ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार, अनुवादक प्रा. रंगनाथ तिवारी यांना यंदाचा महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार जाहीर झालाय. सांस्कृतिक खात्याच्या महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराचं आज मुंबईत वितरण होतंय. यानिमित्त तिवारी सरांच्या व्यक्तिमत्वाचा आणि लेखनाचा वेध घेणारा हा लेख.
अकरावीसाठी स्वामी रामानंद तीर्थ कॉलेजमधे प्रवेश घेऊन मी अंबाजोगाईत आलो तेव्हा सगळ्यात मोठा आनंद झाला तो तिथली लायब्ररी पाहून. अगदी लहानपणापासून मनात रुजलेलं वाचनाचं वेड त्यावेळेपर्यंत त्वचेइतकं अपरिहार्य होऊन सबंध देहभानावर लगटलेलं होतं. इथे आल्यानंतर कॉलेजातली लायब्ररी पाहिल्यावर कुणी मूल जत्रेत हरवून जावं, तसा मी निव्वळ हरवून गेलो. निदान दोनेक दिवसांआड नवं पुस्तक घेऊन त्याचा फडशा पाडणं हा नित्यक्रमच होऊन बसला.
एकदा असंच पुस्तक घेताना मी कोणतीशी ऐतिहासिक कादंबरी मागितल्यावर तिथे खिडकीत बसलेल्या ग्रंथपालांनी एक पुस्तक पुढ्यात ठेवलं, म्हणाले, ‘हे घे. ऐतिहासिक आहे आणि आपल्याच इथल्या सरांनी लिहिलेलंय.’ मी उत्सुकतेने सही करून ते पुस्तक घेतलं आणि उघडलं तर त्याच्या आतल्या पहिल्या किंवा दुसऱ्या पानावर लेखकाचं रेखाचित्र दिसलं. ते दिसल्याबरोब्बर माझ्यासोबत असलेला माझा मित्र म्हणाला, ‘अरे! हे तर आपले तिवारीसर!’ दररोज अनेकदा इथेतिथे दिसणारे तिवारीसर असे एकदम पुस्तकातून भेटल्यावर मला पराकोटीचाच आनंद झाला.
अगदी वाचायला शिकलो तेव्हापासून आजवर सातत्याने ‘ललित साहित्य’ म्हणता येईल असं काही ना काही मी वाचतोच आहे. या पार्श्वभूमीवर लेखक असलेल्या कुणाहीबद्दल मला आजही प्रचंड आदर आणि प्रचंड आकर्षण वाटतं. तिवारीसरांना पहिल्यांदा पुस्तकातून आणि मग प्रत्यक्षात लेखक म्हणून पाहिले तेव्हा तर माझ्या या आकर्षणाला आणि आदराला वयसुलभ अशी अत्यंत नितळ आणि भारावून टाकणारी कोवळीशी झालर होती. जिवंत सदेह असा माझ्या भोवतालात वावरणारा हा पहिलाच लेखक मी बघत होतो.
‘देवगिरी बिलावल’ ही सरांची मी वाचलेली पहिली कादंबरी. देवगिरी आणि दिल्लीच्या राजवटींच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर संगीताच्या साथीने घडणारी ही कादंबरी कुणाही उत्कट वाचकाला खिळवून ठेवणारी होती. या कादंबरीत युद्धं होती, क्रौर्य होतं, प्रेम होतं, तत्वज्ञान होतं, अद्भुताला स्पर्श करणारी आणि इतिहासाचा ललितरम्य प्रत्यय देणारी अशी ही कादंबरी. आजही अधूनमधून मी ही कादंबरी वाचतो तेव्हा यापेक्षा वेगळा अनुभव कधीच येत नाही.
