संपूर्ण पृथ्वीवर आजपर्यंत काळा वाघ फक्त एकाच ठिकाणी सापडलाय. ओडिशातल्या मयुरभंज जिल्ह्यातल्या सिम्प्लीपाल अभयारण्यात या वाघाचं अस्तित्व आढळलं आहे. या वाघाप्रमाणेच अफलातून जंगल, धबधबे आणि निसर्ग असलेल्या या मयुरभंज जिल्ह्याला यावर्षीच्या टाइम मॅगझिनच्या टॉप ५० पर्यटनस्थळात मान मिळालाय. लडाख आणि मयुरभंज अशी दोन ठिकाणी यावर्षीच्या यादीत आहेत.
ही गोष्ट आहे ऑगस्ट २०२२ मधली. ओडिशाच्या सिम्प्लीपाल अभयारण्यात काम करणाऱ्या वन अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर पोस्ट केली की, अत्यंत दुर्मीळ असा काळा वाघ त्यांना जंगलात दिसला. त्याचा वीडियोच त्यांनी सोबत जोडला. बघताबघता ही पोस्ट वायरल झाली आणि सिम्प्लीपाल अभयारण्य आणि काळा वाघ हा ग्लोबल चर्चेचा विषय ठरला.
स्युडो-मेलनिस्टिक असं या वाघाचं शास्त्रीय नाव असून, ओडिशातल्या या जंगलातच आजवर त्याचा वावर आढळला आहे. या वाघामुळे प्रसिद्ध झालेलं हे जंगल असलेला जिल्हा मयुरभंज आता 'टाइम' मॅगझिनने जाहीर केलेल्या सर्वोतम ५० पर्यटनस्थळांच्या यादीत समाविष्ट झालाय. त्यामुळे देशाच्या पर्यटनाला चालना मिळेल आणि काळ्या वाघांबद्द्ल जागृतीही वाढेल.
हे काळ्या रंगाचे वाघ म्हणजे वाघांची नवी जात नाही. या वाघांना मेलनिस्टिक असं नाव त्यांच्या शरीरात असलेल्या मेलनिन या रंगद्रव्यामुळे मिळालं आहे. मेलनिनचं प्रमाण वाढलं की शरीरातला काळा रंग वाढतो. सजिवांच्या त्वचेचा, केसांचा रंगही मेलनिनमुळे ठरतो. या वाघांमधे इनब्रीडिंगमुळे म्हणजे जवळच्या नात्यात संकर झाल्यानं या मेलनिनच्या प्रमाणात वाढ झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.
यामुळे या वाघाच्या अंगावर गडद काळ्या रंगांचे पट्टे असतात. तेही एकमेकांच्या अगदी जवळ असतात. त्यामुळे वाघाचा मूळ रंग कमी दिसून काळा रंगच जास्त उठावदारपणे दिसतो. या वाघांमधे जनुकीय बदलामुळे रंगबदल झालेले आढळतात. तसंच या वाघांचा आकारही सर्वसाधारण वाघांपेक्षा थोडा लहान असतो. तरीही त्यांच्या या अनोख्या वैशिष्ट्यामुळे हे वाघ अत्यंत दुर्मीळ असे ओळखले जातात.
२०२२ मधे या वाघांचा वीडियो लोकप्रिय ठरला खरा, पण त्याआधीही काहींना हे वाघ दिसल्याची नोंद आहे. २०२० मधे सौमेन वाजपेयी यांनी या वाघाचे फोटो टिपले होते. त्याआधीही १९९० च्या सुमारास हे वाघ दिसल्याची नोंद आढळते. यांची संख्या हातावर मोजण्याएवढीच असावी, असाही एक अंदाज आहे. पण हे वाघ जंगलात स्वतःची जागा राखून आहेत. त्यासाठी ते झाडांवर आपल्या नखांनी खुणा करतात, असं सुशांत नंदा यांनी शेअर केलेल्या वीडियोत स्पष्टपणे दिसतं.
