युक्रेनच्या 'डर्टी बॉम्ब'मुळे रशिया टेंशनमधे

०४ नोव्हेंबर २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोएगू यांनी युक्रेन 'डर्टी बॉम्ब' तयार करत असल्याचा दावा केलाय. तशी तक्रारच त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे केलीय. 'डर्टी बॉम्ब' हा काही हलक्यात घेण्यासारखा विषय नाहीय. हा बॉम्ब अणुबॉम्ब इतकाच घातक समजला जातो. त्यातून मोठा विध्वंसही होऊ शकतो. त्यामुळेच तिथल्या भारतीय दूतावासानं भारतीय नागरिकांना युक्रेन सोडायचा आदेश दिलाय.

रशिया-युक्रेन यांच्यातलं युद्ध काही सरता-सरत नाहीय. या युद्धामधे रोज वेगवेगळी वळणं येतायत. अणुबॉम्ब इतक्याच धोकादायक असलेल्या 'डर्टी बॉम्ब'ची आता यामधे एण्ट्री झालीय. मागच्याच महिन्यात रशियाची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसोबत एक बैठक झाली. त्यात युक्रेन 'डर्टी बॉम्ब' तयार असल्याचा दावा रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोएगू यांनी केला होता. त्यामुळे एकच वादळ उठलंय.

हेही वाचा: वीस वर्ष सत्ता भोगणाऱ्या पुतिन यांना का बदलायचंय रशियन संविधान?

डर्टी बॉम्ब काय आहे?

डर्टी बॉम्ब हा अतिशय घातक समजला जातो. यामधे युरेनियम, डायनामाइट असे पदार्थ असल्यामुळे त्याच्या स्फोटातून अनेक प्रकारचे विषारी वायू बाहेर पडतात. या स्फोटाची व्याप्तीही फार मोठी असते. त्यामुळे हा बॉम्ब फुटल्यावर त्याचा प्रभावही बराच काळ कायम राहत असल्याचं मत अमेरिकन आरोग्य संस्था असलेल्या 'सेंटर फॉर डिसीज कन्ट्रोल अँड प्रिवेंन्शन'नं नोंदवलंय.

स्फोट होऊन बराच काळ लोटला तरी त्यातले घातक किरणोत्सर्गी पदार्थ हवेत कायम असतात. टेक्निकल भाषेत या सगळ्याला 'रेडियोलॉजिकल डिस्पर्सन डिवाईज' असं म्हणतात. या घातक पदार्थांमुळे कॅन्सर, अपंगत्व, त्वचेचे गंभीर आजार होऊ शकतात. तसंच हृदयालाही इजा पोचू शकते. त्यामुळे आरोग्याच्यादृष्टीने हे फारच धोक्याचं आहे. याचे परिणाम पुढची अनेक दशकं भोगावे लागू शकतात.

अणुबॉम्बच्या तुलनेत डर्टी बॉम्ब बनवणं फार खर्चिक नाही. कारण यामधे प्रयोगशाळा, हॉस्पिटल, अणुऊर्जा प्रकल्पांमधल्या किरणोत्सर्गी पदार्थांचा वापर केला करता येणं सहज शक्य असतं. त्यामुळे हा बॉम्ब जलदगतीने बनवता येऊ शकतो. तसंच याचा परिणाम लगेच दिसत नाही. तर प्रदूषणासारखा तो संथगतीने जाणवत राहतो.

जगभर झालेत प्रयोग

चेनन्या हे रशियाच्या दक्षिणेकडेचं एक राज्य. १९९१ला सोवियत संघाचे तुकडे झाल्यावर चेनन लोकांनी वेगळ्या देशाची मागणी केली होती. आजही या लोकांची फुटीरतावादी चळवळ कार्यरत आहे. तर याच चेनन बंडखोरांनी १९९६ला रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोतल्या एका पार्कात दोन डर्टी बॉम्ब ठेवले होते. अर्थात ते निकामी करण्यात यश आल्यामुळे पुढचं संकट टळलं. पुढे १९९८मधे चेनन्यामधेही असाच एक डर्टी बॉम्ब आढळून आला होता.

या डर्टी बॉम्बमधून लक्ष्यभेद करायचा तर आधी या बॉम्बमधल्या किरणोत्सर्गी पदार्थांचं पावडरमधे रूपांतर करावं लागत असल्याची माहिती 'लल्लनटॉप' या वेबसाईटवर वाचायला मिळते. हे कण जर बारीक असतील तर त्याचा तितकासा परिणाम होत नाही. पण तरी धोका कमी होतो किंवा टळतो असंही नाही.

