एका वनरक्षकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळतो तेव्हा

१७ जून २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोल्हापुरातील वनरक्षक सलीम मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या बाल कादंबरीला बालसाहित्य अकादमी पुरस्कार घोषित झालाय. निसर्गातली नवलाई हा त्यांच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय. निसर्गाची अनावर ओढ त्यांना सतत खुणावत रहायची. त्यातून इंजिनिअरिंग आणि पुढे इंटेरियर डिझायनिंगसारख्या करियरवर पाणी सोडलं आणि वनरक्षक म्हणून रुजू झाले. तिथून सुरू झाला एका `जंगल खजिन्याचा शोध`.

‘निसर्ग सौंदर्यातील अजब करामतीतून उलगडलेल्या अनेक निसर्गमूल्यांनी मला सतत भुरळ घातलीय. पशूपक्ष्यांची किंवा इटूकल्या कीटकांची कधी सहजगत्या झालेली हालचाल, अनोखी अदाकारी आणि काही वेळा ठोसपणे केलेली कृतीसुद्धा मनस्वी जगायच्या जीवनशैलीचे असंख्य धडे देवून गेली आहे. निष्ठा, त्याग, धिटाई आणि परोपकाराच्या भावभावनांचा त्यात उत्तुंग आविष्कार असतो. तसंच सहजीवनाचे घटमूठ नातेसंबंध, निखळ प्रेमानं मनमुराद जगण्याची हातोटी त्यात दिसून येते. हे सारं थकल्या मनाला आगळच हुरूप आणणारं असतं.’

निसर्ग आणि निसर्गातील जीवजंतूंशी इतकं अमिट नातं सांगणारा हा सलीम मुल्ला. वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे असं निसर्गाशी थेट नातं सांगणार्‍या तुकोबांप्रमाणे निसर्ग सहवासातून ईश्वरीकृपेचा शोध घेतो. तर कधी कधी निसर्गातच स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेत राहतो. त्यातून जे हाताला लागेल ते शब्दात पकडण्याचा प्रयत्न करतो. त्यातून आकाराला येतं ‘अवलिया’ सारखं ललित लेखांचं दर्जेदार पुस्तक.

‘ऋतूफेरा’ या पुस्तकात हा माणूस निसर्गात स्वत:च्या अस्तित्वाच्या खुणा शोधताना सापडतो. त्याच्या शब्दशब्दातून निसर्गाबद्दलची अनाहूत ओढ प्रकट होते. त्यात दखनी आणि हिंदीमिश्रित शब्दांमुळे त्यांच्या भाषेचा लहेजा मनाला भुरळ घालून जातो.

अशी झाली जंगल खजिन्यासाठी भटकंती

निसर्गातील नवलाई त्यांच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय. त्यातूनच ‘जंगल खजिन्याचा शोध’ ही बालकादंबरी आकाराला आली. नुकतंच त्यांच्या या कादंबरीला साहित्य अकादमीने पुरस्कार देवून सन्मानित केलंय. ‘जंगल खजिन्याचा शोध’ ही त्यांची बालकादंबरी. निसर्गातल्या अदभूत गोष्टींचं कुतूहल माणसाला नेहमीच खुणावत असतं. या कुतूहलातूनच ही कादंबरी जन्माला आली.

जेबू आणि त्याच्या छोट्या मित्रांची ही साहस कथा. या साहस कथेत जेबू आणि त्याचे मित्र निसर्गाशी बोलतात. इथल्या विविध पानाफुलांची ओळख करून देतात. पशू- पक्षांचे आवाज, त्यांच्या पावलांचे ठसे, जलचर प्राणी, कीटक, झाडे-वनस्पती, पानफुलांचा गंध,त्यांचे औषधी उपयोग, दगड मातीचे रंग व आकार अशा अनेक वैविध्यपूर्ण गोष्टींचं बारकाईनं निरीक्षण या कादंबरीत येतं. जेबू आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने लेखक आपल्याला जंगलाची सफर घडवून आणतो. निसर्गाचं मानवाला भरभरून देणं आणि माणसाचा स्वार्थ यातल्या संघर्षावरही लेखक नेमकेपणाने बोट ठेवतो.

