डॉ. एम. एस. कलबुर्गी: भारताला बसवण्णांची वाट दाखवणारा संशोधक

३० ऑगस्ट २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


प्रसिद्ध संशोधक डाॅ. एम. एम. कलबुर्गी यांचा आज स्मृतिदिन. २०१५ ला आजच्याच दिवशी त्यांची हत्या करण्यात आली. त्यांची राहणी अगदीच साधी होती. हजारो ग्रंथ आणि शीलालेख धुंडाळत कलबुर्गींनी भक्कम पुराव्यांच्या आधारे संशोधन केलं. लिंगायत समाजाच्या पुनरुज्जीवनाची त्यांनी दिलेली पंचसूत्री आजही खूप महत्वाची आहे. लिंगायतांच्या वैदीकीकरणाची त्यांची चिकीत्सा अनेकांना झोंबणारी होती.

डाॅ. एम. एम. कलबुर्गी हे कर्नाटकातले प्रसिद्ध संशोधक होते. त्यांनी शेकडो पुस्तकांचं संपादन केलं. अनेक शिलालेख शोधले. लोकसाहित्याचा अभ्यास केला. अनेक संशोधन संस्थांची निर्मिती केली. लिंगायत धर्मविचार नव्याने मांडला. विपुल वैचारिक लेखन केलं. त्यांच्या या अफाट संशोधनकार्याचा आवाका पाहिल्यावर डाॅ. एम.एम.कलबुर्गींचं मोठेपण नव्याने समजू लागतं.

शिक्षक ते कुलगुरू

डाॅ.एम. एम. कलबुर्गी यांचा जन्म एका लिंगायत शेतकरी कुटुंबातला. यरगल बीके हे त्यांच्या वडलांचं गाव. विजयपूर जिल्ह्यातल्या सिंदगी तालुक्यातलं हे गाव. तिथं त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. १९६० ला त्यांनी बीएची पदवी घेतली. पुढे एमएला असताना कन्नडमधे १०० पैकी १०० गुण मिळवून ते युनिवर्सिटीत पहिले आले.

त्याच वर्षी त्यांनी कन्नड शिक्षक म्हणून नोकरी करायला सुरवात केली. १९६८ ला 'कविराजमार्ग परिसरातलं कन्नड साहित्य' या विषयावर प्रबंध लिहून पीएचडी मिळवली. १९९८ ला त्यांची हंपी युनिवर्सिटीतच्या कुलगुरूपदी निवड झाली. कुलगुरू पदाच्या काळात त्यांनी अनेक महत्वाची कामं केली. २००१ ला ते कुलगुरू पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही त्यांनी संशोधनकार्य चालूच ठेवलं.

हेही वाचा: महात्मा बसवण्णाः ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारणारा महापुरूष

संशोधन क्षेत्रात भरीव योगदान

संशोधनकार्यावर त्यांची किती निष्ठा होती हे सांगणारा एक प्रसंग भालचंद्र जयशेट्टी यांनी लिहीला आहे. 'धीमंत सत्यशोधक: डाॅ.एम.एम.कलबुर्गी' या पुस्तकात हा प्रसंग आलाय. एकदा कोणतीतरी बैठक संपवून ते शहापूरला गेले होते. त्यावेळी त्यांना शहापूरच्या डोंगरावर असलेल्या एका शीलालेखाची माहिती कोणीतरी दिली.

कलबुर्गी लगेचच त्या शीलालेखाचा शोध घ्यायला निघाले. तिथे जाऊन डोंगर चढू लागले. उतारवय असल्यामुळे डोंगर चढता चढता पाय घसरून पडले. हाताच्या कोपरांना आणि गुडघ्यांना खरचटून जखमा झाल्या होत्या. तरीही शीलालेख पाहता आल्यामुळे ते खूष होते. चेहऱ्यावर त्याचा आनंद ओसंडून वाहत होता. अशा ध्येयवादी वृत्तीने त्यांनी कर्नाटकाच्या संशोधन क्षेत्रात भरीव योगदान दिलं.

अनेक जुन्या-नव्या शीलालेखांचा शोध घेतला. त्या शीलालेखांची माहिती देणारी आणि विश्लेषण करणारी पुस्तकं लिहीली. शीलालेखांबरोबरच त्यांनी अनेक पुस्तकांचं संपादन केलं. वचनसाहित्याच्या संपादनातलं त्यांचं कामंही मोलाचं आहे. बसव समितीच्या मदतीने त्यांनी शरणांची निवडक २५०० वचनं सुमारे २३ भारतीय भाषात अनुवादीत करण्याची योजना पूर्ण केली. त्यातून भारतभर शरणांचा विचार पोचवला. 'मार्ग'च्या सात खंडातून स्वतंत्र विचारप्रवर्तक लेखांची मांडणी केली.

