वारकऱ्यांच्या सहिष्णू परंपरेवर हल्ला करणाऱ्यांना रोखायलाच हवं

१० फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


कीर्तनकार निवृत्तीबाबा वक्ते हे सध्या शरद पवारांविरोधात काढलेल्या पत्रकामुळे वादात सापडलेत. पण वादग्रस्त विधानं आणि कृती करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. त्यांची कीर्तनं माणसामाणसात द्वेष पसरवणारी असतात. सहिष्णू असलेल्या वारकरी संप्रदायावर प्रतिगामी, सनातनी विचारांची मंडळी कब्जा करण्याचा प्रयत्न करताहेत. अशा मंडळींचे निवृत्तीबाबा वक्ते हे प्रतिनिधी आहेत.

वारकरी संप्रदाय धार्मिक समतेचा पुरस्कार करणारी विचारधारा आहे. पण अलीकडच्या काळात काही विकृती या संप्रदायाच्या बदनामीला कारण ठरताहेत. वारकरी संप्रदायातल्या काही जणांनी प्रागतिक विचारसरणीच्या सुधारकांना विनाकारण विरोध केला. शाहू महाराजांच्या ब्राम्हणेतर चळवळीविरुद्ध आळंदी इथं परिषद भरवली गेली. साने गुरुजींच्या उपोषणाला अनेक कथित वारकऱ्यांनी विरोध दर्शवला.

हाच वारसा अलीकडच्या काळात निवृत्तीबाबा वक्ते चालवत आहेत. त्यांनी वयाची ऐंशी कधीच पार केली. सध्या ते वादग्रस्त ठरले आहेत, शरद पवारांच्या विरोधी काढलेल्या पत्रकामुळे. पण अशाप्रकारे वादग्रस्त होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ते तसे आधीपासूनच वादग्रस्त आहेत. असभ्य आणि अश्लील भाषेतली त्यांची किर्तनं आपण यू ट्यूबवर सहज ऐकू शकतो. ती किर्तनं न वाटता खालच्या पातळीवर जाऊन केलेली एखादी राजकीय सभा वाटते.

वारकरी विचारांशी विसंगत वर्तन

निवृत्तीबाबा वक्ते हिंदुत्ववादी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांपेक्षाही ते टोकाचे सनातनी आहेत. त्यांच्या कीर्तनात मुस्लिमद्वेष आणि ख्रिश्चनद्वेष ठासून भरला आहे. चक्रधर स्वामी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तुकडोजी महाराज, सत्यपाल महाराज यांच्याविषयी खालच्या दर्जावर जाऊन त्यांनी याआधी टीका केलीय. या सगळ्या महापुरुषांना वारकरी संतपरंपरेविषयी आदर होता.

असं असतानाही क्षुल्लक मतभेदांवरून त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर बोललं जातं. याउलट वारकरी संतांची बदनामी करणाऱ्या इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, वि. ल. भावे यांच्याविषयी ते चकार शब्दही काढत नाहीत.

हेही वाचा: वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची

मनुस्मृतीचं समर्थन आणि डॉ. आंबेडकरांवर टीका

मनुस्मृतीचं ते खुलेपणाने समर्थन करतात. आजची मनुस्मृती मूळ स्वरूपात नसल्याने वर्णश्रेष्ठत्वाचं विकृत समर्थन करणारी आहे. वारकरी विचारसरणीचा मेळ बसत नाही. वेदात स्त्री शूद्रांना अधिकार नसल्याने ज्ञानोबारायांनी वेदांना कृपण म्हटलं होतं. पापी म्हटलं होतं. हेच पाप फेडण्यासाठी वेद गीतारूपाने आल्याचे माऊली सांगतात. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ मनुस्मृती जाळली म्हणून बाबा त्यांच्यावर टीका करतात.

बाबासाहेबांनी कुराण का जाळलं नाही असा प्रतिप्रश्न विचारतात. खरंतर संत वेदांना मानत होते. पण पारंपरिक वैदिकांप्रमाणे त्यांनी वेद जसेच्या तसे स्वीकारले नाहीत. त्यांनी वेदांचा नवा अर्थ सांगितला. वेदांनी स्त्री शूद्रांना वगळण्याचं पाप केलंय आणि पापाचा निषेध संतांनी वारंवार केला. पण एकाही संताने कुराणाची समीक्षा केली. मनुस्मृती आणि वेद विषमतेला पूरक आहेत म्हणूनच संतांनी आणि बाबासाहेबांनी त्याची समीक्षा केली. इतर धर्माच्या ग्रंथाची संत आणि बाबासाहेब कशाला समीक्षा करतील?