आज सगळी कोवळीक सरून गेलेली असतानाही ही कादंबरी माझी तेवढीच घट्ट पकड घेते. दरम्यान कधीतरी ‘लोकमत’च्या रविवारच्या पुरवणीत कुणा फ्रेंच कादंबरीचा ‘निशिगंधा’ या नावाने सरांनी केलेला अनुवाद क्रमश: वाचनात आला. अनुवाद करणं हे एक स्वतंत्र सृजन असतं, ही गोष्ट हा अनुवाद वाचल्यानंतर कुणालाही पटावी. नंतर सरांची जवळजवळ सगळीच पुस्तकं मी मिळतील तशी वाचून काढली. या प्रत्येक पुस्तकाने त्यांच्यातलं अतिशय समर्थ असं लेखकपण माझ्या मनात अधिकाधिक पक्केपणानं अधिष्ठित होत गेलं.
काही वर्षानंतर त्यांची ‘उत्तम पुरुष एकवचन’ ही कादंबरी वाचली तेव्हा मी कॉलेजातून बाहेर आलेलो होतो. दरम्यान अनेकदा निव्वळ हौसेपोटी अनेक साहित्य संमेलनांना मी हजेरी लावलेली होती. अनेक लेखकांना, कवींना पाहिलेलं होतं. माझं वाचनही ‘वाचकपणाचे’ काही टप्पे ओलांडून पुढे गेलेलं होतं. या टप्प्यावर ‘उत्तम पुरुष...’ ही हैद्राबाद मुक्तीसंग्रामावर आणि त्या काळातल्या अस्सल मराठवाडी खेड्यातल्या लोकजीवनावर बेतलेली कादंबरी वाचताना अनेक गोष्टी लक्षात आल्या. तोपर्यंत हैद्राबाद मुक्तीसंग्रामावर जे काही माझ्या वाचनात आलेलं होतं ते प्रामुख्याने माहिती-घटनाप्रधान स्वरूपाचं होतं.
अमुक ठिकाणी अमुक-अमुक मुक्तीसैनिकांनी अमुक चकमक लढली आणि रझाकारांसोबत कडवी झुंज दिली किंवा रझाकारांनी अमुक गावावर अशा पद्धतीने अत्याचार केले अशा सरधोपट स्वरुपात असलेलं लेखन मी वाचलेलं होतं. ‘उत्तम पुरुष एकवचन’च्या निमित्ताने पहिल्यांदाच घटनाप्रधानतेला फाटा देऊन समग्र लोकव्यवहार आणि लोक आणि रझाकार किंवा निझामी दमणयंत्रणा यांच्या दरम्यानच्या व्यामिश्र स्वरूपाच्या संबंधाचा नेमका वेध वाचकांच्या समोर आला होता.
सरंजामदार, सामान्य प्रजा, रझाकार आणि मुक्तीसैनिक यांच्या परस्परसंबंधांचे विलक्षण ताणेबाणे आणि गढ्यांमधून राहणाऱ्या जहागिरदारांचं प्रच्छन्न कामजीवन यांचं अत्यंत चित्रदर्शी भाषेत घडणारं यथार्थ चित्रण हे या कादंबरीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे.
यानंतर कधीतरी मी ‘संपल्या सुरावटी’ ही कादंबरी वाचली. या कादंबरीत काय नाही? भव्य सांगीतिक परंपरेचं जन्म घेणं, रुजणं, उत्तुंग होणं आहे. वीणा, तंबोरा, मृदुंग, तबला आहे. सोन्यासारखे लखलखीत स्वर आहेत. कापून जातीलसे धारदार सूर आहेत. कलावंतांच्या, रसिकांच्या कलेप्रति टोकाच्या निष्ठा आहेत. अवकाश व्यापून टाकणारं गाणं आहे. स्वामी गोविंदपाद आहेत आणि नवाब वाजीदअली शाहसुद्धा आहे.
‘शामे अवध’ असा पिढ्यानपिढ्या लौकिक मिळवलेल्या अवधच्या रंगीनमिजाज रात्री आहेत, मुजरे आहेत, तवायफांच्या कोठ्या आहेत, नवाबजाद्यांचे शौक आहेत, कव्वाल आणि कव्वाल्या आहेत, कलावंतांच्या प्रेमाचे तीव्रकोमल रंग आहेत आणि त्यांच्याच दैहिक वासनांचे उसळते उफाळते तुफान आहे. रंगनाथ तिवारींची ‘संपल्या सुरावटी’ हा एक निव्वळ अप्रतिम अनुभव आहे.
