देशभरातल्या एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात, ते इथे वाचा

२० मे २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


एक्झिट पोल आले. नरेंद्र मोदी आता जणू पंतप्रधान बनलेच अशा चर्चा सगळ्या चॅनलवरून सुरू झाल्या. तेही स्वाभाविक आहे, कारण सगळेच सर्वे काही खोटं बोलणार नाहीत. त्यामुळे निकालाची दिशा दाखवणारे आकडे म्हणून या सन्मान करायलाच हवा. त्याचबरोबर एक्झिट पोलच्या एकूण प्रक्रियेतल्या मर्यादाही समजून घ्यायला हव्यात.  आनंद किंवा दुःख साजरं करण्याआधी एक्झिट पोल म्हणजे काही निकाल नाही, याचंही भान ठेवायला हवं.

केदारनाथच्या गुहेतली ध्यानधारणा नरेंद्र मोदींना पावली, असं देशभरातले एक्झिट पोल ओरडून सांगत आहेत. झाडून सगळ्या न्यूज चॅनलच्या एक्झिट पोलनी सांगितलंय, फिर एक बार मोदी सरकार. मोदींनी ध्यान केलेली केदारनाथची गुहा नैसर्गिक नव्हती. ती पर्यटनासाठी तयार केलेली फाईव स्टार गुहा होती.

तशीच भाजपच्या समर्थकांना सुख देणारी गुहा एक्झिट पोलनी तयार केलीय. पुन्हा एकदा मोदीच येणार या आनंदात त्यांना राहता येईल. २३ तारखेचे लोकसभा निवडणुकांचे निकाल एक्झिट पोल नुसारच आले, तर ही गुहा मात्र खरी असल्याचं सिद्ध होईल.

हेही वाचाः भाजप २५०+, एनडीए २८०, पंतप्रधानपदी मोदी!

या एक्झिट पोलवर विश्वास किती ठेवायचा?

एक्झिट पोलमधून निवडणुकीत मतदान झाल्याची हवा कोणत्या दिशेने वाहतेय, याचा अंदाज येतो. म्हणूनच एक्झिट पोल वारंवार तोंडघशी पडूनही अद्याप टिकून आहेत. एखादा अपवाद वगळता सगळे चॅनल एक्झिट पोल करतात. ते लोक बघतात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांना जाहिराती मिळतात. एक्झिट पोलचं चक्र सुरूच राहतं. निवडणूक प्रक्रियेतला तो जणू महत्त्वाचा भागच बनलाय.

पण साधारण २००४ पासून बहुसंख्य निवडणुकांत बहुसंख्य चॅनलवरच्या बहुसंख्य एक्झिट पोलनी जास्तीत जास्त वेळा आपला कौल भाजपच्या बाजूनेच दिलेला आढळलाय. पण ते बहुसंख्य वेळा खोटेच ठरलेत. यावेळेस मात्र एकही एक्झिट पोल एनडीएच्या विरोधात जाताना दिसत नाही. त्यामुळे त्याचा सरासरी विचार करताही एनडीएचीच सत्ता येताना दिसतेय.

त्यामुळे मतदानाची दिशा दाखवण्याइतपत यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. पण उत्तर प्रदेश किंवा पश्चिम बंगालसारख्या एखाद्या राज्यातला निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध आला तर पूर्ण राजकारणच बदलू शकतं, हेही लक्षात ठेवायला हवं.

एक्झिट पोलवाले आपल्याला फसवतात का?

मोदी सरकारवर सातत्याने टीका करणारा लोकप्रिय यूट्यूब ब्लॉगर ध्रुव राठीने केलेलं ट्विट फार महत्त्वाचं आहे. तो म्हणतोय. एक्झिट पोल्स प्रत्यक्षात खरे ठरले तर मला आश्चर्य वाटणार नाही. सगळेच प्रपोगंडाचा म्हणजे प्रचाराचा प्रभाव दुर्लक्षित करत आहेत. ९० टक्के मीडिया कंट्रोलमधे, बॉलीवूड सिनेमे, टीवी सिरियल, सोशल मीडियावरच्या जाहिराती, या सगळ्या तुम्हाला मसिहा म्हणून प्रोजेक्ट करत आहात आणि त्यात निवडणूक आयोग तुम्हाला हवं ते करू देतोय. त्याचा प्रचंड प्रभाव पडून तुम्ही जिंकणारच.

