बार्बरा वॉल्टर्स : दंतकथा बनलेली टीवी अँकर

०९ जानेवारी २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


प्रसिद्ध अमेरिकन टीवी अँकर आणि मुलाखतकार बार्बरा वॉल्टर्स यांचं नुकतंच निधन झालंय. अमेरिकेतल्या त्या पहिल्या महिला टीवी अँकर होत्या. पाच दशकं त्यांनी अमेरिकेच्या टीवी क्षेत्रावर आपली छाप पाडली. त्याकाळी गोऱ्या पुरुष मंडळींच्या मक्तेदारीला टक्कर देत टीवी क्षेत्रात वावरणं सोपं नव्हतं. त्यासाठी बार्बरा वॉल्टर्स यांना मोठा संघर्ष करावा लागलाय.

साठच्या दशकात अमेरिकेतल्या टीवी चॅनेलवर एक तिशीतली तरुणी बातम्या देऊ लागली. गोऱ्यांच्या अमेरिकेत त्याकाळी असं कोण्या मुलीनं बातम्या देणं ही आश्चर्याचीच गोष्ट होती. १९४७ ते १९६० हा काळ खरंतर अमेरिकन टीवीचा सुवर्णकाळ होता. टीवीवर छोटे-छोटे कार्यक्रमही सुरू झालेले होते. या कार्यक्रमांचं अँकरिंग करण्यात पुढे होते ते गोरे पुरुषच! याच पुरुषांच्या बरोबरीनं दिसणाऱ्या तिशीतल्या त्या तरुणीचं नाव होतं बार्बरा वॉल्टर्स.

जगभरातल्या आजच्या टीवी माध्यमाची सुरवात झाली ती अमेरिकेत. त्याच अमेरिकेत साठच्या दशकात बार्बरा यांच्या रुपानं मोठी क्रांती घडत होती. ज्या क्षेत्रात गोऱ्या पुरुषांचं वर्चस्व होतं तिथं बार्बरा आत्मविश्वासानं उभ्या राहिल्या. त्यांना गोऱ्यांशी अगदी सहजपणे जुळवूनही घेता आलं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी वेगळा मार्ग निवडला. हा मार्ग होता संघर्षाचा. पुढे याच बार्बरा वॉल्टर्स अमेरिकेतल्या पहिल्या महिला टीवी अँकर आणि पत्रकारितेचा चेहरा बनल्या.

आज अमेरिकाच नाही तर जगभरातल्या टीवीवर आपल्याला सर्वाधिक महिलाच अँकरिंग करताना दिसतात. पण साठच्या दशकात पार तिकडं अमेरिकेत बार्बरा यांनी बंड केलं. थेट भिडण्याची, संघर्ष करण्याची तयारी ठेवली. त्यांचं हे भिडणंच टीवीतली गोऱ्या पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढणारं ठरलं. तब्बल पाच दशकं अमेरिकन टीवीवर छाप पाडणाऱ्या बार्बरा वॉल्टर्स यांचं ३० डिसेंबर २०२२ला निधन झालं.

हेही वाचा: बायका आंदोलक बनून रस्त्यावर उतरतात, त्याचा अर्थ पुरुष कसा लावणार?

विकलांग बहीण बनली प्रेरणा

वर्ष होतं १९२९. अमेरिका आर्थिक महामंदीच्या छायेत होती. याच वर्षी अमेरिकेचं व्यापारी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोस्टन शहरात बार्बरा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील लो वॉल्टर्स बोस्टनमधेच त्याकाळी एक नाइटक्लब चालवायचे. मनोरंजन क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांचं त्यांच्या नाइटक्लबमधे येणं-जाणं होतं. त्यांच्याशी लो वॉल्टर्स यांची गट्टी जमली. हे सगळं बघतच बार्बरा यांचं बालपण गेलं.

बार्बरा यांना एकूण चार भावंडं. त्यामुळे घरी गोतावळा जमला की मुलांना वडील नाइटक्लबमधले किस्से ऐकवायचे. यात नाइटक्लबमधे येणाऱ्या कलाकारांच्या पडद्यामागच्याही अनेक कहाण्या असायच्या. त्यातून नकळत्या वयातल्या बार्बरा बरंच काही शिकत होत्या.