देवगिरी बिलावल, उत्तम पुरुष एकवचन आणि संपल्या सुरावटी या तिन्ही कादंबऱ्या मुख्यत: मराठवाड्याच्या भूमीत आणि मराठवाडी बोलीत घडतात, हे त्यांचं आणखी एक महत्वाचं वेगळेपण आहे. इतिहास, संगीत, हिंदू-इस्लामी-सूफी तत्वज्ञान हे प्रवाह या कादंबऱ्यांतून एकमेकांशी संवादी पद्धतीने एकमेकांच्या सोबत वाहताना दिसतात. शिवाय या कादंबऱ्यांमधून आणखी एक लक्षणीय गोष्ट समोर येते, ती अशी आहे की काळाचा विशाल पट मांडून त्यातल्या अवकाशाचे तुकडे सांधण्याची तिवारीसरांची लेखकीय हातोटी अतिशय विलक्षण अशी आहे.
महाराष्ट्रातल्या सबंध साहित्यविश्वात, विशेषत: कादंबरीच्या क्षेत्रात प्रा. रंगनाथ तिवारींचे नाव अटळपणे घ्यावेच लागावे एवढी ‘अक्षर’ अक्षरे रंगनाथ तिवारींच्या कादंबऱ्यांनी मराठी साहित्यामधे कोरून ठेवलेली आहेत. कादंबरी, ऐतिहासिक कादंबरी, कथासंग्रह, नाटके, समीक्षा आणि अनुवाद अशा सर्वांगाने चौफेर असं लेखन त्यांच्या नावावर जमा आहे.
रंगनाथ तिवारींचा जन्म सोलापूर शहरातल्या हिंदी-मारवाडी भाषिक कुटुंबातला. पुढे हिंदी विषयातच पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतलं आणि कॉलेजातही आयुष्यभर हिंदीचंच अध्यापन केलं. अशा रंगनाथ तिवारींनी हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमधून आपलं लेखन केलं. असं असलं तरी मराठी भाषेवर त्यांचं अधिक प्रेम आहे.
उत्तम पुरुष एकवचन, देवगिरी बिलावल, बेगम समरू, संपल्या सुरावटी आणि अनन्वय या मराठी कादंबऱ्या, देवगिरी बिलावल हे नाट्य रुपांतर, काया परकाया हे नाटक, शून नलिनी हे एकांकी नाटक, मौनाची महासमाधी हा कथासंग्रह, सृजन-विमर्श हा समीक्षात्मक लेखसंग्रह, अशी विपुल ग्रंथसंपदा रंगनाथ तिवारींच्या आतल्या असामान्य लेखकत्वावर शिक्कामोर्तब करणारीच आहे.
देवगिरी बिलावल, सरधाना की बेगम, आणि उत्तरायण या हिंदी भाषेतल्या कादंबऱ्या, डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘बिढार’ या कादंबरीचा त्याच नावाने केलेला हिंदी अनुवाद, फ्रेंच लेखक अलेक्झांडर ड्यूमा ज्युनिअर यांच्या ‘कमिली’ या कादंबरीचा ‘निशिगंधा’ या नावाने केलेला मराठी अनुवाद आणि ‘प्रज्ञा पारमिता’ ही ताजी कादंबरी हे त्यांचं साहित्यही त्यांच्या चौफेर अशा बहुभाषिक व्यासंगाची आणि लेखनाची साक्ष देणारं आहे.
रवींद्रनाथ टागोरांच्या आयुष्यावर रंगनाथ तिवारींनी लिहिलेल्या ‘उत्तरायण’ या हिंदी कादंबरीचा शैलजा वसेकर यांनी ‘गुरुदेव’ या नावाने केलेला मराठी अनुवादही बहुचर्चित ठरला. आजच्या अनेक अर्थांनी संकुचित बनलेल्या सांस्कृतिक अवकाशात ‘टागोरांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया’ अशा वादग्रस्त होऊ शकेलशा विषयावर कादंबरी लिहिणं हे अनेक अर्थांनी धाडसाचं आहे.
स्वत:च्या अभिव्यक्तीला भयमुक्त ठेवून असं लेखन करणं ही धैर्याची परीक्षा घेणारी गोष्ट आहे. आणि हे धैर्य तिवारीसरांनी सातत्याने दाखवलंय, याचा मुद्दाम उल्लेख करणं आवश्यक आहे.
‘देवगिरी बिलावल’साठी महाराष्ट्र सरकारचा ह. ना. आपटे पुरस्कार, ‘वेगम समरू’साठी महाराष्ट्र सरकारचा वि. स. खांडेकर पुरस्कार, श्री भैरूरतन दमाणी पुरस्कार आणि श्रीमती तुळसाबाई सोमाणी पुरस्कार, ‘काया-परकाया’साठी महाराष्ट्र सरकारचा लोटू पाटील पुरस्कार, ‘बेगम समरू’साठी म्हैसूर येथील भाषा भारती सन्मान पुरस्कार, ‘बिढार’ या हिंदी अनुवादासाठी मानव संसाधन केंद्रीय हिंदी निदेशालयाचा पुरस्कार, साहित्यातल्या एकूण योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीकडून छत्रपती शिवाजी राष्ट्रीय एकता पुरस्कार, अंबाजोगाईच्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीकडून यशवंतराव चव्हाण स्मृती साहित्य पुरस्कार आणि आता दिल्लीच्या हिंदी भवनचा पुरुषोत्तमदास टंडन स्मृती ‘हिंदी रत्न’ पुरस्कार अशा अनेकानेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले प्रा. रंगनाथ तिवारी हे व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या साहित्यिक-सांस्कृतिक लौकिकात वेगळी आणि विशेष अशी भर टाकणारं आहे, हे निश्चित.
आयुष्यभर मराठवाडी मातीत रमलेल्या आणि मराठवाडी बोलीवर मन:पूत जीव जडवून असलेल्या या लेखकाची ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड झाली. ही गोष्ट खुद्द साहित्य संमेलनालाच गौरवान्वित करणारी आहे. हे संमेलन तिवारींच्या कर्मभूमीत म्हणजे अंबाजोगाई शहरात होतं, ही दुधात साखर.
मागच्या तीनचार वर्षांत काहीवेळा सरांच्या प्रत्यक्ष भेटींचे योग आले. काही प्रसंगांतून त्यांना ऐकता आलं. काहीवेळा त्यांच्या घरी त्यांच्यासोबत साहित्यविषयक चर्चा घडल्या. आणि या सगळ्यांतून असं लक्षात आलं की हा माणूस नुसता कोरडा लेखक नाहीय. यांच्या आत आस्थेचे जिवंत झरे आहेत. क्षणभरात कुणालाही आपुलकी वाटावी, क्षणभराच्या सहवासाने कुणीही त्यांच्याशी आयुष्यभराचं नातं जोडावं अशी आश्वासक ऊब आणि जिव्हाळ्याची ओल देणारी अशी त्यांची भाषा आहे.
अगदी प्रथमदर्शनीसुद्धा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा हा राजबिंडा लेखक अत्यंत वत्सल आणि आपल्या रक्ताच्या वडिलधाऱ्यांपैकी वाटून जातो. आणि हे वाटणं ओढून ताणून आणावं लागत नाही. अत्यंत सहजभाव म्हणून ते आपल्या आत आपोआप उमटतं. हा माणूस लेखक म्हणून जेवढा उत्तुंग आहे तेवढाच, कदाचित त्याहून जास्त, मानवधर्म जाणणारा जिवंत रसरसता माणूस म्हणून अधिक उत्तुंग आहे.
रंगनाथ तिवारी ही साहित्यातली एक अत्यंत सहृदय अशी निर्विवाद मानवी संस्कृती आहे.
(लेखक हे मराठीतले महत्त्वाचे कवी, कथाकार आहेत.)