तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

०५ जून २०१९

वाचन वेळ : ८ मिनिटं


साहित्यात वेगळा ठसा उमटवणाऱ्या महेंद्र कदम यांच्या ‘धूळपावलं’ आणि ‘आगळ’ या दोन महत्त्वाच्या कादंबऱ्या. आता काही दिवसांतच लोकवाङ्मय गृहकडून त्यांची ‘तणस’ ही तिसरी कादंबरी येतेय. या कादंबरीतला हा संपादित अंश.

पुन्हा हे शहर आणि त्याचा झगमगाट. काळेकुट्ट पसरलेले रस्ते आणि त्यावरून वाहणारे दिवे. हॉर्नचे आवाज. अचानक ब्रेक दाबल्याचे आवाज. मधेच रस्त्यात मांजराचा झालेला चेंदामेंदा. ओवरटेकवाल्यांची धडपड. अशातनं रस्ता काढीत निघालेला दिनू. मधेच त्याला एक मोटरसायकलवाला आडवा आला. म्हणाला, दिसत नाय का भडव्या? का जीव वर आलाय? तुझा आला असला तर, आमच्या नाय ना म्हणत,  शिव्या देत पुढं.

मी जीव मुठीत धरून चाललोय. ही मुठीत घेण्याची गोष्ट कितीदा लिहिली तरी मन भरत नाही. हे शहर काही सोडवत नाही. भिनलंय माझ्यात. विषासारखं नसानसात खेळतंय. इतकं की, रक्ताचा रंगच आता काळा पांढरा होऊ लागलाय. आवाज नसले की चुकल्यासारखं वाटतंय. लाईट गेली की, मिट्ट काळोखात जीव नकोसा होतो. बाहेर आलं तरी दहा पाच फुटांपेक्षा जास्त आभाळ वाट्याला येत नाही.

शहरात घुसलं की, आभाळ, ढग, चांदण्या, सूर्योदय, सूर्यास्त सगळं विसरून जातं. फक्त वीज आणि घड्याळ. टीवी बंद असला की, करमत नाही. मग मुदत संपण्याच्या आत रिचार्ज. मोबाईलचा नेटपॅक संपला की जेवण जात नाही. दिवसात फेसबुकवर नाही गेलं की, मोठं नुकसान झाल्यासारखं वाटतं. सकाळी उठलं की, पेपर लागतो. पेप्रातल्या ताज्या घडामोडी मेंदूत कोंबल्याशिवाय संडासची किक बसत नाही. पेप्राच्या सुटीदिवशी जुना पेपर घ्यावाच लागतो.

चारेक बादल्या घेतल्याशिवाय आंघोळ केल्यासारखं वाटत नाही. उठलं की, गाणी ऐकल्याशिवाय काम पुढं सरकत नाही. दाढी करणं, आंघोळ करणं, कपडे घालणं, सगळं कसं वेळच्या वेळी आणि गाण्याच्या तालावर.

एक गती भिनून राहिलीय अंगात. हे शहर आता कितीही हाकलायचं म्हणलं तरी हाकलता येत नाही. शरीरातून, मनातून की मेंदूतून. चुकून कधी गल्ली शांत वाटली की, पाल चुकचुकल्यासारखं होतं. मन शंकांनी भरून जातं. अवतीभोवती आवाज असल्याशिवाय अस्तित्वाचा पुरावाच सापडत नाही. टेकडीवरचा कच्चा रस्ता सतत खुणावत राहतो.

दगडं चुकवून चालताना मात्र जीव हैराण होतो. पाऊस पडून गेल्यावर तर अक्षरश: जीव मेटाकुटीला येतो. तिथला निवांतपणा आवडतो. पण वारा सुटला आणि धुळीनं डोळं गच्च भरलं की, वैताग येतो. वाकडी तिकडी वाट पावलांना खुणावते. त्याच वाटेवरनं पाय घसरला तेव्हा आईचं दूध आठवलं होतं. झाडी हवीय. शहराच्या बाहेर निवांत ठिकाणी प्लॉटही हवाय. अन्न हवंय, शेती नकोय. सगळं कसं अगदी सेफ हवंय. चार मिनिटं अनवाणी चाललं तर तळव्यांचा भडका उडतो. प्रदक्षिणा घालताना नको वाटतं.