हेही वाचा: पर्यावरण दिनः संवेदनशील कृती करण्यासाठी पावलं उचलुया

बालकादंबरी आजवरच्या अनुभवाचं संचित

ही बालकादंबरी बालमनाची पकड घेत उत्कंठा वाढवत नेते. इथं औषधी वनस्पतीची तस्करी करणारा तस्कर भेटतो. या तस्कराशी जेबू आणि त्याच्या बालमित्रांनी केलेला सामना पाहायला मिळतो. लेखक केवळ साहसकथा म्हणून मर्यादित अर्थाने या कादंबरीत स्वत:ला व्यक्त करत नाही. तो त्याच्या आजवरच्या अनुभवाचं संचित बाल वाचकांसमोर मांडतो. तो आपल्या सहजसुलभ भाषेतून निसर्गसंस्कार देतो.

अपार मेहनत आणि कष्टान त्यानं निसर्गातील केलेल्या निरीक्षणांच्या नोंदी रंजकपणे मांडतो. अनुभवाचा अस्सलपणा आणि रंजकता यामुळे ही कादंबरी वेगळ्या उंचीवर गेली आहे.

भाषांची सुंदर गुंफण सलीमच्या लिखाणाचं सौंदर्य

तळंदगे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर हे त्यांचं गाव. वडील महागाव ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर येथे माध्यमिक शिक्षक. त्यांच्या या साहित्यिक प्रवासात वडिलांचं मोठं योगदान. घरी दखनी बोलली जायची. वडील हिंदीचे शिक्षक. मराठीवरही त्यांचं तितकच प्रेम. हिंदी,मराठी आणि दखनीच्या देवाणघेवाणीतून त्यांची भाषा लुभावणारी बनली. भाषेचा हा लहेजा त्यांना लहानपणीच वडलांकडून मिळाला.

विविध भाषांची सुंदर गुंफण सलीमच्या लिखाणाला एक वेगळं सौंदर्य प्राप्त करून देतं. महगाव हे हिरण्यकेशी नदीकाठावर वसलेलं समृद्ध गावं. गावाच्या अवतीभवती असलेल्या समृद्ध निसर्ग आणि यातून जन्माला आलेल्या समृद्ध संस्कृतिक जीवनाचे खोल संस्कार त्यांच्या बालमनावर झाले. निसर्गाची अनावर ओढ त्यांना सतत खुणावत रहायची.

हेही वाचा: 'मुंबई आमचीच', असं आम्ही मुंबईचे मराठी लोक का म्हणतो?

सिविल इंजिनियर, इंटेरियर डिझायनर ते वनरक्षक

माध्यमिक शिक्षण पूर्ण करून वडीलभावाच्या पाठोपाठ सलीम सिविल इंजिनियर झाले. पानाफुलात रमणार्‍या सलीमचा जीव सिमेंटच्या जंगलात रमेना. निसर्गाला ओरबडणार विकासाचं हे ओंगळ रूप पाहून तो अस्वस्थ व्हायचा. कोल्हापूरच्या दळवीज आर्ट या संस्थेत सलीम मुल्ला यांनी इंटेरियर डिझायनर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. आपल्या निसर्गप्रेमाची भूक  सलीम इंटेरियर डिझायनिंगच्या माध्यमातून भागवू लागला. तिथेच दळवीच आर्टमधे शिक्षक म्हणून काम करू लागला.

दळवीज आर्टमध्ये काम करत असताना त्यांच्यातला निसर्गप्रेमी शब्दातून व्यक्त होवू लागला. स्वराज, बालविकास, रानवारा, आनंद या मासिकातून त्यांनी लिखाण केलं. तसंच लोकराज्य, तरुण भारत, सकाळ, पुढारी, मँचेस्टर मधूनही भरपूर लिखाण केलं. शशिकांत महाडेश्वर यांच्या जनसंदेशमधेही त्यांनी लिखाण केलंय. निसर्गात रमणारा हा माणूस मात्र नेहमीच माणसांच्या गर्दीपासून दूर राहत आलाय. निसर्गाच्या ओढीने या माणसाला वनखात्यात आणलं.