सगळेच चॅनल आणि सर्वेवाले मोदी सरकारने विकत घेतलेत, असं तर नाहीच. कारण त्यांनाही स्पर्धेच्या युगातली आपली विश्वासार्हता टिकवायची आहेच. ते आपल्याला सरसकट फसवणार नाहीत. तेही फक्त तीन दिवसांसाठी. त्यामुळे त्यांच्यावर संशय घेण्यापेक्षा आपलं कुतुहल शमवणारी आणि चर्चेला मुद्दे देणारी एक प्रक्रिया म्हणून याकडे पाहायला हवं. कारण हे एक्झिट पोल का खरे ठरू शकतात, याचे अनेक तर्क देता येतील.

महाराष्ट्रात अनेक मतदारसंघात अत्यंत अटीतटीच्या लढती झाल्यात. काही हजार मतं इथून तिथे गेली तर निकाल बदलणार आहे. हेच पूर्ण देशात झालं असेल तर कितीही मेहनतीने सर्वे केले तर ते चुकू शकतात. कारण ग्रामीण भागात मोदी सरकारच्या विरोधात रोष आहे. तिथे पोचण्यात सर्वेवाल्यांना मर्यादा आहेत.

हेही वाचाः सगळ्या पक्षांना विस्कळीतपणाचा फटका बसणार

मागच्या वेळेपेक्षा मोठी लाट आलीय का?

मोदी सरकार येणार याविषयी एकाही एक्झिट पोलला शंका नाहीय. एक्झिट पोलनी एनडीएला कमीत कमी २४२ आणि जास्तीत जास्त ३३६ जागा दिल्यात. त्याची सरासरी काढली तर ती २९२ इतकी येते. मागच्या वेळेस एनडीएला ३३६ जागा मिळाल्या होत्या. पण तेव्हा मोदी लाट स्पष्ट दिसत होती. आता अनेक एनडीएचे सहकारी सोडून गेलेत. नोटाबंदी आणि त्यानंतर अनेक मुद्दे मोदींच्या विरोधात गेलेत.

तरीही मोदींना इतक्या जागा मिळत असतील तर यंदा २०१४च्या मोदी लाटेपेक्षा मोठी लाट होती. मग ती यंदा दिसली का नाही? मागच्या वेळेस मोदींना मतदान करणारे अनेकजण मोदींच्या विरोधात बोलत होते. मग त्यांनी पुन्हा मोदींना मतदान केलं का?

शेतकरी, मुस्लिम आणि दलित यांचा असंतोष स्पष्टपणे दिसत असताना तो मतदानात का उतरला नाही? तीन राज्यांतल्या विधानसभेत यश देणारा मतदार अचानक लोकसभेत काँग्रेसच्या विरोधात का गेला? असे अनेक प्रश्न उभे राहतात. तरीही यश मिळालं असेल तर सगळ्याचं श्रेय भाजपच्या निवडणूक यंत्रणेला द्यायला हवं.

एक्झिट पोल खरंच प्रातिनिधिक आहेत का?

एक्झिट पोलचे निकाल अचूक यावेत यासाठी यंदा सर्वच सर्वे कंपन्यांनी आपली सॅम्पल साईज खूप वाढवली होती. अनेकांनी देशभरात ५ ते ८ लाख इतक्या लोकांची मतं विचारात घेऊन आपले निष्कर्ष काढलेत. हा आकडा फारच मोठा आहे. तरीही भारतासारख्या अवाढव्य देशात यावरून ठाम निष्कर्ष काढणं कठीणच होतं.

प्रत्येक लोकसभा मतदारसंघात साधारण ६ किंवा ७ विधानसभेचे मतदारसंघ आहेत. त्याचा विचार केल्यास प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अंदाजे २०० लोकांची मतं विचारात घेतली जातात. जात, धर्म, वय, लिंग, शहरी-ग्रामीण याचं प्रतिनिधित्व नीट लक्षात घेतलं नाही तर सगळीच प्रक्रिया सहज गंडू शकते. ते अनेकदा झालंय.

हेही वाचाः निवडणूक अंदाज मांडणाऱ्या देशातल्या सगळ्यात विश्वासार्ह संस्थेच्या प्रमुखाचा अंदाज

सर्वेत लोक खोटं बोलतात का?

