शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा

२६ जून २०१९

वाचन वेळ : ९ मिनिटं


आज २६ जून. छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस. कोल्हापूरच्या राजगादीवर बसल्यानंतरही त्यांच्यातला जाणता राजा कसा जिवंत होता हे त्यांचं कार्य समजून घेतल्यावर लक्षात येतं. त्यांची भाषणंही तशीच होती. त्यांना कृतीची जोड होती. नाशिक इथे निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभेतलं शाहू महाराजांचं हे अध्यक्षीय भाषण.

आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत राजर्षी शाहू महाराजांचं स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. शाहू महाराजांनी आपल्या कारकीर्दीत अनेक भाषण केली. त्यापैकी काही निवडक भाषणांचा डॉ. एस. एस. भोसले यांनी चिकित्सक अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासातून 'क्रांतिसूक्तेः राजर्षी छत्रपती शाहू' हे पुस्तक साकारलं.

१९७५ मधे शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त कोल्हापूर जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन हे पुस्तक काढलं. नंतर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने संदर्भात भर घालून सुधारित आवृत्ती प्रसिद्ध केली. डॉ. एस. एस. भोसले यांनी संपादित केलेल्या 'क्रांतिसूक्तेः राजर्षी छत्रपती शाहू' या ग्रंथाचा 'A Royal Philosopher Speaks' नावाने इंग्रजीतही अनुवाद करण्यात आला.

या पुस्तकात 'सोशल रिफॉर्म + एकी = स्वराज्य' नावाने महाराजांचं एक भाषण आहे. नाशिक इथे निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभेतलं हे भाषण आहे. त्याकाळी पुण्यातले काही खोडसाळ पत्रकार शाहू महाराजांबद्दल उलटसुलट बातम्या देत होते. या पत्रकारांचा खरपूस समाचार घेत महाराजांनी आपल्या भाषणातून पुरोगामी राष्ट्रवादाची मांडणी केली. उच्चनीचतेची, जातिभेदाची दरी बुजवून समाज एकसंध बनतो. यातूनच  खरा देशाभिमान जागृत होऊन जनहितवर्धक राष्ट्रवाद वाढीला लागण्यास मदत होईल, असं महाराजांनी स्पष्ट केलं. शाहू महाराजांच्या या भाषणाचा हा संपादित अंश.

 

मित्रहो! आजच्या ह्या सभेच्या प्रसंगी तुम्ही मला प्रेमाने आमंत्रण केले, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमची संस्था पाहून मला फार संतोष वाटतो.

हल्लीच्या तीव्र जीवनकलहाच्या काळात कोणताही समाज शिक्षणसंपन्न असेल तरच तो टिकाव धरु शकेल, ती गोष्ट तुमच्यातील पुढाऱ्यांना पटली आहे. याचा आनंद वाटतो. तुमच्यासारख्या हतभागी आणि विपन्न ज्ञातीला पुढे यावयाचे असेल तर याबद्दलचा प्रयत्न तुम्हांतील पुढाऱ्यांनी केला पाहिजे. स्वावलंबन ही यशाची किल्ली आहे. या दृष्टीने, या संस्थेचे चालक जे तुम्हापैकीच आहेत त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. या प्रसंगी मोकळ्या मनाने, माझ्या अंतकरणातील तुमच्या हिताचे विचार मला कळवावेसे वाटतात.

प्रथमतः तुम्हाला माझे सांगणे आहे की, तुमच्या उद्धाराच्या सर्व आशांची मदार आमच्या ब्रिटिश साम्राज्याच्या चिरस्थायीपणावर अवलंबून आहे. समतेच्या तत्वाच्या जोरावर तुम्हाला झगडावयाचे आहे.