वयाच्या तेहतिसाव्या वर्षी हा माणूस वनखात्यात वनरक्षक म्हणून नोकरीला लागला. आपल्या आवडीच्या क्षेत्रात नोकरी मिळाल्यानं त्याच्या सृजनाला नवी पालवी फुटली. सिमेंटच्या जंगलात होणारी त्याची घुसमट थांबली. गळ्यात कॅमेरा अडकून दिवसरात्र त्याचं मनसोक्त हिंडणं सुरू झालं. तो आता पानाफुलांशी, पशू पक्षांशी बोलू लागला. त्यांच्या सृजनशील हालचाली टिपू लागला. निसर्गातल्या सृजनाशी त्याचं सृजन एकजीव झालं. आणि शब्दातून ते कागदावर झरझर उतरू लागलं.

जंगल लिपीचा महाकोश अभ्यासायला हवा

आपल्या ‘ऋतुफेरा’ या पुस्तकाच्या ब्लर्गमधे सलीम म्हणतो, ‘निसर्गाच्या प्रत्येक अप्रूपातून ऋतूच्या नवलाईची जादू शोधता येते. त्यासाठी आपली पावलं निसर्गाकडे झपाझपा पडली पाहिजेत. पाखरांच्या कलकलाटांची लडिवाळ बोली समजून घ्यायला हवी. रानातून डुरकणार्‍या रानटी जनावरांच्या हालचालींचा नेमका उद्देश समजायला हवा. त्याच्या डोळ्यातील निव्वळ आब ओळखून त्याच्या कलंदरी मनाची जानपहेचान झाली पाहिजे. किडे, फुलपाखरे, पशू पक्षी या सार्‍यांच्या हरेक हरकतींचा मागमूस घेता आला पाहिजे. पाऊलठशांवरून आडदांड जनावरांचा मनोकल वाचता आला पाहिजे. जंगल लिपीचा हा महाकोश अभ्यासला तर निसर्गाच्या निर्मितीमागे ईश्वराचं नेमकं प्रयोजन काय आहे, हे हळूहळू कळून येतं.’

इतका हा माणूस निसर्गाशी तादात्म पावला आहे. म्हणूनच त्यांच्या ‘अवलिया’ आणि ‘ऋतुफेरा’ या दोन ललित लेखसंग्रहातून पानोपानी निसर्ग ओसंडुन वाहताना दिसतो. ‘पेणं आणि चिकोटी’ ही बालकादंबरी पॉप्युलर प्रकाशनकडून येतेय. या कादंबरीत त्यांनी आपला जीव ओतला आहे. या कादंबरीकडून त्यांच्या खूप अपेक्षा आहेत. ‘अबजाईतून उतराई’ ही बालकादंबरीही लिहून नुकतीच हातावेगळी केलीय.

हेही वाचा: हवामान बदल हे मानवजातीच्या अस्तित्वासमोरचं मोठं आव्हान

साहित्य लेखनामागे अनेकांची प्रेरणा

आपल्या लिखाणाच्या प्रेरणेबद्दल बोलतांना हा माणूस भावुक होतो. निसर्ग कोणताच भेद करत नाही. तो धर्म, जात, भाषा यापलीकडे जावून मुक्तपणे देत असतो. म्हणूनच निसर्ग ही आपली प्रथम प्रेरणा आहे तर आब्बू अर्थात आपले वडील आपल्या लिखाणाची ऊर्जा असल्याचं ते सांगतात. सलीम अली यांच्या लिखाणाने निसर्गाकडे पाहण्याचा डोळस दृष्टीकोण दिला तर व्यंकटेश माडगूळकरांमुळे निसर्गाला शब्दात पकडण्याची किमया मिळाली.