आधीचे पत्रकार आणि सध्या व्यवसायाने वकील असणारे संदीप श्रीवास्तव यांनी एनडीटीवर झालेल्या चर्चेत एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय. ते म्हणतात की सध्या एक्झिट पोल होतच नाहीत. निवडणूक आयोगाने त्यावर आधीच बंदी घातलीय. एक्झिट पोल म्हणजे निवडणूक केंद्रापासून काही अंतरावर प्रातिनिधीक मतदार येऊन पुन्हा मतदान करायचा. त्याचं नाव, गाव काहीच माहीत नसायचं.

ते पुढे सांगतात, आता एक्झिट पोल नाहीत तर पोस्ट पोल सर्वे होतो. त्यात मतदानाच्या दुसऱ्या दिवशी फॉर्म भरून त्यांची मतं नोंदवली जातात. आता त्यांची ओळख उघड असल्यामुळे लोक आपली खरं मत सांगत नाहीत. असं सांगणाऱ्यांची संख्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त असते. त्यामुळे अनेकदा सर्वे तोंडघशी पडतात.

संदीप श्रीवास्तव सांगतात, त्याप्रमाणे होतं हे लक्षात घेऊन अनेक सर्वे कंपन्यांनी आपली पद्धत बदललीय. तरीही मुळात आपलं मतदान गुप्त ठेवण्याच्या टिपिकल मानसिकतेमुळे लोक आपलं मत सांगत नाहीत. विशेषतः प्रस्थापितविरोधी मत दडवून ठेवलं जातं.

कोणत्या पक्षाला कोणत्या चॅनलवर किती जागा?

लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी स्पष्ट बहुमतासाठी २७२ जागा लागतात. पण २०१४च्या मोदी लाटेत भाजपने एकट्यानेच जिंकल्या होत्या तब्बल २८२ जागा. त्यांचे सगळे छोटे मोठे मित्रपक्ष मिळून त्यांची बेरीज ३३६ पर्यंत गेली होती. हा फारच मोठा दिग्विजय होता. त्या पार्श्वभूमीवर आज १९ मे ला मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर एक्झिट पोलचा विचार करताना प्रत्येक चॅनलने कोणत्या आघाडीला किती जागा दिल्यात ते पाहायला हवं.

हेही वाचाः महाराष्ट्रातल्या ४८ जागांवर कोण जिंकणार, कोण हरणार?

रिपब्लिक + सी वोटर 

एनडीएः २८७  

यूपीएः १२८ 

इतरः १२७

रिपब्लिक भारत + जन की बात 

एनडीएः ३०५

यूपीएः १२४

इतरः ११३

टाइम्स नाऊ + वीएमआर 

एनडीए: ३०६

यूपीए: १३२ 

इतरः १०४

न्यूज़ नेशन

एनडीएः २८२ ते २९० 

यूपीएः ११८ ते १२६  

इतरः १३० ते १३८ 

न्यूज एक्स 

एनडीएः २४२

यूपीएः १६२

इतरः १३८

इंडिया न्यूज + पोल स्ट्रेट

एनडीएः २९८

यूपीएः ११८

इतरः १२६

इंडिया टुडे + अक्सिस माय इंडिया 

एनडीएः ३३९-३६५

यूपीएः ७७-१०८

इतरः ६९-९५

एबीपी न्यूज + नेल्सन

एनडीएः २६७

यूपीएः १२७

इतरः १४८

न्यूज २४ + टुडेज चाणक्य

एनडीएः ३५०

यूपीएः ९५

इतरः ९७

न्यूज १८ +  आयपीएसओएस

एनडीएः ३३६

यूपीएः ८२

इतरः ११३

एक्झिट पोलवर चर्चा करताना हे फक्त अंदाज आहेत, याचं भान ठेवायलाच हवं. त्यामुळे हे खरंच किंवा खोटंच मानून त्याची चिकित्सा करण्यापेक्षा तीन दिवसांनी येणाऱ्या निकालांसाठी थांबायला हवं. त्यावर साधी चर्चा नाही तर घमासान चर्चा करायला हवी. कारण एक्झिट पोल हे काही निकाल नाहीत.

हेही वाचाः 

महाराष्ट्रात भाजप महायुतीला मोठा फटका

महाराष्ट्रात कोण जिंकणार किती जागा?