पाचवीला पुजलेल्या प्लेग लॉकडाऊनमुळेच जगाला शेक्सपिअर मिळाला!

२३ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


थोर साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांच्या जन्म तारखेबद्दल वाद असले तरी थडग्यावर त्यांच्या मृत्यूची तारीख आजची म्हणजे २३ एप्रिल ही दिलीय. त्यांचा जन्म झाला तेव्हाही त्यांच्या गावात प्लेगची साथ पसरली होती. पुढे त्यांची कारकीर्द ऐन रंगात असताना युरोपात पुन्हा एकदा प्लेगनं थैमान घातलं होतं. म्हणूनच शेक्सपिअर यांच्या नाटकांवरही आपल्याला प्लेगचा प्रभाव दिसतो.

१६ व्या शतकात युरोपमधे ब्युबोनिक प्लेग नावाचा एक साथरोग पसरला होता. उंदरापासून होणाऱ्या या साथरोगात अनेक लोक मरत होते. इंग्लडमधल्या ऍवन नदीवरच्या भागात वसलेल्या स्ट्रॅटफोर्ड या गावात एक जोडपं राहतं होतं. त्यांची दोन मुलं या प्लेगच्या आजारानं दगावली. आणि आता आपल्या तिसऱ्या अपत्याला, तीन महिन्याच्या मुलाला प्लेग होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःला त्या इवल्याशा बाळापासून दूर ठेवलं. त्यांचं हे तिसरं अपत्य म्हणजे जगप्रसिद्ध साहित्यिक विल्यम शेक्सपिअर. प्लेग या आजारानं शेक्सपिअर यांचं संपूर्ण आयुष्यच घडवलंय.

शिक्षण अर्धवट सोडलं

शेक्सपिअर यांच्या जन्माची नेमकी तारीख काय होती, याबद्दल अभ्यासकांमधे मतभेद आहेत. शेक्सपिअर एका ख्रिश्चन कुटुंबात जन्मले होते. बाप्तिझ्मा ही ख्रिश्चन धर्मातली एक प्रथा असते. मूल जन्माला आलं की त्याला येशूच्या पवित्र पाण्यात बुडवून त्याचा आत्मा पवित्र केला जातो. त्यानंतरच ते मूल ख्रिश्चन धर्माचं म्हणून ओळखलं जातं.

शेक्सपिअर यांच्या थडग्यावर त्यांच्या बाप्तिझ्माची तारीख २६ एप्रिल १५६४ अशी लिहिण्यात आलीय. म्हणजेच २६ एप्रिलला त्यांचा जन्म झाला असावा. तर त्यांच्या मृत्यूची तारीख आजची म्हणजेच २३ एप्रिल १६१६ अशी आहे. आपलं ५२ वर्षांचं आयुष्य रसरशीतपणे जगणाऱ्या या थोर नाटककाराचा आज स्मृतिदिन. शेक्सपिअरचा स्मृतिदिन जागतिक पुस्तक दिन म्हणून जगभरा साजरा केला जातो.

मराठी विश्वकोशात दिलेल्या माहितीनुसार, 'शेक्सपिअर यांच्या वडलांचा अकाली मृत्यू झाला. त्यामुळे एकाएकी या कुटुंबाला हलाखाचे दिवस बघायला लागले. तेव्हा आपलं शिक्षण अर्धवट सोडून शेक्सपिअर यांनी आपल्या बापाचाच धंदा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना फारसं यश आलं नाही. शेवटी १५८५ मधे स्ट्रॅटफोर्ड हे आपलं गावठाण सोडून शेक्सपिअर लंडनला गेले. नाटकांमधे भूमिका, नेपथ्य असा उमेदवारीचा काळ पार पाडला. त्यानंतर शेक्सपिअर यांनी स्वतःची नाटकं लिहायली घेतली असावीत, असं म्हटलं जातं.'

हेही वाचा : पोरांनो, घरी बसून काय करावं असा प्रश्न पडलाय. मग त्याचं उत्तर न्यूटन देतो

शहर लॉकडाऊन झालं

शेक्सपिअर यांची कारकीर्द ऐन रंगात असतानाच युरोपला पुन्हा प्लेगनं पछाडलं. त्यानंतर जवळपास पुढची वीस वर्ष प्लेग लंडनमधे उच्छाद मांडत होता. प्लेगमुळे मरणाऱ्यांची संख्या आठवड्याला ३० टक्क्यांपेक्षा जास्त गेली की प्लेगची साथ सुरू झालीय हे जाहीर होत असे. त्यानंतर इंग्लडमधली सगळी नाट्यगृह, दुकानं बंद करायची असा नियम होता.

