दिल्ली विधानसभेचा निकाल लागला. ७० पैकी ६३ जास्त जागा पटकावत आम आदमी पक्षाला घवघवीत यश मिळालं. अरविंद केजरीवाल हॅटट्रिक करत तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होणार आहेत. कमीतकमी ४८ जागांवर विजय मिळेल असं ठामपणे सांगणाऱ्या भाजपचा सुपडा मतदारांनी साफ केलाय. या ऐतिहासिक निकालावर स्थानिक आणि राष्ट्रीय राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप आणि आप अशीच थेट लढत बघायला मिळाली. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपकडून सातत्याने राष्ट्रवादासारख्या मुद्द्यांना हवा देण्यात आली. विकासाचे मुद्दे प्रचारातून गायब होतील याची काळजी घेतली जात होती. पण आम आदमी पक्ष मात्र रोटी, कपडा, मकान या आपल्या भूमिकेवर कायम राहिला.
आज निकालातून दिल्लीकरांनी आपच्या या केजरीवाल पॅटर्नला भरभरुन प्रतिसाद दिलाय. त्याचबरोबर दुसरीकडे मोदी शहांच्या राजकारणालाही दिल्लीकरांनी नकार दिलाय. देशभरातल्या वेगवेगळ्या नेत्यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या राजकारणावर थेट टीका केलीय.
'दिल्लीवालो. गजब कर दिया, आय लव यू’ अशी सुरवात करत अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीतल्या विजयाबद्दल दिल्लीतल्या जनतेचे आभार मानलेत. हा दिल्लीकरांचा विजय असून त्यांनी आपल्या मुलावर तिसऱ्यांदा विश्वास ठेवलाय असंही ते म्हणाले. हा विकासाचा विजय आहे. आम्ही जी कामं केली त्याला लोकांनी पसंत केलंय. ज्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळतंय, ज्यांना वीज मिळते आहे त्या सगळ्यांचा हा विजय असल्याचं सांगत केजरीवालांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
'दिल्लीतल्या लोकांनी एक मेसेज दिलाय. मतं त्यालाच मिळतील जो काम करेल. जो लोकांना चोवीस तास वीज देईल. घराघरात पाणी पोचवेल. तसंच गल्ल्या गल्ल्यांमधे जो रस्ते बनवेल त्यालाच मतं दिली जातील. एका नव्या राजकारणाचा जन्म झालाय. ज्याचं नाव आहे कामाचं राजकारण. या विजयासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलीय. माझ्या कुटुंबीयांनीही प्रचंड साथ दिली.' असं म्हणत केजरीवाल यांनी सगळ्यांचे आभार मानलेत.
हेही वाचा : केंद्रात मोदी आणि राज्यात कुणीही, असा फरक मतदार खरंच करतात?
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस एकाही जागेवर निवडून येऊ शकला नाहीय. काँग्रेसच्या उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालंय. मात्र या निकालाबद्दल काँग्रेस भलतीच सकारात्मक दिसतेय. ‘काँग्रेसचा विजय की पराभव या नजरेतून या निकालाला पाहायला नको. भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या अजेंड्याविरोधातला हा निकाल आहे.’ अशी प्रतिक्रिया लोकसभेतले काँग्रेसचे नेते आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी दिलीय.
‘आम आदमी पक्षाचा विजय विकासाच्या अजेंड्याचा विजय आहे. सगळ्यांना माहीत होतं की, आम आदमी पक्ष तिसऱ्यांदा सत्तेत येतोय. ही निवडणूक थेट दोन पक्षांमधेच झाली. त्यामुळेच कदाचित काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही’ असंही ते पुढे म्हणाले.
या निकालावर काँग्रेसचे माजी अर्थमंत्री पी. चिंदंबरम यांचीही प्रतिक्रिया आलीय. ते म्हणतात, 'सीएए खूप चांगला कायदा आहे, असं सांगण्याचा प्रयत्न भाजप करत होता. पण त्यांचं हे म्हणणं लोकांनी नाकारलंय. दिल्लीत झालेला विजय हा लोकशाहीचा विजय आहे. प्रत्येक ठिकाणी भाजप हरतंय. लोकांना फुटीचं राजकारण नकोय.’