२००२ला अमेरिका आणि २००४ला इंग्लंडमधे डर्टी बॉम्बच्या असल्याच्या संशयातून दोघांना अटकही झाली होती. इंग्लंडमधे सापडलेली व्यक्ती अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होती. त्यामुळे त्यावेळी या बॉम्बचा धसका जगाने किती घेतला असेल याची कल्पना न केलेली बरी. त्यामुळे डर्टी बॉम्बमधून हल्ला केल्याच्या घटना आजपर्यंत घडलेल्या नसल्या तरी त्याचे प्रयोग याआधी झाल्याच्या नोंदी आहेत.

हेही वाचा: कुणालाही न उलगडलेले मिखाईल गोर्बाचेव

अणुबॉम्बची प्रतिकृती नसला तरी

डर्टी बॉम्ब हा अणुबॉम्बसारखाच असल्याचं बोललं जातं. पण त्यात फरक आहे. डर्टी बॉम्ब हळूहळू त्याचा परिणाम दाखवायला लागतो. तर अणुबॉम्बमुळे एकाएकी सगळं उध्वस्त होतं. ६ ऑगस्ट १९४५ला अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला होता. त्यानंतर ९ ऑगस्टला नागासाकी शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकण्यात आला. ढगांच्या सावटासारख्या घोंघावत येणाऱ्या या अणुबॉम्बनं दोन्ही शहरं बेचिराख करून टाकली. या अणुबॉम्बमुळे लाखो लोकांचा हकनाक बळी घेतला गेला.

१९८६मधे युक्रेनच्या चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पामधे स्फोट झाला होता. एप्रिल २०२२ला याच अणुभट्टीवर रशियाने ताबा मिळवलाय. चेर्नोबिल अणुभट्टीतल्या स्फोटाच्या घटनेला ३५ वर्ष झालीत. या स्फोटानंतर प्रकल्प असलेलं प्रिपिएट हे पूर्ण शहर विस्थापित करावं लागलं होतं. या उध्वस्त शहराच्या जखमा आजही शहरभर कायम आहेत. अशाच अणुभट्टीतून निघणाऱ्या किरणोत्सर्गी पदार्थातून हा बॉम्ब बनवला जातोय. त्यामुळे चेर्नोबिलच्या विस्फोटातून डर्टी बॉम्बचा संभाव्य धोका आपल्या लक्षात येईल.

१९४५ला अमेरिकेनं पहिला अणुबॉम्ब तयार केला होता. 'मॅनहॅट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अणुबॉम्बच्या प्रकल्पावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी 'फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट' ही संस्था काढली होती. या संस्थेनं डर्टी बॉम्बमधे अमेरिकेतलं न्यूयॉर्कसारखं शहर उध्वस्त करायची क्षमता असल्याचं म्हटलंय.

रशियाची अशीही स्ट्रॅटेजी

मागच्या अनेक महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यामधे युद्ध चाललंय. दरम्यानच्या काळात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी जगभरातल्या देशांना मदतीचं आवाहन केलं होतं. अमेरिकेसोबत अनेक पश्चिमी देशांनी त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत तत्परतेने मदतही पोचवली. कुणी शस्त्रास्त्रं, कुणी अन्नधान्य तर कुणी आर्थिक रसद अशा स्वरूपात ही मदत दिली गेली.

झेलेन्स्की हे 'नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन' अर्थात नाटोचं सदस्यत्व मिळावं म्हणून प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्नही केले होते. पण रशियाने युक्रेनला नाटोचं सदस्यत्व मिळालं तर तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल अशी थेट धमकीच देऊन टाकली. त्यानंतर सातत्याने युक्रेनमधल्या मोठ्या शहरांवरचे हल्ले कायम राहिले. युक्रेनच्या आर्थिक नाड्या उध्वस्त करण्याचं कामही रशियाने या काळात केलंय.

युक्रेनला  अमेरिकेसारख्या देशांचा पाठिंबा वाढत जातोय. सहानुभूतीही मिळतेय. भरघोस मदतही केली जातेय. त्या मदतीमधे कुठेतरी खो पडावा म्हणून 'डर्टी बॉम्ब'च्या प्रकरणाची हवा केली जात असल्याचं मत अमेरिकन थिंक टॅंक असलेल्या 'स्टडी ऑफ वॉर'नं मांडलंय. त्यांनी या संबंधीचा एक रिपोर्टच प्रकाशित केलाय. युक्रेनला येत असलेल्या मदतीचा ओघ थांबावा हीच रशियाची स्ट्रॅटेजी असल्याचं मतंही या रिपोर्टमधे नोंदवलं गेलंय.

हेही वाचा: 

लोकशाहीमुळे आर्थिक विकास खुंटतो?

लोकशाही वाचवण्याचा वीस कलमी कृतीक्रार्यक्रम

चीनने धोका दिल्यानंतर नेहरूंनी आपली युद्धनीति कशी बदलली?

बहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज

या बाळंतपणाने सरकारी आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास जन्माला घातलाय