संत विचारांच्या विरोधात कृती

निवृत्तीबाबा वक्ते जादूटोणाविरोधी विधेयकाला विरोध करण्यात आघाडीवर होते. नरबळी, देवदासीसारख्या अमानवी अंधश्रद्धांना संतांनीही विरोध केला आहे. `नवसे कन्या पुत्र होती| तरी का करणे लागे पती?` असा प्रश्न तुकोबारायांनी विचारला आहे.  पण निवृत्तीबाबांनी जादूटोणाविरोधी विधेयकाला विरोध केला. आम्ही आधी वारकरी नसून हिंदू आहोत, असं बाबांनी सांगितलंय. खरंतर हिंदू धर्मातल्यात अनेक प्रवाहांनी अंधश्रद्धांना विरोध केला. संतांनी तर केलेलाच आहे.

वारकरी परंपरा ही सहिष्णुतेवर आधारलेली आहे. असं न्या. महादेव गोविंद रानडे यांनी सांगितलंय. हे खरंही आहे. वारकरी संत सगुणोपासक असतानाही संत कबीर, संत रोहिदास या निर्गुणोपासक संतांविषयी आदर बाळगतात. देवधर्माविषयी आपल्यापेक्षा वेगळं मत व्यक्त करणाऱ्यांविषयी आदर बाळगण्याचा वस्तुपाठ संतांनी घालून दिला. निवृत्तीबाबा मात्र संत विचारांच्या विरोधी वागताना दिसतात.

हेही वाचा: वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन

प्रागतिक मुस्लिम संतांविषयी मौन

सनातन संस्थेसारख्या वादग्रस्त संस्थांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. सनातन प्रभातमधे त्यांचे लेखही छापून येतात. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्याविषयी त्यांच्या मनात असंतोष आहे. 'कोणाही जीवाचा न घडो मत्सर' असं सांगणारे तुकाराम महाराज ते सोयीस्कर विसरतात. कीर्तनातून मुस्लिमद्वेष पसरवत असताना कबीर, लतीफ, शेख महंमद, अनगडशहा फकीर, जैतुनबी अशा वारकरी विचारांशी जोडलेल्या थोर मुस्लिम संतांविषयी मात्र ते मौन बाळगून असतात.

वैदिक धर्मपीठाने इंद्रायणीच्या पाण्यात बुडवायला लावलेली गाथा छापणारे ग्रँट अलेक्झांडर आणि `तुकोबांच्या वाटेने मी प्रभू येशूकडे गेलो`, असं सांगणाऱ्या रेवरंड टिळकांचा वारसा वारकरी परंपरेला आहे. त्यामुळे कोणताच खरा वारकरी मुस्लिम आणि ख्रिश्चन यांचा द्वेष पसरवू शकत नाही. असं असतानाही वक्ते बाबा मात्र काँग्रेसने परधर्माचा अनुनय केल्याचा आरोप भर कीर्तनात करतात.

वारकरी परंपरेच्या गाभामुल्यांच्या विरोधात

तुकोबारायांविषयी अवमानकारक बोललेल्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांवर ते काहीही बोलत नाहीत. पण तुकोबारायांचे अभंग अनुवादित करणाऱ्या गांधीजींवर मुस्लिम अनुनयाचा आरोप असतो. साध्वी प्रज्ञासिंग यांच्यावर दहशतवादाचा आरोप असतानाही निवृत्तीबाबांनी त्यांचे समर्थन केलं. २६/११ च्या हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूने आनंदित होणाऱ्या समूहाचे ते प्रवक्ते असल्याचे आम्ही वारकरीचे सचिन पवार सांगतात.

निवृत्तीबाबा वक्ते यांना 'ज्ञानोबा तुकाराम' पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी प्रागतिक संघटना त्यांच्या विरोधात होत्या. तरीही हा पुरस्कार त्यांना दिला गेला. वारकरी परंपरेच्या गाभामूल्यांशी आणि 'भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या' अशा वारकरी कीर्तनाच्या संहितेशी निवृत्तीबाबा वक्ते विसंगत वागतात. त्यांच्या एकूणच भूमिकेविषयी अनेक वारकरी आणि सर्वसामान्य लोकही नाराज आहेत.

हेही वाचा: 

वारीचं सामर्थ्य समता संगराला लाभावं

बुवाबाबा, साधू, महाराजांनाही संत म्हणावं का?

संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न

साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?

गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला

(लेखक तरुण वारकरी कीर्तनकार आहेत. )