प्रा. डॉ. संजीव कोंडेकर लिखित संत तुकोबारायांवरचं 'हिस्ट्री ऑफ तुकाराम स्टडीज' हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आलंय. विसाव्या शतकाचा पूर्व काळ, विसाव्या शतकाचा पहिला कालखंड, दुसरा कालखंड आणि एकविसावं शतक या अंगांतून तुकोबांचा अभ्यास वाचक आणि अभ्यासकांना अधिक सुलभ ठरतो. जगाच्या पाठीवर आतापर्यंत तुकोबारायांचा या अंगानं फारसा अभ्यास कुठं झाला नव्हता.
'तुका आकाशाएवढा' हे अबाधित सत्य आहे. अणू-रेणु ते आकाश आणि त्याही पुढच्या अनंत आकाशगंगांपर्यंत तुकोबाराय व्याप्त आहेत. 'अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी' या शैलीत तुकोबारायांनी आपल्यासाठी लिहून ठेवलं. 'उत्स्फूर्तपणे ओसंडून वाहणाऱ्या भावना', अशा शब्दात विल्यम वर्ड्सवर्थने कवितेवर भाष्य केलं.
पुणे परिसरातल्या मराठी मुलखात हा कवी जन्मला, रुजला आणि बहरला. त्यामुळे त्यांनी सुबोध, रसाळ, समकालीन बोली आणि प्रमाणभाषा वापरली. तुमच्या आमच्या जगण्यातली उदाहरणं त्यांनी आपल्यापुढे ठेवलीत.
हा मराठी माणूस तेव्हाही महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता. आज तर नाहीच आणि भविष्यातही राहणार नाही. बंगालच्या भूमीतले ज्ञानवृक्ष गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनाही तुकोबांनी आकर्षित केलं. 'वैष्णव जन ते' आणि 'जे का रंजले गांजले' यातली जुळलेली नाळ ज्ञानी आणि लढवय्या महात्मा गांधींना दिसली असावी. कदाचित या किंवा अशा अनेक गोष्टींमुळे गांधीजींना तुकोबाराय 'मैत्र जीवाचे: वाटले असावें'
केवळ भारतीयच नाही तर इंग्रजीसह इतर भाषकांनाही तुकोबारायांच्या गाथेनं आकर्षित केलं. या लिहिणाऱ्यांनी इंग्रजीसह इतर भाषांमधूनही तुकोबारायांच्या अभंगांचा अनुवाद केला. वाचक आणि अभ्यासक यांच्यातल्या भाषेच्या अडचणींचे काळे ढग दूर झालेत.
तुकोबांच्या अभंगांचं तेज आशियासह सर्वत्र पसरायला लागलं. तुकोबारायांच्या चरित्राचा आणि गाथेचा ग्लोबल प्रवास सुरू झाला. विपुल प्रमाणात अध्ययन आणि संशोधन होऊ लागलं. त्यातून प्रा. डॉ. संजीव कोंडेकर यांचं पुस्तक साकारलं. 'हिस्ट्री ऑफ तुकाराम स्टडीज'. हे पुस्तक तुकोबारायांवरच्या अध्ययनाचा इतिहास आहे असं आपण म्हणू शकतो.
नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड इथं नूतन आदर्श महाविद्यालय आहे. डॉ. संजीव कोंडेकर तिथे इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून त्यांनी पीएचडीसाठी संशोधन केलं. त्यांच्या संशोधनाचा विषय होता 'सोशिओ कल्चरल रिलेवन्स ऑफ तुकारामस् पोएट्री'. तुकोबारायांच्या कवितेची सामाजिक-सांस्कृतिक प्रासंगीकता किंवा सार्वकालिकता असं आपल्याला ढोबळमानाने म्हणता येईल. त्याच आधारावर हे पुस्तक साकारलेलं आहे.