जगणं कायक-दासोह तत्वानुसार

डाॅ. एम. एम. कलबुर्गींची राहणी अतिशय साधी होती. शरणांच्या कायक-दासोह तत्वानुसारच ते जिवन जगले. कायक म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं काम आनंदाने आणि प्रामाणिकपणे करणं, तर दासोह म्हणजे त्या कायकातून गरजेपेक्षा जास्त मिळालेलं उत्पन्न गरजूंना वाटणं.

दासोह म्हणजे दान नाही तर शिवाच्या मालकीची वस्तू शिवाला अर्पण करणं. यात कुणी याचक नाही आणि कुणी दाता नाही असा भाव दोघांच्याही मनात असतो. कलबुर्गींनी आपल्या जगण्यातून कायक-दासोह तत्वाचा वस्तुपाठच घालून दिला.

ते हंपी युनिवर्सिटीचे कुलगुरू असताना मिळालेला अधिकचा भत्ता युनिवर्सिटीला परत करायचे. पुरस्काराची एक लाख रूपयाची रक्कमही त्यांनी सरकारला परत केली होती. निवृत्तीनंतर आलेला पैसाही त्यांनी विविध लिंगायत मठांना आणि युनिवर्सिटीला दासोह स्वरूपात दिला होता.

अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करूनही त्यांना अहंकाराची बाधा झाली नाही. कोणताच मोह झाला नाही. त्यांना स्वतःची कार नव्हती. ते आपल्या कामासाठी बस, ऑटो आणि भाड्याच्या कारमधून प्रवास करायचे.

हेही वाचा: बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं

लिंगायत समाजाला बसवण्णांपर्यंत पोचवलं

डाॅ. एम. एम. कलबुर्गी यांचं महत्त्वाचं काम म्हणजे लिंगायत धर्मविचारांची पुर्नमांडणी. आजपर्यंत लिंगायतांकडे हिंदू धर्मातली एक जात म्हणूनच बघितलं जायचं. त्यातही धर्मगुरू असलेले जातीचे जंगम आणि काही व्यापारउदीम करणाऱ्या श्रीमंत जाती एवढीच लिंगायत समाजाची ओळख होती.

लिंगायत मठांवर एकाच जातीच्या पुरूषांची मक्तेदारी होती. लिंगायत समाजातल्या बहुजन आणि अस्पृश्य जातीतल्या लोकांना बाजूला सारलं जात होतं. त्यांची लिंगायत ही ओळखच हिरावून घेतली जात होती. महात्मा बसवण्णा सोडून केवळ पंचाचार्य सांगितलं जात होतं. शरणांची लोकभाषेतली वचनं सोडून काल्पनिक संस्कृत ग्रंथ लिंगायतांच्या माथी मारले जात होते.

बसवण्णांनी नाकारलेली कर्मकांडं आणि सोवळं-ओवळं घुसवलं जात होतं. या सगळ्या गोष्टींना बहुजन लिंगायतातून थोडाफार विरोध होत होता. तो आवाज कलबुर्गींनी बुलंद केला. हजारो ग्रंथ आणि शीलालेख धुंडाळत कलबुर्गींनी भक्कम पुराव्यांच्या आधारे लिंगायत समाजाला बसवण्णांची वाट दाखवली.

'दुर्दैवाने लिंगायत मठांमध्ये बसवण्णा नाहीत, फक्त स्वामीजी आहेत. जोपर्यंत आमच्या मठांमध्ये बसवण्णा प्रवेश करत नाहीत, तोपर्यंत ते आमचे मठ नव्हेत' असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आणखी दहा-पंधरा वर्षांनी हेच लिंगायत स्वामीजी मठांच्या बळावर आमदार-खासदार होतील असं त्यांनी भाकित केलं होतं. आता ते भाकित खरं ठरतय.

महिलांच्या पिठाधिपतीचा विचार मांडला

लिंगायत समाजाच्या पुनरुज्जीवनाची त्यांनी दिलेली पंचसूत्री आजही खूप महत्वाची आहे. ती पंचसूत्रीच लिंगायत समाजाला बसवादी शरणांकडे घेवून जाणारी आहे. त्यांनी लिंगायत समाजाच्या एकिकरणाचा मंत्र दिला.

लिंगायतांनी केवळ आपल्याच जाती-पोटजातीत विवाहसंबंध जुळवण्यापेक्षा शरण तत्वांचं पालन करणाऱ्या इतर जाती-पोटजातींच्या मुलांमुलींशी विवाहसंबंध जुळवावेत असा सल्ला त्यांनी दिला.

लिंगायत मठांमधे नविन उत्तराधिकारींची निवड करताना, आता असलेल्या पिठाधिपतींच्या जातींऐवजी अन्य जातीतल्या पिठाधिपतींची निवड करायला हवी असं त्यांनी सांगितलं. महिलासुद्धा पिठाधिपती व्हाव्यात असा विचार त्यांनी मांडला होता.

