हॉलीवूडच्या काही सिनेमांमधला नायक इतर ग्रहांवर जाऊन शेती करून उदरनिर्वाह करताना दाखवला गेला आहे. पण हे वास्तवात कधी येईल का? असा प्रश्न होता. आता चंद्रावर शेती करण्याच्या दृष्टीने एक छोटंसं पाऊल टाकत चंद्राच्या मातीत एक वनस्पती वाढवण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. ही माती नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेच्या ‘अपोलो’ मोहिमेदरम्यान पृथ्वीवर आणण्यात आली होती.
काही वर्षांपूर्वी ज्या चंद्राकडे लहान मुलं आपला मामा म्हणून पाहत होती, त्याच चंद्रावर नंतर मानवाची पावलं उमटली. नंतरची पिढी चंद्रावर वसाहत तयार करण्याचा विचार करू लागली. चंद्रावर पाणी आणि इतर जीवनोपयोगी गोष्टींचा शोध घेऊ लागली. आता नवी पिढी चंद्रावर चक्क शेती करू पाहत आहे. होय! विश्वास बसणार नाही; पण हे खरं आहे.
चंद्रच नाही, तर मंगळासह पृथ्वीबाहेर वसाहती उभारण्याचं स्वप्न पाहणार्यांना चांदोमामाकडून खूप अपेक्षा आहेत. अंतराळवीरांचा असा विश्वास आहे, की अंतराळात दीर्घकाळ राहण्यासाठी चंद्रावर शेती करणं खूप महत्त्वाचं आहे. अन्नाचा साठा संपल्यावर अंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीच्या दिशेने यावं लागतं किंवा पृथ्वीवरून अंतराळ स्थानकावर अन्न मागवावं लागतं.
आता चंद्रावर शेती करण्याच्या दृष्टीने एक छोटंसं पाऊल टाकत चंद्राच्या मातीत एक वनस्पती वाढवण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. ही माती नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेच्या ‘अपोलो’ मोहिमेदरम्यान पृथ्वीवर आणण्यात आली होती. या घवघवीत यशामुळे आता अंतराळात वसाहती उभारण्याचं स्वप्न साकार होताना दिसतंय.
अमेरिकेतल्या फ्लोरिडा विद्यापीठातल्या संशोधकांनी नासाच्या अपोलो ११, १२ आणि १७ या मोहिमेदरम्यान गोळा केलेल्या चंद्राच्या मातीत ही रोपं वाढवली आहेत. या यशामुळे आता भविष्यातल्या अंतराळ मोहिमांमधे चंद्राच्या पृष्ठभागावर वनस्पती वाढू शकतील, अशी आशा निर्माण झाली आहे. यासोबत चांदोमामाच्या घरीही एखादी व्यक्ती वस्ती स्थापन करू शकेल.
या संशोधनाच्या लेखकांपैकी एक असलेले रॉब फेरेल म्हणाले, ‘आम्ही चंद्राचा वापर भविष्यातल्या दीर्घकालीन अंतरिक्ष मोहिमांसाठी केंद्र किंवा प्रक्षेपण पॅड म्हणून करू शकतो.’ रॉब म्हणाले, ‘चंद्रावरच्या मातीचा वापर करून त्यात रोपं वाढवणं हे शहाणपणाचं ठरेल.’ पूर्वीच्या संशोधनात चंद्राची माती सजीवांसाठी वापरली जायची. पण त्यावर वनस्पती उगवल्या जात नव्हत्या.
प्रा. रॉब यांच्या मते, जेव्हा तुम्ही चंद्राच्या पृष्ठभागावर वनस्पती वाढवण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा काय होईल हे पाहण्यासाठी त्यांच्या पथकाने चंद्राच्या मातीत थेले क्रेसच्या बिया टाकून त्याला पाणी, पोषक घटक आणि सूर्यप्रकाश दिला आणि नंतर त्या मातीत वनस्पती वाढीला लागली. या पथकाजवळ फक्त १२ ग्रॅम चंद्राची माती होती, जी नासाने दिलेली होती.