हेही वाचा: जंगलातून मेट्रो धावताना जंगल उरेलच कसं?
हे वाघ अत्यंत दुर्मीळ असल्यानं ते दरवळी दिसायलाच हवेत असा कुणाचाच आग्रह असू नये. निसर्गाची ती अनोखी गोष्ट निसर्गातच सुरक्षित राहायला हवी. पण निसर्गाचं हे आश्चर्य जपणारा मयुरभंज जिल्हाच पर्यटनाच्या दृष्टिनं महत्त्वाचा आहे. तो पाहायला सर्वांनी यायला हवं. म्हणूनच टाइम मासिकानं मयुरभंज जिल्ह्यालाच पर्यटनाच्या टॉप ५० यादीत निवडलंय.
या यादीत लडाख आणि मयुरभंज अशा दोन जागांना यंदा स्थान मिळालंय. लडाखबद्दल अनेकांना माहिती आहे. पण मयुरभंज हे तसं तुलनेनं नवं नाव यानिमित्तानं लोकप्रिय होणार आहे. सिम्प्लीपाल राष्ट्रीय उद्यानासोबतच लुलुंग हे अप्रतिम ठिकाण, बरेहीपानी धबधबा, जरोंडा धबधबा, देवकुंड आणि हरिबलदेव मंदिर, भीमकुंड, खिचिंग, रामतीर्थ अशी अनेक पर्यटनस्थळं तिथे आकर्षित करतील.
सिम्प्लीपाल राष्ट्रीय उद्यान हे अत्यंत काळजीपूर्वक जपलेलं अभयारण्य असून, इथं फक्त दिवसाला ६० गाड्यांनाच आतमधे प्रवेश दिला जातो. हे हिरवंगार जंगल निसर्गातले अनेक दुर्मीळ प्राणी तसंच नामशेष होणाऱ्या वनस्पतींसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तसंच स्थलांतरित पक्ष्यांचं नंदनवन म्हणूनही ओळखलं जातं.
मयुरभंज जिल्ह्याची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे मयुरभंज चाहू हा नृत्यप्रकार. युनेस्कोनं अमूर्त वारसायादीत या नृत्याला स्थान दिलं असून, पर्यटनाच्या दृष्टिने तेही एक महत्त्वाचं आकर्षण ठरणार आहे. मार्शल आर्ट, अक्रॉबॅटिक यांचा वापर असलेल्या या पारंपरिक लोकनृत्यामधे शैव, वैष्णव आणि शाक्त सांप्रदायातल्या विविध कथा सादर केल्या जातात.
त्यासाठी छाऊ नर्तक विविध रंगी कपडे घालून कमालीचं शस्त्रकौशल्य आणि नृत्यकौशल्य सादर करतात. त्यासाठी रामायण महाभारत महाकाव्यं हे आधार म्हणून घेतले जातात. खरं तर या छाऊ नृत्यप्रकारात मुखवट्यांचा वापर होतो. पण मयूरभंजमधे छाऊ हे मुखवट्यांशिवाय सादर केली जाते. त्यामुळे मयुरभंजचं छाऊ नृत्य हे वेगळं ठरतं.
ओडिशा सरकारने १९६०मधे सेराईकेला इथं छाऊ नृत्य केंद्र आणि १९६२ मधे बारीपाडा इथं मयूरभंज छाऊ नृत्य प्रतिष्ठानची स्थापना केली. या संस्था स्थानिक गुरू, कलाकार, संरक्षक आणि छाऊ संस्थांचे प्रतिनिधी यांना प्रशिक्षण देतात. छाऊ नृत्यासाठी महत्त्वाचा असलेला चैत्रपर्व उत्सवही इथं आयोजित केला जातो.
