सांगलीत साकारतेय शिवराज्याभिषेकाची विश्वविक्रमी महारांगोळी

१९ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज शिवजयंती. पण सांगलीत गेल्या महिनाभरापासून शिवजयंतीचा माहौल तयार झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकावर आधारित महारांगोळी साकारण्यासाठी जिल्हाभरातले कलाकार एकवटलेत. सगळ्या जातीधर्मातले हे कलाकार रांगोळीतून शिवाजी महाराजांचा संदेश देण्यासाठी झपाटल्यागत कामाला लागते. त्या सगळ्या झपाटलेपणाची ही स्टोरी.

ध्येयवेड्या कलाकारांकडून रोज वेगवेगळे जागतिक विक्रम प्रस्थापित केले जातात. यातले अनेक विक्रम मोडले जातात. कारण विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. पण काही विक्रम मात्र कित्येक वर्षे अबाधित राहतात. शिवाय कोण कशाचा विक्रम करेल याचाही काही नेम नाही. याचाच एक प्रत्यय सांगलीत येतोय.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यावर आधारित महारांगोळी साकारली जातेय. १५ ते १९ फेब्रुवारीदरम्यान शिवजयंतीला ही रांगोळी पूर्ण होईल. यासाठी शंभर कलाकार दिवसरात्र ही रांगोळी साकारताहेत. यानिमित्ताने ९ ठिकाणी जागतिक विक्रम प्रस्थापित केले जाणार आहेत.

उत्सव समितीची स्थापना

शिवजयंती दिवशी काही तरी भव्य दिव्य करून महाराजांना मानवंदना देण्याचा निर्धार सांगलीतल्या काही कलाशिक्षकांनी केला. प्रदीप पाटील, अनिल शिंदे, आदम अली मुजावर आणि संतोष ढेरे या चार शिलेदारांनी काही कलाकारांसोबत 'शिवराज्याभिषेक विश्वविक्रमी रांगोळी उत्सव समिती'ची स्थापना केली. धर्मादाय आयुक्तांकडेही तशी नोंदणी केली. या सर्वांनी सारी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत आणखी काहींना एकत्र करून शिवराज्याभिषेकाच्या रांगोळीला मूर्तरुप देण्याचं निश्चित केलं.

यानुसार त्यांनी गेल्या महिनाभरापासून नियोजन आणि तयारी सुरू केलीय. मैदान मिळविण्यापासून ते निधी जमा करण्यापर्यंत अनेक अडचणी होत्या. शिवाय कलाकारांची जुळवाजुळव करणं, लोकवर्गणीसाठी फिरणं, मैदान मिळवून ते तयार करणं, लोकांपर्यंत हा उपक्रम पोचवणं अशा अनेक दिव्यांतून या कलाकारांना जावं लागलं. प्रसंगी त्यांना स्वतःच्या खिशातूनही पैसे टाकावे लागले. पण रांगोळी पूर्ण होईपर्यंत स्वस्थ न बसण्याचा जणू विडाच या मावळ्यांनी उचला.

सव्वा लाख चौरस फुटांची महारांगोळी

सांगलीतल्या छत्रपती शिवाजी स्टेडियममधे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याची विश्वविक्रमी महारांगोळी काढण्याचं निश्चित झालं. ही रांगोळी सव्वा लाख चौरस फूट एवढ्या मोठ्या जागेवर साकारली जातेय. त्याचा आकार २५० बाय ५०० फुट एवढा आहे. सांगली आणि परिसरातल्या जवळपास १०० कलाकारांनी यासाठी झोकून देऊन काम हाती घेतलंय. गेल्या शुक्रवारपासून रांगोळी काढायचं काम सुरू आहे.

सतत दिवस-रात्र कधीच न थांबता १०० तासांमधे ही रांगोळी पूर्ण होईल, असं उद्दिष्ट ठरवण्यात आलंय. त्यानुसार १९ फेब्रुवारीला आज सकाळी ही रांगोळी पूर्ण होणार आहे. त्यानंतर ही रांगोळी लोकांना पाहण्यासाठी खुली केली जाणार आहे. त्यानंतर २५ फेब्रुवारीपर्यंत ती सर्वांना बघायला मिळेल. विविध क्षेत्रातले मान्यवरही ही कलाकृती बघायला येणार आहेत. तसंच जागतिक विक्रम नोंदवण्यासाठी गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेच्या अधिकाऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आलंय.

