. दोन मुलांचे आई-वडिल बनलेलं हे दाम्पत्य आता अमेरिकेतल्या आपल्या नव्या संसारात चांगलंच रुळलंय.

त्यांचं आर्थिक उत्पन्न हे त्यांच्या मुलाखती आणि अशा खळबळजनक पुस्तकांमधूनच अधिक मिळत असावं असं म्हणायला वाव आहे. ऑप्रा विन्फ्रेने दोघांची घेतलेली मुलाखत खळबळजनक ठरली होती. त्यामधे मेघनला होणारं बाळ कोणत्या रंगाचे असेल याबाबत हेअर अँड स्पेअर राजघराण्यात शंका व्यक्‍त होत होती आणि एकंदरीतच वर्णभेदाचे अनुभव येत होते, असं मेघनने या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यानंतरच्या मुलाखती किंवा दोघांच्या डॉक्युमेंटरीतही राजघराण्यातले अनेक कटू अनुभव समोर आले.

हेही वाचा: मॅकडोनल्ड खाऊच्या ठेल्यापासून फास्टफूड इंडस्ट्रीचा बादशाह कसा बनला?

'स्पेअर'ला उदंड प्रतिसाद कारण...

विल्यम-केटच्या लग्नावेळी मी कधीही खर्‍या अर्थाने 'बेस्ट मॅन' नव्हतो, अशी आठवणही हॅरीने सांगितली आहे. विल्यम-केट आणि हॅरी अनेक वेळा एकत्र दिसत होते, पण 'श्री इज क्राऊड' असाच एकंदरीत विल्यमचा रोख होता असं हॅरीने म्हटलंय. वडील कॉमिला पार्करशी लग्न करत असताना आपण केलेला विरोधही त्याने सांगितला आहे. कॅमिला ही आई-वडलांच्या वैवाहिक जीवनातली 'तिसरी व्यक्‍ती', खलनायिका होती आणि ती धोकादायक आहे असं मतही त्याने उघडपणे नोंदवलं.

वडलांनी आपल्याला 'तू नक्की माझाच मुलगा आहेस का याची शंका वाटते', अशी बोचरी थट्टा केल्याचीही आठवण त्याने सांगितली आहे. मेघनबरोबरच्या बिवाहावेळी केटच्या मुलीच्या 'पोशाखावरून तिचा मेघनशी उडालेला खटकाही त्याला आवर्जून आठवतो. मेघनची राजघराण्यात झालेली घुसमट आणि तिच्या मनात आलेले आत्महत्येचे विचारही त्याने बोलून दाखवले आहेत.

विल्यमने तर मेघनवरून झालेल्या भांडणावेळी एकदा आपली कॉलर धरली, गळ्यातली चेन तोडली आणि जमिनीवर पाडलं होतं, असाही खळबळजनक दावा नव्या पुस्तकात केला. इंग्लंडच्या राजघराण्याकडून तिथल्या मीडियाला नेहमीच 'खाद्य' हवं असतं आणि एकंदरीतच आता हॅरी आणि मेघन ते भरभरून देत आहेत. अर्थात खुद्द ब्रिटनमधे हॅरी आणि मेघनकडे 'उपरे' म्हणूनच पाहिलं जातंय. तरीही त्यांच्याबद्दलचं कुतूहल 'शमलेलं नसून उलट वाढलेलंच असल्यामुळे हॅरीच्या 'स्पेअर'लाही उदंड प्रतिसाद मिळतोय.

राजघराण्याने दिलेले कटू अनुभव

प्रिन्सेस डायना यांनीही आपल्या हयातीत अन्याय सहन करत, राजघराण्याचा काटेरी मुकुट घालून जीवन जगणं पसंत केलं नव्हतं. कॉमिला पार्करशी असलेले संबंध त्यावेळेचे प्रिन्स आणि सध्याचे 'किंग' चार्ल्स यांनी सुरूच ठेवल्यामुळे डायना यांनी त्यांच्याशी रीतसर फारकत घेतली होती. त्यामुळे त्यांना सर्व शाही बिरुदंही बाजूला ठेवावी लागली आणि त्याची त्यांनी तमाही बाळगली नाही. या सोनेरी पिंजर्‍यातून बाहेर येऊन मोकळा श्‍वास घेण्याचं धाडस डायनाने दाखवलं, जगभर आपल्या समाजकार्याची व्याप्ती वाढवली होती. हॅरीनेही आता तेच केले आहे.

त्याची पत्नी मेघनवर ती हट्टी, उद्धट आणि अहंकारी असल्याचे आरोप केले जातात. हॉलीवूडमधली ही अभिनेत्री श्वेतवर्णीय वडील आणि कृष्णवर्णीय आईची कन्या आहे. तिच्यावर होणारे आरोप आणि प्रसंगी येणारे वर्णभेदाचेही प्रकार झेलत हॅरीने पत्नीला खंबीरपणे साथ दिलेली आहे. २०२० मध्ये दोघांनी राजघराण्याबाहेर पडून स्वतःची वेगळी वाट चोखाळली. 'ड्यूक ऑफ ससेक्स' आणि 'डचेस ऑफ ससेक्स' म्हणून मिरवण्यापेक्षा एक माणूस म्हणून समाजात वावरणं दोघांनाही अधिक चांगलं वाटलं.

