तरुणाईच्या नव्या जाणिवांची दिशा दाखवणारं साहित्य

१० जानेवारी २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


साहित्यक्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार किरण गुरव, प्रणव सखदेव यांना जाहीर झालाय. नागरसंवेदना, अनोखी कल्पितं आणि आधुनिकोत्तर जाणिवांचं कथन प्रणव सखदेव यांच्या लेखनात आहे; तर सर्वस्वी नवी ताजी वाटावी अशी अनागर जीवनाची कथा किरण गुरव यांनी लिहिलीय. नव्या पिढीतल्या लेखकांच्या लेखनवैशिष्ट्यांची ओळख करून देणारा लेख.

गेल्या दोन दशकांत मराठी कथेला नवं रूप आलंय. चिंचोळ्या आशयाची मराठी कथा आता बहुमुखी झालीय. रंगनाथ पठारे, राजन गवस, सतीश तांबे, जयंत पवार, नीरजा, मोनिका गजेंद्रगडकर, आसाराम लोमटे, किरण गुरव यांनी मराठी कथेचा नवा रूपबंध घडवला आहे. महत्वाचं म्हणजे जयंत पवार, आसाराम लोमटे यांच्या नंतर आता किरण गुरव यांच्या कथासंग्रहाला साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरवण्यात आलंय.

हेही वाचा: पुस्तक माणसाला कसं घडवतं?

भावना जिवंत करणाऱ्या कथा

किरण गुरव यांचे ‘राखीव सावल्यांचा खेळ’ आणि ‘श्रीलिपी’ हे कथासंग्रह एकाच वर्षी प्रकाशित झाले. या कथासंग्रहांनी वाचकांचं लक्ष वेधून घेतलं. सर्वस्वी नवी ताजी वाटावी अशी अनागर जीवनाची कथा त्यांनी लिहिली. त्यांच्या कथेतल्या जीवनाशय, वातावरण आणि कथनाने वाचकांना खिळवून ठेवलंय. आजच्या काळाचं ध्रुवीकरण, खंडितता, गुंते, ताणतणाव आणि लगतच्या मानवी सद्भावाची सृष्टी वेगाने लुप्‍तप्राय होते आहे. त्याचं सखोल दर्शन घडवणारी कथा त्यांनी लिहिली.

जागतिकीकरण काळाचे पेच आणि सामान्य माणसाचं हरवलेपण कथांमधून त्यांनी समरसून मांडलंय. आल्हाददायक वाटावी अशी उपमान सृष्टी, मिश्कील निवेदनद‍ृष्टी आणि प्रादेशिक बोलीचा संपन्‍न आविष्कार या कथेत आहे. त्यांच्या ‘सांगण्या’चा बंध हा दीर्घकथेचा आहे.

मानवी जीवनातल्या मूलभूत भावनेला साक्षात करण्याची अद्भुत किमया किरण गुरवांच्या कथेत आहे. मानवी वर्तन स्वभावामागे दडलेल्या इच्छांचे गारूड ते कथारूपात सहजपणे पेरतात. वाचकांना त्यांच्या जाणिवेचा गडद पुनःप्रत्यय देणारा आणि त्याचा विस्तार करणारा कथाबंध ते घडवत आहेत.

बाळूच्या अवस्थांतराची डायरी

‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ या संग्रहात तीन अभिनव दीर्घकथा आहेत. या त्रिवेणी कथांमधे महत्त्वाची आशयसूत्रं आहेत. ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ या कथेत खेडेगावातली एक सामान्य व्यक्‍ती कुटुंबासोबत त्याच्या तरुण मुलाला शहरातल्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमधे डिप्लोमाचा प्रवेश घेण्यासाठी जाण्याच्या प्रवासाचं चित्र आहे.

गावातून शहरात आलेल्या कुटुंबाच्या ‘वावरण्या’तून आणि शहरपाहणीतून गाव तसंच शहरातली भिन्‍नता आणि खेड्याविषयीचा सद्भाव आहे. संपूर्ण कथेत उपहासविनोदाच्या शैलीचं अजब रसायन आहे. तरुण मुलाच्या मिश्कील निवेदनातून शहर आणि कुटुंब न्याहाळणीचा अद्भुत वाटावा असा नजारा पेश केलाय. गुरवांच्या कथेची खासियत म्हणजे तपशिलांचा भरगच्चपणा तसंच स्थळ, द‍ृश्यं, प्रसंग, घटना, वर्तन आणि भावना संवेदनांचा घनदाट प्रत्यय देणारी त्यांची शैली आहे.