सकाळी आंघोळ, चहा-नास्ता झाल्यावर गल्लीच्या कोपर्‍यावर जावून आल्याशिवाय करमत नाही. माणसांच्या गर्दीत बरं वाटतं. आपलं अस्तित्व विसरता येतं. बसमधे चढलं की, रंगीबेरंगी दुनियेत आपली ओळख विसरता येते. स्टँडवर भटकता येतं. वाटलं की कुठंही हाकेच्या अंतरावर चहाचं कँटीन भेटतं. हवी ती वस्तू कुठंही उपलब्ध होते. रोज ताजी भाजी मिळते. लाँड्रीवाला घरून कपडे घेवून जातो.

पाऊस कितीही पडला तरी पावसातच रस्ते आंघोळ करून स्वच्छ होतात. त्यावरून चालण्यात मजा येते. अनोळखी होवून फिरण्यातली मजा शहरातच घेता येते. ओळखी विसरण्यातला आनंद काही औरच असतो. गर्दीत असं निस्सं:ग होता येणं फक्त शहरातच शक्य आहे. म्हणून तर माणसं धक्के देतात. घेतात. चालती होतात. ओळख कोणीच ठेवीत नाही.

बसमधे एखाद्या दिवशी कोणीतरी असं भेटून जातं की, जीव ओवाळून टाकावा वाटतो. शेजारी बसलं की, त्याचाही/तिचाही थोडावेळ प्रतिसाद मिळतो. तेवढाच चैतन्यसोहळा अनुभवायचा आणि उतरून जाताना मात्र चेहरा कोरा करकरीत ठेवायचा. कसलीच ओळख नसते. हे मात्र भारीच. कुठल्याही बाईकडं/ जिगोलोकडं जावून यायचं. रितं व्हायचं. ओळख कसलीच नाही ठेवायची. मस्त झिंग आहे आयुष्याची. याचा कंटाळा आला की, आहेच निसर्गसहल आणि टेकडीसुद्धा. समुद्र, डोंगरदर्‍या एकदोनदा चढून थकलं की पुन्हा नको वाटतं. वर्षभर तरी. किती भिनलंय हे शहर माझ्यात. कसं हुसकावून लावू मी त्याला.

इथं सगळं मला अगदी सहज उपलब्ध आहे. पेपरस्टॉल एक मिनटावर. बसस्टॉप दोन मिनटावर. चहा चार मिनटावर. दवाखाना पाच मिनटावर. रेल्वे सात मिनटावर. स्टँड नऊ मिनटावर. जेवण दहा मिनटावर. टेलर पंधरा मिनटावर. नॉनवेज वीस मिनटावर. दारू पंचवीस मिनटावर. सगळं गणित मिनटा मिनटावर बांधलं गेलंय. त्याची पक्की सवय झालीय. स्टॉलवर पेपर नाही दिसला तर अस्वस्थ वाटतं. तिथं दहापाच रिक्षा उभ्या असल्याशिवाय रस्ता भरल्यासारखा वाटत नाही.

कोपर्‍यावरचा भिकारी इकडं तिकडं गेला तरी, चुकल्यासारखं वाटतं. पंधरा वीस मिनटाला रेल्वे हॉर्न नाही वाजला की, कानाला बरं नाही वाटंत. चारवेळा भोंगा ऐकावाच लागतो. तो वाजला की चैतन्य येतं. निर्जन रस्त्यावरून चालताना कोणीतरी आपला पाठलाग करून मारून टाकेल असं वाटतं. म्हणून मग रस्ता गजबजलेला असावा. तो वाहता असला की, मस्त फिलींग येतं.