समता, बंधुता आणि स्वातंत्र्य यांचे उगमस्थान ब्रिटिश राष्ट्र आहे. गेल्या महायुद्धाच्या आपत्तीचे परिणाम जगाला आता कडक रितीने जाणवू लागले आहेत. अशा वेळी आमच्यावर जर ब्रिटिश साम्राज्याचे छत्र नसते तर आपल्या कोट्यवधी देशबंधूंना अन्नपाण्याशिवाय तडफडून मरण्याची पाळी आली असती. परंतु हल्ली या देशात एकही मनुष्य उपाशी मरत नाही. यावरुन आमच्या साम्राज्याची महती किती वर्णन करावी. तरी या गोष्टी नेहमी डोळ्यांपुढे ठेवून तुम्ही ब्रिटिश साम्राज्याची अंतकरणपूर्वक राजनिष्ठ आणि कृतज्ञ राहून लढाईच्या अथवा शांततेच्या काळात साम्राज्याचे हित पाहिले पाहिजे. त्यास हरएक बाजूने मदत करण्यास तयार राहिले पाहिजे.

हेही वाचा: शाहू महाराजांवरचं पुस्तक वाचकांच्या भेटीला आलंय? आपण वाचलंत का?

आता मी एका नेटिव्ह संस्थानचा राज्यकर्ता असल्याने ब्रिटिश मुलुखात येऊन मी भाषणे का करावी असा माझ्यासंबंधाने एक आक्षेप घेण्यात येतो. त्यास एक तर मी राजा या नात्याने तुम्हात आलो नसून आपल्या कोट्यवधी देशबंधूंचा एक हितचिंतक आणि सेवक या नात्याने आलो आहे. जर कोणी प्रेमाने माझे विचार मला विचारले तर ते न सांगणे सभ्यपणाचे होणार नाही; किंबहूना विचारणाऱ्यांचा मी उपमर्द केला असे होईल.

शिवाय दुसरे असे की, नेटिव्ह संस्थाने ही साम्राज्याशी एकजीव झालेले त्याचे अवयव आहेत. साम्राज्यातील कोट्यवधी व्यक्तींचे साम्राज्याशी प्रजा या नात्याने किंवा सनदा, तहनामे इत्यादी द्वारांनी संबंध जोडलेले आहेत. अर्थात हा संबंध कोणताही असला तरी साम्राज्यातील आम्हा सर्वांचे हितसंबंध एकच आहेत. म्हणून साम्राज्याच्या आणि त्यातील प्रजाजनाच्या कल्याणाच्या गोष्टीत मन घालून त्यासंबंधी आपले विचार प्रदर्शित करणे यात वावगे असे काहीच नाही. किंबहुना तो माझा हक्कच आहे असे मी मानतो.

आमच्या धर्मात जातिभेदामुळे जो उच्चनीचपणा आलेला आहे तशा प्रकारचा जन्मजात भेदभाव जगाच्या पाठीवरील दुसऱ्या कोणत्याही धर्मात नाही. या जातिभेदाचे अत्यंत हिडिस स्वरूप जर कोठे असेल तर इतर जातींकडून तुम्हाला ज्या रीतीने वागवण्यात येते त्या रीतीत दिसून येते. तुम्ही आमचे बंधू असता तुम्हाला अस्पृश्य म्हणून लेखून, मांजरे-डूकरे-कुत्रे यापेक्षाही तुम्हाला नीचपणाने वागवण्यात येते ही किती लज्जेची गोष्ट आहे बरे? ही अस्पृश्यता अलिकडे केव्हातरी मध्येच घुसडून दिली असली पाहिजे कारण या नासिकसारख्या क्षेत्राच्या ठिकाणी अनादि कालापासून महार लोकांच्या स्नानाचे कुंड इतर जातींच्या कुंडामध्येच आहे.