एखाद्या शहराचा असा तपशीलवार नकाशा रेखाटणारी ही मराठीतली अपवादात्मक कथा आहे. त्यामुळे त्यांच्या कथनाला सजीव सचित्रता प्राप्‍त होते. अनुभव-भावसंवेदनांचा भरगच्च प्रत्यय देणं हे त्यांच्या कथेचं वैशिष्ट्य ठरतं. मानवी जगण्यातलं अवस्थांतरणाचं जग आणि या गतीत खूप काही हरवल्याची जाणीव गुरवांच्या सर्वच कथेत केंद्रीय स्वरूपात आहे.

अचंबित वाटणारी शहरी भौतिक सृष्टी आणि त्यांच्या वागणुकीबरोबर गावाकडच्या ‘असते’पणाच्या विरोधद्वंदातून त्यांची कथा घडली आहे. हा फरक भैतिक सृष्टीबरोबर मूल्यद‍ृष्टीचाही आहे. ‘भरपूर काय तरी कायमचं आपण मागं टाकलेलं आहे किंवा कायमचं आपल्यापासून दूर गेलेलं आहे’, या हरवलेपणाची गडद जाणीव त्यांच्या सबंध कथाविश्‍वाला लगडून आहे.

हेही वाचा: वाचकानं सजगपणे वाचन संस्कृती कशी घडवावी?

कथेतल्या कथेत गुंतलेला ‘इंदूलकर’

‘इंदूलकर: चरित्र, काळ आणि निर्मिती यांची अन्वेषणकथा’ या कथेत लोकविलक्षण असा प्रत्यक्षता आणि कल्पिताचा ‘कथाखेळ’ रचला आहे. कथेतल्या कथेत अनेक कथा आहेत. कथाप्रवाह वाचकांना निवेदनात सहभागी करून कथा ‘रचतोय’. वाचक इंदूलकरबरोबर कधी त्या कथेचा भाग होऊन जातो ते कळतही नाही.

कथा एकाच वेळी ऑफिसकथा, घरकुटुंबकथा आणि स्वप्नकथा अशा तीन पातळ्यांवर घडते. एकाच व्यक्‍तिमत्त्वाच्या आत दुहेरी व्यक्‍तिमत्त्वं नांदत असतात. त्याच्या वर्तन स्वभावावर या दोन्ही व्यक्‍तिमत्त्वाचे ताण असतात. ऑफिस काळ हा अंगावर येणारा काळ आहे. या द्वंद्व प्रतिमांतून काळवेग साक्षात केला आहे.

घरकुटुंबावकाशात घरातले आणि गावाकडचे ताणतणाव आहेत. स्वप्नमालिकेत ‘आतले’ आणि ‘बाहेर’च्या विश्‍वातला ताण आहे. ताणमुक्‍तीची ही कथा आहे. मध्यान्हीचा दिवस अणि मध्यान्हीची रात्र एकदम दिसावी तसे होते. तारेवरील जीवघेण्या कसरती कराव्या लागणार्‍या आजच्या माणसाची ही कथा आहे.

मार्केटिंगचा बाजार मांडणारी कथा

‘बाजार: दि मार्केट’ या कथेत जागतिकीकरणाचा काळाचा गडद प्रभाव आहे. ग्राहककेंद्री बाजाराचे आसुरी कथन आहे. एका खेड्यातल्या आठवडी बाजाराचे दिलखेचक निवेदन आहे. वेगवेगळ्या रंग-गंध-संवेदनांबरोबर रंगात आलेल्या बाजारात एक वेडा मार्केटिंगचे फंडे ओरडून ओरडून सांगत आहे. या कथेत पराभूत माणसाचं केविलवाणं करुणचित्र रेखाटलंय. गुरवांच्या कथेत अस्वस्थ कालांतरण आणि त्याच्या पाठीमागे भूतकाळाचा आनंदसोहळारूपी जगाचा पडदा आहे.

तो पुन्हा पुन्हा अनावृत्तपणे उसळी मारून साकार होतो. हिरवंगार रान, पखरण घालणारं निळंशार आभाळ, भैरीचा डोंगर, चांदणं, घर, झाडंपेरं, लिंगोबा-म्हसोबाचा डोंगर,आईचे हाकारे अशा ‘बळेवंत’ निसर्गाची हाक आहे. ती ‘वांझोट्या आणि भाकड वर्तमानकाळापासून बाजूला झाली आहे’ याचा व्याकूळ आठवणपट त्यांच्या कथेत आहे. भूतकाळातला सर्व तर्‍हेचा सुकाळ आणि वर्तमानातल्या दुष्काळाची ही कथा आहे. त्यात मूल्यद‍ृष्टी आहे.

