भारताच्या कुस्ती कलेचा इतिहास बोलकं करणारं पुस्तक

२० ऑगस्ट २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


'भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा' हे प्रसिद्ध कुस्ती समालोचक शंकरराव पुजारी यांचं पुस्तक. कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आदिमानवापासून मानव संरक्षणासाठी लढाया आणि चढाया करत होता. त्यातून कुस्तीचा उगम झाला. त्यामुळेच अगदी रामायण काळापासून ते २०२० पर्यंतच्या कलेचा आढावा या पुस्तकातून त्यांनी घेतलाय. त्याला समकालीन असा खूप चांगला संदर्भही आहे.

देशात हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेची सुरवात १९५८ ला झाली. पहिल्या वर्षी पंजाबचे बाबूराम हिंदकेसरी झाले. गदा देण्याची प्रथा १९५९ मधे दुसऱ्या वर्षापासून सुरू झाली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून श्रीपती खंचनाळे यांची निवड झाली होती. हिंदकेसरीसाठी गदा सुरू झाल्यानं या स्पर्धेविषयी उत्सुकता होती. श्रीपती खंचनाळे यांनी पहिल्या सगळ्या फेऱ्या जिंकून अंतिम फेरीत धडक मारली.  त्यांची गाठ त्यावेळी पंजाबच्या बत्तासिंग यांच्याशी पडली.

दोघंही मोठे बलदंड पैलवान होते. ही कुस्ती २२ मे १९५९ ला २८ मिनिटं झाली. बत्तासिंगचा दम भरला. पंचांनी कुस्ती बरोबरीत सोडवली. पंचांचा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना श्रीपती खंचनाळे यांची होती. त्यांनी आपली कैफियत राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे मांडली. हिंदकेसरी पदकाची कुस्ती बेमुदत निकाल ठेवावी, अशी त्यांची भावना होती.

दुसऱ्या दिवशी ही कुस्ती पुन्हा घ्या अशी विनंती त्यांनी केली. ती मान्य झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता कुस्ती घेण्याचं ठरलं. राष्ट्रपती आणि पंतप्रधान दोघंही कुस्ती पाहण्यासाठी हजर होते. श्रीपती खंचनाळे यांनी बराच वेळ बत्ताससिंगला खेळवलं आणि दमामधे काढून चितपट केलं. राष्ट्रपतींच्या हस्ते हिंदकेसरीची पहिली गदा कोल्हापूरच्या खंचनाळे यांनी पटकावली.

पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना मानाचा फेटा बांधला. सारा देश आणि महाराष्ट्र या लढतीने रोमांचित झाला होता. हा ऐतिहासिक प्रसंग कुस्ती समालोचक पैलवान शंकरराव पुजारी कोथळीकर यांच्या पुस्तकातला आहे. भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा असं या पुस्तकाचं नाव आहे.

पुस्तकातून कुस्तीच्या इतिहासापर्यंत

कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलंय. ज्येष्ठ संपादक रावसाहेब पुजारी यांनी शब्दांकित केलेल्या पुस्तकात फोटोग्राफीची मांडणी उत्तम झालेली आहे. प्रत्येक कुस्ती शौकीनाकडे असावं, असं हे पुस्तक आहे. कुस्ती या विषयावर पुस्तकांची खूप कमतरता आहे. नवीन माहिती मिळण्यासाठी हे पुस्तक वाचकांना उपयोगी पडेल असं आहे.

या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रस्तावना आहे. भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा या पुस्तकाविषयी पवार म्हणतात, 'कुस्तीचा इतिहास तटस्थपणे या पुस्तकात संकलित झालाय.'

'नव्या पिढीतल्या कुस्तीगीरांसाठी हा इतिहास अतिशय प्रेरक आहे. कुस्तीला पुन्हा वैभवाचे दिवस येऊ लागले आहेत. या क्षेत्रातली मरगळ दूर करण्याचं काम पैलवान पुजारी यांच्यासारखी मंडळी अतिशय प्रामाणिकपणे करतायत.'