थोडक्यात, शहर लॉकडाऊन केलं जात होतं. आजच्याप्रमाणे माणसं घरात क्वारंटाईन होत होती. पण या क्वारंटाईनच्या काळात शेक्सपिअर काही आपल्यासारखं हातावर हात ठेवून स्वस्थ बसले नव्हते. या काळात त्यांनी अनेक महाकाव्य आणि नाटकं लिहिली. त्यांची ही सगळीच नाटकं पुढे जगप्रसिद्ध झाली. आणि शेअक्सपिअर यांचं जगात नाव झालं. लॉकडाऊनच्या काळात घेतलेल्या कष्टाचं हे फळ होतं, असं आत्ता आपण त्यांच्या कामाकडं बघताना म्हणून शकतो.

प्रेमाची देवता प्रेमात पडते

द गार्डीयन वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, '१५९२ मधे युरोपात पहिली प्लेगची साथ सुरू झाली. तेव्हा जवळपास एकट्या लंडनमधे १० हजार लोकांना प्लेगमुळे आपला जीव गमवावा लागला होता. लंडनमधली सगळी नाट्यगृह १४ महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आली होती. या काळात शेक्सपिअर यांनी आपलं पहिलं पुस्तक म्हणजे  वीनस अँड ओडोनिस हे महाकाव्य लिहिलं.'

ओडोनिस हा पृथ्वीवरचा एक खूप सुंदर तरूण मुलगा आणि वीनस ही प्रेमाची देवता यांची गोष्ट शेक्सपिअर यांनी या काव्यात मांडलीय. ओडोनिसचं सौंदर्यपाहून वीनस त्याच्या प्रेमात पडते आणि त्याच्याकडून एक किस मिळावं यासाठी त्याला विनवणी करत असते. पण ओडोनिसला प्रेमाबिमात काहीही रस नसतो. शिकार करणं एवढं एकच त्याचं ध्येय असतं. शेवटी या शिकारीतच त्याचा मृत्यू होतो, असं चित्रण शेक्सपिअर यांनी केलंय.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

लॉकडाऊनमधे लिहिली नाटकं

१६ व्या शतकाच्या सुरवातीला प्लेगने पुन्हा डोकं वर काढलं. १६०३ मधे आलेल्या प्लेगच्या साथीनं तर शेक्सपिअर यांच्यासोबत काम करणाऱ्या ५ माणसांचा जीव घेतला. प्लेग असाच अधून मधून डोकं वर काढत होता. अखेर १६१० मधे एक जोराचा झटका देऊन प्लेग शांत झाला ते साधारण ३० हजार लोकांचे जीव घेऊनच.

या दुसऱ्या साथीच्या काळात शेक्सपिअर यांनी अनेक दर्जेदार नाटके लिहिली. एंटोनी अँड क्लिओपात्रा, कोरीओलेनस, टाईमन ऑफ अथेन्स अशा अनेक दर्जेदार नाटकांचा यात समावेश होतो. त्यातली किंग लिअर आणि मॅकबेथ ही दोन नाटकं तर खूप गाजली.

किंग लिअर या नाटकात शेक्सपिअरने राजा आणि त्याच्या तीन मुलींची गोष्ट सांगितलीय. आपली प्रशंसा करणाऱ्या तीनपैकी दोनच मुलींना राजा त्याची सगळी संपत्ती वाटून देतो. पण संपत्ती मिळाल्यावर त्या दोघी राजाविषयी द्वेष व्यक्त करू लागतात. राजाला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होतो. आपली चूक सुधारण्यासाठी काही प्रयत्न करायच्या आधीच राजावर भयंकर संकट कोसळतं, अशी या नाटकाची पटकथा आहे.

तर मॅकबेथमधे राजा बनण्याची इच्छा असलेल्या एका सैनिकाची गोष्ट सांगितलीय. सत्ता मिळवण्याच्या इच्छेनं हा सैनिक काय वाटेल ते करतो. पण शेवटी अपराधीपणाच्या भावनेनं  स्वतःच वेडापिसा होऊन आपले प्राण सोडतो. शेक्सपिअरची सगळी नाटकं ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका या प्रकार मोडणारी म्हणून ओळखली जातात. एकीकडे माणसं मरत असताना शेक्सपिअरच्या मनात या दुःखद भावनांशिवाय दुसरं असणार तरी काय होतं!

