सामूहिक अंतमर्नाला सहजतेने साद घालण्याची आणि तितक्याच सहजतेने हाक मिळविण्याची विलक्षण हातोटी दिलीपकुमार यांच्याकडे होती. त्यामुळे कलांचा भाव व्याकुळतेने, श्रद्धापूर्वक आस्वाद घेणार्या भारतीय मानसिकतेला हा अभिनेता ‘घरातला’ वाटणं स्वाभाविक होतं. श्रद्धाळू भारतीय समाजमनाला भावनेच्या लाटांवर झुलायला आवडतं, त्याला या शोकनायकाच्या सिनेमांनी अलगद ऊब दिली.
स्वातंत्र्यापूर्वीची काही मोजकी वर्ष आणि स्वातंत्र्यानंतरची भारताची जडणघडण होत असताना सिने संस्कृतीचे एक शिल्पकार दिलीपकुमार नवे व्याकरण मांडत होते. पाकिस्तानातल्या पेशावर इथल्या फळविक्रेत्याचा मुलगा युसूफ ते अभिनेता दिलीपकुमार असा या व्याकरणाचा प्रवास होता. ते आता अटळ अशा अनंताच्या प्रवासाला निघून गेले.
हेही वाचा: भारत माता की जय म्हणणं हा माझा अधिकार, जावेद अख्तर यांचं वायरल भाषण
पाच दशकांच्या रूपेरी पडद्याचा आनंदाचा ठेवा ही या प्रवासाची बाकी. १९४४ मधल्या ‘ज्वारभाटा’ या पहिल्या सिनेमापासून त्यांची ही दमदार वाटचाल सुरू झालेली. सिनेमा निर्मितीच्या प्रक्रियेचा सुरवातीचा हा खडतर काळ. अशा काळात ‘मेथड अॅक्टिंग’ची सुरवात दिलीपकुमार यांनी केली.
व्यक्तिरेखा साकारण्यासाठी हा अभिनेता तासन्तास रंगीत तालीम करायचा. पाणिनीला पहिला व्याकरणकार म्हणतात, तसे दिलीपकुमार पहिले ‘मेथड अॅक्टर’. त्यामुळेच ते भारतीय सिने सृष्टीतले पाणिनी आहेत, असा गौरव जावेद अख्तर यांनी केला, तो समर्पकच.
‘उडे जब जब झुल्फे तेरी...’ म्हणणारा उमदा, लोभस चेहरा. या चेहर्याने पन्नास वर्षांहून प्रदीर्घ काळ रसिकांवर अमिट ठसा उमटवला. मूल्यव्यवस्था, नैतिकता अशा कैक गोष्टी सभोवताली बदलत असताना इतका प्रदीर्घ काळ दिलीपकुमार यांचा प्रभाव टिकून राहिला.
अभिनेता हा विचारवंत असावा लागतो, किमान स्वतंत्र विचार करू शकण्याची कुवत असणारा तरी. दिलीपकुमार तसे होेते. म्हणूनच तर त्यांनी ‘अभिनयाशिवाय माणुसकीसाठी, जनतेसाठी तुम्ही काय करता’ असं विचारलं होतं. या विचारीवृत्तीमुळेच त्यांच्या थबकण्याला, निःशब्द चित्रचौकटींनाही अर्थांच्या नानाविध मिती असायच्या.
या थबकण्यामधे होती प्रेक्षकांना व्यक्तिरेखा पटवून देण्याची विलक्षण क्षमता. त्यामुळे प्रेक्षकांची स्वीकारार्हता मोठी लाभली. ‘दिलीपकुमार जे पॉझ घेतात, त्याला पर्याय नसतो’ असे दस्तुरखुद्द अमिताभ बच्चननी म्हटलंय. त्यांच्यावरही दिलीपकुमार यांच्या शैलीचा प्रभाव सुरवातीच्या काळात होताच. ‘दिलीपकुमारकडून आम्ही चोरी करून शिकलो’, अशी प्रांजळ कबुली धर्मेंद्रसारख्या अनेक अभिनेत्यांनी दिली आहे.
हेही वाचा: जावेद अख्तरनी कैफी आझमींवर कविता लिहिलीय
सिनेमाच्या संख्येवरून विचारलेल्या प्रश्नावर दिलीपकुमार यांनी दिलेलं उत्तर त्यांच्या कला विचारांची दिशा स्पष्ट करतं. ‘कंटेट इज दि किंग’ इतर सगळ्या गोष्टी ‘नंतर’ अशी त्यांची धारणा होती. असा विचार करणार्या अभिनेत्याला काळाशी संवादी व्यक्तिरेखा मिळाल्या. त्याचं त्यांनी सोनं केलं.