हेही वाचा: पर्यावरण दिनः संवेदनशील कृती करण्यासाठी पावलं उचलुया
मयुरभंज हा ओडिशामधला सर्वात मोठा जिल्हा असून ब्रिटिश काळातही तिथं राजेशाही होती. त्यामुळे तिथली निसर्गसंपदा आणि खनिजं मोठ्या प्रमाणावर सुरक्षित राहिली असंही सांगितलं जातं. भांज राज्यकर्ते हे इथल्या परंपरागत राजे असून त्यांच्या नावावरूनच या भागाला मयुरभंज असं नाव मिळालं. ब्रिटीश भारतातल्या अनेक नोंदींमधे याचा उल्लेख मोहुरबुंगे आणि मोरभंज असाही नोंदवलेला आहे.
आज या भागाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सध्याच्या राष्ट्रपती दौपदी मुर्मू या याच मयुरभंज जिल्ह्यातल्या आहेत. देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून निवडल्या गेलेल्या दौपदी मुर्मू या मयुरभंजमधल्या बैदापोसा या गावच्या असून, त्या आदिवासी समाजातून पुढे आलेल्या आहेत. त्यामुळेच तिथल्या अनेक आदिवासी जनसमुहांना देशातील सर्वोच्च पदापर्यंत पोचल्याचा आनंद झालाय.
असा हा मयुरभंज जिल्हा धातुशिल्पं, सबई गवतापासून केलेलं वीणकाम, डोक्रा हे अनोखं धातूकाम यासाठीही प्रसिद्ध आहे. तसंच आदिवासी समुहांच्या मोठ्या संख्येमुळे इथं अनेक नैसर्गिक औषधं, वनस्पती आणि पारंपरिक ज्ञानाचा संग्रह आहे. युनेस्कोने आणि टाइम मासिकानं केलेल्या नामांकनामुळे हे सगळं ज्ञान जागतिक पातळीवर पोचू शकेल, असा विश्वास इथल्या प्रशासनाला वाटतो आहे.
आज मयुरभंजची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचली आहे. हे जरी खरं असलं तरी अद्यापही राष्ट्रीय पर्यटनाच्या लोकप्रियतेमधे या जिल्ह्याची ओळख लोकांना झालेली नाही. ओडिसा म्हटलं की जसं जगन्नाथपुरी डोळ्यापुढे येतं तसं अजून मयुरभंज हे नाव लोकापर्यंत पोहचलेलं नाही. आपल्याकडच्या अनेक टुरिस्ट कंपन्यांच्या जाहिरातीतही अद्याप मयुरभंज नाही.
आपल्याकडे काय आहे, याची आपल्यालाच माहिती नसल्याचं अनेकदा सामोरं आलंय. त्यामुळेच बुद्धिस्ट सर्किटसारखा प्रकल्प आंतरराष्ट्रीय मागणी असूनही आपल्याकडे गांभीर्यानं घेतला जात नाही. आपल्याकडच्या पर्यटनस्थळांचा विकासही ज्या पद्धतीनं केला जातो त्यात निसर्गाचं संरक्षण करण्याऐवजी त्याचा विनाशच अधिक होतो. जोशीमठ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.
त्यामुळे आता मयुरभंज अधिकाधिक लोकापर्यंत पोचणार असेल, त्याची काळजीही अधिक घ्यावी लागेल. तिथल्या पर्यटनस्थळांचा विकास करताना जोशीमठासारखं तिथं काँक्रिटचं जंगल उभं राहणार नाही याची दक्षता बाळगावी लागेल. तसंच तिथं पर्यंटकांची संख्या जशी आतापर्यंत मर्यादीत ठेवली गेली आहे, ती वाढवताना किती वाढवायची कशी वाढवायची याचंही नियोजन करावं लागेल. शेवटी जगात काळेवाघ फक्त मयुरभंजमधेच आहेत, त्यांना जपण्याची जबाबदारी कुणीही विसरून चालणार नाही.
हेही वाचा:
पाण्याचीही साहित्य संमेलनं होऊ शकतात!
मुंबईच्या विकासात पर्यावरणाला धक्का लागणारच!