नाटकांवर प्लेगचा प्रभाव जाणवतो

कोलंबिया युनिवर्सिटीतले प्राध्यापक जेम्स शॅपरो हे शेक्सपिअरच्या नाटकांचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. द अटलांटिक या अमेरिकन न्यूजपेपरशी बोलताना त्यांनी शेक्सपिअरच्या नाटकांवर आणि महाकाव्यांवर नेहमी प्लेगच्या साथीचा परिणाम दिसून येतो, असं सांगितलंय.

प्लेगची पहिली साथ ओसरल्यानंतर साधारण एक वर्षाने शेक्सपिअर यांनी रोमिओ आणि ज्युलियट हे जगप्रसिद्ध रोमँन्टिक नाटक लिहिलं होतं. या नाटकातंही प्लेगचा हलकासा उल्लेख आढळतो. ज्युलियटचा मृत्यू झालाय अशी खोटी बातमी रोमिओला देण्यासाठी गेलेल्या पात्राला प्लेगचं इन्फेक्शन झालंय असं समजून त्याचं विलगीकरण केलं जातं. त्यामुळे रोमिओपर्यंत तो खोटा संदेश पोचत नाही, असं चित्रण शेक्सपिअर यांनी रंगवलंय.

शिवाय १९५३ मधे लिहिलेल्या आपल्या वीनस अँड ओडोनिस या महाकाव्यातही प्लेगचा उल्लेख सापडतो, असं शॅपरो सांगतात. वीनस ओडोनिसला किस करायला सांगते म्हणजे एका भयानक वर्षापासून इन्फेक्शन दूर घेऊन जाण्याचा तिचा प्रयत्न आहे, असं शेक्सपिअरने लिहिलं असल्याचं शॅपरो म्हणतात.

हेही वाचा : १९४७ मधेच कोरोनासारख्या रोगाचं तंतोतंत वर्णन करणारी कादंबरी

प्लेग हा टॅबूच झाला होता

किंग लिअर या नाटकातही आपल्या एका मुलीला शाप देताना तिला प्लेगची लक्षणं दिसावीतस, असं शेक्सपिअरने लिहिलंय. प्लेग सोअर म्हणजे मोठे मोठे लाल फोड यावेत, गळूसारखा प्रकार तुला व्हावा, असा डायलॉग या राजाच्या मुखातून शेक्सपिअरने लिहिलाय. मॅकबेथ या नाटकातंही प्लेगचा उल्लेख आढळतो.

शॅपरो म्हणतात, ‘शेक्सपिअर यांची नाटकं शोकात्मक असत. शेक्सपिअरच्या नाटकात माणसांचे मृत्यू वेगवेगळ्या प्रकारे होतात. पण कुणाचाही मृत्यू प्लेगमुळे होत नाही. शेक्सपिअरच्या वेळी प्लेग हा एक प्रकारचा टॅबूच झाला होता.’ आजच्या कोरोनापेक्षा कितीतरी जास्त भीती या प्लेगनं लोकांच्या मनात बसवली होती, हेच यावरून कळतं.

थोडक्यात काय तर, लॉकडाऊनचा आपण नीट डोकं लावून करिअर घडवण्यासाठी उपयोग करू शकतो. कोरोनामुळे तर नोकरीधंद्याची मोठी आबाळ होणार आहे. बेरोजगारीचा धंदा जोरात निर्माण होणार आहे. अशावेळी आपल्यालाही जगप्रसिद्ध शेक्सपिअर होण्याची संधी आहे.

हेही वाचा : 

पुस्तक माणसाला कसं घडवतं?

वाचकानं सजगपणे वाचन संस्कृती कशी घडवावी?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा

आज लेनिनचं भारताशी असलेलं नातं समजून घ्यावंच लागेल

पालघर झुंडबळी सत्य कळण्यासाठी सहा प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत

शाहू महाराजांच्या एन्फ्ल्युएन्झा मंडळानं स्पॅनिश फ्लूला रोखून दाखवलं!

प्लेगची साथ रोखण्यासाठी गांधीजींनी झोपडपट्टीत उभारलेल्या जुगाड हॉस्पिटलची गोष्ट