महारांगोळीसाठी साहित्य आणि खर्च

ही महारांगोळी सव्वा लाख चौरस फूट क्षेत्रफळावर साकारण्यात येणार आहे. यासाठी ३० टन रांगोळी आणि ५ टन विविध रंग वापरण्यात आलेत. यासाठी एवढ्या मोठ्या जागेवर रांगोळीचा स्केच असलेला फ्लेक्स अंथरलाय. त्यावर ही रांगोळी रंगवण्यात येतेय. वेगवेगळ्या फाईन आर्ट्स कॉलेजातले विद्यार्थी, शिक्षक असे १०० कलाकार रात्रंदिवस काम करताहेत. त्यामधे ५० मुख्य कलाकार आणि ५० सहकलाकार आहेत. कामाच्या सोयासाठी त्यांच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आहेत.

महारांगोळी साकारण्यासाठी जवळपास ३० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रांगोळी, रंग, फ्लेक्स, फ्लड लाईट, दिवसरात्र काम करणाऱ्या १०० कलाकारांचं चार दिवसांचं जेवण अशा अनेक गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. समितीचे चारही शिलेदार आणि सहकलाकार या सर्वांनी लोकवर्गणीतून हा निधी जमवलाय. शिवाय अमोल कोरगांवकर आणि प्रा. महेश थोरवे यांनीही ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

सामाजिक, शैक्षणिक संथा, उद्योजक, राजकीय नेते, नागरिक, प्राध्यापक, विद्यार्थी यांच्याकडे जाऊन मदतीचं आवाहन करण्यात आलं. ‘या उपक्रमासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्ती आणि जाहिरातीतून आतापर्यंत फक्त ७ लाखांचा निधी जमा झालाय. आणखी २३ लाखांचा पल्ला गाठायचाय,’ असं आदमअली मुजावर यांनी सांगितलं. ‘हा विश्वविक्रम नोंदवण्यासाठी समाजातल्या सर्व समाजघटकांचा पाठिंबा आणि मदत आवश्यक आहे. कारण हे काम आम्हा एकट्याचं नाही. यासाठी सर्वांनी मदत करावी आणि महाराजांना मानवंदना द्यावी,’ असं आवाहन समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केलंय.

कोणते होणार ९ संस्थेत विश्वविक्रम

इथल्या या रांगोळीच्या निमित्ताने ९ विश्वविक्रम प्रस्थापित केले जाणार आहेत. यासाठी गिनीज बुक, लिम्का बुक, एशिया बुक, इंडिया बुक, गुगल बुक, ग्लोबल बुक, वर्ल्ड बुक, गोल्डन बुक, युनिक बुक या नऊ संस्थांना निमंत्रण देण्यात आलंय. ही मोहीम फत्ते झाल्यास विश्वविक्रमासाठी सर्वात मोठी रांगोळी म्हणून नोंद होईल. यासाठी ऑनलाइन नोंदणीने सर्व प्रक्रिया पूर्ण करून अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलंय. या रांगोळीचे ड्रोन कॅमेऱ्याने संपूर्ण चित्रीकरण होणार असून तेही या संस्थेकडे सुपूर्द केलं जाणार आहे.

याआधी संस्थेचे कार्याध्यक्ष आदमअली मुजावर यांनी ७२ तासात ४० बाय ५० फुटांची महाभारतावर आधारित रांगोळी काढून भारतातून पहिल्यांदा गिनीज बुकमधे रेकॉर्ड केलाय. डॉ. आंबेडकरांची आणि शिवाजी महाराजांची रांगोळी काढून त्यांच्या नावावर लिम्का बुक आणि एशिया बुकमधेही नोंद झालीय.

सर्व जातीधर्मातले ध्येयवेडे कलाकार

रांगोळी साकारणारे सर्वच जण नोकरी, व्यवसाय करतात. स्वतःचं काम, नोकरी, शाळा कॉलेज सोडून ही सर्व कलाकार मंडळी एका ध्येयाने झपाटली आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्याची जगातील महारांगोळी काढून शिवाजी राजांना मानवंदना देण्यासाठी अहोरात्र झटताहेत. गेल्या चार दिवसांपासून या सर्वांचा मुक्काम शिवाजी स्टेडियमवर आहे.

कलेला वाहून घेतलेले हे सर्वजण वेगवेगळ्या जाती धर्मातले असून ते सगळे शिवाजी महाराजांच्या विचाराने एकत्र आलेत. यासर्वांच नातं फक्त कलाकार आणि त्यांचा धर्म फक्त कला हाच आहे. सर्व जाती-धर्मांचा आदर करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या महारांगोळीतून यापेक्षा दुसरा मोठा संदेश कोणता असू शकेल.

 

(लेखक हे मुक्त पत्रकार असून सध्या कोल्हापूरला राहतात.)