अर्थात त्या ठिकाणी स्पर्शास्पर्शाचा विधीनिषेध असणे शक्य नाही. असे असता हल्लीच्या व्यवहारात तुम्हाला आम्ही अस्पृश्य म्हणून दूर ठेवतो, हि किती शरमेची गोष्ट आहे! या प्रकारासंबंधाने समाजातील श्रेष्ठ जातींना जसजशी खंती वाचेल त्यामानाने त्यांच्या ठिकाणी खऱ्या स्वदेशाभिमानाचे बीजारोपण झाले असे होईल. सुशिक्षित जातीतून जेव्हा हा खरा स्वदेशाभिमान संचार करु लागेल तेव्हाच त्यांच्याकडून तुम्हाला टिकाऊ अशी काहीतरी मदत होईल.

माझ्या राज्याची अधिकारसूत्रे हाती आली तेव्हा कोल्हापूरात सर्वत्र एकाच सुशिक्षित जातीचे वर्चस्व होते. ऑफिसातून मागासलेल्या जातीचा एकही नोकर दिसत नव्हता. म्हणून त्यांचा दर्जा वाढविण्याकरिता मागासलेल्या सर्व जातींच्या लोकांना नोकरी देण्याचे धोरण मला ठेवावे लागले. त्यातील कित्येकांना वकिलीच्या सनदा दिल्या. त्यांच्या शिक्षणासाठी ‘स्पेशल स्कॉलरशिप्स’ ठेवून त्यांना निरनिराळी बोर्डिंगेही करुन दिली. माझ्या पंचवीस वर्षांच्या प्रयत्नाचे आता कुठे सुपरिणाम दिसू लागले आहेत. त्यांचे पाऊल आता इथे बरेच पुढे चालले आहे. त्यांची स्थिती आता नुकत्याच चालू लागलेल्या मुलासारखी आहे.

तुमचा समाज मात्र अजून रांगण्याच्या स्थितीतही आलेला नाही. म्हणून आता तुम्हालाच वर काढण्याकडे माझे लक्ष वेधले आहे. हरएक प्रकारचे उत्तेजन तुम्हाला देण्याचे माझे धोरण आहे. तुमच्यासाठी माझ्या राज्यात मी आतापर्यंत काय कार्य केले आहे, हे मी सांगत बसण्यापेक्षा माझ्या राज्यातील ज्ञातीबंधूच तुम्हाला ते सांगतील.

अलिकडे थोड्या दिवसाखाली माझ्या इलाख्यात तुमच्या ज्ञातिबंधूंची सभा झाली. त्या सभेस मी हजर होतो. त्यावेळी मी लहानसे भाषणही केले. ते भाषण वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्यानंतर पुण्यातील काही पत्रकारांनी आपला अमूल्य वेळ आणि जागा खर्च करुन मजसारख्या अज्ञानाने केलेल्या भाषणावर टीका केली. ते योग्यच झाले, परंतु टीका करताना त्याच्या हातून माझ्या भाषणाचा विपर्यास झालेला आहे.

त्याचे कारण माझे मराठी भाषेवर प्रभुत्व नसल्याने कदाचित माझ्या मनातील विचार मला बरोबर व्यक्त करता आले नसावेत. यामुळे विपर्यास करण्यास जागा मिळाली आणि ब्राम्हणजातीचे पाय मागे ओढण्यासाठी झालेल्या कटाचा मेरुमणी असे मला म्हटले.

मेरुमणी होण्याच्या योग्यतेचा मी नाही. माझ्या भाषणाचा आशय इतकाच होता की, जगाच्या पाठीवर हिंदू धर्माशिवाय कोणत्याही धर्मात जातिभेदभाव नाहीत. हिंदू धर्मात मात्र जातिभेदभाव आहेत. त्यामुळे मी कालच मराठ्यांच्या परिषदेत भाषण केल्याप्रमाणे, पूर्वी परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय केली तरी ब्राम्हणी वर्चस्वाची पीछेहाट होऊन पुन्हा राम आणि कृष्ण हे क्षत्रिय देव्हाऱ्यात बसले.