सिनेमासाठी त्यांना अपेक्षित होतं ते मंटो, के. ऐ. अब्बास यांच्यासारखं अभ्यासू योगदान. ज्यामुळे सिनेमांना सौंदर्यात्मक अनुभूती मिळते. परिणामी कलेचा प्रभावकाळ अजरामर होतो. आजच्यासारखा माहितीचा महापूर आदळणारा तो काळ नव्हता. तत्कालीन समाजाची गाणी त्यांनी इतक्या तादात्म्याने अभिनीत केली आहेत की येणार्या पिढ्यांवरही त्याचं गारूड राहील.
माणसांना गाणी, गोष्ट हवी असते. ही गोष्ट सांगायला दिलीपकुमार शिकले ते पेशावरमधल्या घरातून. एकत्र कुटुंब व्यवस्थेत रात्रींच्या गप्पांच्या फडामधे गोष्ट सांगावीच लागायची, तीही साभिनय. मनोरंजनाच्या साधनांचा प्रपात नसणार्या काळात गोष्ट साभिनय सांगत-ऐकत ते मोठे झाले.
त्यांच्यातल्या अभिनेत्याचं मूळ शोधताना बीज इथं सापडतं. तिथंच उमलत्या वयातल्या युसूफला अभिनयाची ओळख झाली, असा अदमास. तो आपण त्यांच्या आयुष्याच्या गोष्टीवरून लावू शकतो. त्यांच्या गोष्टींमधे माणसांचे ‘आतडे’ गुंतवण्याची ताकद असल्यामुळेच ते ठरले ‘शोकनायक’. ज्यांच्याकडे होतं भावना आणि विचारांचं एकजीव रसायन.
हेही वाचा: पाकिस्तानी सत्तेला ‘हम देखेंगे’ म्हणणारं गाणं हिंदूविरोधी का ठरवलं जातंय?
कार्ल गुस्ताव युंगने समाजाला सामूहिक अंतर्मन असतं, याविषयीची मांडणी केली. या मनाचं पोषण कलाविष्कार करत असतात. सामूहिक अंतमर्नाला सहजतेने साद घालण्याची आणि तितक्याच सहजतेने हाक मिळविण्याची विलक्षण हातोटी दिलीपकुमार यांच्याकडे होती.
कलांचा भाव व्याकुळतेने, श्रद्धापूर्वक आस्वाद घेणार्या भारतीय मानसिकतेला हा अभिनेता ‘घरातला’ वाटणं स्वाभाविकच. माणूस केवळ ऐहिकतेवर जगत नाही. तसं असतं तर तो चंद्रावर गेला नसता, तात्पर्य काय तर भाकरी आणि चंद्र दोन्हींचीही त्याला गरज असते.
दिलीपकुमार यांनी आपल्याला सुख-दुःखाच्या चंद्रावर नेलं. श्रद्धाळू भारतीय समाजमनाला भावनेच्या लाटांवर झुलायला आवडतं, त्याला या शोकनायकाच्या सिनेमांनी अलगद ऊब दिली.
श्रद्धा-अंधश्रद्धेनंतर, चिकित्सेवर घासून-पुसून पटकथा लिहिण्याचा सुरवात झालीय. जुनं व्याकरण मोडल्याशिवाय नवनिर्मितीही होत नसते. कथन शैलीत आमूलाग्र बदल झाले आणि विलक्षण गतीने होतही राहणारच. ‘मॅट्रिक्स’सारख्या सिनेमांनी या वेगाचं दर्शनही जगाला दाखवलं.
तंत्रज्ञान हाच आशय असेही प्रयोग झालेत आणि होत राहतील. या भवतालातही ‘सुहाना सफर और ये मौसम हंसी...’ असं पडद्यावर गाणारा दिलीपकुमार भावतच राहील. तो आपल्यातून गेला, आपल्या सुख-दुःखाची गोष्ट आपल्याला सांगून. त्याने आपल्या मेंदूत सुरू केलेले सिनेमे सुरूच राहतील.
हेही वाचा:
सोनाली बेंद्रेः कॅन्सरशी पंगा घेणारी लढवय्यी
#बॉयकॉटदीपिका हॅशटॅगने छपाकचा गल्ला खाल्ला?