हेही वाचा: नलिनी पंडितः दलित, बहुजनांच्या वकील

पैलवानाने मांडलेला अनुभव दुर्मिळच

कुस्ती समालोचक म्हणून शंकरराव पुजारी यांना महाराष्ट्र ओळखतो. त्यांनी आपलं सारं आयुष्य कुस्तीसाठी घालवलं. त्यामुळे पुजारी यांचं हे पुस्तक हा महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. समकालीन कुस्तीची स्थिती गती समजून घेण्यासाठीही उपयुक्त ठरणारं आहे.

राज्यातल्या प्रमुख मैदानात कुस्ती समालोचक म्हणून प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या पुजारी यांनी साकारलेला हा ग्रंथ संदर्भग्रंथ ठरावा, इतका मोलाचा आहे. या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात कुस्तीचा इतिहास आणि यासंदर्भाने येणारी मांडणी पुजारी यांनी केलीय. दुसऱ्या भागात त्यांनी आपली आत्मकथा मांडली आहे.

पुजारी यंदा पंचाहत्तरीकडे वळले आहेत. त्यांच्या अनुभवाचा परिघ मोठा आहे. ते पैलवान, शेतकरी, वारकरी, कुस्तीगिरांचं प्रेरणास्थान, कुस्ती समालोचक आणि आता लेखक अशा विविध भूमिकात वावरलेत. एखाद्या पैलवानानेच आपला अनुभव आणि त्या अंगाने येणारा इतिहास साकारणं, तो मांडणं ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे.

नेटकेपणाने मांडलेलं आत्मकथनही

शंकरराव पुजारी हे जितक्या सुंदर आणि नेटकेपणाने निवेदन करतात. त्यांनी हे पुस्तक साकारलं आहे. कुस्ती बोलकी करण्याचं काम त्यांनी केलं. त्याच पद्धतीने कुस्ती लिहिती त्यांनी केली, असं म्हटलं तर वावगं ठरु नये. बुद्धिमान आणि चपळ त्याचं नाव पैलवान. आत्मबल, मनोबल आणि शक्ती बलाने पैलवान तयार होत असतो. मन, मनगट आणि मेंदूच्या बळावर पैलवानाची घडण झालेली असते.

भारतीय कुस्तीला हजारो वर्षांची परंपरा आहे. वयाच्या चौथ्या वर्षी पुजारी यांनी लंगोट लावला. त्यावेळेपासून आतापर्यंत त्यांची लाल मातीशी जोडलेली नाळ कायम आहे. ते सातवीपर्यंत शिकले. शाळेत अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची ख्याती असतानाही वडलांनी त्यांना सांगलीला तालमीत घातलं. वस्ताद नारायण पवार यांच्याकडे त्यांनी कुस्तीचे धडे घेतले.

दहा वर्ष ते कुस्तीची साधना करत होते. या काळात त्यांनी अनेक चटकदार कुस्त्या केल्या. नेमून काही त्यांच्या कुस्त्या झाल्या. रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार, संभाजी सावर्डे, महंमद हनिफ, शिवाजी मदने अशा अनेक नामवंत मल्लांशी त्यांनी लढती केल्या. काहीदा जिंकले. काहीदा हारले.

हेही वाचा: मराठ्यांना रोखण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्या गोळवलकरांना बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं?

कुस्ती बोलकी करणारे शंकरराव

१९७२ मधे राज्यावर दुष्काळाचं संकट आलं. त्यामुळे त्यांना कुस्ती थांबवावी लागली. ते शेतीकडे वळले. याच काळात त्यांनी अध्यात्माकडे लक्ष दिलं. त्यांनी पंढरपूरची वारी सुरु केली. सुरवातीला ते सांगलीवाडीच्या वारीत सहभागी झाले. त्यांनी नंतर स्वतःची आळंदी देहूपासून आषाढीला दिंडी सुरु केली. गेली २४ वर्ष सतत त्यांची वारी सुरू आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून त्यात खंड पडलाय.