हॉटेलला गर्दी हवी. कपबशांचा आवाज हवा. थिएटरात गोंगाट हवा. सोड्याच्या बाटल्या फुटायला हव्यात. अंगाचा वास येईपर्यंत घसटून चालायचं, पण ओळख द्यायची, घ्यायची नाही. असं माणसांच्या जगात अनोळखी होण्याची मजा फक्त शहरातच. तिथं स्वत:चं काहीच अस्तित्व नसतं. एक शूद्र किडामुंगी बनून जगण्याची मजा औरच नाही का?

शहर सगळं कसं चकाचक पॉश. जिथल्या तिथं. पावसाळ्याच्या आधी छत्र्या दिसू लागतात. हिवाळ्याच्या आधी स्वेटर्स. उन्हाळ्याच्या आधी सन्क्रीम्स. भारी भारी मॉश्चरायझर्स. जोराचा पाऊस पोर्चमधे खुर्ची टाकून बघता येतो. घरात कुलर, एसी लावून बाहेरच्या उन्हाची तल्खली अनुभवता येते. उबदार स्वेटरमधे थंडी अनुभवता येते.

इथं दारात गॅस मिळतो. दूधवाला दारात येतो. भाजीवाला येतो. पेपरवाला येतो. रद्दीवाला येतो. भंगारवाला येतो. वस्तूवाला येतो. औषधवाला येतो. भांडीवाली येते. जाहिरातवाला येतो. लॉन्ड्रीवाला येतो. पिग्मीवाला येतो. कचरावाला येतो. नळवाला येतो. वीजवाला येतो. प्लंबर, लाईनमन, सगळे सगळे येतात. दारात हजेरी लावून जातात.

सगळे तुमच्या सेवेला हजर. हे कमी म्हणून नवरात्रात आराधनी येतात. एखादा वासुदेव येतो. वारकरी येतो. पिंगळेवाला येतो. (एकदा मी त्याला चक्क पाचशे रुपये दिलेत.) अंडीवाला येतो. हुरडावाला येतो. फणसवाला येतो. बांगड्यावाली येते. मधेच कधी तरी रायरंद उपटतो. असं सगळंच येतं. मग गाव कशाला राहतं. तिथं कशाला जायला हवं? काय आहे गावात?

शहरं सुजली बिजलीत ते मला मान्य नाही. बकाल होऊ लागली. होऊ देत. काय फरक पडतो? बकालपण तर सगळीकडचंय. आदिवासी पाड्यांपासून अमेरिकेपर्यंत. सगळीकडं पसरलंय. त्याला कोण रोखणार? एकदम पॉश व्यवस्थेतही हे भरून राहिलंय बकालपण. त्याला एकटा कोण काय करणार? त्यापेक्षा सगळ्या सुविधांचा लाभ घेऊ. मजा करू. डोक्यात सगळं ठेऊन काय उगवणार नाही नवीन. उगवलं तर ते परवडणारं नाही.

या सोयींच्या सोबतीला आहेच ना हे पूर्वीचं सगळं. कमी-जास्तीला. आधाराला. मनाची समजूत घालायला. मग बस्स! बाकी कशाला हवा भूतकाळ आणि धुरळा. उन्हाच्या लाह्या. दुष्काळ. सुकडी. फुफाटा. भाजलेले पाय. ओढ्याचं पिलेलं पाणी. रक्त निघेपर्यंत बोरीवर चढून काढलेली बोरं. आणि या सगळ्यासकट भाजून निघणारा गाव. काही कामाचा नाही.