बार्बरा यांची सगळ्यात मोठी बहीण जॅकलिन ही मानसिक विकलांग होती. पण तिचं विकलांग असतानाही जिद्दीने उभं राहणं बार्बर यांना प्रेरणा द्यायचं. भविष्यात आपल्या मोठ्या बहिणीची जबाबदारी आपल्यावर असेल या जाणिवेतून त्या नकळत्या वयात विचारशील बनल्या. बार्बरा जॅकलिनच्या इतक्या जवळ होत्या की, पुढं आपल्या दत्तक मुलीचं नावंही त्यांनी जॅकलिन असंच ठेवलं. दरम्यान वडलांनी न्यूयॉर्कमधे नाइटक्लब उघडला. पूर्ण कुटुंब तिथं स्थायिक झालं. याच न्यूयॉर्क शहरात बार्बरा यांनी बीएची डिग्री घेतली.

एण्ट्री टीवी क्षेत्रातली

इकडे वडलांचा व्यवसाय तोट्यात आला होता. आर्थिक अडचणीही येत होत्या. त्यामुळे डिग्री झाली तशी बार्बरा यांनी नोकरीसाठी धावपळ सुरू केली. त्याकाळी 'नॅशनल ब्रॉडकास्टिंग कंपनी' अर्थात एनबीसी हे अमेरिकेतल्या मोठ्या टीवी आणि रेडिओ नेटवर्कपैकी एक होतं. त्याचंच अपत्य असलेल्या डब्ल्यूएनबीसीमधे बार्बरा यांना नोकरी मिळाली. त्यांच्याकडे प्रसिद्धी आणि प्रेस रिलीजची जबाबदारी टाकण्यात आली. हीच त्यांची सुरवात होती.

बार्बरा लिहू लागल्या. त्यातूनच १९५३ला त्यांनी १५ मिनिटांचा 'आस्क द कॅमेरा' या नावाचा एक टीवी कार्यक्रम केला. त्या दिसायलाही सुंदर होत्या. त्यामुळे या कार्यक्रमाचा होस्ट आणि स्तंभलेखक असलेल्या इगोर कॅसिनीची त्यांच्यावर नजर पडली. कॅसिनीनं त्यांना थेट लग्नासाठी गळ घातली. बार्बरा यांना हे काही पटलं नाही. त्यामुळे त्यांनी थेट राजीनामा दिला आणि बाहेर पडल्या.

लेखन आणि निर्मिती क्षेत्रातल्या अनुभवांनी त्यांना समृद्ध केलं होतं. त्यामुळे लेखिका म्हणूनच सीबीएस नावाच्या चॅनेलमधे त्यांना काम मिळालं. काही काळ महिलांसाठी असलेल्या 'रेडबुक' मॅगझीनसाठीही त्यांनी काम केलं. एक एक टप्पा गाठत असतानाच १९६१ला अमेरिकेतलं दुसरं मोठं टीवी नेटवर्क असलेल्या एनबीसी चॅनेलचं त्यांना बोलावणं आलं. या चॅनेलच्या 'द टुडे शो'चं संहितालेखन आणि कार्यक्रम निर्मितीचं काम त्यांच्याकडे आलं. या शोची त्याकाळी प्रचंड चलती होती.

हेही वाचा: महिला दिन विशेष : आईंना हमे देखके हैरान सा क्यूँ हैं?

पहिल्या महिला अँकर

फ्रँक मॅकगी हा 'द टुडे शो'चा प्रमुख होस्ट होता. तर बार्बरा यांच्या रुपाने कुण्या महिलेकडे पहिल्यांदाच को-होस्टची जबाबदारी आलेली. पण मॅकगीला ते काही पटत नव्हतं. एक बाई आपली जागा घेईल याची त्याला भीती वाटायची. त्यामुळे तो कायम दबावाच्या हेतूने बार्बरा यांचा अपमान करायचा. १९६१ला शो जॉईन केलेल्या बार्बरा या मॅकगीचा मृत्यू झाल्यावर १९७४ला अधिकृतपणे को-होस्ट बनल्या. 'टुडे'साठी त्यांना ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कारा इतकाच प्रतिष्ठेचा आणि टीवीतला मानाचा एमी पुरस्कार मिळाला होता. ही त्यांच्या कामाची पोचपावती होती.

याच काळात टीवी क्षेत्रात स्पर्धा सुरू झाली. तोपर्यंत स्टार बनलेल्या बार्बरा चर्चेत आलेल्या होत्या. त्याकाळी 'अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कंपनी' अर्थात एबीसीकडे एनबीसी या टीवी चॅनेलचा प्रतिस्पर्धी म्हणून बघितलं जायचं. याच एबीसीनं बार्बरा यांना वार्षिक ५ मिलियन डॉलर इतका पगार देऊन करारबद्ध केलं. बार्बरा यांनी सगळेच रेकाॅर्ड मोडले. टीवीतल्या पुरुष आणि महिलांमधे इतका पगार घेणाऱ्या बार्बरा एकमेव व्यक्ती ठरल्या. त्यांना सगळीकडे 'मिलियन डॉलर बेबी' असं म्हटलं जाऊ लागलं.