हेही वाचा: भाई माधवराव बागलः कोल्हापुरात उभारला आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा

शाहू महाराजांच्या वंशजास पेशव्यांनी लुप्तप्राय केले, तरी पेशवाईच्या अस्ताबरोबर सातारच्या प्रतापसिंह महाराजांचा उदय झाला. प्राचीन काळापासून या उलाढाली होत असून त्यांच्या बुडाशी आमचा जातिभेदच आहे. अशा उलाढाली पुन्हा होणे इष्ट नाही. म्हणून मोठ्या जोराने मी सांगतो की, हा जातिभेद मोडून समाजाचा पाया शुद्ध केल्याशिवाय आम्हाला ‘सेल्फ गव्हर्नमेट’ दिले तरी नको. कारण ते वरील अनुभवामुळे ढासळून पडणारच म्हणून पुन्हा जोराने सांगतो की, माझे असे ठाम मत आहे की, आधी ‘सोशल रिफॉर्म’ होऊन आपली एकी झाली म्हणजेच आम्हाला स्वराज्याचे पूर्ण फायदे मिळतील.

थोड्या दिवसांपूर्वीच मुंबईत मी ‘सेंट कोलंबस स्कॉच मिशन’ मध्ये गेलो होतो. अमेरिकन मिशनचा आणि माझा फार दिवसांचा परिचय आहे. दोन्ही ठिकाणची माणसे म्हणजे मिस सदरलंड, डॉ. व्हेल आणि डॉ. वॉन्लेस हे सातासमुद्रापलिकडून इकडे आले असून, अन्नवस्त्रपलिकडे कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ निष्काम आणि परोपकारबुद्धीने अहोरात्र आमच्या लोकांना विद्यादान आणि जीवनदान करीत आहेत. त्यांनी आमची मने न दुखवावी म्हणून, आपल्या संस्थेतून आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आमच्या जातिधर्माप्रमाणे कडक ठेविलेली आहे. अशा उदाहरणाने ते आमच्या मनाची आणि शरीराची जोपासना करीत आहेत. अर्थात मी तरी त्यांना 'अवतारी माणसे'च म्हणतो.

आमच्यात गांधीसारख्या काही व्यक्ती अवतारी आहेत आणि त्यांच्याबद्दल माझ्या ठिकाणी पूज्यबुद्धी आहे. परंतु वरील मिशनरीप्रमाणे कोणताही भेदभाव न ठेवता निष्काम आणि निस्वार्थ बुद्धीने समाजाची सेवा ती ईश्वराचीच सेवा ही भावना मनात बाळगून रंजल्यागांजलेल्यांना वर आणण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या संस्था आमच्यात कितीशा आहेत?

मिस्टर गांधींच्या संबंधाने माझ्या भाषणाचा एका एडिटरने विपर्यास केलेला आहे. मी वर सांगितलेच आहे की, गांधींच्या संबंधाने माझी अत्यंत पूज्यबुद्धी आहे. त्याप्रमाणे श्रद्धानंद किंवा मिसेस बेझंट ही माणसे अवतारी आहेत. तथापि त्यांच्या हातून चुका होणे अशक्य आहे हे मात्र मला कबूल नाही. या चुका कबूल न करण्याइतके ते हटवादी नाहीत.

आपल्याकडून झालेल्या चुका मिस्टर गांधी, श्रद्धानंद यांनी स्वतःच कबूल केल्या आहेत. अर्थात त्या संबंधाने माझ्या भाषणात उल्लेख आला म्हणून खुद्द मिस्टर गांधींनाही राग येणार नाही. तथापि या पत्रकाराने माझ्यावर केलेल्या टीकेमुळे माझ्याबद्दल गांधींचा आणि सर्व जगाचा निष्कारण गैरसमज होणार आहे. मिस्टर गांधीसारखी पूज्य माणसे आमच्याकडे आहेत, पण त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे.