हेही वाचाः भ्रष्टाचारी माणूस चांगलं साहित्य लिहू शकत नाही : राजन गवस

आई दारात. नेहमीप्रमाणे. वाट पहात. सॉरी. आज उशीर झाला. तू वाट बघत जाऊ नकोस. किती वेळा सांगू? चल घे जेवायला. आईसोबत जेवला. बिछाना जवळ केला. तसा शहराचा भिनलेला भाग हळूहळू सुस्तावला. त्याच्यासकट शहरावर झोपेचा अंमल. त्या अंमलात शहराऐवजी ते डोळे उगवले, आधीची ओळख असल्यासारखे. पहिल्यांदाच दिसलेले. एकदम वीज लख्खन चमकल्यासारखं काय तरी झालं. अनेकदा कुठं-कुठं नजरा अडकल्या होत्या. नाही असं नाही, पण तरी असा झटका? कधीच नाही. असली विलक्षण जाणीव पहिल्यांदाच झाली. आणि दूरवरून त्याला जगजीतसिंगची गझल ऐकू येतेय, कुठल्यातरी एफएमवरून, 

चिठ्ठी ना कोई संदेश, जाने वो कौनसा देस?
जहाँ तुम चली गयी, इस दिल पे लगाके ठेस
जाने वो कौनसा देस? जहाँ तुम चली गयी

आणि आरपार ते भेदून जाणारं संगीत. जगजीत तूही असाच गेलास. ठेच लावून काळजाला. दूरच्या प्रदेशात.

एक आह भरी होगी, हमने ना सुनी होगी 
जाते जाते तुमने आवाज तो दी होगी 
हर वक्त यही है गम ,उस वक्त कहाँ थे हम?

जगजीत ही वेळ नाही कुणाला पकडता येत. काय करायचं त्याचं. तुझा तो खर्जातला आवाज आणि खोलवर उमटलेली वेदना. नेमकं तुला पकडता आलं.

हर चीज पें अश्कों के, लिखा है तुम्हारा नाम
ये रस्ते, घर, गलिया तुम्हे कर ना सके सलाम 

कसं नेमकं पकडून ठेवलंस तू. हे पकडणं खूप कठीण गोष्ट आहे. हे म्हणता म्हणता अचानक तिचा आवाज घुमतो. कानाच्या पडद्यावर तरंग उमटवतो. 

अब यादों के कांटे, इस दिल में चुभते है
ना दर्द ठहरता है, ना आँसू रुकते है
तुम्हे ढूंढ रहा है प्यार, हम कैसे करे इकरार...

तुझ्या आवाजातली जादू काही माहीत नाही, यार. खूप उशिरा भेटलास, पण वेडं केलं. हल्ली मी तुझ्या आवाजी गझलेशी बोलतो. तुझ्याशी संवादू लागतो. काही तरी नवं सापडू लागलं होतं. तर तू अचानकच निरोप घेतलास. हे बरं नाही केलंस. आजही तुझ्या आवाजात ‘मै नसे में हूँ’ ऐकताना वेगळीच नशा येते. तू किती सहज म्हणून गेलास, 

प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है
नये परिंदो को उडनेमें वक्त तो लगता है
जिस्म की बात नही थी, उनके दिल तक जाना था 
लंबी दुरी तय करने में वक्त तो लगता है 
गाँठ अगर लग जाये तो, ये रिस्ते हो या डोरी
लाख करे कोशिश, खुलने को वक्त तो लगता है 

किती सहज गाऊन जातोस. घरभर, मनभर, मेंदूभर, एक दरवळ पसरून ठेवतोस. शब्दच नाहीत तुझ्यापुढं.

तेरे बारे में जब सोचा नही था 
मै तनहा था मगर इतना नही था 
तेरी तसवीर से करता था बाते 
मेरे कमरें में आइना नही था
मै तनहा था मगर इतना नही था 
समंदर ने मुझे प्यासा ही रखा
मै जब शेहरा में था प्यासा नही था
मै तनहा था मगर इतना नही था 

आतापर्यंतच्या एकूण बेफिकिरीला आणि चैतन्याला असा अचानक लगाम बसण्याची शक्यता दाट बनली आणि त्याला जगजीतसिंग जास्तच भावू लागला. रात्रभर तो मोबाईलवर गाणी ऐकत बसला.

तो पुन्हा टेकडीवर. कुठली अदृश्य शक्ती टेकडीवर खेचून नेते कळत नाही. आत खोलवर एक झरा उमलतो. खळाळू लागतो. नसानसांतून धावू लागतो. तो झरा थेट वडाच्या मुळ्यापर्यंत पोचलाय. दिनू त्याकडं अचंबित होऊन पाहतोय. टेकडीवर गेल्यावर जमिनीखालून त्यानं असे खळाळ अनेकदा ऐकले होते. ते ऐकताना तो स्वत:चा राहायचा नाही. दूरवर निघून जायचा. त्याच्यावर तेव्हा कोणीतरी सत्ता गाजवायचं.

तशा तंद्रीत तो तळ्यावर जायचा. काठावर बसायचा. तंद्रीत पाण्यात पाय सोडायचा. त्या पायांना मुळ्या फुटायच्या. त्या मुळ्या काढता काढता, जागेवर येता येता जीव मेटाकुटीला यायचा. तर कधी मेंदूशी तो जितका बोलायला लागतो. त्याच्या जवळ जातो, तितका मेंदू त्याला, त्याच्या शरीरातील एकेक अवयव जागा करून देतो. तो अवयव त्याच्याशी बोलायला लागतो. प्रत्येक अवयवाचं आणि एकूण शरीराचंच संवादी रूप त्याला अप्रूपाचं वाटू लागतं.

जमिनीच्या पडद्यासारखे पडदे मेंदूत असल्याचा त्याला भास होऊ लागतो. एखादा पडदा उलगडावा तर आत नवाच पडदा दिसायचा. त्याला सुरुंग लावावा तर पुन्हा चारपाच पडदे फुटून शरीरभर एक ओल पसरून राहायची. ती ओल काही केल्या हटायची नाही. पंप लावून पाणी उपसलं तरी निघायचं नाही. नवीन पडदा म्हणा, तळ म्हणा, काही लागायचा नाही. निवळसंख पाण्यामुळं पडदा दिसत राहतो. लालसर, तांबूस मधेच गारगोटीसारखा शुभ्र तुकडा. त्याच्या खालून येणारा पाण्याचा झरा. म्हणजे तोही ओला झराच म्हणायचा. पण त्याखालचं त्याला काही दिसलं नाही. ओलीचा थांग लागला नाही.

बरं, शोधावं निवांत तर ती ओल फार काळ टिकत नाही. ओल संपली म्हणून सुरूंग लावून शोध घ्यावा तर सुरूंग लावताना अचानक ओल सुरू होते. बघता बघता ओलीचा प्रवाह बनतो. तिचा थांग लागत नाही. मेंदूचं कोडं सुटत नाही. अशी ही तंद्री त्याला हवी तेव्हा लागत नव्हती. कधी तरी लागायची. ती तशीच रहावी वाटलं की, भंग पावायची. आनंदाचा वाटणारा संवाद नंतर त्रासाचा वाटू लागायचा. तो त्रास कमी करण्याचं कोणतंच तंत्र विकसित नसल्यामुळं त्याचा एकच गोंधळ उडतो. नुसता त्रास, त्रास आणि त्रासच. मग चिडचिड सुरू व्हायची. त्या चिडचिडीत तो शहरात येऊन स्वत:ला विसरायचा.

कादंबरीचं नाव: तणस 
लेखक: महेंद्र कदम
किंमतः ३०० रुपये | पानंः २२८
प्रकाशकः लोकवाङ्मय गृह
पाठराखण: डॉ. राजेंद्र दास
मुखपृष्ठ: सतीश भावसार


हेही वाचाः 

विष्णू खरे : कवी गेल्यावर सोबत काय राहिलं?

चर्चा तर होणारचः गुप्तेंच्या भयकथांमागचं उचलेगिरीचं गूढ

वंचित आघाडीने निव्वळ मतं खाल्ली की नवं राजकारण उभं केलं?

फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टीकोन

(साभार लोकवाङ्मय गृह. पुस्तकासाठी संपर्क ०२२-२४३६२४७४)