‘नव्या शहरी नेपथ्याच्या घरकुटुंबात पोरांना सद्यःस्थितीत आईचा पाठीवरून भरड हात फिरवण्यातला त्रिकालाबाधित आशय समजेल का?’ अशा भावजाणिवेची ही कथा आहे. काळ आणि मूल्यांतरणाची ही कथा आहे. त्यात वेगवान बदलाची पडझडचित्रं आहेत. नात्यांचा भूतकाळ आणि वर्तमानातल्या विभागणीची ही कथा आहे. गावपरिसर ही त्याची ‘विसावा सृष्टी’ आहे. या अनेकवचनी कथेत कथनाचा चित्तवेधकपणा आहे.

जुन्या कथेतल्या अलंकरणसृष्टीचं नूतनीकरण आहे. कोल्हापूर-राधानगरीची भूमिकथा म्हणून तिच्यातल्या घनदाट आशय समृद्धतेमुळे ती वेगळी ठरते. कोल्हापूर परिसरातल्या सजीव ध्वनी रूपांचा, बोलींचा लखलखाट आणि चमचमाट त्यांच्या कथेच्या पानोपानी आहे. त्यामुळे किरण गुरव यांचं कथासाहित्य मौलिक आणि महत्त्वपूर्ण ठरतं.

हेही वाचा: कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

तरुणाईचे ‘काळे करडे स्ट्रोक्स’

‘कोसला’ कादंबरीने तरुणांच्या जगाची नवी दिशा मराठी कादंबरीला दाखवली. त्या वाटेवरून कॉलेजच्या जगाचा नकाशा पुढे अनेक कादंबरीकारांनी आणला. नागरसंवेदना, अनोखी कल्पिते आणि आधुनिकोत्तर जाणिवांचे कथन सखदेव यांच्या लेखनात आहे. ‘काळे कोरडे स्ट्रोक्स’ या त्यांच्या कादंबरीत आजच्या महानगरातल्या महाविद्यालयीन तरुणांची भावकहाणी चित्रित केली गेली आहे.

कॉलेजमधल्या तरुण-तरुणींच्या आयुष्यातल्या घडामोडींतून नव्या जगाची दिशा, गती आणि मानवी स्वभाव कादंबरीत प्रकटलीय. त्याला महानगरीय जीवनाचे संदर्भ आहेत. मास कॉमला प्रवेश घेतलेल्या तरुणाच्या जीवनातल्या तीन वर्षांच्या काळातल्या घडामोडींचं चित्रण या कादंबरीत आहे. समीर आणि त्यांच्या जिवलग मित्र-मैत्रिणीचं एक खुलं जग कादंबरीत प्रातिनिधिक स्वरूपात आहे.

मोकळेपणाचा अवकाश मांडणारी कादंबरी

सानिकाचा मित्र चैतन्य अपघातात मरण पावतो. या मरणाचा तिला धक्‍का बसतो. पुढे समीर आणि सानिकात मैत्री निर्माण होते. सानिका अचानक परागंदा होते. पुढे समीर सलोनी नावाच्या तरुणीच्या सहवासात येतो. तिच्यात गुंततो. तीही मामाबरोबर न्यूझीलंडला निघून जाते. तो एकाकी होतो. मानवी नात्यातल्या सोबतीचा शोध सबंध कादंबरीभर आहे.

या पात्रांवर मरणाचं ओझंही आहे. कुटुंबातल्या मित्राच्या मृत्यूमुळे आलेल्या एकाकीपणातून अस्तित्वाची परिमाणे आणि गुंते अधोरेखित केले आहेत. कादंबरीत कॉलेजच्या वातावरणातला खुलेपणा आणि मोकळीकतेचं चित्रण आहे. आधीच्या पिढीतला मध्यमवर्गीय ताण आणि ओझ्यातून बाहेर पडलेल्या पिढीचं जगणं कादंबरीत आहे.

तरुणांचं बिनधास्त जग आहे. खाण्या-पिण्यापासून लैंगिक संबंधातल्या मोकळेपणाचा अवकाश कादंबरीत आहे. त्यामुळे हॉटेल, पब, बारमधल्या तरुण-तरुणींच्या मुक्‍त वावराने कादंबरीचा अवकाश गजबजलाय. सानिका आणि चैतन्य, समीर आणि सानिका, समीर आणि सलोनी, मी आणि विजीत, समीर आणि पिअर, समीर आणि अरुण या तरुण पात्रांच्या भावविश्‍वातून कादंबरीतलं कथन आकाराला आलंय.