एबीसीमधे प्रयोगशाळा झाली. 'एबीसी इविनिंग न्यूज' हा प्रयोग त्याचाच एक भाग होता. संध्याकाळच्या बातम्यांच्या या कार्यक्रमात अँकर म्हणून त्या झळकू लागल्या. अशी संधी मिळालेल्या त्या पहिल्या अमेरिकन महिला अँकर होत्या. त्या काळात अँकरिंग करणं सोपी गोष्ट नक्कीच नव्हती. कारण याच कार्यक्रमातला सहकारी हॅरी रिझनरकडून त्यांना सारखं अपमानित केलं जायचं. एका महिलेचं टीवी अँकरिंग करणं त्याला आवडायचं नाही. असा प्रत्येक टप्प्यावरचा अपमान त्यांना पचवावा लागला.

दिग्गजांच्या मुलाखतींचं धाडस

एबीसीमधे अजून एक वेगळा प्रयोग करायचं ठरलं. त्यातूनच १९७८ला मुलाखतीचा २०/२० हा कार्यक्रम सुरू झाला. पुरुष सहकारी असलेल्या ह्यूग डाउन्स यांच्यासोबत बार्बरा यांनी मुलाखती घ्यायला सुरवात केली. एखाद्या महिलेनं मुलाखती घेणं त्याकाळी मोठं धाडसी होतं. अशा परिस्थितीत बार्बरा यांच्या प्रश्न विचारण्याच्या हटके स्टाईल आणि हजरजबाबीपणानं मुलाखतींना अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली.

हटके स्टाईलमुळे बार्बरा प्रेक्षकांशी थेट जोडल्या गेल्या. आक्रस्ताळेपणा न करता त्या समोरच्याचं म्हणणं ऐकायच्या आणि त्यालाही बोलू द्यायच्या. त्यामुळेच विशेष मुलाखतींच्या या कार्यक्रमाची सर्वसामान्यांमधे प्रचंड क्रेज निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या मुलाखतींना इतकी लोकप्रियता मिळाली की २००४पर्यंत हा मुलाखतींचा कार्यक्रम चालू राहिला.

वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्राध्यक्षांपासून ते बड्या सेलिब्रिटी मंडळींच्या मुलाखतीही बार्बरा यांनी घेतल्या. यात काही वादग्रस्त नावंही होती. लिबियाचा हुकूमशहा गद्दाफी, इराकचा सद्दाम हुसेन ते इंग्लंडच्या मार्गारेट थॅचर, रशियाचे बोरिस येल्त्सिन, अमेरिकाविरोधी ओळखले जाणारे क्युबाचे फिडेल कॅस्ट्रो, ते भारताच्या इंदिरा गांधी अशी अनेक राजकीय नावं यात होती. त्याकाळी गद्दाफी, सद्दाम हुसेन, कॅस्ट्रो यांच्या मुलाखती घेणं सोपी गोष्ट नव्हती. पण ते धाडसही बार्बरा यांनी केलं. 

अमेरिकेच्या रिचर्ड निक्सननंतरच्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षाला त्यांनी मुलाखतीमधून बोलतं केलं होतं. मायकल जॅक्सन, मोनिका ल्युइन्स्की यांच्यासारखे सेलेब्रिटीही यात होते. त्यांच्या मुलाखत घेण्याच्या हटके स्टाईलची त्याकाळी तुफान चर्चा व्हायची. त्यामुळेच तब्बल दोन दशकांपेक्षा अधिक काळ २०/२०ची अमेरिकन टीवीवर हवा होती. त्याचं श्रेय अर्थातच बार्बरा वॉल्टर्स यांनाच जातं. २०/२०ला १९८२ आणि १९८३ला एमी पुरस्कारही मिळाला होता.

हेही वाचा: गोझी ओकोन्जो : आर्थिक सत्तेच्या चाव्यांनी विकासाची दारं उघडणाऱ्या ‘आजीबाई’

प्रेमसंबंधांची तुफान चर्चा

बार्बरा यांनी १९९७ला 'द व्यू' या कार्यक्रमाचं लॉन्चिंग केलं. महिलांचा हा लोकप्रिय कार्यक्रम होता. यात राजकारण, मनोरंजनासोबत रोजच्या घडामोडींवर दिलखुलासपणे मतं मांडली जायची. गप्पा व्हायच्या. वेगवेगळ्या पिढीच्या, पार्श्वभूमी आणि स्वतंत्र विचारांच्या महिलांना 'द व्यू' हा एक प्लॅटफाॅर्म मिळाला. त्यातून जेन पाॅल, केटी कुरिक और डायने सॉयर अशा प्रसिद्ध महिला अँकर घडल्या. याच 'द व्यू'चं जगभर कौतुक झालं.

