आज रामनवमी. प्रभू रामचंद्रांच्या चरित्राची प्रेमभावाने आठवण काढण्याचा दिवस. त्याकडे फक्त भक्तीच्याच अंगाने बघायला हवं, असं नाही. रामाच्या चरित्राकडे भारतीय इतिहासातल्या एका महान सांस्कृतिक संघर्षाच्या दृष्टीनेही पाहता येतं. हा संघर्ष नेमका आहे तरी कोणता?
भारताच्या पुराणकालीन इतिहासात प्रचंड घुसवाघुसव झालेली आहे. वाड्मयीन भाषेत त्याला आपण प्रक्षिप्त म्हणतो. वाल्मिकी रामायणात तसेच इतर उपलब्ध धर्मग्रंथातसुद्धा राम या व्यक्तिमत्वाच्या नावे अनेक प्रक्षिप्त घटना जोडलेल्या असण्याची दाट शक्यता आहे. हे विविध धर्मग्रंथ आपण जर या दृष्टिकोनातून एकत्रित वाचावयास घेतले, तर हा प्रक्षिप्त प्रकार आपल्याला सहज समजून येतो.
इतिहासाची अशी मोडतोड नेमक्या कोणत्या विकृत जातीय मनोवृत्तीने केलेली असावी हेसुद्धा मग विनासायास आपल्या नजरेस येतं. हे सर्व आमच्या ध्यानात येवू नये यासाठी काही मंडळी आमची मनं `राम मंदिर वहीं बनाएंगे` अशा घोषणांनी भारून टाकण्याचा प्रयत्न करतात. आम्ही मात्र या घोषणेबाबत `तारीख कब बताएंगे?` हा प्रतिप्रश्न न विचारता त्या भावनिक कल्लोळात सामील होतो.
हेही वाचाः मुंह मे राम, बगल में वोट
मात्र आज रामनवमीच्या निमित्ताने राम या चरित्र नायकाचा इतिहास उघड्या डोळ्यांनी अन जागृत मेंदुने वाचणं गरजेचं आहे. मध्यंतरी भारतातील काही विचारवंतांच्या परखड विचारांची अडचण झाली होती. तेव्हा काही तथाकथित संस्कृतीरक्षकांनी अशा विचारवंतांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला. त्यातून भविष्यात त्यांचं चरित्र बदलवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी तसाच प्रकार भारतीय इतिहासात राम आणि इतर चरित्र नायकांसोबत झालेला असण्याची शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही.
आज फोटोशॉपमध्ये महारत असणार्या मंडळींचे वैचारिक पूर्वजही त्या काळी प्रचलित लिखाणपद्धतीत बेमालूमपणे बदल करवण्यात निष्णात होते. त्यामुळे रामासारख्या व्यक्तीविशेषाला या मंडळींनींच चुकीच्या पद्धतीने आमच्यासमोर प्रोजेक्ट केलं असावं.
भारतीय संस्कृतीतील चरित्रनायक रामाने केलेले वडलांच्या आज्ञेचं पालन, त्याचं मातृप्रेम, राजसत्तेसाठी भावाबरोबर संघर्ष करण्याएवजी सत्तेचा त्याग करून वनवास पत्करण्याचा त्याचा निर्णय, भिल्ल शबरीने चाखून दिलेली बोरं खाण्याचा त्याचा उमदेपणा, आदिवासी निषादराजा बरोबरची त्याची जिव्हाळ्याची मैत्री, वानर मानल्या गेलेल्या सर्वसामान्य लोकांसोबतचा त्याचा स्नेहभाव, विषमतावादी व्यवस्थेचा समर्थक असलेल्या मातृघातकी परशुरामाचा त्याने केलेला पूर्ण पाडाव, बहुपत्नीकत्व स्वीकारण्याच्या काळातील त्याचं एकपत्नीव्रत, त्याचं प्रजाप्रेम इत्यादी कारणांनी तो आदरणीय आहे.
मात्र त्याच्या नावावर महाविद्वान शंबुकाची हत्या आणि सीतात्यागाची कथा घुसडण्यात आली. या दोन्ही कथा उत्तरकांडातल्या आहेत आणि हे कांड वाल्मिकी रामायणात प्रक्षिप्त असल्याचं अनेक अभ्यासकांनी सिद्ध केलंय. सीतेचे शेतीव्यवसायाशी असलेलं घट्ट नातं आणि रामाने परशुरामाचा केलेला संपूर्ण पाडाव या दोन गोष्टी परशुरामाच्या समर्थकांसाठी अडचणीच्या असल्याने बहुधा ही घुसवाघुसवी करण्यात आल असावी.