साताऱ्यातल्या गेंडामाळ, यशवंत नगर इथल्या लोकायत प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं. प्राच्यविद्या पंडित डॉक्टर आ. ह. साळुंखे यांनी तुकोबारायांच्या तीन पैलूंवर आणि पुस्तकावर संक्षिप्त भाष्य केलं. त्रिवेंद्रम इथल्या टीईएसच्या संचालिका डॉ. कल्याणी वल्लथ यांची प्रस्तावना अत्यंत बोलकी आहे. डॉ. संजीव कोंडेकर यांचं मनोगत त्यांनी केलेल्या संशोधनाचा आणि इतर गोष्टींचा आढावा घेतं. राकेश साळुंखे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाला पुलकेशी साळुंखे यांचं आकर्षक मुखपृष्ठ आहे.
हेही वाचा: आषाढी वारीनिमित्त पसरलेल्या वायरल विठ्ठलाची गोष्ट
तुकोबाराय महाराष्ट्रीय, भारतीय होते. त्यांचा कालखंड १६०८ ते १६५०. असं असलं तरी त्यांचा विचार, त्यांचं तत्त्वज्ञान, जगण्याचं सूत्र जगाच्या पाठीवर सर्वत्र आणि सर्वच काळात लागू होतं. ते कसं, यासाठी डॉ. कोंडेकर यांनी सखोल संशोधन केलं. सूक्ष्म निरीक्षण, मुलाखती, स्थळभेटी, अनेकविध ग्रंथांचा अभ्यास, तज्ज्ञांचं मार्गदर्शन अशा अनेक अवजारांचा त्यांनी कौशल्यानं वापर केला.
तुकोबारायांचा अभ्यास या अंगान हे पुस्तक प्रामुख्यानं चार भागात विभागलेलं आहे. विसाव्या शतकाचा पूर्व काळ, विसाव्या शतकाचा पहिला कालखंड, दुसरा कालखंड आणि एकविसावं शतक या अंगांतून तुकोबांचा अभ्यास वाचक आणि अभ्यासकांना अधिक सुलभ ठरतो. पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या टिपा आणि संदर्भग्रंथांची यादी पुस्तकाला अधिक भक्कम करते.
तुकोबारायांच्या चरित्राचं भाषांतर करताना अनेकांनी महिपती ताहराबादकर यांच्या 'भक्तलीलामृत' या ग्रंथाचा आधार घेतला असल्याचं चित्र सगळीकडे दिसतं. १९७५ मधे महिपतींनी तुकोबारायांचं चरित्र मांडलं. यातला बराचसा भाग संदिग्ध आहे. तरीही अनेक अंगांनी हे पुस्तक उपयुक्त असल्याचं डॉ. कोंडेकर म्हणतात. इंग्रजीतून मराठी भाषांतराचा पहिला प्रयोग टॉमस स्टीफन्स यांनी केला. त्यांनी बायबलचं 'ख्रिस्तपुराण' असं मराठी भाषांतर केलं. बायबल मुळात हिब्रू भाषेत लिहिलेलं आहे. नंतरच्या काळात ते इंग्रजीत आलं.
स्कॉटिश मिशनरी जॉन्स स्टिव्हनसन आणि जॉन म्युरी मिशेल यांना तुकोबारायांच्या विद्रोहनं आकर्षित केलं. लंडनच्या एका पाक्षिकात सर अलेक्झांडर ग्रांट तुकोबारायांवर लिहितात. त्यात ते एक महत्त्वाची खंत व्यक्त करतात. तुकोबारांसारखा एवढा मोठा राष्ट्रीय कवी युरोपीय राष्ट्रांपर्यंत आणला गेला नाही, ही दुःखद गोष्ट आहे. असं ते नमूद करतात.