२००८ला त्यांचं 'ऑडिशन : एक आठवण' नावाचं आत्मचरित्र आलं होतं. या आत्मचरित्राची तेव्हा तुफान चर्चा झाली होती. बालपणापासून ते अलीकडच्या मुलाखतींपर्यंतचे अनेक किस्से यात होते. अमेरिकन उद्योगपती रॉबर्ट कॅट, नाट्यनिर्माता ली गुबेर आणि मव एडेलसन यांच्यासोबत केलेल्या लग्नाची चर्चाही यात आहे. अर्थात ही लग्नं फार काळ टिकली नाहीत. पण खूप सारं गॉसिप झालं. स्वतंत्र विचारांच्या बार्बरा यांनी याकडे कायमच दुर्लक्ष केलं.

त्याकाळात अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिजर्वचे माजी प्रमुख अॅलन ग्रीनस्पॅन आणि सिनेटर जॉन वॉर्नर अशा हायप्रोफाईल व्यक्तींसोबतच्या प्रेमसंबंधांमुळेही बार्बरा खूप चर्चेत आल्या. ऑडिशनमधे त्यांनी या अफेअरचाही खुलासा केलाय. खुप सारी श्रीमंती अनुभवलेल्या बार्बरा यांना आपली लाडकी बहीण जॅकलिनच्या मृत्यूचा मात्र मोठा धक्का बसला होता. 

बार्बरा बनल्या दंतकथा

बार्बरा यांना त्यांच्या हयातीतच अनेक मानसन्मान मिळाले. १९८९ला अमेरिकेतल्या टीवी क्षेत्रातल्या योगदानासाठीचा 'टेलिविजन अकादमी हॉल ऑफ फेम' पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. 'नॅशनल अकादमी ऑफ टेलिविजन आर्ट्स अँड सायन्सेस'चा जीवनगौरव पुरस्कारही मिळाला. न्यूयॉर्क टाइम्सनं 'अमेरिकेतलं टीवीवरचं सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्व' म्हणून त्यांचा सन्मान केला. तब्बल १२ एमी पुरस्कार बार्बरा वॉल्टर्स यांच्या नावावर आहेत. यातले ११ पुरस्कार त्यांनी एबीसी चॅनेलला मिळवून दिलेत. बार्बरा यांच्या धाडसी स्वभावामुळेच हे सगळं शक्य झालं. 

मे २०१४ला न्यूयॉर्कच्या एबीसी न्यूजच्या मुख्यालयाला 'द बार्बरा वॉल्टर्स बिल्डिंग' असं नाव देण्यात आलं. त्यांच्या एकूण कारकिर्दीचा हा खरंतर सन्मान होता. त्यावेळी बार्बरा यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की, ' तुमचा नेमका वारसा काय?' त्याला उत्तर देताना बार्बरा म्हणाल्या होत्या, 'मी जगभरातल्या राष्ट्राध्यक्षांचे घेतलेले इंटरव्यू हा काही माझा वारसा नाही. तर अगदी प्रामाणिकपणे माझ्या वाटेनं चालतायत अशा सुंदर तरुणी माझा वारस आहेत. बातमी बनवणार्‍या आणि रिपोर्टिंग करणार्‍या अशा सर्व तरुणींचा मला अभिमान वाटतो'

आपल्या पाच दशकांच्या वाटचालीत त्यांनी कधीच हार मानली नाही ना कधी कुणासमोर झुकल्या. वेगवेगळी आव्हानं आली. ती त्यांनी लिलया पेलली. टीवी क्षेत्रातली पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. २०१४ला बार्बरा यांनी रिटायरमेंट घेतली. तरीही 'द व्यू'मधला त्यांचा वावर कायम होता. टीवी क्षेत्रातल्या महिलांना घडवणाऱ्या अशा अनेक महिला टीवी पत्रकारांपैकी त्या एक होत्या. महिला पत्रकारांमधे त्यांनी आत्मसन्मानाचं बीज रोवलं. त्यामुळेच बार्बरा अमेरिकन टीवी पत्रकारितेतली एक दंतकथा बनल्यात.

हेही वाचा: 

अपर्णाताई, आता दिवस स्त्री पुरूष समतेचे आहेत!

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?

चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया