प्रेमाची नाती तोडतंय सोशल मीडिया

१४ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रेमाच्या संकल्पना प्रत्येकासाठी वेगवेगळ्या आहेत. नातं कोणतंही असो तुम्ही एकमेकांना किती समजून घेता, एकमेकांचा किती सन्मान करता आणि त्याचं पावित्र्य कसं जपता यावर त्या नात्याची वीण किती घट्ट असेल हे अवलंबून असतं. सो कॉल्ड प्रेमामुळे काहींच्या आयुष्याची गणितं बदलतात तर काहींच्या आयुष्याचाच गुंता होतो. कुणावर सर्वस्व उधळलं म्हणून त्या नात्याला चकाकी येत नाही.

वॅलेंटाईन वीक चालू आहे. सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. वॅलेंटाईनच्या निमित्ताने आपल्या जवळच्या खास व्यक्तीला सरप्राईज, गिफ्ट देण्याच्या तयारीत असतो.

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. ‘तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं,’ या मंगेश पाडगावकरांच्या ओळी असोत किंवा नवीन ट्रेंड नुसार ‘कितनीभी शिद्दत सें निभालो अपना रिश्ता, बदलने वाला तो बदलहीं जाता हैं’ अशा काही खूपच इमोशनल करणाऱ्या लाईन असो. सध्याच्या घडीला प्रेमाची व्याख्या आणि परिभाषा सर्वांसाठी खरंच सेम आहे का? मुळीच नाही.

माझं बालपण गावाकडे गेलं. उच्चशिक्षणासाठी स्वप्नांच्या नगरीत राहिले. विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे शहराशी संबंध आला. मेट्रो सिटीतल्या माणसांचं राहणीमान, विचार, पेहराव, परंपरा खूप जवळून पाहता आल्या. तरुणाईचं कल्चरही समजलं. सुरवातीला आपण किती गबाळे आहोत ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. पण परिस्थितीशी मिळतं जुळतं घेत स्वतःमधे बरेच बदल घडवून आणले.

हेही वाचा: क्रिकेटच्या पिचवर रंगतोय सतरंगी प्रेमाचा किस्सा

मोठ्या शहरांमधे आल्यावर प्रत्येकात काही न काही बदल होतात. वैयक्तिक असो, वागण्यात, बोलण्यात, पेहरावात किंवा राहण्याच्या बाबतीत असो, मुलींच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर गावाला वेळोवेळी पाठलाग करणाऱ्या नजरा इथे पिच्छा सोडतात. मग मिळालेल्या स्वातंत्र्याच्या नावावर मुली कसलाही विचार न करता प्रेमात पडतात.

प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या ही बदलत राहते. आणि अशा या सो कॉल्ड प्रेमामुळे काहींच्या आयुष्याची गणितं बदलतात तर काहींच्या आयुष्याचाच गुंता होतो. मग कसं आपण असं म्हणू शकतो की प्रेम हे सर्वांचं सेम असत?

आजकाल मुलांनाही आपण ज्या मुलीवर प्रेम करतो ती आपल्या मालकीची वाटू लागते. सध्या प्रेम, रिलेशन या गोष्टींमधे सोशल मीडिया नावाची गोष्ट प्रमुख भूमिका बजावत असते. एबीसी सायन्स या पोर्टलनुसार, सर्वात जास्त ब्रेकअप्स हे सोशल मीडियामुळे होतात.

हेही वाचा: आशिक लाथ कधी मारेल, सांगता येत नाही

'सायबर सायकॉलॉजी बिहेवीयर अँड सोशल नेटवर्किंग' या सोशल मीडियाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेच्या रिपोर्टमधे म्हटलंय की, फेसबुक हे सध्या घटस्फोट, आणि ब्रेकअप्समधे प्रमुख भूमिका बजावतंय. भांडण, संशय, अविश्वास, भीती ही याची प्रमुख कारणं आहेत. आजुबाजूला आज कित्येक उदाहरण आपण पाहतोय.

माफी मागणं, मनधरणी करणं, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही असं बोलून नातं सांभाळण्याचा प्रयत्न करणं आणि याने काही झालं नाही तर मग ब्रेकअप यातून पुढे काहीजण सावरतात. तर काही जीव देण्यापर्यंत जातात आणि काही नुसतेच कासावीस होतात.

आताच्या काळात बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड असणं हा सुद्धा एक प्रतिष्ठेचा विषय झालाय. पुन्हा एकदा आपल्याला सोशल मीडियावर त्यासाठी ताट वाढून ठेवलेलंच असतं. डेटिंग अॅपच्या छताखाली मॅच करणं, नंतर डेट करणं आणि मग फिरायला जाणं या गोष्टी नॉर्मल वाटतात.

हेही वाचा: लिंगभेदापलीकडची प्रेमाची वर्च्युअल पायवाट

प्रेमात पडलेल्या सर्वांचंच एकमेकांसोबत लग्न होतं का? तर उत्तर नाही असंच आहे. अशावेळी प्रेम म्हणजे भावना आणि लग्न म्हणजे व्यवहार हे समीकरण डोकं वर काढू लागतं. धर्म, समाज, प्रतिष्ठा यांचे काटे टोचू लागतात. मग या काट्यांचं भाल्यात रूपांतर होऊन अनेकांचा त्याग मोड ऑन होतो. पण काही ठिकाणी या भाल्यांचा शस्त्र म्हणून वापर करून समाजाशी लढणाऱ्या प्रेमकहण्या ही आज पाहायला मिळतात.

प्रेमाच्या संकल्पना प्रत्येकासाठी वेगवेगळ्या आहेत. नातं कोणतंही असो तुम्ही एकमेकांना किती समजून घेता, एकमेकांचा किती आदर राखता आणि त्याचं पावित्र्य कसं जपता यावर त्या नात्याची वीण किती घट्ट असेल हे अवलंबून असतं. कोणावरती कितीही सर्वस्व उधळलं म्हणून त्या नात्याला चकाकी येत नाही.

आताच्या या दूषित युगात प्रेम, आकर्षण, आवड, सवय या गोष्टीबद्दल जितकं जागरूक राहून किंवा योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आयुष्याचा होणार गुंता हा प्रत्येकजण सावरू शकतो. पण ते पुन्हा ज्याच्या त्याच्या परिकल्पनेवर आधारलेलं असतं. समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात असलेलं प्रेमाचं, विश्वासाचं आणि आपुलकीचं खातं म्हणजेच नातं. आणि नात्याचा हा वटवृक्ष मायेचा ओलावा, भावना आणि काळजी या गोष्टींनी वाढत असतो.

हेही वाचा: 

तुमचं आमचं सेमच असतं

‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम

छोट्याशा गावातल्या दिशाचा सतरंगी संघर्ष

(दिपाली रत्नागिरीची असून तिचं बीएमएम झालंय)