इतकी कमी माती असल्यामुळे शास्त्रज्ञांना एका छोट्या भांड्यात रोप वाढवावं लागलं. शास्त्रज्ञांनी थेले क्रेसचं बियाणं निवडलं कारण त्याचा अनुवंशिक कोड पूर्णपणे मॅप केलेला आहे. तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी ते पृथ्वीवरून घेतलेल्या मातीतही वाढवलं. या प्रयोगामधे मंगळ ग्रहावरून आणलेल्या मातीसारखे गुणधर्म असलेली मातीही समाविष्ट आहे.
हेही वाचा: पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी
चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह पृथ्वीपासून ३ लाख ८० हजार किलोमीटर अंतरावर आहे. चंद्राचा स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग एकसारखा असल्यामुळे चंद्राची एकच बाजू आपल्याला दिसते. तिला ‘निअर साईड’ असं म्हणतात, तर जी बाजू दिसत नाही तिला ‘फार साईड’ म्हणतात.
चंद्राच्या फार साईडवर कोणत्याही देशाने आतापर्यंत यान उतरवलं नव्हतं; मात्र चीनने याही बाजूला यान उतरवण्याचा विक्रम केला. चांग ई-४ नावाच्या या यानातून चीनने विविध वर्गातल्या वनस्पती आणि भारतात माती पाठवली. माशीची अंडीही पाठवली होती आणि ती तिथं उबवतील, असा शास्त्रज्ञांचा अंदाज होता. वनस्पतीची बीजं तिथं रुजली तर त्यांचा बीजप्रसार या माश्या करतील, असंही त्यांना वाटत होतं. पण हा प्रयोग यशस्वी झाला नाही.
ताज्या प्रयोगानंतर शास्त्रज्ञांना अशी आशा वाटू लागलीय, की पुढच्या वेळी जेव्हा मानव चंद्रावर पाऊल ठेवेल तेव्हा तिथल्या जमिनीत रोपं उगवून आणायला तो सक्षम असेल. कारण हा एक ऐतिहासिक प्रयोग ठरला आहे.
चंद्रावरून यापूर्वीच्या मोहिमांमधून आणलेली माती ही सुपीक आहे का? त्यात वनस्पतींची वाढ होऊ शकेल का? याबद्दल जगाला कुतूहल होतं आणि किमान मातीच्या बाबतीत तरी आता हे कुतूहल शमलंय. राहता राहिला विषय चंद्रावरच्या मातीव्यतिरिक्त इतर परिस्थितीचा! ती सध्या तरी रोपं उगवून यायला पोषक नसल्याचं चीनने केलेल्या प्रयोगांमधून दिसून आलंय.
ताजं संशोधन ‘जर्नल कम्युनिकेशन्स बायोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालंय. शास्त्रज्ञांना मिळालेली ताजी माहिती भविष्यात शास्त्रज्ञांना आणि अंतराळ प्रवाशांना उत्साह देणारी आहे. जर चंद्रावर राहायचं असेल, तर सॅलाडसारख्या वनस्पती तिथं उगवून आणणं आवश्यक आहे, असं मत अनेक शास्त्रज्ञांनी यापूर्वी व्यक्त केलंय. त्याचबरोबर अंतराळवीरांनी आपल्याबरोबर पुरेसं पाणी नेलं तर काही दिवस चंद्रावर राहता येऊ शकेल, असं मत व्यक्त केलं होतं.
हेही वाचा: चांद्रयान २: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारं पहिलं अंतराळयान
हे संशोधन आणखीही एका कारणामुळे महत्त्वाचं ठरतं. ते म्हणजे, माणसाला चंद्रावर जाण्याची ओढ पूर्वीपासूनच आहे; पण तो चंद्रावर फार काळ राहू शकत नाही. या संशोधनात निष्पन्न झालेल्या गोष्टी आणि पुढचं संशोधन योग्य दिशेने राहिलं, तर चंद्र हे सूर्यमालेतल्या पर्यटनाचं आवडतं ठिकाण बनण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकेल.