हे कोरोना स्पेशलही वाचाः
युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?
कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया
परशुराम आणि दशरथपुत्र राम यांच्यातला संघर्ष अत्यंत महत्त्वाचा आहे. या संघर्षातून दोन भिन्न संस्कृतीतला विरोधाभास समोर येतो. याची कथा अशी - राम आणि त्याचं संपूर्ण कुटुंब सीतेला विवाह करून अयोध्येला परतत असताना परशुराम विनाकारण रामाशी भांडण उकरतो. राम सुरवातीला अत्यंत विनयाने परशुरामाला समजवतो. परंतु परशुराम उद्दामपणे संघर्षासाठी इरेला पेटतो. त्यानंतरच राम परशुरामाचा पाडाव करतो. त्याच्या अहंकाराच्या ठिकऱ्या उडवतो. अत्यंत सोप्या वाटणार्या या कथेत अनेक छुपे पैलू लपलेले आहेत.
रामासारखे अनेक नायक स्वीकारायचे की नाही याबाबत अनेक बुद्धिप्रामाण्यवादी मंडळींमधे अनेक शंका असतात. पुरोगामी म्हणविणाऱ्या काही मंडळींमधे नि:पक्षपणा सापडत नाही. पण त्यामुळे गडबडून न जाता आपण भारतीयांनी आपलं अस्सल आणि निकोप सांस्कृतिक स्वत्व स्वयंस्फूर्तीने जपण्याची गरज आहे. आपल्या मूळ संस्कृतीत प्रक्षिप्त केलेल्या सर्व नकारात्मक गोष्टी विवेकाच्या चाळणीतून डबल फिल्टर करून, आपलं अभिमानास्पद मूळ अंतरंग आम्ही आता ओळखणं तेवढेच गरजेचं आहे.
रशुरामाने क्षत्रिय या वंशाचा एकदा नव्हे तर अनेकदा पाडाव करून या पृथ्वीवरून क्षत्रिय वंशाचे समूळ उच्चाटन केल्याची आख्यायिका इतिहासात नोंदवलेली आहे. या पार्श्वभूमीवर जेष्ठ प्राच्यविद्यापंडित डॉ आ. ह. साळुंखे सर यांच्या 'परशुराम - जोडण्याचे प्रतीक की तोडण्याचे' या अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तकाचे आकलन केल्यास वरील अनेक बाबींचा विस्तृत संदर्भ मिळू शकतो.
हेही वाचाः गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल
मात्र काहीही असो, परंतु क्षत्रियवंश संपूर्णपणे संपविण्याची अगदी हिटलरसारखी परवंशद्वेषी मानसिकता असलेल्या परशुरामाचा पाडाव करणार्या ख़र्या रामाची आज भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला गरज आहे. विशिष्ट वंश जगात सर्वोच्च ठरावा म्हणून मागील काही दिवसात जगभरात दुसऱ्या वंशाच्या नागरिकांना निर्घृण आणि क्रुरपणे ठार करण्याच्या काही विकृत घटना जगाने नुकत्याच अनुभवल्या आहेत. भारताबाहेर घडलेल्या अशा घटना सर्वांना डोळे उघडून आणि मेंदूची कवाडे खोलून गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडणाऱ्या आहेत.
म्हणूनच दशरथपुत्र रामाचा त्याच्या जन्मदिनी गौरव आणि आठवण सामाजिकदृष्ट्याही फार महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आम्हा भारतीयांची मनं ते करताना उचंबळून येतात. रामाला अनेक जण धार्मिक भावनेतून ईश्वर म्हणून पाहतात. मात्र मनुष्यधर्माच्या अंगानेही रामाचं स्थान सर्वसामान्य जनतेच्या हृदयात त्यापेक्षाही अधिक खोल रुजलेलं आहे.
हेही वाचाः
अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं?
६ डिसेंबर १९९२ : साडेचारशे वर्षांची वास्तू साडेचार तासात जमीनदोस्त
गुढीपाडवा FAQs: आपल्या मनात असणाऱ्या प्रश्नांची साधीसरळ उत्तरं