हेही वाचा: कोरोनाकाळाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात कसं उमटलंय?

एकाकीपणातल्या अस्तित्वाचा शोध

मैत्रभावाचा किंवा नात्यांच्या शोध हे या कादंबरीचं मुख्य सूत्र आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर येणारा निराशेचा, उदासीनतेचा स्वर कादंबरीभर आहे. एका अर्थानं जीवनातल्या काळ्या करड्या स्ट्रोक्सचं हे चित्रण आहे. लैंगिक जीवनातले अनेक कंगोरे त्यातून ध्वनित झालेत. समीरचा हा अस्तित्व शोध मुंबई, मुळशी आणि हिमाचल प्रदेशातलं मॅकलीओडगंज अशा तिहेरी स्थळावकाशातून साकारला आहे.

महानगर, प्राकृतिक जंगल आणि पहाडी प्रदेशातल्या या शोधात प्राकृतिक वाटाव्या अशा जंगलभागातल्या फार्म हाऊसवर समीर जातो. तिथला ओला वारा, लाटांचा नाद, बैलांचे आवाज, हिरवा वास आणि औदुंबराची सळसळ या पार्श्‍वभूमीवर आदिम शांतता त्याला भावते. यातही त्याच्या एकाकी अवस्थेला विविध परिमाणं लाभली आहेत.

कादंबरीत आजच्या तरुणांचे समांतर विचारव्यूह आहेत. अरुण या मित्राच्या निमित्ताने ‘लाईफ खुल नाटक’ आहे. किंवा ‘माणसाच्या आयुष्यात हिडन फाईल्स’च जास्त असतात. अशा अनेक गुंत्यांचा शोध कादंबरीत आहे. ‘सगळ्या फिलॉसॉफीपेक्षा जगण्याला पैसा लागतो. तरायचं असेल तर वाहतं राहावं लागते’ या जाणिवेचं चित्र आहे.

मोल वाढवणारं साहित्य

‘काळेकरडे स्ट्रोक्स’ कादंबरीचं निवेदन प्रथम पुरुषी आहे. समीरच्या नजरेतून तीन वर्षांतल्या घटना-घडामोडींचं चित्रण केलंय. त्याचबरोबर पात्रांपात्रांमधल्या संवादाच्या मितीने त्याला वेगळी परिमाणं लाभली आहेत. मराठी, इंग्रजी, हिंदी संवाद भाषेच्या छटा आहेत. नव्या काळाचे संभाषित म्हणून मेल आणि ‘एसएमएस’चा उपयोग आहे. लोकपरंपरेतल्या चिमणी-कावळा-ससाणा आणि कान्होबाच्या गोष्टींचा कल्पक उपयोग केलाय.

शारीर अनुभवाचं आणि तरुणांच्या खासगी आयुष्याचं धीट चित्रण कादंबरीत आहे. कॉलेज तरुणाच्या नात्यांचा शोध आणि त्यातल्या हरवलेपणाची जाणीव या कादंबरीत केंद्रस्थानी आहे. मनाच्या उदास निराश अवस्थेत ‘चमकत्या अंधाराच्या दिवसांची, जिच्या फण्यावर, हिंदोळतोय, तुझ्या माझ्या नात्यांचा आस’ अशा उदास केऑसचं गडद असं चित्र आहे.

संजय वाघ यांच्या ‘जोकर बनला किंगमेकर’ या बालकादंबरीचा साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मान झालाय. संस्कारक्षम आणि प्रेरक ठरावी अशी विनूची हृद्य कथा या कादंबरीत आहे. आजच्या समाजाचं भविष्यचित्र दर्शविणारं हे कथारूप मराठीत अप्रुप ठरावं असं आहे. या तीनही साहित्यकृतींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातलीय.

हेही वाचा: 

विष्णू खरे : कवी गेल्यावर सोबत काय राहिलं?

दीडशे वर्षांनंतरही मराठी कवितेत गालिब जिवंत

कवयित्री सावित्रीबाईंची ओळख करून देणाऱ्या कविता

व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!

‘अरुणा ढेरेंचं मराठी साहित्यातलं योगदान मानदंडासारखं’

फ्रेंच सरकारने लुई ब्रेल यांचा मृतदेह कबरीतून बाहेर का काढला?

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)