आर्ची आणि लिलिबेट या दोन गोंडस अपत्यांसह दोघे अमेरिकेतल्या आपल्या संसारात खूश आहेत. पण राजघराण्याने दिलेले कटू अनुभव ते विसरू शकत नाहीत आणि जगालाच या राजघराण्याविषयी कुतूहल असल्याने ते हे अनुभव वेळोवेळी मुलाखती, डॉक्युमेंटरीमधून मांडतही आहेत. अर्थातच त्याचा त्यांना आर्थिक लाभही मिळत आहे.

हेही वाचा: विद्या सिन्हाचं मन सुंदर होतं म्हणून ती सुंदर होती

पुस्तकात भरपूर 'मसाला'

हॅरीला त्याच्या या ४१६ पानांच्या 'स्पेअर' नावाच्या आत्मचरित्रासाठीही पेंग्विन रँडम पब्लिशिंग हाऊसकडून १६४ कोटी रुपये मिळाले असल्याचं म्हटलं जातं. वेगवेगळ्या सोळा भाषांमधे प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची विक्रीही तडाखेबाज असून ती नवे नवे विक्रम नोंदवत आहे. 'स्पेअर' हे ब्रिटनमधलं सर्वाधिक वेगाने विकलं जाणारं नॉन-फिक्शन' पुस्तक ठरलंय.

१० जानेवारीला म्हणजेच प्रकाशनाच्या पहिल्याच दिवशी या पुस्तकाच्या ४ लाख प्रती विकल्या गेल्या. यामधे छापील पुस्तकांबरोबरच ई-बुक्स आणि ओंडिओ बुक्सचाही समावेश आहे. प्रिन्स  हॅरीच्याच आवाजात एक ऑडियोबुक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे हे विशेष! 'स्पेअर' घेण्यासाठी पुस्तकांच्या दुकानांवर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

३४ डॉलर्स म्हणजेच सुमारे २,५७८ रुपयांचं हे पुस्तक निम्म्या किमतीत उपलब्ध झाल्यानं वाचकांच्या उड्या पडल्या! एका बातमीनुसार 'पेंग्विन' ने प्रिन्स हॅरीबरोबर चार पुस्तकांचा करार केला आहे. 'स्पेअर' व्यतिरिक्त तो पत्नी मेघनसह आणखी एक पुस्तक लिहिणार आहे.

उर्वरित दोन पुस्तकांपैकी एक पुस्तक हे नेतृत्वाशी संबंधित आणि दुसरं मानव कल्याणाविषयीचं असेल. प्रिन्स हॅरीभोवती राजघराण्याचं वलय आहे आणि मेघनभोवती 'हॉलीवूडच्या स्टारपदाचं आणि आता ओघानेच आलेलं राजघराण्याचंही वलय आहे. त्यामुळे दोघांकडून भरपूर 'मसाला' मिळू शकतो, हे ताडल्याने अनेक मुलाखतकार, प्रकाशन संस्था किंवा सिनेनिमतिही त्यांच्या घराचे उंबरठे झिजवू शकतात, हे उघडच आहे.

तर बकिंघमचे दरवाजे बंद

हॅरीने त्याच्या 'स्पेअर'मधेही त्याची नवतारुण्यातली व्यसनं, लैंगिक संबंध यांच्यापासून ते अफगाणिस्तानात ब्रिटिश सैन्यामधे बजावलेल्या सेवेच्या अनुभवापर्यंत अनेक गोष्टी खुल्लमखुल्ला सांगितलेल्या आहेत. आपण अफगाणिस्तानात २५ तालिबान्यांना ठार केलं, असंही हॅरीने 'स्पेअर'मधे म्हटलंय. त्याची तालिबानने खिल्लीही उडवली आहे!

ब्रिटनमधल्या सुरक्षा तज्ज्ञांनी या 'गौप्यस्फोटा' मुळे त्यांची सुरक्षा अडचणीत येऊ शकते आणि तालिबानी त्याच्यामागे हात धुऊन लागू शकतात, असा इशारा दिला आहे. हॅरीला मात्र त्याची तमा नाही. अर्थात खुद्द ब्रिटिश लोकांना त्याच्या इतर गोष्टींपेक्षा राजघराण्याशी संबंधित गोष्टीतच अधिक रस आहे. पण सतत राजघराण्याची लक्तरं जगाच्या वेशीवर टांगण्याचंच काम हॅरी आणि मेघन करत राहिले तर बकिंघम पॅलेसचे दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद होतील, यात शंकाच नाही!

हेही वाचा: 

पर्यावरण दिनः संवेदनशील कृती करण्यासाठी पावलं उचलुया

फेसबुकचं व्यसन लावणाऱ्या मार्क झुकेरबर्गची प्रेरणादायी गोष्ट

रमजान ईद दिवशी अमर हबीब यांची वाचायला हवी अशी कथा