सध्या सातपेक्षा अधिक देशांचा चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात भारत, जपान, रशिया, दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिकेचा समावेश आहे. नासाचा ८३ अब्ज डॉलर खर्चाचा आर्टेमिस कार्यक्रम या वर्षापासूनच सुरू होईल. त्यानंतर चंद्रावर सहज भटकणारा माणूस दिसून येऊ शकेल. सर्व काही ठरल्याप्रमाणे झाल्यास पुढचं वर्ष हे चंद्राविषयी संशोधनाचं सुवर्ण वर्ष ठरेल.
खासगी कंपन्यांनी यात जो उत्साह दाखवलाय, त्यामुळे हा विषय केवळ शास्त्रीय राहिलेला नसून तो व्यापाराशी जोडला गेला आहे. लोकांकडे पैसा वाढत आहे. त्यांची इच्छाशक्तीही त्याबरोबरच वाढत आहे. कितीही पैसे मोजून चंद्रावर जाऊन येण्याची इच्छा बाळगणारे अनेक लोक आहेत.
खासगी कंपन्यांचा असा प्रयत्न आहे, की अंतरिक्ष विज्ञान अशा प्रकारे विकसित केलं जावं, जेणेकरून चंद्रावर जाणं सोपं आणि परवडण्याजोगं होईल. चंद्राच्या बाबतीत रशियाच्याही अनेक योजना आहेत. परंतु येणार्या काळात रशिया या योजना साकार करू शकेल का? असा प्रश्न सद्यःस्थितीमुळे निर्माण होत आहे.
भारताने ‘चांद्रयान-३’ मोहिमेवर आता लक्ष केंद्रित करायला हवं. मागची मोहीम चंद्राच्या जवळ पोचून अयशस्वी ठरली. पुढची मोहीम १ ऑगस्टला लाँच होऊ शकली नाही, तरी जेव्हा केव्हा ती लाँच होईल तेव्हा त्याला यश मिळावं, अशीच प्रत्येक भारतीयाची अपेक्षा आहे. यावेळी मोहिमेत कोणतीही चूक होता कामा नये, त्रुटी राहता कामा नये. ज्यावेळी आपण आपला लँडर आणि रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरवू शकू, तेव्हा कोणताही भारतीय चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी रवाना होऊ शकतो.
संपूर्ण मानवजातीला पृथ्वीव्यतिरिक्त इतर ग्रहांवर वसाहत स्थापन करण्याची दुर्दम्य इच्छा आहे. हॉलीवूडच्या काही सिनेमांमधे नायक इतर ग्रहांवर जाऊन शेती करून उदरनिर्वाह करताना दाखवला गेलाय. पण हे वास्तवात कधी येईल का? असा प्रश्न होता. चंद्रावरच्या मातीत रोप उगवून आल्यामुळे किमान तिथली माती सुपीक आहे, रोपं उगवून येऊ शकतात, या वास्तवावर शिक्कामोर्तब झालंय.
मंगळावर काही रोपं उगवून यावीत यासाठी प्रयोग सुरू आहेत. मंगळावरचं तापमान, विविध वायूंचं प्रमाण आणि इतर भौगोलिक घटक लक्षात घेऊन बंदिस्त बायोस्फियर निर्माण करण्याचा आणि त्यात पिकं घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्याचे परिणामही सकारात्मक असल्याचं दिसून आलंय. मंगळावर बंदिस्त केलेल्या वातावरणात बटाट्याला कोंब फुटल्याचं दिसून आलं असून, त्यापाठोपाठ चंद्रावरून आणलेल्या मातीत रोप उगवून आल्यामुळे संपूर्ण जगाच्या आशा उंचावल्या आहेत.
हेही वाचा:
ती १५ मिनिटं ठरवणार आपल्या चांद्रयानाचं भवितव्य
विज्ञानदिनी ना सीवी रमण यांचा जन्मदिन, ना स्मृतिदिन
चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता
(लेखक ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ असून त्यांचा लेख दैनिक पुढारीतून साभार)