हॉटेल विश्वातल्या भेदक अंतरंगांचा 'टिश्यू पेपर'

०८ ऑक्टोबर २०२१

वाचन वेळ : ३ मिनिटं


'टिश्यू पेपर' ही राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेली रमेश रावळकर यांची कादंबरी. परमीट रूम, बार, हॉटेल काहींसाठी अगदी हक्काच्या जागा असतात. पण इथले बाहेरून कधीच न दिसणारे कैक प्रकार, इथली विषमता यावर टिश्यू पेपर जळजळीत भाष्य करतते. ही कादंबरी आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषणाचे रंग दाखवते. गुंतवळीचे हे पापुद्रे किती वेदनादायी असतात ते 'टिश्यू पेपर' वाचताना कळतं.

कोणत्याही हॉटेलमधे गेल्यावर आपण काय काय पाहतो? हॉटेलचे बाहेरून दिसणारे डोळे दिपवणारं झगमगाटी जग? मोहमयी आभास देणारी प्रकाशयोजना? ठेका धरायला लावणारं संगीत? धराव्या वाटणार्‍या आकारातल्या बाटल्या? थिरकणार्‍या पायांचं सौंदर्य? शारीरिक आकर्षण? या ‘वरलीया रंगा’शिवाय हॉटेलचा आतला चेहरा पाहण्याचा प्रयत्न आपण कधी केला आहे का?

हेही वाचा: व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!

वेटर, हेल्पर, कूक, मॅनेजर, मोरीवाली, बारबाला, त्यांच्यातल्या नातेसंबंधांचे स्तर हे पुन्हा एक वेगळंच जग असतं. अशा जगाचा तापदायक आनंद ‘टिश्यू पेपर’ कादंबरी देते. रमेश रावळकर या लेखकाने हॉटेलचे अंतरंग आपल्यासमोर बारकाईने उलगडलेले आहे. लेखक जे जगला ते त्याने मांडलं, ही या कादंबरीची जमेची बाजू. बाहेरून न दिसणारे कैक प्रकार, तसंच विषमतेवर टिश्यू पेपर जळजळीत झोत टाकतं. आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषणाचे रंग दाखवतो. गुंतवळीचे पापुद्रे किती वेदनादायी असतात, ते समजतं.

‘बशी फुटली... नोकरी सुटली!’ असं आयुष्य हॉटेल लाईनमधे असतं. तिथं येणार्‍या बहुतेक ग्राहकांची ‘इतके प्रचंड खाऊनही ढेकर का येत नाही?’ ही जीवघेणी समस्या असते. त्याच हॉटेलमधे ‘वेळेवर चार घास खायला कधी मिळतील?’ या विवंचनेनं तळमळणारा वर्ग असतो. ही दोन्ही चित्रं टिश्यू पेपरने टिपून आपल्या समोर ठेवलेली आहेत.

बारबालांचं जगणं वाचताना तर आपल्या माणूसपणाची लाज वाटत राहते. कोणत्याही हॉटेलमधे गेल्यावर संवेदनशीलतेला टिश्यू पेपर साद घालेल, ही या कादंबरीची जमेची बाजू आहे.

लेखक रमेश रावळकर म्हणतो, 'हॉटेलमधे काम करणार्‍यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असत नाही. त्यांच्याकडे तुच्छतेनेच पाहिलं जातं. वेटरला टाकून बोललं जातं. हिडीस फिडीस केलं जातं. या कामगार वर्गाला हीन वागणूक दिली जाते. जे वाचन केलं, त्यामधे या कामगारवर्गाविषयी काही वाचायला मिळालं नाही.'

हेही वाचा: ‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

'मला वेटरला कादंबरीचा नायक करायचं होतं. त्याचं जगणं लिहायचं होतं, ते लिहिलं. हॉटेललाईनला खूप वर्ष काम केलं. माझा माझ्याशी एक झगडा चाललेला होता. या झगड्यातून बाहेर पडलो, त्यासाठी लिहिलं. लिहितानाही जगलेले माझ्यासोबत होते. त्याच वेदना, दुःख, तोच भवताल साथीला होता. ते लिहितानाही पुन्हा ते वास्तव अंगावर धावून आलं. कामगार वर्गाकडे पाहण्याची समाजाची नजर बदलली पाहिजे' लेखक सांगतो.

समीक्षक आणि शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. प्रा. रणधीर शिंदे म्हणतात, 'अनेक क्षेत्रांविषयी मराठी साहित्यामधे काही लेखन झालेलं नाही. अस्पर्श अशी अनेक क्षेत्रं आहेत. ट्रक चालकांचं जीवन, समुद्री जीवनावर मराठीत लेखन नाही. अनेक कामं हलक्या दर्जाची समजली जातात. ती करणारा कामगार वर्ग साहित्यात उपेक्षितच राहिला आहे. टिश्यू पेपर कादंबरीत हॉटेल कामगारांचं जग आहे. या दुनियेचे पापुद्रे रमेश रावळकर यांनी उलगडून दाखवले आहेत.

पुस्तकाचं नाव: टिश्यू पेपर
लेखक: रमेश रावळकर
प्रकाशन: राजहंस प्रकाशन
पानं: ३३६
किंमत: ४००

हेही वाचा: 

तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

राजस्थानातल्या पुष्करच्या वाळूत उमटलेल्या घोड्यांच्या टापांची गोष्ट

जयंत नारळीकर म्हणजे फळांनी लगडलेलं एक सफरचंदाचं झाडच!

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)