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतरच्या महाभारतानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपच्या अपयशाबद्दल बोलणार नाहीत असं कसं होईल? ‘दिल्लीच्या जनतेनं 'मन की बात' नाही तर आता देशात 'जन की बात' चालणार हे दाखवून दिलंय,’ असं म्हणत त्यांनी थेट भाजप नेतृत्वावर निशाणा साधलाय. तथाकथित राष्ट्रीय विचारांचं सरकार केंद्रात आहे. सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा 'झाडू'समोर निभाव लागला नाही, अशी उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया होती.
इतक्या मोठ्या आणि बलाढ्य पक्षाने रथी महारथी निवडणुकीत उतरवून, अरविंद केजरीवाल यांची थेट दहशतवाद्यांशी तुलना केली. स्थानिक प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय विषय आणून मतदारांचं मन वळवण्याचा प्रयत्न झाला. पण तरीही केजरीवाल यांना ते पराभूत करू शकले नाहीत. दिल्लीतली जनता विकास करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या मागे ठामपणे उभी राहिली. जनतेनं लोकशाहीवरचा विश्वास कायम असल्याचं दाखवून दिलं, अशा शब्दांत ठाकरेंनी आपच्या यशाचं कौतूक केलं.
हेही वाचा : दिल्ली विधानसभा निकालाचे सरळ सोपे पाच अर्थ
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केजरीवालांचं अभिनंदन केलंय. ‘दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आपची सत्ता येणं हे आश्चर्यचकित करणारं नाही. देशात सध्या बदलाचं वारं आहे. भाजपनं मतदारांमधे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आलं नाही. भाजपला सत्तेतून बेदखल करायचं असेल तर प्रादेशिक पक्षांनी एकत्रित यायला हवं. भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला मात्र ते यशस्वी झाले नाहीत,’ असं शरद पवार यांनी म्हटलंय.
शरद पवार पुढे म्हणतात की, मला वैयक्तिकरित्या या निकालाचं आश्चर्य वाटत नाही. मी दिल्लीत राहतो. केजरीवाल जिंकतील असं सगळे सांगायचे. हा निकाल दिल्लीपुरता मर्यादित राहणार नाही. मोदी आणि शहा यांच्याबद्दलची अस्वस्थता सत्ताधारी पक्षातही आहे. संसदेच्या सदस्यांमधेही दहशतीच वातावरण आहे. हीच नाराजी मतांच्या रुपात व्यक्त झाली.
भाजपचा याआधी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधे पराभव झाला. भाजपच्या पराभवाची ही मालिका आहे, ती थांबेल असं वाटत नाही. गोळ्या घाला, मारा, अशाप्रकारच्या प्रचाराला उत्तर म्हणून भाजपचा पराभव झाला आणि दिल्लीकरांनी केजरीवालांना कौल दिला, असं शरद पवार म्हणाले.
अशा वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या तरीही पराभव झालेल्या भाजपची काय अवस्था आहे हे जाणून घेतल्याशिवाय आपली जिज्ञासा शमत नाही. दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी आम आदमी पार्टीला मिळालेल्या विजयाबद्दल अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलंय. 'पराभवाचं चिंतन केलं जाईल. आम्हाला जिंकण्याची अपेक्षा होती. पण दिल्लीच्या जनतेनं दिलेला कौल मान्य आहे. पराभव झाल्यामुळे निराश नक्कीच आहोत. दिल्ली भाजपचा प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो,’ असं मनोज तिवारींचं म्हणणं आहे.
२०१५ मधे मिळालेल्या मतांच्या टक्केवारीचा विचार करता आताची टक्केवारी वाढलीय. २०१५ मधे ३२ टक्के मतं मिळाली. आज त्यात वाढ होऊन हे प्रमाण ३८ टक्क्यांवर गेलंय. आता तरी दिल्लीमधे ब्लेम गेम कमी होऊन जास्तीत जास्त काम व्हायला हवीत. जनतेच्या अपेक्षा लक्षात ठेवून त्या पूर्ण करण्यासाठी अरविंद केजरीवाल प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त करतानाच मनोज तिवारींनी भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीसाठी त्यांचे मनापासून आभार मानलेत.
हेही वाचा :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतले सहा मुद्दे
बोडो शांतता कराराने आता तरी आसाम शांत होणार का?
दिल्ली विधानसभेची निवडणूक या गोष्टींमुळे कायम चर्चेत राहणार
दिल्ली विधानसभा २०२०: निवडणूक सर्वे सांगतायत, लगे रहो केजरीवाल