विसाव्या शतकाच्या सुरवातीला म्हणजेच १९०६ मधे जे. नेल्सन फ्रेझर यांनी तुकोबारायांच्या ३७२० अभंगांचं इंग्रजीत भाषांतर केलं. त्यानंतरच्या काही दशकांत महात्मा गांधी यांना तुकोबाराय गवसलेत. गांधींना १९३०ला पुण्याच्या येरवडा तुरुंगात ठेवण्यात आलं. एका मराठी सहकैद्याच्या मदतीनं त्यांनी अभंगांचं इंग्रजीत भाषांतर सुरू केलं. नागपूर इथल्या हिस्लॉप कॉलेजात एक ख्रिस्ती मिशनरी जॉन हॉयलंड प्राध्यापक होते. त्यांनी तुकोबारायांवर लंडनमधे दोन पुस्तकं प्रकाशित केलीत.
आर. वी. मतकरी, पंडिता क्षमा राव, एम. आर. जयकर, एस. आर. शर्मा, अरुण कोलटकर, के. व्ही. बेलसरे, प्रभाकर माचवे, अजित लोखंडे, बिशप टॉमस डाबरे, अनंत पै, मालती पाटील, भालचंद्र नेमाडे, एस. एल. कर्वे, जयंत लेले, गीता कपूर, शं. गो. तुळपुळे, दिलीप चित्रे, आर. डी. रानडे, रशियाच्या इरिना ग्लुश्कोव्हा, जपानचे कोईसो चिहिरो, जेम्स बीन, विंदा करंदीकर अशा कितीतरी नावांचा उल्लेख डॉ. कोंडेकर यांच्या या पुस्तकात झालेला आहे.
हेही वाचा: वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची
भाषा हा संस्कृतीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तुकोबारायांच्या अभंगांतून मराठी संस्कृती आणि जगणं अनुभवायला मिळतं. या संस्कृतीशी समरस नसलेले किंवा या संस्कृतीचा पुरेसा अभ्यास नसलेल्या अनेकांनी तुकोबारायांच्या अभंगांचं भाषांतर केलेलं आहे. त्यामुळे अर्थभेदाचा धोका अधिक वाढतो. यातल्या काही धक्कादायक अर्थभेदांवर लेखकानं या पुस्तकात भाष्य केलं आहे.
भाषांतर करणाऱ्यांनी स्थानिक मराठी लोकांची मदत घेतली. अजूनही घेत आहेत. निकॉल मॅकनिकॉल यांनी १९१९ मधे तुकोबारायांच्या ७६ अभंगांचं इंग्रजीत भाषांतर केलं. 'कन्या सासुरासी', 'बोले तैसा चाले', 'मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास', 'जे का रंजले गांजले" अशा अनेक अभंगांचं इंग्रजी भाषांतर आपल्याला या पुस्तकात पाहायला मिळतं.
मलपृष्ठावर डॉ. कल्याणी वल्लथ, गोरखपूरचे डॉ. संजीव विश्वकर्मा आणि हैद्राबादच्या डॉक्टर शिबा व्हिक्टर यांचे अभिप्राय अत्यंत वेधक आहेत. अनेक जुन्या पुस्तकांतल्या एकेक पानांची चित्रं यात जोडलेली आहेत. त्यामुळं वाचकांना त्या काळातल्या शैलींचा अंदाज घेता येईल. फ्लिपकार्ट, इंटरनेट, प्रत्यक्ष अशा अनेक माध्यमांतून हे पुस्तक घरपोच मिळवता येतं.
जगाच्या पाठीवर आतापर्यंत तुकोबारायांचा या अंगानं फारसा अभ्यास झाला नव्हता. तो पहिल्यांदाच डॉ. संजीव कोंडेकर यांनी केला. तुकोबारांयांवर प्रेम करणारे आणि त्यांचा अभ्यास करणारे या सर्वांसाठीच हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आणि संग्राही ठेवावं असं आहे.
हेही वाचा:
पंढरीची वारीः माऊलींच्या दिंडीतला एक दिवस
गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनाचा सामाजिक आशय