काळाच्या कुरुपतेचा अनुभव व्यक्त करणाऱ्या कविता

१९ डिसेंबर २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


‘सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे’ हा गणेश कनाटे यांचा कवितासंग्रह. वरातीत वाजवलं जाणारं सॅक्सोफोन, हे दृश्यच या कवीला कुरूप वाटतं. कारण या सॅक्सोफोनमधून जे सूर बाहेर पडतात, त्यातून ज्या सौंदर्य संवेदना जागृत होतात, त्या कवीला वरातीशी विसंगत वाटतात. त्याचा शोध घेऊ पाहणारी या कवितासंग्रहावरची प्रमोद मुनघाटे यांची ही फेसबुक पोस्ट.

गणेश कनाटे हे नागपुरात असताना आमचे पत्रकार मित्र होते, ही एक ओळख माझ्या मनात होती. गेल्या काही वर्षात फेसबुकवर त्यांच्या कविता वाचत होतो. त्याशिवाय कविता आणि काव्यशास्त्र यावर त्यांची अभ्यासपूर्ण टिपणंही फेसबुकवर गाजली आहेत. एवढंच नाही तर अलीकडे ‘सजग’ या समीक्षेला वाहिलेल्या त्रैमासिकाचे ते संपादक म्हणूनही पुढे आलेले आहेत.

‘सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे’ हा त्यांचा कवितासंग्रह. या संग्रहातल्या कविता वाचताना त्यांच्या लौकिक परिचयाचा काही उपयोग होतो असं मला वाटत नाही. उलटं त्यांचं व्यक्तिमत्व आतून समजून घेण्यासाठी त्यांच्या कविताच उपयोगाच्या आहेत.

गणेश कनाटे यांच्या या संग्रहातील सगळ्याच कविता एका काळाच्या कुरुपतेचा अनुभव व्यक्त करणाऱ्या आहेत. कवीच्या भावविश्वातला काळ त्याच्या शीर्ष कवितेतूनच स्पष्ट होतो. ‘जॅझ बाय द बे', 'सॅक्सोफोन आणि दु:खाचे गाणे’ या कवितेत तो लिहितो.

'सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे
याचे भान नसलेल्या काळात
आपण क्वचित कधीतरी जातो 'जॅझ बाय द बे' मध्ये
जिथे काळाशार, कातळासारखा रेखीव देहाचा माणूस
सॅक्सोफोनमध्ये आपले प्राण फुकत असतो
आपल्या गुलाम पूर्वजांच्या दुःखाचे गाणे गात असतो
आपल्याच देहात आपण गाडले जात असतो- अपराधबोधाने
आपल्या पूर्वजांच्या पापांच्या आठवणींनी'

हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

‘सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे’ याचं भान नसलेल्या काळात हा कवी आहे. ‘सॅक्सोफोन’चे साहचर्य तो आपल्या गुलाम पूर्वजांच्या दुःख गाणाऱ्या काळाशार, कातळासारखा रेखीव देहाच्या माणसाशी जोडतो.  म्हणून कवीला त्याच्या वर्तमानात वरातीत वाजवलं जाणारं सॅक्सोफोन, हे दृश्यच कुरूप वाटतं.  कारण सॅक्सोफोनमधून जे सूर बाहेर पडतात, त्यातून ज्या सौंदर्य संवेदना जागृत होतात, त्या कवीला वरातीशी विसंगत वाटतात.

‘वरात’ ही तरल सौंदर्य-संवेदनाच्या शुद्ध अनुभवाला सौंदर्यहीन करणारी गोष्ट कवीला वाटत असावी.  जीवनातल्या सगळ्या बटबटीतपणाचं, गोंधळाचं, ध्वनी प्रदूषणाचं आणि मूल्यहीनतेचं प्रतीक म्हणून इथं ‘वरात’ ही संकल्पना येते.

कवीची ही जाणीव एका काळाशी संबद्ध आहे. ‘सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे' याचं भान नसलेला काळ हा कवी अधोरेखित करतो हे महत्त्वाचं आहे. हा काळ सर्वप्रकारच्या मानवी व्यवहारांना बाजार मूल्य बहाल करणारा काळ आहे. म्हणून अशा काळात पूर्वजांच्या दुःखाचं गाणं गाण्यासाठी आपले प्राण फुंकणारा गुलाम कवीला आठवतो. ‘गुलाम’ आणि त्याचं ‘दुःखाचं गाणं’ हे कवीच्या अंतरात जपलेल्या मूल्यव्युहाला दृश्यरूप देणारे शब्द आहेत.

कवी या काळाचं रूप आणखी एका दुसऱ्या कवितेतून स्पष्ट करतो. ‘तुमच्या काळात जन्मलो, हे विसरता येत नाही म्हणून’ या कवितेत तो म्हणतो,

'इवल्याशा मुलांच्या हाती बंदुका दिल्यात तुम्ही!
लाज नाही वाटत तुमची तुम्हालाच?
मला वाटते म्हणून मी माझ्याच मनाच्या आरशापासून
माझेच तोंड लपवत असतो;
तुमच्या काळात जन्मलो, हे विसरता येत नाही म्हणून
स्वतःला लाजेच्या वाळवंटात काढून घेत असतो-
मी माझ्यात एक मातृत्व घेऊन फिरत असतो’

हेही वाचा: आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

कवीच्या मातृहृदयाचं अधिक स्पष्टीकरण देण्याची इथं गरज नाही असं मला वाटतं. या कवितेत कनाटे यांनी कमलताई होस्पेट यांच्या सूतिकागृहाचा संदर्भ दिला आहे. तो समजून घेण्यासाठी ही कविता मुळातूनच वाचायला हवी.

सौंदर्य आणि अनामिक अलौकिकाची आस कोणत्याही कवीला असतेच. पण त्याच्या अभावामुळे  त्याची स्वप्नं, त्याला भेटलेली माणसं, त्यांच्याशी कवीचा झालेला संवाद किंवा विसंवाद, भूतकाळातले अनेक संदर्भ कवितेत प्रकटत असतात. या सगळ्या घटकांच्या सुट्या सुट्या किंवा मिश्रित अनुभवांची चित्रं ‘सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे’ या संग्रहातल्या कवितेत आहेत.

रोजच्या आयुष्यात सगळ्या लौकिक संपन्नता कवीच्या पुढे पायघड्या घालून असली तरी त्याला अचानक जागेपणीच अदृश्य अशी दु:स्वप्नं दिसू लागतात. ही दु:स्वप्नं या कवीच्या प्रत्येक कवितेचाच भाग आहेत आणि त्या दु:स्वप्नातल्या कौरुप्याच्या दर्शनानं त्याचं आक्रंदणारं मन वाचकालाही अस्वस्थ करत जातं.

हेही वाचा: 'लाल श्याम शाह' हे पुस्तक मी का लिहिलं?

हा कवी चालू काळाच्या अदृश्य मितीचा अनुभव घेताना दिसतो. त्याचे शब्द, त्याची प्रतीकं आणि प्रतिमा जणू वाचकाला त्याच्या कवितेच्या आत घेऊन जाणाऱ्या अतींद्रिय वाटाच आहेत असं वाटत राहतं.

उदा-
‘मांजर, कुत्रा, वटवाघूळ आणि मी’ या कवितेच्या सुरवात आणि कवितेच्या शेवटी हा कवी
लिहितो,
'कारच्या टपावर गुंडाळी करून झोपलेलं मांजर,
दोन पायांवर मान टाकून निपचित झोपलेला कुत्रा,
ध्यानस्थ ऋषीसारखे स्वत:ला टांगून घेतलेले वटवाघूळ
आणि
घराच्या एका खोलीच्या तुरुंगात कैद असलेला मी,
नेमकं काय भोगत असतो एकाच वेळी?

'ते' मांजर आणि 'तो' कुत्रा
काय म्हणत असेल 'या' वटवाघुळाबद्दल?
आणि अर्थात,
माझ्याबद्दल?'

कनाटे यांच्या या संग्रहात सत्व हरवत चाललेल्या काळाची आणि आपण त्या काळाचा एक भाग असल्याच्या पराकोटीच्या अगतिकतेची जाणीव व्यक्त होते. त्या जाणिवेने जणू काळीज पिळवटून टाकणारं दु:ख कवीला होत आहे आणि या दुःखाचं दृश्यरूप म्हणजे काळ्या रंगाच्याच विविध छटा आहेत.

हेही वाचा: चर्चा तर होणारचः गुप्तेंच्या भयकथांमागचं उचलेगिरीचं गूढ

कवीच्या या शोकात्म भावस्थितीचं अनुभवात्मक रूप काही दृश्यातून कवितेत व्यक्त होतं. जवळजवळ प्रत्येकच कवितेचा अवकाश दृश्यपूर्ण आहे. संपूर्ण संग्रह काळ्या दृश्यांचा अल्बम वाटावा असा आहे. या दृश्यात शोकात्म अनुभव अधिक गडद करणारे तपशील आहेत. उदा. कवितेतला ‘सॅक्सोफोन’, ‘कातळासारखा रेखीव देहाचा माणूस’, ‘निथळता घाम’, अस्वस्थ समुद्र, समुद्राची गाज’.

अशाच एका ‘गूढ-धूसर, हळव्या उदास संध्याकाळी कवीला क्लिओपात्राच्या स्नानाची आठवण येते. आणि त्यासोबत त्याला त्या गाढविणी आठवतात. त्यांच्या दुधपित्या पिल्लांच्या तोंडातलं आचळ ओढून राणीसाठी काढलेलं दूध आठवतं. हे आठवून कवीला क्लिओपात्रा आवडत नाही. तो म्हणतो, 'मी तिच्या हमामखान्यावर थुंकून बाहेर पडतो.'

या कवितांमधली ‘काळाची’ जाणीवही प्रतिकात्मक आहे. हा काळ लौकिक-अलौकिकाच्या सीमारेषेवरचा आहे. हा काळ कवीच्या नैतिक-अनैतिक, जीवन-मृत्यू, शुभ-अशुभ, आणि मूल्यवान-मूल्यहीन अशा जाणिवांच्या ताण्याबाण्यातून विणला गेलाय. विविध प्रतीकं आणि प्रतिमांमधून तो आपल्या मानसिक अनुभवाला या काळाच्या अदृश्य पडद्यातून पकडू पाहतोय.

म्हणूनच, 'सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे याचे भान नसलेल्या काळात' अशा शब्दांत तो त्याच्या ‘काळाची’ जाणीव नकारात्मक भूमिकेतून व्यक्त करतो. नैतिक-अनैतिक, शुभ-अशुभ हा सगळा मूल्यव्यूहच त्याच्या अस्तित्वाचा आधार आहे. कवीला जीवनाकडून  अपेक्षित जे काही आहे, ते फार स्पष्ट आहे. त्यातून गुंतागुंत नाही किंवा दुर्बोधही काही नाही असं काही कावितांमधून स्पष्ट होतं.

हेही वाचा: विष्णू खरे : कवी गेल्यावर सोबत काय राहिलं?

उदा. ‘येशूचे डोळे’

'एकच मिनिट थांब जरा
मला सांग
तुला भूक दिसते?
तुला राग दिसतो?
प्रेम दिसतं का तुला?
आणि मृत्यू?
आणि, हे सारं दुसऱ्याचं तुझं नाही

तुला दुसऱ्याची भूक, राग, प्रेम आणि मृत्यू
सारंच दिसत असेल
आणि हे बघताना तुझ्या डोळ्यात असेल
जर एक अश्रूंचा थेंब
तर तुझे डोळे येशूचे आहेत असे समज

बुद्धीच्या झगझगीत प्रकाशात
करुणा दिसत नसते'

पण एखाद्या सायंकाळी, रात्री किंवा अचानक कवीच्या डोळ्यापुढे अंधार निर्माण होऊन अशी काही दृश्यं उभी राहतात की त्याने जपलेला मूल्यव्यूह कोसळून जातो आणि आणि कवीला आपल्या अस्तित्वाबद्दलच शंका येते. तो खिन्न होतो. त्याचं सारं जग दुःखाच्या धुराने काळवंडून जातं.

आपल्या शोकात्म अनुभवाची मूस शोधण्यासाठी भोवतालच्या कवीला इमारती, भिंती, जड वस्तू जशा दिसतात, तसं त्याला निसर्ग, प्राणी, कीटक आणि झाडंझुडपंही दिसतात.

हेही वाचा: ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

‘उगाच का कागद काळे करायचे?’ या कवितेत तो म्हणतो,
'माणसांना न कळणाऱ्या
झाडांच्या जगात
मरणवेळेपूर्वी मरण्याची
मरणवेळेपूर्वी आत्महत्या करण्याची
मरणापूर्वी वेगळे होण्याची
असेलच ना काही एक रीत
पक्ष्यांना, प्राण्यांना, माणसांना
न कळणारी?

पक्ष्यांची, प्राण्यांचीही असेल कदाचित
त्यांची स्वत:ची वेगळी रीत

घटस्फोटापूर्वी आणि आत्महत्येपूर्वीही
कागदावर काहीतरी लिहिण्याची
त्यात कुणालातरी दोष देण्याची
कुणीतरी सही करण्याची
कुठून शिकलो आपण ही रीत?’

म्हणजे या कवीने स्वतःच्या अस्तित्वाचा अपरिहार्य अंश म्हणून आपला एक मूल्यव्यूह जपला आहे. म्हणून त्याला भोवतालच्या जड व्यवस्थेच्या पलीकडे असलेलं कोणतंतरी एक शुद्ध तत्त्व आकर्षित करत आहे. त्या शुद्ध तत्त्वाच्या शोधाचा अनुभव शब्दात व्यक्त करताना कवीची तडफड होते. अनेक कवितांतून कवीची तडफड व्यक्त होते.

हेही वाचा: पंगतीतलं पान : वेगळ्या प्रयोगातून आलेल्या कादंबरीची काही पानं

‘शब्दांमागून शब्द ठेवताना’ या कवितेत कवी म्हणतो,

'शब्दांमागून शब्द ठेवताना
मी द्रौपदीच्या मागे कृष्णच उभा करत असेन असे नाही'

आणि कवितेच्या  शेवटी तो म्हणतो,

'म्हणून प्रिये,
शब्दांमागून शब्द ठेवताना
द्रौपदीचे द्रौपदीत्व जपावे लागेल; नाही?’

आपले शब्द वाचकांपर्यंत पोचूच शकणार नाही, याची कवीला भीती आणि शंका वाटते. म्हणून या संग्रहाच्या पहिल्याच कवितेच्या ‘धोक्याची पूर्वसूचना’ या शीर्षकातूनच त्याची तडफड लक्षात येते. या कवितेत तो म्हणतो,

'मी हे कागदावर खरडलेलं वाचून कुणालाही काहीही फरक पडणार नाही
हे शब्दांचं कालवण नाहीच चिवडलं तरी कुणालाही काहीही फरक पडणार नाही'

कवीच्या अशा शोकात्म अनुभवामागच्या प्रेरणा कोणत्या असाही एक प्रश्न मनात येतो. त्याच्या व्यक्तिगत जगण्याचे थेट संदर्भ या कवितेत फार हाती लागत नाहीत. जे आहे ते अमूर्त आणि अदृश्य आहे. मानसिक पातळीवरच्या प्रेरणांचा शोध कवितेतूनच घ्यावा लागतो. कवीच्या मानसिक पातळीवर अमूर्त आणि अदृश्य अनुभवाला तर मर्यादाच नाहीत. पृथ्वीच्या पोटातल्या भूकंपाच्या केंद्रापासून तर अंतराळातल्या कृष्णविवराच्या गुरुत्वाकर्षणापर्यंत ते काहीही असू शकेल. गणेश कनाटे यांच्या कवितेकडे या दृष्टीने पाहावं लागतं.

हेही वाचा: राजस्थानातल्या पुष्करच्या वाळूत उमटलेल्या घोड्यांच्या टापांची गोष्ट

कवीच्या मूल्यव्यूहात शुद्ध तत्त्वाचा अनुभव ‘मकबूल, मुक्तिबोध आणि माउली’ या कवितेतून कसा व्यक्त होतो ते पहा :

'हुसेनने काढून ठेवल्या आपल्या चपला
मुक्तिबोधांच्या अंत्ययात्रेनंतर
आणि नंतर कधी घातल्याचा उल्लेख दिसत नाही

मक़बूल आणि माती यांच्यामधे का उभे होते मुक्तिबोध?

चपला निर्माण करतात एक अंतर, एक अवकाश
माणूस आणि मातीच्या संबंधांमध्ये
शरीरातील प्राणतत्त्व आणि आकाश यांच्यात असते तसे
-त्वचा असते ना माणसाची भिंत म्हणून उभी
मक़बूलला हे भान मुक्तिबोध देऊन गेले बहुदा'

हेही वाचा: एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता

गणेश कनाटे यांना ‘हा काळ भान नसलेला’ वाटतो. त्यांना गुलामाच्या दु:खाचं गाणं, मातृत्व, अश्रू, गाढविणीची पिल्लं ही आपल्याच अस्तित्वाचं अभिन्न अंग वाटतात. कवीच्या विशाल करुणेचं पात्र इतकं विशाल होतं की त्याला मृत्यूनंतर आपला देह जाळायचा नाही, पुरायचा असं मृत्युपत्र करूनच मरायचे आहे. तो म्हणतो,

'काळ संस्कृती परंपरा
आणि पृथ्वी भर ठिकाणी मेलेले पूर्वज
यांचं काय काय आणलं या देहात मी,
माझ्यातल्या गुणसूत्रांनी
कुणास ठाऊक.

कधी कधी आठवतात,
रात्री-अपरात्री पाहिलेली स्वप्न.
भयावह होत असतात बहुतेक.
पण आठवतात; काय करू?
कनाटे आडनावाची सगळी माणसं
माझ्याच गुणसूत्रांची असतील, असं नाही
पण सापडतात अजूनही
आफ्रिकेत, जपानमध्ये
काही फ्रान्समध्येही'

कवितासंग्रह - ‘सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे’
कवी - गणेश वामन कनाटे
प्रकाशक - वर्णमुद्रा पब्लिशर्स, शेगाव, जि. बुलडाणा
पहिली आवृत्ती - मे २०२१
किंमत - ३००

हेही वाचा: 

जे बोललो तेच लिहित गेलो: अनिल अवचट

तरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक

तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?

मराठीतलं ऐतिहासिक ललित लेखन म्हणजे फॅन फिक्शन: नंदा खरे

संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंच्या भाषणाचं सारः लेखक हुजऱ्या नसतो