हेही वाचा: आपल्याला कोणता आणि कसा हिंदू धर्म हवाय?

लिंगायतांच्या वैदीकीकरणाची चिकित्सा

डाॅ. एम. एम. कलबुर्गींची संशोधनाविषयी निश्चित भुमिका होती. संशोधन म्हणजे केवळ इतिहासाचा शोध नाही. तर खोट्या इतिहासाचा मुखवटा घालून वर्तमानाचा दुरूपयोग करणाऱ्यांशी करावा लागणारा संघर्ष आहे हे त्यांनी स्पष्ट केलं होतं. 'माझ्या पिढीतल्या इतर संशोधकापेक्षा माझ्या पायाखाली पसरलेली अग्निकुंडं अधिक मोठी आणि दाहक आहेत' असं ते म्हणायचे.

आपल्या मांडणीमुळे अनेकांचा विरोध आपण अंगावर घेतोय याची त्यांना जाणीव होती. तरीही सत्यावरची त्यांची निष्ठा तसूभरही कमी झाली नाही. विशेषतः 'विरशैव: इतिहास आणि भूगोल' आणि 'पंचाचार्यांचे असली रूप' यांसारख्या लहान लहान पुस्तकातून लिंगायतांच्या वैदीकीकरणाची त्यांनी केलेली सडेतोड चिकीत्सा अनेकांना झोंबणारी होती.

त्यांनी मांडलेले मुद्दे सहजासहजी खोडता येणारे नव्हते. त्यामुळे सनातन्यांनी लोकांच्या भावना भडकावून कलबुर्गींना छळण्याचा खूप प्रयत्न केला. तरीही ते मागे हटले नाहीत. अखेर सनातन्यांचा नाईलाज झाला. त्यांनी ३० ऑगस्ट २०१५ रोजी सकाळी राहत्या घरी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.

कलबुर्गी नावाचं वादळ अखेर शांत

धर्मांधांनी कलबुर्गी सरांची हत्या केली असली, तरी कलबुर्गी अत्यंत धर्मश्रद्ध होते. त्यांचं जगणंच धर्म बनला होता. त्यांच्या गळ्यात इष्टलिंग होतं. कपाळाला विभूती असायची. रोज स्नान केलं की ते पुजागृहात जायचे. महात्मा बसवण्णांच्या भावचित्राला नमस्कार करायचे. चामरसाच्या प्रभुलिंगलीलेतील पद्य स्तुतीवचने म्हणायचे.

हत्येनंतर सनातन्यांकडून कलबुर्गींविषयी अपप्रचार करण्यात आला. मूर्तीपुजेविषयी त्यांनी केलेल्या कथित वादग्रस्त विधानाचं निमित्त पुढे केलं. खरंतर यु. आर. अनंतमूर्ती यांनी केलेल्या विधानाचा कलबुर्गींनी आपल्या भाषणात केवळ दाखला दिला होता. सनातन्यांसाठी ते पुरेसं होतं. त्यांनी कलबुर्गींना त्रास द्यायला सुरवात केली.

काही तरूणांनी त्यांच्या घरासमोर दंगा केला. घरावर दगडफेक केली. बाटल्या फेकल्या. तेव्हा सरकारने त्यांच्या संरक्षणासाठी पोलीस पहारा बसवला. पोलीस संरक्षणात जगणं कठीण वाटू लागल्यामुळे पोलीस पहारा उठवण्याची त्यांनी विनंती केली. त्यानुसार पोलीस संरक्षण उठवलं गेलं आणि त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसातच कलबुर्गींची हत्या करण्यात आली.

डाॅ. एम. एम. कलबुर्गी नावाचं वादळ अखेर शांत झालं. ते एके ठिकाणी म्हणाले होते, 'माझ्याठायी सत्य जिवंत असेतोवर मी मरणार नाही. मी जन्मलोय ते मरून जाण्यासाठी नाही, तर चंद्र-सूर्याबरोबर जगण्यासाठी.' जोवर सत्य जिवंत असेल तोवर कलबुर्गी जिवंत असणार आहेत.

संदर्भ: राजु जुबरे संपादित 'धीमंत सत्यशोधक: डाॅ.एम.एम.कलबुर्गी', 'महामार्गाचे शिल्पकार: डाॅ.एम.एम.कलबुर्गी' - डाॅ.वीरण्णा राजूर

हेही वाचा: 

सुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन

गोमंतकीय साहित्याचा ओला दुष्काळ आता दूर करायला हवा!

वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण

आजच्या किती लेखिका आजूबाजूच्या घटनांवर भूमिका घेतात? : अरुणा सबाने