महागावचे अनंत सामंत आणि विठ्ठल कृष्णा सुतार या बालसाहित्यिक असलेल्या शिक्षकाने बालसाहित्याची आवड निर्माण केली. किलबिल, बलोद्यान या सारख्या आकाशवाणीवरील कार्यक्रमांनी आपलं बालमन समृद्ध केल्याचंही ते सांगतात.

पत्रलेखनाची आवड हा छंदच जडला

शाळेत असतांना गो. नि. दांडेकर महागाव शेजारी असलेल्या सामनगड याठिकाणी आले होते. लेखकाच्या भेटीसाठी शाळेची मुलं घेवून शिक्षक गोनीदाना भेटायला गेले. त्यात एक अपंग विध्यार्थी होता. तोही गडावर त्यांना भेटण्यासाठी आला होता. त्याच त्यानं अप्रूप वाटलं. गोनीदानी त्याला पत्र पाठविलं. त्यांचं पत्र वाचून सलीम यांनाही लेखकांना पत्र लिहण्याची आवड निर्माण झाली.

एखाद्या लेखकाचं पुस्तक वाचलं की सलीम त्यांना पत्र लिहायचा. आणि पत्राच्या उत्तराची वाट पाहत रहायचा. लेखकाच्या हस्ताक्षरातील पत्र सलीमला वेड लावून जायचं. पुढे हा त्याला छंदच जडला. पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, रणजीत देसाई, शिवाजी सावंत, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, वसंत बापट यासारख्या अनेक दिग्गज लेखकांच्या हस्ताक्षरातील हजारो पत्रांचा ठेवा त्यांच्या आजही संग्रही आहे.

हेही वाचा: अरुणा सबानेः एकटेपणाचा खंबीरपणे सामना करण्यासाठीची प्रेरणा

साहित्यविश्वापासून नेहमीच चार हात लांब

साहित्य अकादमीने सन्मानित केलेल्या त्यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या बालकादंबरीला २०१५ मधे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार मिळालाय. याबरोबरच यावर्षी त्यांच्या ‘ऋतुफेरा’ या ललित लेखसंग्रहाला दमसाचा विशेष पुरस्कार मिळाला. याबरोबरच अमरावती येथील एका प्रतिष्ठानचा पुरस्कारावरही या पुस्तकानं मोहोर उमटवलीय.

साहित्यिक चळवळ आणि साहित्य विश्वापासून हा माणूस नेहमीच दूर राहत आला आहे. आपल्याला निसर्गात जे भावल ते शब्दातून मांडत राहायचं. इतकाच त्यांचा साहित्य जगताशी संबंध. बाकी त्यांचं अवघ जीवन जंगल आणि निसर्गानं व्यापलं आहे.

निसर्गाचं कुतूहल बालमनात निर्माण करुया

निसर्गाच्या पडझडीने हा माणूस खूप अस्वस्थ होतो. निसर्ग वाचवायचा असेल तर खरं काम लहान मुलांच्यात करावं लागणार आहे. पशू पक्षांचे आवाज, पक्षांचं हवेत उडणं, कोंबांचं जमिनीतून तरारुन येणं, झाडांच वाढण या सार्‍यांच कुतूहल बालमनाला असतं. या कुतुहलाला सर्जक बनवणं हा बालसाहित्याचा गाभा असला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे.

निसर्गाबद्दल असलेल्या कुतुहलाला जागवत रंजकपणे बालमनावर निसर्गसंस्कार करता येतात यावर त्यांचा विश्वास आहे. या विश्वासातून ते बालसाहित्याकडे वळले. त्यातून `जंगल खजिन्याचा शोध` ही कादंबरी आकाराला आली. त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीने पुरस्कार देवून सन्मानित केलंय. पण या कादंबरीबरोबच ‘पेणं आणि चिकोटी’आणि ‘अजबाईतून उतराई’ या दोन बालकादंबऱ्याही वाचालयाच हव्यात अशा आहेत.

हेही वाचा: गिरीश कर्नाड: आधुनिक विचारांचा अभिजात नाटककार