राज्यात दरवर्षी सुमारे दीडशे ते दोनशे कुस्तीचे मैदान होतात. यापैकी मोठ्या मैदानांना कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोथळीचे शंकरराव पुजारी कुस्ती समालोचक म्हणून असतात. गेल्या ३५ वर्षात साडेचार हजारांहून अधिक कुस्ती मैदानांचं समालोचन शंकरराव पुजारी यांनी केलंय. मुकी कुस्ती त्यांनी बोलकी केली आहे. त्यांना राज्यातल्या विविध संस्थांनी पुरस्कार देऊन गौरवलंय. निवेदनासाठी पुरस्कारही त्यांना मिळालेत.

कुस्ती कलेचा ऐतिहासिक आढावा

पुजारी यांचं आत्मकथन जसं वेधक आहे तसाच किंबहुना त्यापेक्षाही नेटकेपणाने त्यांनी कुस्ती आणि कुस्तीचा इतिहास या विषयाची मांडणी केली आहे. आदिमानवापासून मानव संरक्षणासाठी ज्या लढाया आणि चढाया करत होता. त्यातून कुस्तीचा उगम झाला. रामायण काळापासून अगदी २०२० पर्यंतचा या कलेचा आढावा त्यांनी घेतलाय.

जगामधे आज १७२ देशात कुस्ती खेळली जाते. रशिया, इराण, जपान देश कुस्तीत अग्रेसर आहेत. भारतीय कुस्तीला ही मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राजाश्रयाने देशात कुस्ती वाढली. काळ बदलला तसं कुस्तीचं स्वरूप बदलत मातीवरची कुस्ती मॅटवर आली.

भारतीय कुस्तीच्या इतिहासात महाराष्ट्राचं नाव पैलवान खाशाबा जाधव यांनी कायम कोरलंय. त्यांनी राजधानी हेलसिंकी इथं ऑलिंपिक स्पर्धेत १९५२ ला देशाला कास्यपदक मिळवून दिलं. देशात हरियाणा, पंजाब, दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यात कुस्तीचा प्रचार आणि प्रसार चांगला झाला आहे.

हेही वाचा: किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी?

पुस्तकाला समकालीन संदर्भही

महाराष्ट्रात कोल्हापूर बरोबर सांगली, पुणे, सातारा, नगर, उस्मानाबाद या ठिकाणी कुस्तीची मोठी मैदानं भरतात. तिथं कुस्तीला उदंड प्रतिसाद मिळतो. हे सगळे पुजारी यांनी टिपले आहेत. श्रीपती खंचनाळे, गणपतराव आंदळकर, मारुती माने, दीनानाथसिंह, हजरत पटेल, विनोद चौगुले, योगेश दोडके,  संतोष वेताळ, विकास जाधव यासह हिंदकेसरी झालेल्या मल्लांविषयी त्यांनी या पुस्तकात दिलेली माहिती वाचनीय आहे.

पुजारी यांच्या या पुस्तकाला समकालीन खूप चांगला संदर्भ आहे. राज्यातल्या कुस्तीच्या प्रमुख प्रशिक्षण केंद्रांची माहिती आणि वस्ताद यांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत. कुस्ती शौकिनांनी या आपल्या मुलगा एखाद्या दाखल करायचा असेल तर त्यासाठी ही अत्यंत उपयुक्त माहिती आहे. अशी खूप माहिती पुस्तकात आहे.

कुस्तीचे नियम, कुस्तीतला डाव, मातीवरची कुस्ती, कुस्तीतला प्रमुख डाव, जगातल्या कुस्तीचे प्रमुख प्रकार, गाजलेल्या लढती, पैलवान आहार काय घेतात, त्यांचा व्यायाम कसा चालतो इथपासून अनेक बारीकसारीक गोष्टींचा आढावा त्यांनी घेतलाय.

पुस्तकाचे नाव: भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा
लेखक: शंकरराव पुजारी
प्रकाशन: तेजस प्रकाशन, कोल्हापूर
पाने: २०४
किंमत: ३००

हेही वाचा: 

व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!

डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक

गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह

ब्राह्मणी अरेरावी आणि मुसलमानी धर्मवेड यांना आव्हान देणारे संत नामदेव

आपल्यावरच्या नियंत्रणासाठीच चाललाय सोशल मीडिया आणि सरकार यांच्यातला संघर्ष