सर्व समाजाचा विचार करताना, समाजात सामान्यतः पुढारी म्हणून जे वावरतात त्यांचे शील, नीतिधैर्य वगैरे सद्गुण कोणत्या कसाचे आहेत तेच पाहिले पाहिजे. महाराष्ट्रात सुशिक्षित जातींपैकी बहुतेक पुढाऱ्यांच्या ठिकाणी पतित जातींच्या संबंधाने सहानभुतीचा पूर आल्याचे कित्येकदा दिसते. परंतु त्यांच्याशी सहभोजनाद्वारे एकी करण्यासंबंधाने प्रत्यक्ष कृतीचा प्रसंग आला की, हे लोक आपल्या बायकामुलांची सबब पुढे करितात. परंतु थोड्या विचारान्ती ही सबब अगदी अगदी क्षुल्लक आहे, असे तेव्हाच दिसून येते.

कारण अनादि कालापासून हिंदू स्त्रिया आपल्या नवऱ्याकरिता सती जाण्यासही मागेपुढे पाहत नाहीत, असे इतिहास सांगतो. मग असल्या सहभोजनासारख्या क्षुद्र बाबतीत आपल्या पत्नीचा अडथळा होतो, असे म्हणणे आपल्या सकल हिंदु कुलस्त्रियांचा उपमर्द करणे नव्हे काय? अर्थात अंगी नीतिधैर्य नसल्यामुळे किंवा ही गोष्ट मनापासून नको असून, देखावा करण्याची मात्र प्रबळ इच्छा असल्यामुळे ही बायकांची ढाल लपवण्यासाठी पुढे येते, असे मानले पाहिजे.

तेव्हा अशा नामर्द मनोवृत्तीच्या पुढाऱ्यांच्या सहानभूतीचा तुम्हाला कितीसा उपयोग होणार? त्याप्रमाणे परवा एका प्रसंगी निपाणी येथे एका विद्वान ब्राम्हण वक्त्याने ‘आम्हास स्वराज्य मिळाले तर आपण अस्पृश्य मंडळींबरोबर सहभोजन करण्यास आज तयार आहोत’ असे म्हटले. आता मानलेल्या अस्पृश्यांच्या ठिकाणी जर खऱ्या बंधुत्वाची भावना बाणलेली असेल, तर त्यांच्याशी भोजन करणे, यासारखी क्षुद्र गोष्ट करण्यास स्वराज्य मिळण्यासारखी प्रचंड अट कशाला पाहिजे? यावरुन अस्पृश्यांसंबंधाने आपली बंधुभावना असल्याचे हे वरवर सांगतात, त्यांचा खरेपणा किती आहे हे स्पष्ट होते, तरी त्यांच्या मदतीवर विशेष भर न देता आपल्या ज्ञातिबंधूंना विद्यामृताचे जीवन देण्याला तुम्हीच कंबरा कसल्या पाहिजेत असे माझे तुम्हास कळकळीचे सांगणे आहे.

हेही वाचा: चला, आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होऊया!

माझ्या राज्यात मागासलेल्या जातींना वर आणण्याबद्दल माझे जे प्रयत्न झाले आहेत, त्याबद्दल उच्च म्हणविणाऱ्या एका सुशिक्षित जातीचा माझ्यावर घुस्सा झालेला आहे. परंतु ज्याप्रमाणे एखादा डॉक्टर किंवा लेडी डॉक्टर ही अगदी अशक्त आणि दुबळ्या मुलाला अन्न आणि औषधे देऊन त्याची जोपासना सर्वांपेक्षा विशेष काळजीने करुन, त्याला इतर मुलांच्या जोडीला आणून बसवितात त्याप्रमाणे आम्ही अस्पृश्य मानलेल्या लोकांना वर आणले पाहिजे.

पुण्यनगरीतील कित्येक लोकांनी माझ्यावर असा आरोप आणला आहे की, महाराज पंक्तिप्रपंच करुन आपल्याच जातीला पुढे आणतात. मी असे निक्षून सांगतो की, ही गोष्ट निखालस खोटी आहे. श्री शिवछत्रपतींच्या नावाला किंवा त्याच्या गादीला बट्टा लागेल असे नीच वर्तन माझ्याकडून होणार नाही. राज्याधिकारसूत्रे हाती आल्यानंतर मागासलेल्या जातींना वर आणल्याचे मी अनेक प्रयत्न केले. परंतु यावरुन ब्राम्हणाचे ठिकाणी माझा द्वेषभाव आहे, असे मात्र मुळीच नाही.

अनेक ब्राम्हण माझ्या पूर्ण विश्वासाचे अंमलदार आणि सल्लागार आहेत. अनेक ब्राम्हणांना मी इनामे वगैरे दिली आहेत आणि इतर जातीप्रमाणे त्याच्या कल्याणाची इच्छा बाळगलेली आहे. या सर्व गोष्टी माझे ब्राम्हण प्रजाजनच या विद्वान एडिटरला सांगतील. सारांश, अशक्त मुलाला ताकद आणण्यासाठी, त्याची आई त्याची जशी काळजी बाळगते त्याचप्रमाणे माझे हे प्रयत्न आहेत.

माणगाव येथील माझ्या भाषणात प्रजाजनांना लवकरच थोड्या प्रमाणावर स्वराज्य देण्याचा माझा विचार असल्याचा उल्लेख होता. यावर एका एडिटराने ‘लौकरच म्हणजे किती वर्षात आणि थोड्या प्रणावर म्हणजे किती आणे, याचा खुलासा कोणी भविष्यवादी करील काय?’ असा सवाल केला आहे. त्यावर माझे म्हणणे इतकेच आहे की, हा खुलासा ताबडतोब करता आला असता तर मला आनंद झाला असता.

परवा सोलापुरास जहाल मवाळांचा जो तंटा झाला त्याची हकीकत देताना एका पत्रकाराने ‘पुण्याहून किंवा कोल्हापुरहून गेलेल्या तीन हजार रुपयांच्या थैलीचा’ उल्लेख केला आहे. त्यास ही थैली माझ्याकडून नेली असे ध्वनित करण्याचा त्याचा उद्देश असेल तर माझे इतकेच सांगणे आहे की, माझ्याकडून थैली गेली ही गोष्ट निखालस खोटी आहे. मागासलेल्यांच्या हिताची मला कळकळ आहे आणि त्यांनी योग्य कारणासाठी रक्कम मागितली असती तर ती मी दिलीही असती. पण मी रक्कम दिली नसता गप्पपणे दिली असे ध्वनित करुन मजवर भ्याडपणाचा नीच आरोप करण्यात त्या पत्रकाराला काय वाटले असेल ते असो.

याप्रमाणे आमच्या पत्रकारांचे माझ्यावर प्रेम आहे; तथापि मला जे वाटते ते मी करताना यांची पर्वा करीत नाही. मी अज्ञानी आहे आणि त्यांच्या चौथ्या हिश्श्यानेही माझी विद्वत्ता नाही. तथापि मला जे वाटते ते मी मनोभावाने करतो. अर्थात इतरांच्या रागाची किंवा लोभाची पर्वा बाळगण्याचे मला तरी कारण नाही.

सरतेशेवटी माझे तुम्हाला इतकेच सांगणे आहे की, तुमचे हे पवित्र कार्य तुम्ही न डगमगता अखंड चालू ठेवा आणि परमेश्वर तुम्हाला या कार्याला पूर्ण यश देईल असा मला भरवसा वाटतो.

हेही वाचा: 

'वारीच्या वाटेवर' ही महाकादंबरी म्हणजे भागवत धर्माची बखर

इस्लामविषयी साध्यासोप्या मराठीत ए टू झेड माहीती देणारं पुस्तक बाजारात

मोदी सरकारमधले बडे अधिकारी कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामे का देताहेत? 

आपली आजीही बावन्नला पन्नासवर दोन म्हणते, मग वादाचं कारण काय?

इस्लामविषयी साध्यासोप्या मराठीत ए टू झेड माहीती देणारं पुस्तक बाजारात